जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर. तक्रार क्रमांक 1811/2009 तक्रार पंजीबध्द करण्यात आले तारीखः- 15/12/2009 सा.वा. यांना नोटीस लागल्याची तारीखः- 18/06/2008 तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 15/10/2011 श्री.सुनिल निवृत्ती चौधरी, ..........तक्रारदार उ.व.संज्ञान धंदा शेती, रा.अट्रावल ता. यावल जि.जळगांव. विरुध्द 1. निर्मल सिडस प्रा.ल. रा.पी.ओ.बॉक्स नं.63, . ......सामनेवाला भडगाव रोड, पाचोरा ता.पाचोरा जि.जळगांव. 2. श्री.प्रशांत मधुकर शिंदे उ.व सज्ञान धंदा व्यवसाय, रा.श्री.साई अग्रो एजन्सी, अट्रावल, ता.यावल जि.जळगांव. 3. श्री.पुरुषोत्तम पुरनसिंग पाटील, उ. व सज्ञान धंदा कंपनी प्रतिनीधी, निर्मल सिडस प्रा.लि. रा.पी.ओ.बॉक्स नं.63, भडगांव रोड, पाचोरा ता.पाचोरा जि.जळगांव. न्यायमंच पदाधिकारीः- श्री. बी.डी.नेरकर अध्यक्ष. अड. श्री.चंद्रकांत मोहन येशीराव सदस्य. अंतिम आदेश ( निकाल दिनांकः 15/10/2011) (निकाल कथन न्याय मंच अध्यक्ष श्री.बी.डी.नेरकर यांचेकडून) तक्रारदार तर्फे सौ.स्वाती आष्ट, निकम,वकील हजर सामनेवाला तर्फे प्रतिनीधी हजर. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार यांचे शेती अट्रावल ता.यावल जि.जळगांव येथे आहे. सदरील शेती एकत्रात असल्याने अद्याप पावेतो वाटणी झालेली नाही म्हणुन सगळयांच्या वतीने तक्रारदार हे स्वतः तक्रार दाखल केली आहे तसेच वादातीत बियांणाची खरेदी तक्रारदार यांनी केलेली आहे. तक्रारदाराची जमीन काळी कसदार असुन दरवर्षी सदरील शेत जमीनीत पेरणी करुन वेगवेगळया प्रकारची पिके घेऊन तक्रारदार हे स्वतःचा कुटूंबाचा उदरनिर्वाह करतात. निर्मल सिडस प्रा.ली. ही नामांकीत कंपनी असुन सदरील सामनेवाले नं. 2 हे त्या कंपनीचे परवानाधारक आहेत. सामनेवाले नं. 2 यांचे साई अग्रो एजन्सी या नावांचे बि बिण्यांचे व शेती उपयोगी वस्तुंचे दुकान आहे. सामनेवाले नं.3 हे सदरील कंपनीचे प्रतीनीधी आहेत. सदरील कंपनी हे नामांकीत असल्यामुळे विश्वासाने तक्रारदार हा कंपनीकडुन कापुस मुक्ता- 7 प्लॉट नं. 04949 नग 8 प्रती नग रु.400/- एकुण किंमत रु.3,200/- चे बियाणे सामनेवाले यांचेकड न विकत घेऊन एक हेक्टर 60 आर एवढया क्षेत्रात पेरणी केलेले होते. सदर बियाणे पेरल्यानंतर शेतात पिकाची वाढ झाली पंरतु फलोत्पादन झाली नाही. सदरील बियाणे पेरल्यानंतर 120 ते 130 दिवस झाले तरी कापसाची वाढ जोमदार झालेली असून त्यास फुले, पाती, कैरी लागलेली नाही. आजुबाजूंच्या इतरत्र वाणाच्या कापसाची वेचणी सुरु होती. पेरणी नंतर 10 थैली 10 x 26 x 26 पेरणीनंतर किटक नाशक फवारणी 500 मी.ली. इ. मीडा पहिली फवारणी असिफेड + कोम्बी एफ, दुसरी फवारणी टाटामिटा 100 मी.ली.+ बेरीलॉन 250 मी.