जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – ११६/२०११
तक्रार दाखल दिनांक – ०९/०६/२०११
तक्रार निकाली दिनांक – ३०/०७/२०१३
अशोक सेवाराम पाटील ----- तक्रारदार.
उ.व.५२ वर्षे सज्ञान,धंदा-शेती
रा.सोनगीर,ता.जि.धुळे.
विरुध्द
(१)निर्मल सिड्स प्रा.लि. ----- सामनेवाले.
भडगांव रोड,पाचोरा,
ता.पाचोरा,जि.जळगांव
(२)नंदु श्रावण चौधरी
उ.व.सज्ञान,धंदा-प्रोप्रायटर
लक्ष्मी ट्रेडर्स,रा.ग्रामपंचायत
ऑफीस जवळ,सोनगीर,
ता.जि.धुळे.
न्यायासन
(मा.अध्यक्षाः सौ.व्ही.व्ही.दाणी )
(मा.सदस्याः सौ.एस.एस.जैन)
(मा.सदस्य: श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – वकील श्री.एस.डी.भट)
(सामनेवाले क्र.१ व २ तर्फे – वकील श्री.एल.पी.ठाकूर)
निकालपत्र
(द्वाराः मा.सदस्याः सौ.एस.एस.जैन)
(१) सामनेवाले क्र. १ व २ यांनी तक्रारदार यांना सदोष बियाण्याची विक्री करुन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला, म्हणून तक्रारदार यांनी सदर तक्रार या मंचात दाखल करुन नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
(२) तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, मौजे सोनगीर येथील राधाकृष्ण मंदीर ट्रस्ट हया नोंदणीकृत संस्थेची मौजे सायने, ता.जि.धुळे शिवारात गट नं.१६७ एकूण क्षेत्र ८ हे ३१ आर अशी शेतजमीन आहे. सदर क्षेत्रापैकी १ हे.६० आर ऐवढे क्षेत्र तक्रारदाराला पाच वर्षा करिता कसणेसाठी भाडे तत्वावर संस्थेने दि.०१-०१-२०१० रोजीच्या ठरावाद्वारे दिलेली आहे. तक्रारदाराने सामनेवाले क्र.२ यांच्या दुकानातून सामनेवाले क्र.१ यांची मिरची ९३२ एन. या बियाण्याचे दि.०४-१२-२०११ रोजी ५ नग पाकीट व दि.०६-१२-२०१० रोजी एक नग पाकीट रु.२७५/- प्रती पाकीट या प्रमाणे एकूण रु.१,६५०/- ला खरेदी केले.
(३) तक्रारदाराने दि.०६-१२-२०१० रोजी ६० ग्रॅम बियाणे अगोदर गादी वाफयावर टाकून त्याची उगवण केली. त्याच्यावर आवश्यक ती फवारणी केली व दि.०६-०२-२०११ रोजी १० आर क्षेत्रात पुनर्लागवड केली. पुन्हा त्याची योग्य ती काळजी घेतली व आवश्यक औषधांची फवारणी केली. एक ते दिड महिन्यात पीक येणे आवश्यक होते. मात्र पिकाची योग्य वाढ झाली नाही. म्हणून तक्रारदाराने जिल्हास्तरीय बियाणे तक्रार निवारण समिती यांचेकडे तक्रार केली. त्यानुसार दि.२३-०३-२०११ रोजी सकाळी ०९.०० वाजता त्यांनी पिकाची पहाणी केली व पिक परिस्थितीचा पंचनामा केला. सदर पंचनाम्यात खराब बियाण्यामुळे तक्रारदारास मोठे आर्थिक नुकसान झाले असे मत व्यक्त केले आहे.
(४) तक्रारदाराचे पुढे असे म्हणणे आहे की, सामनेवाले यांनी दिलेल्या हमी प्रमाणे दररोज १० किलो मिरचीची वेचणी ४ महिने म्हणजे साठ दिवस झाली असती. प्रत्येक १० किलोस रु.१,०००/- एवढा भाव मिळाला असता. सबब तक्रारदारास सामनेवाले यांच्याकडून आर्थिक नुकसान रक्कम रु.६०,०००/- मिळावे. तसेच एकंदरीत आलेला खर्च रु.२०,०००/-, मानसिक त्रासापोटी रु.१०,०००/- व तक्रार अर्जाचा खर्च मिळावा अशी विनंती केली आहे.
