::: नि का ल प ञ:::
मंचाचे निर्णयान्वये, उमेश वि. जावळीकर मा. अध्यक्ष
१. गैरअर्जदार क्र. १ व २ यांनी, अर्जदारास ग्राहक संरक्षण अधिनियम अन्वये तरतुदीनुसार, कराराप्रमाणे सेवासुविधा पुरविण्यात कसुर केल्याने प्रस्तूत तक्रार दाखल केली आहे.
२. गैरअर्जदार क्र. १ व २ यांनी सन २०१३ पासून पर्यटन क्षेत्राशी निगडीत योजना सुरु करून फार्म लॅड विक्रीस काढल्या. या व्यवसायामध्ये गैरअर्जदार क्र. १ यांनी खास मौजा चिंचोली, ता. समुद्रपूर, जि. वर्धा येथील खसरा क्र. ९४ एकूण आराजी ९.१९ एकर जागा विकसित करण्याचे उद्देशाने फार्म लॅडचे तुकडे करून विक्री करण्याची योजना आणली. या योजनेनुसार उपरोक्त जागा विकसित करून प्रत्येकी २०० चौ. मी. जागा विकण्याचे ठरविले. सदरील जागा ताडोबा अभयारण्याकरिता संरक्षित जागेजवळ असल्यामुळे या जागेवर फार्म हाऊस बांधून सदर जागा पर्यटनासाठी वापरात येऊ शकेल, असे आमिष दाखविले. तसेच सदर जागा विकसित करून गैरअर्जदारांनी त्यांच्याकडे राखीव ठेवलेल्या जागेवर रिसाट, कॉन्फरन्स हाल, वेलनेस सेंटर, उपहार गृह, स्विमिंग पूल. नचरोपेथी सेंटर, ऑस्ट्रीच शो फार्म, बटरफ्ल्याय वर्ल्ड, पक्के रस्ते, वृक्षारोपण इत्यादी तयार करणे व त्यामुळे सदर जागेच्या किमतीमध्ये ५ ते १० पटीने वाढ होईल अशी माहिती दिली. तसेच प्रॉपटी धारकांना एका वर्षात सात दिवसाकरिता गैरअर्जदार तयार करीत असलेल्या गेस्ट हाऊसचा नि:शुल्क वापर करता येईल, या बाबत कळविले. गैरअर्जदार क्र. १ व २ यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून अर्जदाराने गैरअर्जदार क्र. २ च्या वतीने गैरअर्जदार क्र. १ सोबत दि. २२.०२.२०१४ रोजी उपरोक्त जागे मधील किंग्स इस्टेट – १ फार्म लॅड नं. ४ मधील प्लॉट क्र.३० आराजी २०० चौ. मी. जागा एकूण किंमत रु. १,५०,०००/- मध्ये विकत घेण्याचा सौदा केला. त्यापोटी अर्जदाराने दि. ११.१२.२०१३ ते १९.२.२०१४ पावेतो मोबदल्याची संपूर्ण रक्कम रु. १,५०,०००/- गैरअर्जदारास दिली आहे. त्याबाबत गैरअर्जदाराने अर्जदारास पावत्या देखील दिल्या आहेत. तसेच दिनांक २२.२.२०१४ रोजीच्या करारनाम्यानुसार करारनाम्याच्या दिनांकापासून ३० महिन्यानंतर उपरोक्त नमूद मालमत्तेची, ठरलेल्या अटी व शर्तीची पुर्तता करून, पंजीबद्ध विक्रीपत्र अर्जदाराच्या नावे करून देतील, तसेच उपरोक्त जागेचा प्रत्यक्ष ताबा अर्जदारास देतील, अशा प्रकारे अर्जदार व गैरअर्जदार यांच्यात ग्राहक व सेवा पुरविणारे असा संबंध निर्माण झाला आहे. या इसार पत्रानुसार गैरअर्जदार क्र. १ व २ यांनी सदर जागा विकसित करून नकाशाप्रमाणे जागेची आराजी पाडून इसार पत्रातील जागा अर्जदाराचे हक्कात पंजीबद्ध विक्रीपत्राद्वारे