ली. +19x19x19 कि.ग्रॅ. तक्रारदारांनी सदरच्या शेतजमीनीत कापसाचे योग्य खत,पानी किटक नाशकांचे नियोजन करुन सुध्दा फुल, पाती,कैरी लागल्या नसल्याने येणारे उत्पन्न शुन्य मिळाले त्यामुळे तक्रारदाराचे अतोनात नुकसान झालेले आहे. त्यानंतर तक्रारदार यांनी याबाबत कृषी विकास अधिकारी, जिल्हा परीषद,जळगांव याचेकडे तक्रारअर्ज दि.05/11/2009 रोजी दिलेला होता. शेतीच्या नुकसानी बाबत योग्य तो पंचनामा करुन नुकसानीची रितसर भरपाई उत्पादकाकडुन मिळावी असा अर्ज केलेला आहे. त्याप्रमाणे दि.11/11/2009 रोजी जिल्हास्तरीय पिक तक्रार मोका तपासणी अहवाल निरीक्षणाअंती तयार करुन त्यात कुठलाही किड रोगाचा प्रादर्भाव आढळुन आलेला नाही. सदर पिकास फारच अत्यल्प प्रमाणात पात्या लागलेल्या असून त्याची सुध्दा 90 ते 100 टक्के गळ झालेली आहे, असा कृषी अधिकारी यांनी निष्कर्षाअंती शेरा मारलेला आहे. अहवालामध्ये बियाणे कंपनीचे प्रतीनीधी यांची साक्ष घेतली असता त्यांनी अळीचा प्रादुर्भाव बाबत खोटी साक्ष नमुद केलेला आहे. सदरच्या बियाणांमुळे पिकांची गर्भधारणा झालेली असून फलोत्पादन झालेले नाही, असा निष्कर्ष काढता येईल असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. पिकाच्या परिस्थीती बाबत श्री.रविंद्र मुरलीधर पाटील, श्री.लिलाधर प्रभाकर पाटील, श्री.सुधाकर प्रभाकर पाटील यांनी सदरील पंचानी देखील योग्य अभीप्राय दिलेला आहे की, पिकाची वाढ चांगली झालेली असुन किड रोग नसुन त्यावर कै-या लागलेल्या नाहीत. म्हणजेच उत्पन्न शुन्य झालेले आहे. दि.17/11/2009 रोजी कापुस पिकाचे उत्पादन न आल्याने जिल्हास्तरीय पिक तक्रार समीतीची भेट लावण्याची आवश्यकता नाही, सदरची तक्रार ही उत्पादन न आले बाबतची आहे, कृषी अधिकारी पंचायत समीती यावल यांनी दिलेल्या पंचनाम्याचे आधारे जिल्हा ग्राहक मचाकडे दाद मागावी असे कळवीलेले आहे. सामनेवाले या कंपनीने सदरचे बियाणे कुठे तयार झाले सदरचे बियाणे कोणी कसे तयार केले व अळीचा प्रादुर्भाव कोठेही नसतांना सदरील निष्कर्ष का दिला असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. तक्रारदार यांचे शेतात 65 क्विंटलचे नुकसान झालेले आहे. तक्रारदारास 65 क्विंटलचे जर उत्पन्न झाले असते तर त्यांना प्रति क्विंटल 3,600/- भावाप्रमाणे रु.2,34,000/- चे नुकसान झालेले आहे. म्हणुन तक्रारदाराची मागणी आहे की, नुकसान भरपाईपेटी रु.2,34,000/- मंजुर करावे व या तक्रारअर्जाच्या खर्चापोटी रु.10,000/- व किरकोळ खर्च रु.6,000/- एकुण रु.2,50,000/- सामनेवालेकडुन तक्रारदारास मिळावे अशी विनंती केली आहे. सदर प्रकरणांमध्ये सामनेवाले क्र. 1 ते 3 यांना या मंचाची नोटीस तामील झाली, त्यांनी आपला लेखी खुलासा खालील प्रमाणे सादर केलेला आहे. सामनेवाले