निकालपत्रः- श्रीमती सुमन प्र.महाजन, अध्यक्षा ठिकाणः बांद्रा निकालपत्र तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी कि, त्याने सामनेवाला क्र.1 यांनी तयार केलेला नोकिया मोबाईल हॅन्डसेट दि.06.05.2008 रोजी रक्कम रु.13,255/- ला विकत घेतला होता, त्याचा इन्व्हाईस तक्रारदाराने दाखल केला आहे. दि.21.04.2009 रोजी त्या मोबाईल हॅन्डसेटची बॅटरी लो दाखवत दाखवत पूर्ण रिकामी झाली व मोबाईल बंद पडला. बॅटरी चार्ज करुन पाहिली परंतु चार्ज झाली नाही. स्विच ऑनचे बटन दाबूनही तो चालू होत नव्हता, म्हणून तक्रारदाराने दि.22.04.2009 रोजी तो हॅन्डसेट सामनेवाला क्र.2 यांचेकडे नेला. त्यांनी दुरुस्तीसाठी तो हॅन्डसेट त्यांचेकडे ठेवून घेतला, त्याबद्दलची जॉबशीट तक्रारदारांने दाखल केली आहे. दि.29.04.2009 रोजी सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदाराला त्यांचे दुकानात बोलावून कळविले कि, तो हॅन्डसेट पडल्यामुळे बंद झाला आहे, त्यामुळे तो वॉरंटीत येत नाही असे कंपनीकडे हॅन्डसेट पाठविल्यानंतर एंन्ट्री लेव्हल स्क्रीनच्या वेळेस समजले. त्यांनी दुरुस्ती करण्यासाठी रु.250/- द्यावे असे तक्रारदाराला सांगितले. त्याबद्दलचे जॉबशीट या तक्रारीत दाखल आहे. मात्र तक्रारदार दुरुस्त करण्यासाठी खर्च देण्यास तयार नाहीत कारण त्याचे म्हणणे होते कि, मोबाईल हॅन्डसेट वॉंरंटीच्या कालावधीत असल्यामुळे पैसे देण्याची त्याची जबाबदारी नाही, त्यामुळे सदरचा हॅन्डसेट अजूनही सामनेवाला क्र.2 कडे पडून आहे कारण तक्रारदाराने तो परत घेतला नाही. सामनेवाला क्र.2 यांनी दि.22.04.2009 रोजी तक्रारदाराला दुसरा पर्यायी हॅन्डसेट वापरण्यास दिला होता, तो तक्रारदाराने दि.29.04.2009 रोजी त्यांना परत केला. तक्रारदारांचा मोबाईल हॅन्डसेट वॉरंटीत असूनही सामनेवाला यांनी तो मोफत दुरुस्त करुन दिला नाही ही सामनेवाला यांच्या सेवेत न्युनता आहे असा तक्रारदाराचा आरोप आहे. सदरची तक्रार करुन तक्रारदारांनी खालीलप्रमाणे केलेल्या आहेत. अ सामनेवाला यांचेकडून हॅन्डसेटची किंमत परत मिळावी. ब रक्कम रु.2,000/- ची नुकसान भरपाई मिळावी. क व या तक्रारीचा खर्च रक्कम रु.2,00/- मिळावा. 2 सामनेवाले क्र.1 यांना नोटीस मिळूनही ते हजर झाले नाहीत व तक्रारीस उत्तर दिले नाही. 3 सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदाराचे आरोप नाकारले आहेत. त्यांचे म्हणणे कि, तक्रारदाराचा मोबाईल त्यांचेकडे दुरुस्त होण्यासारखा नव्हता म्हणून त्यांनी तो कंपनीच्या मुख्य ऑफीसकडे पाठविला. त्यांनी तो RWR (RETURN WITHOUT REPAIR) या शे-यांने परत पाठविला. कारण तो पडल्यामुळे बंद पडला होता व त्यामुळे त्याची वॉरंटी संपली होती. सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदाराला कळविले कि, जर त्याला हॅन्डसेट दुरुस्त करावयाचा असेल तर त्यांने त्यांना रक्कम रु.250/- दुरुस्तीचा खर्च द्यावा परंतु तक्रारदार त्याला तयार नव्हते, म्हणून हॅन्डसेट त्यांचेचकडे पडून आहे. 4 आम्ही तक्रारदारांचे व सामनेवाला क्र.2 यांचे प्रतिनिधी यांचा युक्तीवाद ऐकला व कागदपत्रे वाचली. मोबाईल हॅन्डसेट सामनेवाला क्र.2 कडे दुरुस्तीला नेला, त्यावेळी त्याचा एक वर्षाचा वॉरंटी कालावधी संपलेला नव्हता मात्र सामनेवाला क्र.2 यांचे म्हणणे कि, तो पडल्यामुळे बंद पडला. वॉरंटीच्या शर्ती व अटी सामनेवाले यांनी दाखल केलेल्या नाहीत. तसेच तो हॅन्डसेट पडल्यामुळे त्याला नुकसान झाले किंवा तो बंद पडला याबद्दलचा लेखी पुरावा किंवा तज्ञांचे मत सामनेवाले यांनी दाखल केलेले नाही, त्यामुळे सामनेवाला यांचा बचाव कि हॅन्डसेट पडल्यामुळे बिघडला व त्याची वॉरंटी रद्द झाली आहे हे मान्य करता येत नाही. हॅन्डसेट वॉरंटीत असल्यामुळे सामनेवाला यांनी तो मोफत / चार्ज न घेता दुरुस्त करुन दयावयास पाहिजे होता, तो त्यांनी केला नाही, ही त्यांच्या सेवेत न्यूनता आहे. तक्रारदाराने हॅन्डसेटची पूर्ण मागितली आहे किंवा त्याला त्याच किंमतीचा नवीन हॅन्डसेट दयावा अशी मागणी केली आहे. मंचाच्या मते ही मागणी अवास्तव व गैर आहे. कारण जवळ जवळ एक वर्षे तक्रारदाराने तो हॅन्डसेट वापरला आहे. मात्र हॅन्डसेट वॉरंटी कालावधीत असल्यामुळे तो सामनेवाला यांनी दुरुस्त करुन दयावा व तक्रारदाराला मानसिक त्रास झाल्याबद्दल थोडी नुकसान भरपाई द्यावी असे मंचास वाटते. याप्रकरणी खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश (1) तक्रार अर्ज क्र.249/2011(627/2009) अंशतः मंजूर करण्यात येत आहे. (2) सामनेवाला यांनी तक्रारदाराचा नोकिया हॅन्डसेट दुरुस्त करुन चालू करुन द्यावा. (3) सामनेवाला क्र.1 व 2 यांनी एकत्रितरित्या व वैयक्तिकरित्या तक्रारदाराला रक्कम रु.1,000/- नुकसानभरपाई द्यावी व या तक्रारीचा खर्च रु.1,000/- द्यावा. (4) आदेशाच्या प्रमाणित प्रती दोन्हीं पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.
| [HONORABLE G L Chavan] Member[HONABLE MRS. S P Mahajan] PRESIDENT | |