जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/217. प्रकरण दाखल तारीख - 01/10/2009 प्रकरण निकाल तारीख – 18/02/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्री.सतीश सामते - सदस्य माधव पि. दत्ता रामपूरे वय, 32 वर्षे, धंदा शेती, रा.पाचपिंपळी ता.बिलोली जि.नांदेड अर्जदार विरुध्द. 1. निर्मल सिडस प्रा.लि. पाचोरा जि. जळगांव. 2. मे.ज्ञानेश्वर कृषी सेवा केंद्र, गैरअर्जदार कासराळी ता. बिलोली, जि. नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.बी.एस.शिंदे. गैरअर्जदार क्र.1 व 2 तर्फे वकील - अड.पी.एस.भक्कड. निकालपञ (द्वारा - मा.श्री.बी.टी.नरवाडे, पाटील, अध्यक्ष ) गैरअर्जदार यांनी भेसळयूक्त बियाणे पूरवून सेवत ञूटी केली म्हणून अर्जदारास नूकसान भरपाईपोटी रु.85,000/- 12 टक्के व्याजाने गैरअर्जदाराकडून मिळावेत तसेच झालेल्या मानसिक ञासापोटी रु.10,000/- व दावा खर्च म्हणून रु.5,000/- मिळावेत म्हणून ही तक्रार दाखल केली आहे. अर्जदार हे पाचपिंपळी ता. बिलोली येथे शेत गट नंबर 22/3 मध्ये 1 हे.90 आर जमिनीमध्ये शेती करतात. त्यांनी गैरअर्जदार यांचे कंपनीचे नाविन्य 6 कापसाचे बियाणे गैरअर्जदार क्र.2 यांचेकडून दि.08.06.2009 रोजी खरेदी केले व आणखी एक बँक दि.12.06.2009 रोजी खरेदी केली. ज्यांचा लॉट नंबर 8670 असा आहे. योग्य पाऊस पडल्यानंतर गावांतील सर्व शेतक-यासोबत त्यांने संबंधीत बियाण्याची लागवड दि.06.07.2009 रोजी आपल्या शेतात केली. यानंतर काही दिवसांनी गावांतील इतर शेतक-यांनी त्यांचे शेतात पेरलेल्या इतर जातीच्या कापसाच्या बियाण्यांची उगवण चांगली झाली परंतु अर्जदाराने त्यांचे शेतात पेरलेलया बियाण्याची उगवण झालीच नाही. सदर बियाणे हे थोडया प्रमाणात उगवले पण ते भेसळ बारक्या कापसाचे बोगस कापूस नीघाले त्यामूळे त्यांचे नूकसान झाले. सदर प्रकाराची तक्रार अर्जदाराने तालूका कृषी अधिकारी, बिलोली व गट विकास अधिकारी बिलोली यांचेकडे दि.21.07.2009 रोजी केली. त्याप्रमाणे त्यांनी अर्जदार यांचे शेतात दि.28.07.2009 रोजी येऊन स्थळ पाहणी करुन पंचनामा केला. पंचनाम्याप्रमाणे बियाण्याची उगवण ही 35 टक्के असल्याचे आढळून आले व सदर बियाणे हे भेसळ स्वरुपाचे आहे असा उल्लेख केला. अर्जदाराने वर्षभर शेतीची मशागत करुन बियाणे, खतांचा वापर करुन, शेतात पेरणीसाठी मजूर लाऊन या सर्वावर खर्च केला तरी कापसाची उगवण झाली नाही म्हणून गैरअर्जदाराने पूरवीलेल्या निकृष्ट दर्जाचे बियाणेमूळे त्यांचे आर्थिक नूकसान झाले आहे. योग्य उगवण झाली असती तर रु.85,000/- चे उत्पन्न अर्जदारास झाले असते म्हणून नूकसान भरपाई मिळण्यासाठी अर्जदाराने गैरअर्जदारांना दि.18.08.2009 रोजी नोटीस पाठविली परंतु यांचें उत्तर