निकालपत्र
(1) मा.सदस्य,श्री.सी.एम.येशीराव – विरुध्दपक्ष यांनी तक्रारदारांना योग्य व तत्पर सेवा देण्यात कसुर केली म्हणून नुकसानभरपाई मिळणे करिता, तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
(2) तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, त्यांनी विरुध्दपक्ष यांचेकडून दि.03-06-2008 रोजी रु.1,26,500/- किमतीचे कॉम्प्यूटराइज्ड व्हिल अलाइनमेंट मशिन व कॉम्प्यूटराईज्ड व्हिल बॅलेन्सर मशिन खरेदी केले. सदर मशिनची दोन वर्षाची तोंडी गॅरंटी दिलेली होती. परंतु सदर मशिन अचुक निष्कर्ष देत नव्हते. त्यामुळे तक्रारदाराने या बाबत दि.18-05-2009 रोजी लेखी तक्रार केली. यापुर्वीही बराचवेळ फोनवर तोंडी तक्रारी केलेल्या आहेत. तक्रार करतेवेळी डिलेव्हरी चलन व प्रोफार्मा इनव्हाईस इ. कागदत्रांची मागणी केली. दि.16-07-2009 तसेच 10-09-2009 रोजी या मशिनरीचे सेन्सॉर विरुध्दपक्ष यांनी बदलून दिले. मात्र त्यानंतरही मशिन वारंवार नादुरुस्त होत होते. त्यामुळे तक्रारदारास वारंवार त्यांचा व्यवसाय बंद ठेवावा लागला होता. त्यामुळे त्यांच्या व्यवसायाचे नुकसान होत होते. म्हणून तक्रारदाराने दि.24-11-2009 रोजी विरुध्दपक्ष यांना वकीला मार्फत नोटिस पाठविली. नोटिस पाठविल्यानंतरही विरुध्दपक्ष यांनी नोटिसीची दखल घेतली नाही. म्हणून तक्रारदाराने सदोष नादुरुस्त मशिन बदलून देण्यासाठी, नुकसान भरपाई व शारीरिक, मानसिक त्रासापोटी रु.1,00,000/- मिळण्यासाठी तसेच तक्रारीचा खर्च रु.10,000/- मिळण्यासाठी या न्यायमंचात तक्रार दाखल केलेली आहे.
(3) विरुध्दपक्ष यांना मंचातर्फे नोटिस काढण्यात आली. त्यानुसार ते मंचात हजर झाले. त्यांनी मंचात खुलासा दाखल केला. त्यात त्यांनी असे कथन केले आहे की, सदर तक्रार या मंचाच्या अधिकार क्षेत्राबाहेर आहे, ग्राहक संरक्षण कायद्यानुसार तक्रार चालू शकत नाही. सदर वाद हा दिवाणी स्वरुपाचा आहे, त्यामुळे या मंचात चालूशकत नाही. तक्रारदार हे व्यावसायीक आहेत त्यामुळेही तक्रार चालविण्याचा मंचास अधिकार नाही. तक्रारीस मिस जॉईंडर ऑफ पार्टीज आणि नॉन जॉईंडर ऑफ नेसेसरी पार्टीज या तत्वाची बाधा येते. तक्रारदाराकडून विरुध्दपक्षाचे रु.26,500/- घेणे बाकी आहेत. विरुध्दपक्ष यांनी अहमदाबाद येथे सदरचे मशिन विकलेले आहे, त्यामुळे मंचास तक्रार चालविण्याचा अधिकार नाही. तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या संज्ञेत येत नाही. मशिनचा मेंटेनन्स किंवा दुरुस्ती करुन देण्याची विरुध्दपक्ष यांची जबाबदारी नाही. त्यांनी तक्रारदारास सदर मशिनची कोणतीही गॅरंटी अथवा वॉरंटी दिलेली नाही. त्यांनी वेळोवेळी तक्रारदारास सदर मशिनचे स्पेअर पाटर्स पुरविलेले आहेत. तक्रारदाराची तक्रार खोटी आहे. तक्रारीतील कथन खोटे आहे. त्यामुळे तक्रारदारांची तक्रार कॉम्पेंसेटरी कॉस्टसह रद्द करण्यात यावी अशी त्यांनी शेवटी विनंती केली आहे.