(५) तक्रारदारांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ नि.नं.५ सोबत नि.नं.५/१ वर ठरावाची प्रत, नि.नं.५/२ वर ७/१२ उतारा, नि.नं.५/३, ५/४ व ५/५ वर बियाणे खरेदी पावती, नि.नं.५/६ वर बियाणे पाकिटांची छायांकीत प्रत, नि.नं.५/७ वर पंचनामा, नि.नं.५/८ वर पिक पाहणी अहवाल, नि.नं.५/९ वर साक्षीदारांची साक्ष, नि.नं.५/१० वर तलाठी पंचनामा, नि.नं.१३ वर वरीष्ठ कोर्टाचे न्यायनिवाडे, नि.नं.१४ सोबत नि.नं.१४/१ वर औषधी खरेदी संबंधी पत्र, नि.नं.१४/२ वर ७/१२ उतारे, नि.नं.१४/३,१४/४ व १४/५ वर मिरची विक्रीच्या पावत्या इ.कागदपत्रे दाखल केली आहेत.
(६) सामनेवाले नं.१ व २ यांनी नि.नं.९ वर खुलासा दाखल करुन तक्रारीतील कथन नाकारले आहे. तक्रारदाराची तक्रार खोटी आहे. तक्रारदार सामनेवाले यांचा ग्राहक नाही. पेस्ट्रीसाईड्स न टाकलेमुळे त्यांच्या कंपनीला पार्टी केलेले नाही. पेस्ट्रीसाईड्स कंपनीला पार्टी करणे गरजेचे होते. तसे न केल्याने तक्रारीस नॉन जॉईन्डर ऑफ नेसेसरीज पार्टीजची बाधा येते. तक्रारदार प्रगतीशील शेतकरी नाही. गट नं.१६७ हा ठरावाद्वारे भाडे तत्वावर खेडणेस दिलेला नव्हता. तसा ट्रस्टचा कोणताही ठराव नाही. तक्रारदाराची शेती मिरची पिकासाठी योग्य नाही. तक्रारदाराने गादी वाफयावर उगवण केलेली नाही. आवश्यक ती काळजी व फवारण्या केलेल्या नाहीत. बियाणे विक्रीच्या वेळी कोणतीही हमी व विश्वास उत्पादनाबाबत दिलेला नव्हता व नाही.
(७) सामनेवाले यांचे पुढे असे म्हणणे आहे की, तक्रारदाराने सहा पाकिटे घेतले. एक पाकिट १०० ग्रॅम वजनाचे असते. एका एकर मध्ये केवळ १०० ग्रॅक बियाणे आवश्यक असते. तक्रारदाराने दूर-दूर अंतरावर लावल्याने पिकांना जास्तीचा सुर्यप्रकाश मिळाला व त्यामुळे रसशोधक (रस शोषणा-या) किडीचा प्रादुर्भाव झालेला आहे. त्यामुळे वाढ खुंटली व उत्पन्न कमी झाले. पिकांची वाढ जी काही होवू शकलेली नाही ती कमी तापमानामुळे झालेली आहे. बियाण्यांची उगवण ८५% ते ९० % झालेली होती. मात्र बियाणे पुनर्लागवडीच्या कालावधीत थंडीचा मोठा प्रादुर्भाव वाढल्याने पिकावर/रोपावर स्थिपस किडीचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर झाल्याने रोपांची वाढ होवू शकली नाही. पिकाच्या वाढीसाठी तक्रारदाराने रासायनिक खतांचा वापर केलेला नाही. वरील सर्व बाबी पंचनाम्यातही नमूद असून त्यात बियाणे सदोष असल्याबाबत निष्कर्ष नोंदविलेला नाही.
लावणी करतांना मिरचीच्या पिकास जास्त थंडी नको असते. तक्रारदाराने लावणी केली त्यावेळी हवामानात आर्द्रता जास्त होती. तसेच लावणी करतांना रोपे “ट्रॅकोडोमा” मध्ये बुडवून लावणी केली पाहिजे. पिक वाढीसाठी “सुपरफॉस्पेट” व “हयुमीक असीड” चा आणि “हयुमीक ग्रॅनीअल ” चा वापर करणे आवश्यक असते. त्याचा वापर तक्रारदाराने केलेला नाही. तसेच पिकास आवश्यक असलेल्या पाण्याचा पुरवठा देखील तक्रारदाराने केलेला नाही. त्यामुळे पिकांची वाढ न होणेस तक्रारदार जबाबदार आहे. सबब तक्रारदाराचा अर्ज खर्चासह रद्द करण्यात यावा. तक्रारदार यांनी रक्कम रु.२५,०००/- खर्च द्यावा असा आदेश करण्याची विनंती केली आहे.