यांचे म्हणणे असे की, सामनेवाले यांनी तक्रारदारास सेवेमध्ये देणेमध्ये कोणतीही कमतरता झाली नाही किंवा सामनेवालेकडुन कोणत्याही प्रकारची अनुचित व्यापार प्रथेचा उल्लंघन केले नाही म्हणुन सदरील तक्रार या मंचासमोर चालु शकत नाही. सामनेवाले यांचे असे की म्हणणे आहे की, जोपर्यत बियाणे संबंधीत प्रयोगशाळेमध्ये पाठवून त्याची तपासणी होत नाही तोपर्यंत बियाणे सदोष आहे ही बाबत सिध्द होत नाही. कृषी अधिका-यांनी किंवा समीतीने तर्काच्या आधारावर कोणतेही शास्त्रीय कारण न देता आपला अभिप्राय दिला आहे तो सामनेवाला यांना मान्य नाही. महाराष्ट्र शासनाने प्रत्येक जिल्हयामध्ये तज्ञ व्यक्तीची बियाणे समीती स्थापन केलेली आहे व बियाणे समीतीने आपला अभिप्राय देणे गरजेचे होते. तक्रारदाराने दाखल केलेल्या बियाणांमध्ये दोष आहे असे कुठेही लिहीलेले नाही. कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांनी दिलेला अहवाल हा मोघम स्वरुपाचा आहे. सदरील बयाणे सदोष आहेत हे सिध्द करण्यासाठी तक्रारदाराने कोणताही ठोस पुरावा दाखल केलेला नाही. तक्रारदार यांची शेती अट़ावल ता यावल जि.जळगांव येथे आहे व त्यांच्या शेताचे गट नं.123/2 व 124 असा आहे, त्याबद्यल जो 7/12 गट नं.123/2 मध्ये राजेंद्र निवृत्ती चौधरी यांचे पण नांवे जमीन आहे. तसेच गट नं.124 चा 7/12 वर विजय भगवान चौधरी व सुमन निवृत्ती चौधरी यांचे नांवे सदर जमीन आहे, त्यांना या प्रकरणांत पक्षकार करणे आवश्यक होते. सामनेवाले ही नामांकित कंपनी आहे. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडुन मुक्ता 7 चे बियाणे विकत घेतले हे त्यांचे म्हणणे खोटे आहे. तक्रारदाराने दाखल केलेल्या पावतीवर लॉट नं.04949 चा उल्लेख आहे त्या लॉट नंबरचे बियाणे सामनेवाले कपंनीचे नाही. तक्रारदाराने सदर मुक्ता 7 कपाशीचे बियाणे एक हेक्टर 60 आर एवढया क्षेत्रामध्ये पेरले हे खोटे आहे, तक्रारदाराने बियाणे शेतात केव्हा पेरणी केली त्या तारखेचा उल्लेख केला नाही. सदर बियाणे पेरणी केल्यानंतर शेतात पिकाची वाढ झाली परंतु फलोत्पादन झाले नाही, तक्रारदाराचे हे म्हणणे खोटे आहे. तक्रारदाराने सदरील बियाणे पेरलेनंतर 120 ते 130 दिवस झाले तरी देखील कापासाची वाढ जोमदार झाली परंतु फुले, पाती, कैरी लागलेली नाही म्हणणे खोटे आहे. एवढया कालावधीत दुस-या वाणाच्या कपासीची वेचणी सुरु व्हावयास हवी होती हे म्हणणे खोटे आहे. तक्रारदाराच्या शेजारील शेतातील दुस-या वाणाची कापुस वेचणी एवढया कालावधीत दोनदा झाली हे म्हणणे खोटे आहे. तक्रारदार यांनी सदरच्या शेतात पेरणी नंतर 10 थैली 10 : 26 :26 पेरणी नंतर किटक नाशक फवारणी 500 मिली इ.