(4) तक्रारदार यांनी नि.नं.2 वरील आपल्या अर्जाच्या पृटयर्थ नि.नं. 3 वर शपथपत्र तसेच नि.नं. 6 वरील कागदपत्रांच्या यादीनुसार, नि.नं.6/1 वर डिलेव्हरी चलन, नि.नं.6/2 वर प्रोफार्मा इनव्हाईस, नि.नं.6/3 वर जकात पावती, नि.नं.6/4 व नि.नं.6/5 वर पत्र आणि नोटिसीची स्थळप्रत, नि.नं.6/6 वर विरुध्दपक्ष यांची पोहोच पावती, नि.नं.6/7 वर नोटिस उत्तराची प्रत तसेच नि.नं.15 वर पुराव्याचे शपथपत्र तसेच नि.नं.17/1 वर रिपोर्ट तसेच नि.नं.18 ला कोर्ट कमशिरन नियुक्त करण्यासाठी दिलेला विनंती अर्ज व नि.नं. 27 ला कोर्ट कमशिनर यांनी दिलेला कमिशनर अहवाल दाखल केला आहे.
विरुध्दपक्ष यांनी नि.नं.13 वर आपला खुलासा दाखल केला असून, नि.नं.14 वर शपथपत्र दाखल केले आहे.
(5) तक्रारदारांची तक्रार, विरुध्दपक्ष यांचे म्हणणे तसेच दाखल कागदपत्रांवरुन आमच्यासमोर निष्कर्षासाठी पुढील मुद्दे उपस्थित होतात व त्यांची उत्तरे आम्ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.
मुद्देः | निष्कर्षः |
(अ)तक्रारदार हे विरुध्दपक्ष यांचे ग्राहक आहेत काय ? | ःहोय. |
(ब)सदर तक्रार चालविण्याचा या न्यायमंचास अधिकार आहे काय ? | ःहोय. |
(क)तक्रारदार मशिन बदलून मिळण्यास, मानसिक व शारीरिक त्रासाची रक्कम व नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे काय ? | ःहोय. |
(ड)आदेश काय ? | ःअंतिम आदेशानुसार |
विवेचन
(6) मुद्दा क्र. ‘‘अ’’ - तक्रारदारांनी नि.नं.6/2 वर रु.1,26,500/- किमतीचे कॉम्प्यूटराइज्ड व्हिल अलाइनमेंट मशिन व कॉम्प्यूटराईज्ड व्हिल बॅलेन्सर मशिन विरुध्दपक्ष यांचेकडून खरेदी केल्याची पावती दाखल केलेली आहे. तक्रारदाराने विरुध्दपक्ष यांच्याकडून तक्रारीतील मशिन घेतल्याची बाब विरुध्दपक्ष यांनी मान्य केलेली आहे. त्यानुसार तक्रारदार हे विरुध्दपक्ष यांचे ग्राहक आहेत असे या न्यायमंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र. ‘‘अ’’चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(7) मुद्दा क्र. ‘‘ब’’ - तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीत ते स्वतः मोटारवाहन व्हिल अलाइनमेंटचा व्यवसाय करतात व त्याच्या उत्पन्नावर स्वतःची व त्यांच्या कुटूंबाची उपजीवीका भागविली जाते असे स्पष्टपणे नमूद केलेले आहे. तक्रारदारांनी तक्रारीत असेही नमूद केले आहे की, विरुध्दपक्ष यांनी सदरची मशीनरी धुळे येथे तक्रारदारांकडे येऊन बसवून दिलेली आहे आणि मशिनरीचा मोबदलाही धुळे येथे स्वीकारलेला आहे. मशिनरी घेतल्यानंतर ती वारंवार नादुरुस्त धुळे येथे झाली आहे व वेळोवेळी विरुध्दपक्ष यांनी धुळे येथे येऊनच मशिनरी दुरुस्त करुन देण्याचा प्रयत्न केलेला आहे तसेच मशिनरीचे सेन्सॉर बदलून दिले आहे. ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदीनुसार त्यांच्यातील व्यवहार हा धुळे येथे झालेला आहे. वरील सर्व बाबी पाहता तक्रारीस संपूर्णतः तसेच अंशतः कारणही धुळे येथेच घडलेले आहे. त्यामुळे सदर तक्रार चालविण्याचा या न्यायमंचास अधिकार आहे. तसेच विरुध्दपक्ष यांनी तक्रारीस नॉन जॉईडर ऑफ नेसेसरी पार्टीज व मिस जॉईंडर ऑफ पार्टीज या तत्वाची बाधा येते अशी हरकत घेतलेली आहे. मात्र या बाबत कुठलाही सुस्पष्ट खुलासा अथवा कारणे त्यांनी दिलेली नाहीत. आवश्यक पक्षकार तसेच अनावश्यक पक्षकार कोणते आहेत या बद्दलची स्पष्ट कारणे अथवा त्यांची नांवे विरुध्दपक्ष यांनी दिलेली नाहीत. त्यामुळे तक्रारीस नॉन जॉईडर ऑफ नेसेसरी पार्टीज व मिस जॉईंडर ऑफ पार्टीज या तत्वाची बाधा येत नाही असे आम्हास वाटते. म्हणून मुद्दा क्र. ‘‘ब’’चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(8) मुद्दा क्र. ‘‘क’’ – तक्रारदाराने विरुध्दपक्षाकडून रु.1,26,500/- किमतीचे कॉम्प्यूटराइज्ड व्हिल अलाइनमेंट मशिन व कॉम्प्यूटराईज्ड व्हिल बॅलेन्सर मशिन विकत घेतले आहे. मशिन घेतल्यापासूनच ते व्यवस्थित चालत नव्हते. त्यात बिघाड होत होता, मशिन आवश्यक व अचूक निष्कर्ष देत नव्हते. म्हणून तक्रारदाराने विरुध्दपक्ष यांच्याकडे वेळोवेळी तोंडी व लेखी तक्रार केलेली दिसून येते. त्या तक्रारीनुसार विरुध्दपक्ष यांनी वेळोवेळी मशिन दुरुस्त करुन दिलेले आहे व सेन्सॉर बदलून दिलेले आहे. मात्र त्यानंतरही सदर मशिन व्यवस्थित काम करीत नव्हते म्हणून तक्रारदाराने वकीला मार्फत विरुध्दपक्षाला नोटिसही पाठविली होती. सदर नोटिस व लेखी तक्रार नि.नं.6/4,6/5 वर दाखल आहे आणि ही बाब विरुध्दपक्ष यांनाही मान्य आहे. विरुध्दपक्षाचे नोटिस उत्तर नि.नं.7 वर दाखल आहे. तक्रारदारांची त्यांच्या म्हणण्याचे पृष्टयर्थ नि.नं.17/1 वर विरुध्दपक्षाच्या मॅकेनिकने दिलेला सर्व्हिस रिपोर्ट दाखल केला आहे. यावरुन मशिनरीत बिघाड होता व ते दुरुस्त करण्यात आले होते ही बाब स्पष्ट होते. मात्र त्यानंतरही मशिन पुर्णपणे दुरुस्त झालेले नव्हते ही बाब स्पष्ट होते. या कामी तक्रारदाराने दिलेला कोर्टकमिशनर नेमणूकीचा अर्ज मंचातर्फे मंजूर करण्यात आला. त्यानुसार ऑटेक इंजिनीअरींग कॉर्पोरेशन, पुणे या कोर्टकमिशनरचा अहवाल नि.नं.27 वर दाखल आहे. सदर अहवालात त्यांनी मशिनरीमध्ये काय दोष आहे या बाबत चार प्रमुख दोष नमूद केले आहेत,ते खालील प्रमाणे.
(1) Malfunctioning of communication between the measuring sensors & computer.
(2) Unstable reading of Alignment angles due to improper positioning of Sensor .
(3) Malfunctioning of software.