(८) सामनेवाले यांनी आपल्या म्हणण्याचे पुष्टयर्थ नि.नं.११ सोबत नि.नं.११/१ वर मालाचा तपशील, नि.नं.११/२ वर मिरचीचे माहिती पत्रक, नि.नं.११/३ वर पिकाची लागवड व घ्यावयाची काळजी या बाबत पत्रक इ.कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
(९) तक्रारदारांची तक्रार, प्रतिज्ञापत्र, सामनेवाले यांचा खुलासा, प्रतिज्ञापत्र, दाखल केलेली कागदपत्रे पाहता तसेच दोन्ही वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आमच्या समोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुद्देः | निष्कर्षः |
(अ)तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? | : होय. |
(ब)सामनेवाले यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रृटी केली आहे काय ? | : नाही. |
(क)आदेश काय ? | : अंतिम आदेशा प्रमाणे |
विवेचन
(१०) मुद्दा क्र. ‘‘अ’’ – तक्रारदार यांनी नि.नं.५/३, नि.नं.५/४ व नि.नं.५/५ वर बियाणे खरेदीच्या पावत्या दाखल केलेल्या आहेत. या पावत्या सामनेवाले नं.२ यांच्या दुकानाच्या आहेत. तसेच त्यावर सामनेवाले नं.१ यांच्या कंपनीचे नावाचा उल्लेख आहे. यावरुन तक्रारदार हे सामनेवाले नं.१ व २ यांचे ग्राहक आहेत असे आम्हास वाटते. म्हणून मुद्दा क्र. ‘‘अ’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(११) मुद्दा क्र. ‘‘ब’’ – तक्रारदार यांची मुख्य तक्रार अशी आहे की, त्यांनी सामनेवाले नं.१ कंपनीची मिरची ९३२-एन हे बियाणे विकत घेतले होते. परंतु पिकांची योग्य वाढ झाली नाही. तक्रारदाराने सामनेवाले यांनी सदोष बियाणे विकले आहे हे सिध्द करण्यासाठी नि.नं.५/७ वर जिल्हास्तरीय बियाणे तक्रार निवारण समितीने केलेल्या पंचनाम्याची प्रत दाखल केलेली आहे. सदर पंचनाम्याचे आम्ही बारकाईने अवलोकन केलेले आहे. सदर पंचनाम्यात कमी तापमानामुळे रोपांची वाढ अत्यंत कमी झाली आहे. पुनर्लागवडीसाठी रोप उंच, सशक्त नाही. रोपांची वाढ ६” ते १०” एवढीच झाली. पिक संरक्षण औषधी फवारणी करुनही पिकांची वाढ समाधानकारक झालेली नाही. असे नमूद आहे. परंतु सदरची पिकांची वाढ कोणत्या कारणास्तव कमी झाली याचा उल्लेख या पंचनाम्यात नाही. वास्तविक सदर समितीने पिक पाहणी केल्यानंतर पंचानाम्यात दर्शविल्याप्रमाणे परिस्थिती का उदभवली ?, पिकाची वाढ कमी का झाली ?, यात बियाण्याचा दोष होता काय ? याबद्दल अभिप्राय नोंदविणे आवश्यक होते. त्यामुळे सदर पंचनाम्यावरुन सामनेवाले यांनी उत्पादित केलेले बियाणे सदोष होते असा निष्कर्ष काढता येणार नाही. याशिवाय बियाणे सदोष आहे या बाबत अन्य कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. बियाण्यांची पुन्हा तपासणी होवून मिळणेबाबत तक्रारदाराने कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत. तसेच बियाणे योग्य त्या प्रयोगशाळेतून तपासणी करुन मिळावेत यासाठी अर्ज केलेला नाही.
