द्वारा- श्री एस के कापसे, मा. सदस्य
:- निकालपत्र:-
दिनांक 10 मे 2012
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदार श्री रेसिडन्सी सोसायटीचे सदस्य आहेत. तक्रारदारांनी जाबदेणारांकडून पाईप गॅसचा पुरवठा घेतला होता. जाबदेणार गॅस पुरवठयासाठी बिल आकारणी ज्यामध्ये रुपये 20/- सर्व्हिस चार्जेसचा समावेश होता, आकारणी करीत होते. मार्च 2009 मध्ये जाबदेणार यांनी सर्व्हिस चार्जेस रुपये 25/- वरुन रुपये 45/- केली. तक्रारदारांनी जाबदेणार यांच्याकडे यासंदर्भात विचारणा केली असता दिनांक 4/4/2009 च्या उत्तराद्वारे जाबदेणार यांनी सिलेंडर ट्रान्सपोर्ट करण्यासाठी, अखंडित गॅस पुरवठयासाठी, रबर पार्ट बदलण्यासाठी, उपकरण बंद पडल्यास, पाईपलाईन रंगविण्यासाठी आकारणी करण्यात येत होती असे नमूद केले. तसेच जाबदेणार यांनी सदस्यांकडून परतावा डिपॉझिट रुपये 500/- घेतलेले नव्हते, जर सदस्यानी गॅस पुरवठा घेण्याचे बंद केले तरच ती रक्कम परत मिळणार होती. जाबदेणार यांनी दिलेले उत्तर तक्रारदारांना मान्य नसल्यामुळे तक्रारदारांनी मार्च 2009 ते एप्रिल 2009 या कालावधीतील सर्व्हिस चार्जेस वजा जाता गॅसचे बिल भरलेले आहेत. जाबदेणार यांनी तक्रारदारांना विलंबापोटी रुपये 40/- ची आकारणी करणारे बिल पाठविले. कुठलेही समाधानकारक कारण न देता जाबदेणार यांनी तक्रारदारांचा गॅस पुरवठा दिनांक 8/5/2009 पासून बंद केला. म्हणून तक्रारदारांनी दिनांक 23/5/2009 रोजी जाबदेणार यांना नोटीस पाठविली. जाबदेणार यांनी दिनांक 24/06/2009 रोजी नोटीसला उत्तर देऊन सर्व्हिस चार्जेस भरण्यास सांगितले. जाबदेणार फक्त गॅसच्या वापराचे रिडींग घेण्यासाठी तक्रारदारांकडे येत असत, परंतु बिलाची आकारणी कशी केली जात होती याचा तपशिल तक्रारदारांना देण्यात आला नव्हता. म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून गॅसचा पुरवठा मागतात, जाबदेणार यांनी सर्व्हिस चार्जेसची आकारणी करु नये अशी मागणी करतात. तक्रारदारांकडून घेण्यात आलेले सर्व्हिस चार्जेस रुपये 140/- परत मागतात, तसेच कॉम्पनसेटरी कॉस्ट रुपये 25000/-, नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च रुपये 10,000/- एकूण रुपये 35,140/- 18 टक्के व्याजासह व इतर दिलासा मागतात. तक्रारदारांनी शपथपत्र आणि कागदपत्रे दाखल केली.