त्यांनी दिले नाही. म्हणून अर्जदाराने गैरअर्जदार यांचे विरुध्द मागणी प्रमाणे आदेश व्हावा असे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी वेगवेगळा जवाब दाखल केला असला तरी दोघांचे म्हणणे एकच आहे, त्यामूळे एकञच जवाब देत आहोत. गैरअर्जदार यांनी कोणताही अनूचित व्यापार पध्दतीचे उल्लंघन केलेले नाही. अर्जदाराची तक्रार खोटी आहे. गैरअर्जदारांचा असा आक्षेप आहे की, संबंधीत बियाणे प्रयोगशाळेमध्ये पाठवून त्यांची तपासणी होत नाही तोपर्यत बियाणे मध्ये दोष आहे असे म्हणता येणार नाही. महाराष्ट्र शासनाने प्रत्येक जिल्हामध्ये तज्ञ व्यक्तीची सिड समिती स्थापन केलेली आहे व सिड कमिटीने पण संपूर्ण कारणे लिहून आपला अभिप्राय देणे गरजेचे आहे. सदर प्रकरणामध्ये अर्जदाराने दाखल केलेला अहवाल कायदयाप्रमाणे वाचता येत नाही. त्यामध्ये बियाण्यामध्ये दोष आहे असे कूठेही म्हटलेले नाही. कृषी विकास अधिकारी व तालूका कृषी अधिकारी यांनी अर्जदार यांचे शेतामध्ये जाण्याआधी गैरअर्जदार यांना सूचना दिलेली नाही. अर्जदाराने बियाणे गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून दि.09.6.2009 रोजी विकत घेतलेले आहे व सदरचे बियाणे त्यांनी केव्हा लागवन केली यांची नेमकी तारीख दिलेली नाही. तसेच पंचनामा दि.27.07.2009 रोजी करण्यात आलेला दिसतो. सदरील बियाणे हे 15 मे ते 30 जून पर्यत लागवण करणे जरुरीचे आहे त्याबददलची माहीती शेतक-यांनी दिलेली आहे. गैरअर्जदाराने दिलेल्या सूचनाचे अर्जदाराने पालन केलेले नाही. त्यामूळे उगवणीमध्ये फरक पडू शकतो. त्यासाठी बियाणे बरोबर नाही असा आरोप करता येणार नाही. अर्जदाराने सन 2008-09 चा 7/12 मंचा समोर दाखल केलेला नाही. त्यामूळे जमिनीमध्ये पेरल्याचा पूरावा नाही. अर्जदाराने गैरअर्जदार क्र.1 यांनी उत्पादित केलेले बियाणे गैरअर्जदार क्र.2 यांचेकडून खरेदी केले ही बाब अमान्य आहे. कारण अर्जदाराने लिहीलेला लॉट नंबर 8670 हा चूक आहे. सदर लॉट नंबरचे बियाणे गैरअर्जदाराने उत्पादित केलेले नाही. गैरअर्जदाराने उत्पादित केलेल्या बियाण्याचा लॉट नंबर 84476, 75072, 76428 असे आहेत. त्यामूळे मंचासमोर असे सहा प्रकरण प्रंलबित आहेत. त्यामूळे अर्जदारास बियाणाचे पाकीट व लेबल दाखल करण्याचे आदेश करण्यात यावेत. अर्जदाराने दाखल केलेल्या पंचनाम्यामध्ये असे कूठेही लिहीलेले नाही की, कापूस भेसळ बारक्या कापसाचे आहे. गैरअर्जदार क्र.1 यांनी सदरील बियाणे उत्पादित केल्यावर अतिउच्च प्रतीच्या प्रयोगशाळेत तज्ञ व्यक्तीकडून तपासून घेतलेले आहे. पंचनाम्यामध्ये शेतामध्ये 35 टक्के उगवण झाली ही बाब गैरअर्जदार यांनी अमान्य केलेली आहे. पंचनाम्यात लॉट नंबर यांचा उल्लेख नाही. अर्जदाराने वर्षभर शेतीची मशागत केली व खताचा वापर केला व शेतावर काही खर्च केला ही बाब गैरअर्जदार यांना अमान्य आहे. गैरअर्जदार यांचे पञकाप्रमाणे 750 ते 1000 ग्रॅम बियाणे प्रति एकर वापरावयास पाहिजे व बागायती जमिनीसाठी 5 x 4 फूट व जिरायती जमिनीसाठी 4 x 3 फूट अंतरावर पेरावयास पाहिजे. जून व जूलै महिन्यात पावसाचे प्रमाण कमी असल्यामूळे सदर बियाण्याचे उगवण शक्तीचे प्रमाण कमी होऊ शकते. बियाणे खोलवर गेल्यावर बियाण्याची उगवण कमी होऊ शकते. तसेच चूकीच्या व्यवस्थापनामूळे देखील बियाण्याची उगवण कमी होऊ शकते. अर्जदाराने गैरअर्जदार यांना नोटीस दिली ही बाब मान्य आहे परंतु त्यांनी नोटीसचे उत्तरही दिलेले आहे. कृषी विकास अधिकारी यांनी दिलेला अहवाल यांना तज्ञाचा अहवाल म्हणता येणार नाही. अर्जदाराने त्यांला किती कापूस झाला यांचा तपशील दिलेला नाही. म्हणून तक्रार ही खोटी असल्याकारणाने ती खर्चासह फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र.2 यांनी गैरअर्जदार क्र.1 यांचे उत्पादित बियाणे बंद पाकीटात घेऊन तसेच अर्जदारास विक्री केलेले आहे. सदरचे प्रकरण हे वॉरंटीत येते म्हणून गैरअर्जदार क्र.2 यांचे विरुध्द ही तक्रार चालू शकत नाही. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ,तसेच गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी आपआपले पूरावे म्हणून आपआपले शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार क्र.1 यांचे सेवेतील ञूटी किंवा व्यापारात अनूचित पध्दतीचा अवलंब असल्याचे अर्जदार सिध्द करतात काय ? नाही. 2. गैरअर्जदार क्र.2 यांचे सेवेतील ञूटी सिध्द होते काय ? होय. 3.. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- अर्जदार यांनी दि.08.6.2009 रोजी व दि.12.06.2009 रोजी गैरअर्जदार क्र.2 यांचेकडून नाविन्य 6 या कापसाच्या बियाण्याचे दोन बँग ज्यांचा लॉट नंबर 8670 असा आहे ते खरेदी केले. उत्पादक कंपनी गैरअर्जदार क्र.1 आहे ते विबत घेतल्याबददलची पावती नंबर 437 व 359 दाखल केलेली आहे. दि.21.7.2009 रोजी तालूका कृषी अधिकारी यांचेकडे तक्रार केली म्हणजे एकच महिन्यामध्ये बियाण्याच्या उगवणी बददल तक्रार केली. यानंतर दि.28.7.2009 रोजी तालूका कृषी विकास अधिकारी यांनी स्थळ पाहणी करुन पंचनामा केला. तो पंचनामा या प्रकरणात दाखल आहे. पंचनाम्यानुसार अर्जदार यांचे शेतात रॅडंम पध्दतीने पाहणी केली असता कापसाच्या बियाण्याची उगवण 35 टक्के झाल्याचे दिसून येते एवढेच म्हटले आहे. अर्जदाराने आपल्या तक्रारीत बियाणे भेसळयूक्त असल्या बददलचे म्हटले आहे. त्यांचा या पंचनाम्यात कूठेही उल्लेख नाही. तसेच गेरअर्जदार यांनी आपल्या लेखी म्हणण्यात यावर आक्षेप घेतलेला आहे. पंचनाम्यामध्ये भेसळ हा शब्द कूठेही आलेला