विक्री करून देण्याचे ठरले. परंतु अर्जदाराने इसार पत्रात नमूद केल्याप्रमाणे सौद्यातील जागेची संपूर्ण रक्कम अदा करून देखील आजपावेतो गैरअर्जदाराने कबुल केल्याप्रमाणे वरील उल्लेखित जागेवर कोणतीही विकासाची कामे केली नाहीत किंवा कोणत्याही प्रकारचे बांधकाम सुद्धा केलेले नाही. गैरअर्जदारांनी, प्रस्तावित ग्राहकांनी सदरील जागा विकत घ्यावी म्हणून सदरील जागा किरायाने देण्याबाबत सुद्धा योजना आखली होती. या योजनेनुसार मे. विदर्भ एलोई ट्रेडिंग कंपनी, जिचे पंजीयन कार्यालय सुद्धा गैरअर्जदाराच्या पंजीयन कार्यालयाच्या पत्त्यावर दर्शविलेले आहे, त्यांचे सोबत दि.२३.२.२०१४ रोजी किरायाचा करारनामा अर्जदारासोबत केला. या करारनाम्यानुसार प्रॉपटी धारकाचे जागा वापराकरिता सदरील कंपनी रु. १८००/- प्रतिमाह किराया देण्यास कबुल झाले होते. परंतु अल्पावधितच अर्जदारास किरायाची रक्कम सुद्धा देणे बंद केले. अर्जदाराने सदर जागेच्या मिळणाऱ्या किरायाच्या रक्कमेतून त्यांची उपजिविका चालण्यास मदत होईल या उद्देशाने त्याची जागा, गैरअर्जदार क्र. १ व २ यांच्या सांगण्यावरून, किरायाने देण्यास तयार झाले होते. मार्च २०१६ मध्ये अर्जदाराने विकासाच्या कामाची पाहणी केली असता, कोणत्याही प्रकारचे विकासाचे काम झाले नसल्याचे अर्जदाराच्या निदर्शनास आले. त्याबाबत अर्जदाराने गैरअर्जदारांकडे विचारणा केली असता अर्जदारांनी कोणतेही उत्तर दिले नाही. सौद्याची संपूर्ण रक्कम स्वीकारून आणि किराया देण्याचा करारनामा करून, कांही महिन्यानंतर गैरअर्जदारांनी कोणत्याही न्यायोचित कारणाशिवाय अर्जदारास किराया देण्याचे बंद केले. त्यामुळे उल्लेखित जागेचा करारनामा रद्द करून अर्जदाराने गैरअर्जदारास अदा केलेली संपूर्ण रक्कम अर्जदारास तात्काळ परत करावी, अशी नोटीस अर्जदाराने दि. २९.०३.२०१६ रोजी वकिलामार्फत गैरअर्जदारास पाठविली. सदर नोटीस गैरअर्जदारास प्राप्त होवून देखील गैरअर्जदारांनी अर्जदारास रक्कम परत न करून अर्जदाराचे शारीरिक व मानसिक त्रास आणि आर्थिक नुकसान करणारे कृत्य केल्याने, अर्जदाराने प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराने गैरअर्जदाराकडे गुंतविलेली रक्कम रु. १,५०,०००/-, १८% व्याजासह अर्जदारास तात्काळ परत करावी आणि शारीरिक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु. १,००,०००/- तसेच गैरअर्जदाराने अवलॅबविलेल्या अनुचित व्यापारी पद्धती आणि दिलेल्या न्युनतापूर्ण सेवेबद्द्ल आर्थिक नुकसान रु. ५,००,०००/- आणि तक्रार खर्च रु. १०,०००/- गैरअर्जदार क्र. १ व २ यांनी अर्जदारास तात्काळ अदा करावे व तक्रार खर्चासह मान्य करावी, अशी विनंती अर्जदाराने केली आहे.
३. गैरअर्जदार क्र. १ व २ यांना मंचाची नोटीस पाठविली असता, गैरअर्जदार क्र. १ व २ यांनी मंचासमक्ष हजर राहून तक्रारीतील मुद्द्यांचे खंडन करुन, अर्जदार हे ग्राहक संरक्षण अधिनियम अन्वये तरतुदीनुसार “ग्राहक” या व्याखेत येत नसून अर्जदारांनी तक्रारीमध्ये नमूद केल्याप्रमाणे अर्जदारांनी सदर मिळकत व्यक्तिगत रहिवासी वापरासाठी घेतलेली नसून नफा कमविण्याच्या उद्देशाने घेतलेली आहे. करारनाम्यातील अटी व शर्तीचे अवलोकन केले असता, सदर करारनामा वाणिज्यिक प्रकारच्या वर्गवारीमध्ये येतो. अर्जदाराने व्यावसायिक हेतूने सदर व्यवहार केला असल्याने अर्जदाराची तक्रार खर्चासह अमान्य करण्यात यावी, असा प्राथमिक आक्षेप घेतला. तसेच करारनाम्यातील मिळकत मंचाच्या भौगोलिक अधिकारक्षेत्रात येत नसल्याने, केवळ, गैरअर्जदार यांचे शाखा कार्यालय मंचाच्या भौगोलिक अधिकारक्षेत्रात असल्याने मंचास अधिकारक्षेत्र येणार नाही. कारण, अर्जदाराने गैरअर्जदार यांचे सदर शाखा कार्यालयात कोणताही व्यवहार केलेला नाही. अर्जदाराने गैरअर्जदारासोबत दि. २३.०२.२०१४ रोजी किरायाचा करारनामा केल्यानंतर अर्जदाराने नियमितपणे मासिक किस्त न भरल्याने गैरअर्जदाराने अर्जदारास किरायाची रक्कम अदा केली नाही. अर्जदाराने करारनाम्यातील अटी व शर्तीची पुर्तता न केल्याने गैरअर्जदार यांनी देखिल अर्जदारास किरायाची रक्कम अदा केली नाही. अर्जदार यांनी कोणत्याही न्याय्य व उचीत कारणाशिवाय सदर तक्रार दाखल केली असल्याने व तक्रारदारास सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केला नसल्याने तक्रार खर्चासह अमान्य करण्यात यावी, अशी विनंती गैरअर्जदार क्र. १ व २ यांनी केली आहे.
४. अर्जदारांची तक्रार, कागदपत्रे, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तिवाद तसेच गैरअर्जदार क्र. १ व २ यांची कागदपत्रे, लेखी म्हणणे, पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद व उभय पक्षांचा तोंडी युक्तिवाद यावरून तक्रार निकाल कामी खालील मुद्दे कायम करण्यात येतात.
मुद्दे निष्कर्ष
- ग्राहक संरक्षण अधिनियम अन्वये कलम २(१)(ड)
नुसार अर्जदार हे “ग्राहक” या संज्ञेत येतात काय?नाही
२. आदेश ? तक्रार अमान्य
कारण मिमांसा
मुद्दा क्र. १ :
५. ग्राहक संरक्षण अधिनियम कलम २(१)(ड) अन्वये “ग्राहक” या संज्ञेची व्याप्ती पाहता, वाणिज्यिक प्रकारच्या बाबीसंदर्भात, अर्जदाराच्या उपजीविकेसाठी असल्याखेरीज, अर्जदार “ग्राहक” या संज्ञेत येत नाही. अर्जदाराने तक्रारीत नमूद केलेल्या वादकथनाचे अवलोकन केले असता, अर्जदाराने गैरअर्जदारासोबत केलेला करारनामा स्वत:च्या वापराकरिता किंवा उपजीविकेकरिता केलेला नसून नफा कमविण्याच्या उद्देशाने केला होता, हि बाब अर्जदाराने सदर मिळकतीमधून रक्कम रु. १८००/- किरायापोटी प्राप्त करण्यासाठी केलेल्या करारनाम्यावरून सिध्द होते. अर्जदाराने तक्रारीत केलेल्या विनंतीवरून देखील सदर मिळकतीचा उपयोग वाणिज्यिक प्रकारासाठी होणार होता, असे सिद्ध होते. उभय पक्षांनी दाखल केलेल्या दस्तावेजाचे अवलोकन केले असता, अर्जदारांनी गैरअर्जदारासोबत केलेला करारनामा वाणिज्यिक प्रकारचा असल्याचे सिद्ध होते. तसेच मा. राष्ट्रीय आयोगाने Prithipal Singh Arora and Anr. V/s Ms. Emaar MGF Land Limited 2018 (1) CPR 872 मध्ये विषद केलेल्या न्यायतत्वानुसार अर्जदार “ग्राहक” या संज्ञेत येत नाहीत. सबब, अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक संरक्षण अधिनियम कलम २(१)(ड) अन्वये “ग्राहक” या संज्ञेप्रमाणे “ग्राहक” होत नसल्याने, उपरोक्त निष्कर्षावरून, मुद्दा क्र. १ चे उत्तर नकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्र. २ :
६. मुद्दा क्र. १ व २ वरील विवेचनावरुन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो.
आदेश
१. ग्राहक तक्रार क्र. ७५/२०१७ अमान्य करण्यात येते.
२. खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.
३. उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी.
कल्पना जांगडे(कुटे) किर्ती वैद्य(गाडगीळ) उमेश वि. जावळीकर
सदस्या सदस्या अध्यक्ष