(१२) या उलट सामनेवाले यांनी नि.नं.११/३ वर पिकांच्या वाढीसाठी घ्यावयाच्या काळजी संदर्भात माहितीपत्रक दाखल केलेले आहे. त्यात पिकाला आवश्यक असणारे औषधी व पाण्याचे प्रमाण या बाबत माहिती दिलेली आहे. तक्रारदाराचे नि.नं.५/९ वर पंचनाम्याच्या वेळी घेण्यात आलेल्या बियाणे कंपनीच्या प्रतिनिधीच्या साक्षीची प्रत जोडली आहे. सदर साक्षीत कंपनीच्या प्रतिनिधीने बियाण्याची उगवण ८५ % ते ९० % झाली. परंतु त्या कालावधीत थंडी मोठया प्रमाणावर वाढली व पिकावर स्थिपस किडीचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर असल्यामुळे रोपाची वाढ झाली नाही व पिकाच्या वाढीसाठी रासायनिक खत कोणतेही दिलेले नाही. इ.बाबी नमूद केलेल्या आहेत. तसेच पंचनाम्यातही सदर मिरची पिकावर रस शोषणा-या किडीचा मोठा प्रादुर्भाव झाल्याचे नमूद आहे. तक्रारदाराने नि.नं.५/८ वर पिक पाहणी अहवालाची माहिती दाखल केलेली आहे. त्यात तक्रारदाराने गादी वाफयावर Actara हयाची फवारणी केल्याचे नमूद आहे. सदर औषधाची फवारणी तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी केली जाते, असा कंपनीच्या वकीलांनी युक्तिवाद केला. त्याअर्थी तक्रारदाराने स्थिपस (रस शोषणारी किड) किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आवश्यक असणा-या औषधांची फवारणी केलेली नाही हे सिध्द होते. तसेच पुनर्लागवडी नंतर Metador व सल्फर ची फवारणी केल्याचेही नमूद आहे. सदर फवारणी थंडीमुळे पान आकसू नये हयासाठी करतात. यावरुन त्या कालावधीत थंडीचे प्रमाणात वाढ झाली होती हे सिध्द होत आहे. यावरुन पिकाची वाढ योग्य होती, परंतु किडीचा प्रादुर्भाव व थंडी मोठया प्रमाणात वाढल्याने योग्य ते उत्पादन मिळालेले नाही हे स्पष्ट होते. तसेच विपरीत हवामान, कमी-अतिवृष्टी, किडीचा प्रादुर्भाव, स्थानिक परिस्थिती, आर्द्रतेचे कमी-जास्त प्रमाण झाल्यास पिकाचे उत्पादन कमी येवू शकते असे आम्हास वाटते.
(१३) या संदर्भात आम्ही पुढीलप्रमाणे वरिष्ठ न्यायालयांच्या न्यायनिवाडयांचा आधार घेत आहोत.
· ३ (२००६) सी.पी.जे. राष्ट्रीय आयोग,पान नं.२६९
खामगांव तालुका बागायतदार शेतकरी विक्री संस्था विरुध्द बाबु कुटी डॅनियल
· २ (२००५) सी.पी.जे. सर्वोच्च न्यायालय,पान नं.१३
हरीयाणा सिड्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. विरुध्द साधु व इतर
· २ (२००५) सी.पी.जे. राष्ट्रीय आयोग,पान नं.९४
सोनेकिरण ग्लॅडिओली ग्रोवर्स विरुध्द बाबुराम
यामध्ये असे मत व्यक्त केले आहे की, No reason disclosed for poor germination-Panchanama silent on quality of seeds- No evidence regarding sub- standard or adulterated quality of seeds- Failure of germination may be due to agro climatic factors- No deficiency in service proved.
(१४) तसेच बियाणे सदोष आहे हे सिध्द करण्याची जबाबदारी ही तक्रारदाराची आहे. यासाठी आम्ही मा.राष्ट्रीय आयोग व मा.राज्य आयोग यांनी अनेक निवाडयांत स्पष्ट केलेले आहे. या संदर्भात आम्ही-४ (२००७) सी.पी.जे.राष्ट्रीय आयोग पान १९२ कंझुमर प्रोटेक्शन सोसायटी विरुध्द नॅशनल सिड्स कॉर्पोरेशन या मधील निवाडयाचा आधार घेत आहोत.
त्यामध्ये असे मत व्यक्त केले आहे की, ‘Onus of proof lies with farmers, seeds not tested from “Seeds Testing Laboratory” Expert evidence not produced. Provision of section 13 not complied’.
(१५) वरील विवेचनावरुन व सर्व कारणांचा विचार करता तसेच प्रयोगशाळेचा अहवाल नसल्यामुळे बियाणे सदोष आहेत ही बाब स्पष्टपणे शाबित होत नाही असे आम्हास वाटते. म्हणून मुद्दा क्र. “ब” चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत.
(१६) वरील सर्व कारणांचा विचार होता खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येत आहे.
आदेश
(अ) तक्रारदारांची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
(ब) दोन्ही पक्षांनी आपआपला खर्च सोसावा.
धुळे.
दिनांक ३०-०७-२०१३
(श्री.एस.एस.जोशी) (सौ.एस.एस.जैन) (सौ.व्ही.व्ही.दाणी)
सदस्य सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे. (महाराष्ट्र राज्य)