मीडा पहीली फवारणी असिफेड + कोम्बी एफ, दसुरी फवारणी टाटा मीडा 100 मीली + बेरीलॉन 250 मीली + 19x19x19 सदरच्या शेतजमीनीत कापसाचे योग्य खत, पाणी व किटकनाशकाचे नियोजन केले होते हे म्हणणे खोटे आहे कारण त्याबद्यल तक्रारदाराने एकही पुरावा दाखल केलेला नाही. कापसाच्या झाडस फुले, पाती कैरी लागली नसल्यामुळे तक्रारदारास शुन्य उत्पन्न मिळाले हे म्हणणे खोटे आहे. कारण सामनेवाले कंपनीच्या माहीती पत्रकाप्रमाणे भारी जमीनीसाठी लागवडीचेनंतर 3x3 फुट ठेवावे लागते पेरणीसाठी बियाणे 750 ते 1000 ग्रॅम प्रति एकर वापरावे लागते, अधिक उत्पनासाठी शेंडा खुडणी करावी लागते, पहील खुडणी 75 ते 80 दिवसांनी व दुसरी खुडणी पहील्या खुडणीनंतर 15 ते 20 दिवसांनी खुडणी, दुस-या खुडणी नंतर तिसरी खुडणी 15 ते दिवसांनी करावी लागते. खते किलो हेक्टर बागायती जमीनीसाठी नत्र 100, स्फुरद 50, पालाश 50 व जिरायती जमीनीसाठी 60:40:40 याप्रमाणे द्यावी लागते. निर्मल बायोपॉवर 10 किलो प्रति एकर या प्रमाणे लागवडीपासुन 30 ते 35 दिवसांनी पिक फुल पातळीवर असतांना कोणत्याही रासायनिक खताबरोबर मिश्रण करुन झाडाच्या कक्षेभोवती द्यावी असे सामनेवाले यांच्या माहीती पत्रकात नमुद केलेले आहे. सामनेवाले हे तक्रारदार यांनी केलेली इतर सर्व विपरीत विधाने नाकबुल केली आणि असा उजर/बचाव घेतला की, तक्रारदार यांचा तक्रारअर्ज खर्चासह खारिज करण्यात यावा. तक्रारदार यांची तक्रार, शपथपत्र, त्यांनी दाखल केलेले दस्तऐवज, सामनेवाला यांचा खुलासा, शपथपत्र त्यांनी दाखल केलेले दस्तऐवज यांचा सारासार विचार होता खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये उत्तर. 1. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना योग्य ती सेवा न देऊन आपल्या सेवेत कसूर केला आहे काय? नाही.. 2. म्हणुन आदेश काय ? अंतीम आदेशाप्रमाणे निष्कर्षाची कारणे मुद्या क्र 1 व 2 याकामी तक्रारदाराने यांनी दाखल केलेल्या गट नंबर 123/2 गांव नमुना 7, अव 12 मध्ये राजेंद्र निवृत्ती चौधरी व सुनील निवृत्ती चौधरी यांच्या नांवाची नोंद आहे. तसेच गट नंबर 124 गाव नमुना 7 अ व 12 मध्ये विजय भगवान चौधरी व सुमन निवृत्ती चौधरी यांच्या नांवाची नोंद आहे. सदरील बियाणे मुक्ता 7 खरेदीच्या पावतीवर सुनिल निवृत्ती चौधरी यांच्या नांवाची नोंद आहे. तक्रारदार हे स्वतः बियाणे खरेदी केल्यामुळे आणि तशी पावती या मंचासमोर दाखल केल्यामुळे ते ग्राहक या संज्ञेत येतात. तक्रारदार यांनी त्यांच्या शेतातील कापुस पिकाची फोटो दाखल केले आहे परंतु सदरील फोटोमध्ये पिकाची वाढीबाबत स्पष्ट असे चित्र दिसुन येत नाही ते अस्पष्ट फोटोग्राफी तक्रारदार यांनी दाखल केली आहे. तक्रारदाराने पिकाची जिल्हास्तरीय तपासणी कामी अर्ज दिला त्यानसार कृषी अधिकारी यांनी पिकाची पाहणी करुन असा अहवाल दिला की, मुक्ता 7 पिकाची वाढ पुर्णपणे