(4) Improper assemblty & fitment of Measuring Sensors.
सदर अहवालाचे वाचन करता व तक्रारदारांच्या तक्रारीतील कथन पाहता विरुध्दपक्ष यांनी तक्रारदारांना सदोष मशिनरी पुरविली व ती वारंवार नादुरुस्त होत होती ही बाब शाबीत झालेली आहे असे आम्हास वाटते.
(9) विरुध्दपक्ष यांनी तक्रारदारांना सदोष मशिनरी पुरविली व ती वारंवार नादुरुस्त होत होती त्यामुळे तक्रारदारास वारंवार त्यांचा व्यवसाय बंद ठेवावा लागत होता. त्यामुळे त्यांचे आर्थीक नुकसानही होत होते. सदोष मशिनरीमुळे तक्रारदारांना निश्चितच शारीरिक, मानसिक त्रास झाला आहे व त्यामुळे ही तक्रार दाखल करावी लागली आहे. विरुध्दपक्ष यांनी सदोष मशिन पुरविल्याची बाब पुराव्यावरुन शाबीत झाली आहे. सदोष मशिन वारंवार दुरुस्त करुनही त्यातील दोष दुरुस्त झालेले नाहीत. ही बाब पाहता तक्रारदार हे विरुध्दपक्ष यांच्याकडून नविन कॉम्प्यूटराइज्ड व्हिल अलाइनमेंट मशिन व कॉम्प्यूटराईज्ड व्हिल बॅलेन्सर मशिन मिळण्यास पात्र आहेत तसेच शारीरिक, मानसिक त्रासासाठी व नुकसानीची रक्कम मिळण्यास पात्र आहेत असे आमचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र. ‘‘क’’चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(10) तक्रारदाराने नुकसान भरपाईपोटी रु.1,00,000/- ची मागणी केली आहे. तसेच ते व्यवसायातून रोज रु.500/- ते 1,000/- कमावत होते असेही कथन केले आहे. मात्र त्यांनी नुकसानीबद्दल कोणताही पुरावा मंचासमोर दाखल केलेला नाही. मात्र मशिन सदोष होते ही बाब तज्ज्ञ अहवालानुसार स्पष्ट झालेली आहे. त्यामुळे निश्चितच तक्रारदारांच्या व्यवसायाचे नुकसान झालेले आहे ही बाब स्पष्ट झाली आहे. सदर बाब पाहता तक्रारदार हे नुकसान भरपाईपोटी रु.10,000/- तसेच मानसिक, शारीरिक त्रासापोटी रु.5,000/- व तक्रारीचा खर्च रु.2,000/- मिळण्यास पात्र आहेत असे आम्हास वाटते.
(11) मुद्दा क्र. ‘‘ड’’ – वरील विवेचनावरुन आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोत.
आदेश
(अ) तक्रारदारांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
(ब) सदर निकालाच्या तारखेपासून पूढील तीस दिवसांचे आत, विरुध्दपक्ष यांनी.
(1) तक्रारदारास नवीन कॉम्प्यूटराइज्ड व्हिल अलाइनमेंट मशिन व कॉम्प्यूटराईज्ड व्हिल बॅलेन्सर मशिन द्यावे आणि तक्रारदाराच्या ताब्यातील दोषीत मशीन परत घ्यावे.
(2) तक्रारदारास नुकसान भरपाईपोटी रक्कम 10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त), मानसिक, शारीरिक त्रासापोटी रक्कम 5,000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) आणि तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम 2,000/- (अक्षरी रुपये दोन हजार फक्त) द्यावेत.
(3) उपरोक्त आदेश कलम 2 व 3 मध्ये नमूद केलेली रक्कम मुदतीत न दिल्यास त्यावर तक्रार दाखल तारखे पासून ते संपूर्ण रक्कम देईपर्यंतचे कालावधीसाठी द.सा.द.शे.9 टक्के प्रमाणे व्याज तक्रारदारास द्यावे.
धुळे
दिनांक – 02-02-2012.
(सी.एम.येशीराव) (डी.डी.मडके)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,धुळे.