नाही. गैरअर्जदार क्र.1 यांनी उत्पादित केलेले बियाणे शेतक-यांनी आपल्या शेतात लावले व एक महिन्यातच तक्रार केली. पंचनाम्याप्रमाणे कापसात भेसळ नाही व असे असले तरी गैरअर्जदार यांचे लेखी म्हणण्यामध्ये तो लॉट मधील बियाणे यांचे सम्पल घेऊन शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवीणे आवश्यक होते असे असताना बियणे प्रयोगशाळेत पाठविले गेले नाहीत. कापसाच्या नाविन्य 6 या जातीच्या बियाण्याची उगवण झालेली आहे. ही उगवण कमी जास्त होण्यास अनेक कारणे असू शकतात. याप्रमाणे बियाण्याची लागवड ही करतेवेळेस पाऊस पडला असला पाहिजे, यांची व्यवस्थित मशागत होणे, खताचे प्रमाणे योग्य प्रमाणात देणे इत्यादी बाबी आवश्यक आहेत. बियाणे जर जमिनीत खोलवर पेरले तरी ते वर येत नाहीत. अंतर योग्य प्रमाणात ठेवणे हे देखील आवश्यक आहे. भेसळयूक्त बियाणे असल्यास दोन प्रकारचे कापसाची उगवण होते. त्यांस भेसळ म्हणतात. यात तो काही प्रकार दिसून येत नाही. अर्जदारांनी त्यांचे शेतात कापूस लावल्या बददलचा 7/12 दाखल केलेला असला तरी त्यांचे तक्रारीप्रमाणे लागवड ही 2009 मध्ये केली म्हणजे वर्ष 2008-09 चा पेरा केलेला आवश्यक आहे. वर्ष 2006-07 चा पेरा दाखवतात. अर्जदाराने तक्रार केल्याबददलचा तक्रार अर्ज दाखल केलेला आहे. तसेच वकिलाने पाठविलेली नोटीसही या प्रकरणात दाखल केली आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्या वकिलाच्या नोटीसला उत्तर दिलेले आहे. ही नोटीस त्यांनी या प्रकरणात दाखल केलेली आहे. गैरअर्जदाराने शासनाचे परिपञक दाखल केलेले आहे. याप्रमाणे बियाण्याचा लॉट नंबर व रिलीज ऑर्डर हे अतीशय आवश्यक आहे. पावतीवर जो लॉट नंबर आहे त्याप्रमाणे सिड नाही. त्यांचा लॉट नंबर हे वेगवेगळे आहेत. परिपञकाप्रमाणे शेतक-यांची तक्रार आल्यानंतर काय काय गोष्टी आवश्यक आहेत व तक्रारीची तपासणी करीत असताना कोणत्या गोष्टी बघीतल्या पाहिजे या सर्व यात दिलेल्या आहेत. या सूचनाचे पालन केल्या गेलेले नाही. तसेच तक्रार ही जिल्हा कृषी अधिकारी यांचेकडे करायला पाहिजे पण अर्जदाराने तक्रार ही तालूका कृषी अधिकारी व गट विकास अधिकारी यांचेकडे केलेली आहे. तयांनी त्यांची तक्रार जिल्हा कृषी अधिकारी यांचेकडे न पाठविता स्वतःच पंचनामा केलेला आहे, जिल्हास्तरीय असलेल्या सर्व कमिटीच्या लोकांनी शेतामध्ये जाऊन पंचनामा केला पाहिजे. शेतावर जाण्यापूर्वी गैरअर्जदार यांना नोटीस किंवा सूचना देणे आवश्यक आहे. गैरअर्जदारांनी त्यांनी उत्पादीत केलेले लॉट नंबर 84476, 75072, 76428 असे सांगितले आहेत. तसेच गैरअर्जदार यांनी त्यांनी विकलेले सिड लॉट नंबर नुसार ज्यांना विकले त्या सर्व शेतक-यांना चांगले पिक आल्या बददलचे शपथपञ दाखल केलेले आहेत. जसे की, विठठल वचमचा कारलावाड,विठठल इरन्ना वीभूते, व माधवराव इरन्ना पाटील रा.चैनपूर ता. देगलूर या सर्वानी सदर बियाण्यामध्ये 7-8 क्विंटल कापूस झाला असे शपथपञ तसेच तलाठयांचे प्रमाणीत केलेले प्रमाणपञ, श्री गजानन कृषी सेवा केंद्र, लॉट नंबर सहीत खरेदी केलेले बिले इत्यादी कागदपञ दाखल केलेले आहेत. वरील सर्व प्रकरणावरुन असे वाटते की, गैरअर्जदार यांनी उत्पादित केलेले बियाणे हे भेसळयूक्त किंवा दोषयूक्त आहेत हे अर्जदार सिध्द करु शकलेले नाहीत. गैरअर्जदार क्र.2 यांनी पावतीवर लॉट चूकीचा लिहून सेवेतील अनूचित प्रकार केला किंवा जून्या लॉट मधील सिड विकण्याचे नाकारता येत नाही, चुक झाली हे कबूल करत नाहीत. मा. राज्य आयोग दिल्ली इंडो अमेरिकन हायब्रीड सिडस व इतर विरुध्द विजयकूमार शंकरराव व इतर यात बियाणे बददलची तक्रार होती. बियाणे हे भेसळयूक्त नाही ते फक्त 10 टक्केच उगवले, रिपोर्टमध्ये क्वॉलिटी किंवा भेसळी बददल काहीही म्हटलेले नाही त्यामूळे योग्य त्यापूराव्याअभावी अनूचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला हे सिध्द होऊ शकले नाही. म्हणून तक्रार फेटाळण्यात येते. I (2007) CPJ 258 मा. राज्य आयोग महाराष्ट्र यात महाराष्ट्र स्टेट सिडस कार्पो. लि व इतर विरुध्द नरेंद्र मोतीरामजी बूरुडे व इतर याही प्रकरणात योग्य उगवण झाली नाही म्हणून तक्रार दाखल आहे. यात 15 ते 20 टक्के ची उगवण झाली होती. पंचनामा पंचायत समितीने केला आहे. उगवण ही समाधानकारक आहे असे म्हटले आहे. त्यामूळे त्यात काही दोष नाही. म्हणून अपील अलॉऊ केले आहे. I (2007) CPJ 266 (NC) मा. राष्ट्रीय आयोग दिल्ली यात महाराष्ट्र हायब्रीड सिडस कंपनी लि. विरुध्द गौरी प्रिदेन्ना व इतर यात दोषयूक्त बियाणे पूरवले परंतु पूराव्याअभावी तसेच प्रयोगशाळेत बियाणे पाठविले असता ते 99 टक्के शूध्द आहेत, त्यामूळे सेवेत ञूटी नाही असे म्हणून रिव्हीजन पिटीशन अलॉऊ केले आहे. 2007 NCJ 202 (NC) मा. राष्ट्रीय आयोग दिल्ली यात दोषयूक्त बियाणे पूरवले या बददल पूरावा नाही. लॅबोरटरी रिपोर्ट 99.6 टक्के शूध्दता दर्शविते त्यामूळे गैरअर्जदार जबाबदार नाहीत असे म्हटले आहे. वरील सर्व बाबीचे अवलोकन कले असता अर्जदार हे बियाणे निकृष्ट असल्याबददल सिध्द करु शकलेले नाहीत म्हणून आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज खालील प्रमाणे मंजूर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार क्र.1 यांचे विरुध्द तक्रार खारिज करण्यात येते. 3. गैरअर्जदार क्र.2 यांचे चूकीबददल रु.8000/- अर्जदार यांना मानसिक ञास व दंड म्हणून दयावेत तसेच दावा खर्च म्हणून रु.2,000/- दयावेत. 4. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्य जयंत पारवेकर, लघूलेखक |