2. जाबदेणार यांनी लेखी जबाब दाखल करुन तक्रारदारांच्या मागणीस विरोध दर्शविला. तक्रारदार आणि जाबदेणार यांच्यात कुठलाही करार झालेला नाही. कुठल्या तरतुदी अंतर्गत जाबदेणार सर्व्हिस चार्जेस आकारु शकत नाहीत याचा उल्लेख तक्रारदारांनी केलेला नाही. जाबदेणार यांनी कुठल्या तरतुदी अंतर्गत गॅस पुरवठा दिलाच पाहिजे अथवा कुठल्या तरतुदी अंतर्गत गॅस पुरवठा खंडित करु नये याबाबत तक्रारदारांनी उल्लेख केलेला नाही. सदनिका धारकांच्या सोईसाठी काही प्रमोटर बिल्डर पाईप गॅसची सुविधा देतात. HPCL यांनी निश्चित केलेल्या दरानुसार जाबदेणार प्रत्यक्षात वापरलेल्या गॅस साठी ग्राहकाकडून आकारणी करतात. प्रत्येक ग्राहकामागे पाईप गॅसची इन्स्टॉलेशन कॉस्ट रुपये 9000/- होती. प्रमोटर बिल्डर यांनी त्यानुसार जाबदेणार यांना रक्कम अदा केलेली होती. बिल्डरनी ती रक्कम तक्रारदारांकडून घेतली होती का नाही याबाबत जाबदेणार यांना माहिती नाही. HPCL यांनी पाईप गॅस बसविण्यासंदर्भातील पॉलिसी व अटी संदर्भातील circular दिनांक 13/8/2008 मध्ये 8.6.1 मध्ये जाबदेणार सर्व्हिस चार्जेस आकारणी करुन करतात असे नमूद करण्यात आलेले आहे. जर तक्रारदारांना सर्व्हिस चार्जेस दयावयाचे नसतील तर ते पाईप गॅसचा पुरवठा खंडित करु शकतात असे नमूद करुन तक्रार खर्चासह नामंजुर करावी अशी मागणी जाबदेणार करतात. जाबदेणार यांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
3. उभय पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पहाणी केली. तक्रारदारांनी जाबदेणार यांच्याकडून डायरेक्ट पाईप गॅस पुरवठा घेतला होता, तक्रारदार व जाबदेणार यांच्यात पाईप गॅस पुरवठा व त्यासंदर्भातील आकारणी बाबत करार झाला होता, व करारातील ठरलेल्या अटी व शर्तीनुसार जाबदेणार यांनी आकारणी न करता अधिकच्या सर्व्हिस चार्जेसची आकारणी केली यासंदर्भातील कागदपत्री पुरावा मंचासमोर दाखल केलेला नाही. जाबदेणार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली असता दिनांक 8/3/2005 च्या पत्रान्वये जाबदेणार यांनी आर्या शक्ती डेव्हलपर्स यांना पाईप गॅस पुरवठयासंदर्भात जाबदेणार यांच्या अटी व शर्ती, आकारणी कशी होणार याबाबत कळविल्याचे स्पष्ट होते. तसेच त्याच पत्रामध्ये जाबदेणार यांनी पहिल्या वर्षी मेंटेनन्स नि:शुल्क राहिल व नंतर नॉमिनल आकारणी करण्यात येईल असेही नमूद केल्याचे स्पष्ट होते. जाबदेणार यांच्या अटी व शर्ती आर्या शक्ती डेव्हलपर्स यांना मान्य असल्याचे व तक्रारदारांच्या श्री रेसिडन्सी येथे पाईप गॅस पुरवठा जाबदेणार यांनी दयावा असे कळविल्याचे स्पष्ट होते. म्हणजेच जाबदेणार व आर्या शक्ती डेव्हलपर्स यांच्यामध्ये पाईप गॅस संदर्भातील करार झाला होता, जाबदेणार यांनी पहिल्या वर्षी मेंटेनन्स नि:शुल्क राहिल व नंतर नॉमिनल आकारणी करण्यात येईल असे आर्या शक्ती डेव्हलपर्स यांना कळविले होते, त्यांनी ते मान्यही केले होते ही बाब स्पष्ट होते. तक्रारदार आणि जाबदेणार यांच्यात कुठलाही करार झालेला नव्हता, तक्रारदारांनी आर्या शक्ती डेव्हलपर्स यांना प्रस्तूत तक्रारीमध्ये पक्षकार केलेले नाही. हिन्दुस्तान पेट्रोलिअम कार्पोरेशन लिमिटेड यांनी दिनांक 18/8/2008 च्या पत्रानुसार जाबदेणार सर्व्हिस चार्जेसची आकारणी करु शकतात हे दाखल दिनांक 18/8/2008 च्या पत्रावरुन स्पष्ट होते. त्यानुसारच जाबदेणार यांनी सर्व्हिस चार्जेस ची आकारणी केलेली आहे असे मंचाचे मत आहे. त्यामुळे तक्रारदारांची तक्रार मंच नामंजुर करीत आहे.
:- आदेश :-
1. तक्रार नामंजुर करण्यात येत आहे.
2. खर्चाबद्यल आदेश नाही.
आदेशाची प्रत दोन्ही पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.