झालेली असून सदर पिकास फारच अत्यल्प प्रमाणात पात्या लागलेल्या असून त्यांची सुध्दा 90 ते 100 टक्के गळ झालेली दिसून आली. परीणामी शेतक-या पिकाचे उत्पन्न मिळणार नाही. त्यामुळे आर्थीक नुकसान झाले आहे, याचा सारासार विचार करता कृषी अधिकारी यांनी दिलेला अहवाल योग्य व संयुक्ती आहे. सामनेवाले यांनी जे माहीती पत्रक या मंचासमोर सादर केलेले आहे त्या माहीती पत्रकामध्ये नमुद केलेल्या पिकाच्या उत्पन्नाबाबत घेण्याची काळजी व निर्देशानुसार तक्रारदार हे पिकाची काळजी घेतली नाही म्हणुन तक्रारदारास शुन्य उत्पन्न आले, ही तक्रारदाराची निष्काळजीपणा स्पष्ट होत आहे. सदर तक्रारीमध्ये तक्रारदाराने बियाणे निकृष्ट दर्जाचे आहेत याबाबत, बियाणे शासकीय प्रयोगशाळेमध्ये तपासणीकामी पाठवून बियाणे दोषयुक्त आहेत किंवा कसे याबाबत त्यांचा अहवाल प्राप्त करणे आवश्यक होते, तक्रारदार यांनी तसे कुठलीही प्रक्रिया अवलंबीली नाही. सामनेवाले यांनी त्यांच्या खुलाश्यात असे म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाने प्रत्येक जिल्यामध्ये तज्ञ व्यक्तीची बियाणे समीती स्थापन केली आहे. तक्रारदाराने सदर समीतीच्या तज्ञ व्यक्तीकडुन सुध्दा सदर बियाणे निकृष्ट असल्याबाबतचा अहवाल प्राप्त करुन या मंचसमोर सादर केलेला नाही. तक्रारदाराने सामनेवाला यांचेकडुन मुक्ता 7 या वाणाचे बियाणे विकत घेतल्यानंतर पिकाची वाढ जोमाने झाली परंतु त्यास 120 ते 130 दिवस होऊन सुध्दा फुले, पाती कैरी लागली नाही ही बाब तक्रारदार यांनी ठोस पुराव्यानीशी सिध्द केलेले नाही. तक्रारदार यांनी त्यांना त्यांच्या शेतामधून 65 क्विंटलचे उत्पन्न झाले असते त्यापोटी त्यांना प्रती क्विंटल रु.3,600/- या भावाप्रमाणे रु.2,34,000/- चे अपरिमीत असे उत्पन्न झाले असते, ही बाब तक्रारादाराने सबळ पुराव्यानीशी या मंचासमोर सिध्द केलेले नाही. वरील सर्व बाबींचा सारासार विचार करता सामनेवाले यांनी तक्रारदार यांना विक्री केलेले बियाणे हे निकृष्ट दर्जाचे होते ही बाब सबळ पुराव्यानीशी तक्रारदार सिध्द करु शकले नाही, तसेच सामनेवाले यांनी तक्रारदार यास देण्यात आलेल्या सेवेमध्ये कोणतीही त्रुटी केलीली नाही, सबब तक्रारदार यांची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे, या निष्कर्षाप्रत हे मंच आले आहे. सबब खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश. अ) तक्रारदार यांचा तक्रारीअर्ज खारीज करण्यात येतो. ब) दावाखर्च ज्यांनी त्यांनी आपापला सोसावा. ई) उभयपक्षकारांना आदेशाची सही शिक्क्याची प्रत निःशुल्क देण्यात यावी. ज ळ गा व दिनांकः- 15/10/2011 (श्री.चंद्रकांत मोहन येशीराव ) ( श्री.बी.डी.नेरकर ) सदस्य अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव |