श्री. मनोहर चिलबुले, अध्यक्ष यांचे आदेशांन्वये.
- आ दे श -
(पारित दिनांक - 15 ऑक्टोबर, 2016)
तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये दाखल केलेल्या तक्रारीचे संक्षिप्त विवरण येणेप्रमाणे.
1. तक्रारकर्त्याने वि.प.क्र. 2 मे. पॅनासोनिक लिमिटेड निर्मित मोबाईल हँडसेट वि.प.क्र. 1 निरंकारी मोबाईल स्टोर्स, देसाईगंज, जि. गडचिरोली यांचेकडून दि.29.08.2015 रोजी रु.8250/- मध्ये खरेदी केला. वि.प. ने मोबाईल विकत घेतल्याचे बिल क्र. 188 तक्रारकर्त्यास दिले. तसेच सदर मोबाईल खरेदी केल्यापासून त्यात वारंवार आपोआप बंद पडण्याचा दोष दिसून आला. सप्टेंबर 2015 मध्ये तक्रारकर्त्याने वि.प.क्र. 1 ची भेट घेऊन सदोष मोबाईल बदलवून देण्याची विनंती केली. परंतू त्यांनी फॉर्मेट करुन तोच मोबाईल काही दिवस वापरण्यास सांगितले आणि जर पुन्हा दोष निर्माण झाला तर बदलवून देण्याचे आश्वासन दिले. सदर मोबाईलमध्ये पुन्हा तोच दोष आढळून आल्यामुळे तक्रारकर्त्याने वि.प.क्र. 1 ची भेट घेतली असता त्यांनी सदर मोबार्इल वि.प.क्र. 3 लक्ष्मी टेलिकेयर भंडारा या वि.प.क्र. 2 च्या अधिकृत सेवा केंद्राकडे नेण्यास सांगितले. त्याप्रमाणे तक्रारकर्त्याने सप्टेंबर 2015 च्या अखेरीस मोबाईल दुरुस्तीकरीता वि.प.क्र. 3 कडे नेला असता त्यांनी पुन्हा फॉर्मेट करुन मोबाईल दिला. परंतू त्यावेळेस जॉबशिट बनवून दिली नाही. डिसेंबर 2015 मध्ये पुन्हा मोबाईलमध्ये त्याच दोषाची पुनरावृत्ती झाल्याने तक्रारकर्त्याने तो दुरुस्तीकरीता वि.प.क्र. 3 कडे दिला. वि.प.ने त्यात जुजबी दुरुस्ती करुन तक्रारकर्त्यास परत केला. त्यानंतरही दोष दुरुस्त न झाल्याने तक्रारकर्त्याने 11 जानेवारी 2016 रोजी पुन्हा सदर मोबाईल वि.प.क्र. 3 कडे दुरुस्तीस दिला. त्याबाबतची जॉबशिट वि.प.क्र. 3 ने दिली असून ती तक्रारकर्त्याने दस्तऐवज क्र. 2 वर दाखल केले आहे. तक्रारकर्त्याचे म्हणणे असे आहे की, सदर दुरुस्तीनंतर जुन्या सर्व समस्या कायम आहेत. त्यामुळे तक्रारकर्ता वि.प.क्र. 1 कडून विकत घेतलेला मोबाईल हँडसेटचा उपभोग घेऊ शकत नाही. सदर मोबाईल हँडसेटमध्ये निर्मिती दोष असल्यामुळेच तो विकत घेतल्यापासून त्यात वारंवार बिघाड होत आहे. तक्रारकर्त्याने वि.प.क्र. 1 ला 01.02.2016 रोजी पत्र देऊन सदोष मोबाईल हँडसेट बदलवून देण्याची विनंती केली. परंतू त्यास 13.02.2016 रोजी वि.प.क्र. 1 ने पत्र पाठवून तो वि.प.क्र. 3 कडून दुरुस्त करुन घेण्यास कळविले. वि.प.क्र. 3 कडे यापूर्वी मोबाईल दुरुस्तीस देऊन देखील त्यातील दोष दूर झालेला नाही आणि वि.प.क्र. 1 ने तक्रारकर्त्याकडून रु.8250/- घेऊन विकलेला सदोष मोबाईल विनंती करुनही बदलवून दिलेला नाही. वि.प.ची सदरची कृती ग्राहकांप्रती सेवेतील न्यूनता आणि अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब आहे, म्हणून सदर तक्रारीत खालीलप्रमाणे मागणी केली आहे.
- तक्रारकर्त्याला नविन मोबाईल त्याच बनावटीचा देण्याचा किंवा मोबाईलची किंमत रु.8,250/- परत देण्याचा आदेश व्हावा.
- शारिरीक व मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई रु.20,000/- व तक्रार खर्च रु.10,000/- मिळावा.
तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीसोबत मोबाईलचे बिल, जॉब कार्ड, सर्विस जॉब शिट, मोबाईल परत केल्याचे शिट, नोटीस, पोस्टाच्या पावत्या व पोचपावत्या इ. दस्तऐवजांच्या प्रती दाखल केलेल्या आहेत.
2. वि.प.क्र. 2 ला नोटीस तामिल होऊनही ते मंचासमोर हजर न झाल्याने मंचाने त्यांचेविरुध्द एकतर्फी कारवाई चालविण्याचा आदेश पारित केला.
3. वि.प.क्र. 1 व 3 यांनी संयुक्त लेखी जवाब दाखल केला असून तक्रारीस सक्त विरोध केला आहे. त्यांचा प्राथमिक आक्षेप असा की, तक्रारकर्त्याने वि.प.क्र. 1 कडून तक्रारीतील मोबाईल हँडसेट वडसा येथे खरेदी केला, त्यामुळे मंचाला सदर तक्रार चालविण्याची अधिकार कक्षा नसल्याने तक्रार खारीज होण्यास पात्र आहे. तक्रारकर्त्याने वि.प.क्र. 1 कडून तक्रारीतील वर्णनाचा मोबाईल खरेदी केल्याचे वि.प.क्र. 1 व 3 ने लेखी जवाबात मान्य केले आहे. मात्र त्यांत तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे खरेदीनंतर लगेच दोष निर्माण झाले व मोबाईलमध्ये निर्मिती दोष असून ते दूर न झाल्याने तक्रारकर्ता नविन मोबाईल हँडसेट किंवा मोबाईलची किंमत परत मिळण्यास पात्र असल्याचे नाकबूल केले आहे. त्यांचे म्हणणे असे की,तक्रारकर्त्याने मोबाईल हँडसेट वि.प.क्र. 3 कडे डिसेंबर 2015 मध्ये दाखविला असता त्याच्या तपासणीमध्ये कोणताही दोष आढळून आला नाही म्हणून तक्रारकर्त्यास परत करण्यांत आला होता. तक्रारकर्त्याने खरेदी केलेला हँडसेट पसंत नसल्याने तो बदलवून मिळावा म्हणून मोबाईल सदोष आहे असे सांगून कंपनीस परत करावा व दुसरा मोबाईल द्या म्हणून तक्रारकर्त्याने वि.प.ला सांगितले. परंतू वि.प.ने त्याची बेकायदेशीर मागणी अमान्य केली. पुन्हा 11.01.2016 रोजी तक्रारकर्ता सदर मोबाईल घेऊन वि.प.क्र. 3 कडे आला तेव्हा मोबाईलमध्ये कोणताही बिघाड नसल्याने मोबाईल बदलवून देता येणार नाही असे त्यास सांगितले. परंतू मोबाईल कंपनीला पाठविण्याचा तक्रारकर्त्याने हट्ट धरल्याने दि.11.01.2016 रोजी जॉबशिट बनवून मोबाईलमध्ये काय त्रुटी आहेत हे जाणून घेण्यासाठी कंपनीला पाठविला. कंपनीने (वि.प.क्र. 2 ने) ‘नो फॉल्ट फाऊंड’ अशा अभिप्रासासह मोबाईल परत पाठविला. मोबाईलमध्ये कोणताही दोष नसतांनादेखिल वि.प. क्र. 1 व 3 यांनी मोबाईल सॉफ्टवेअर अपडेट करुन मोबाईल बरोबर काम करीत असल्याची खात्री करुन घेतली. त्यामुळे त्यांचेकडून सेवेत कोणतीही त्रुटी झालेली नाही. तक्रारकर्त्याचे मोबाईलमध्ये कोणताही दोष नसून मोबाईल चालू आहे. परंतू घेतलेला मोबाईल पसंत नसल्याने तक्रारकर्त्याने मोबाईल सदोष असल्याचे खोटे कारण सांगून खोटी तक्रार केली असल्याने ती खारीज करण्याची वि.प.नी विनंती केलेली आहे.
3. उभय पक्षांच्या परस्पर विरोधी कथनावरुन मंचाचे विचारार्थ खालील मुद्दे व त्यावरील निष्कर्ष खालीलप्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) तक्रार चालविण्याची या मंचाला अधिकार कक्षा आहे काय ? होय.
2) वि.प.ने सेवेत न्युनतापूर्ण व्यवहार केला आहे काय ? होय.
3) तक्रारकर्ती मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पात्र आहे काय ? अंशतः.
4) आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
4. मुद्दा क्र. 1 बाबत – सदर प्रकरणात वि.प.क्र. 1 कडून तक्रारीतील मोबाईल जरी वडसा, जि. गडचिरोली येथे खरेदी केला असला तरी वि.प.क्र. 3 हे मोबाईल निर्मात्या कंपनीचे अधिकृत सेवा केंद्र भंडारा येथे असल्याने व त्यांच्याकडे मोबाईल दुरुस्तीस देऊनही दुरुस्त न झाल्याने किंवा नविन मोबाईल न मिळाल्याने तक्रारीस कारण भंडारा येथे भंडारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या अधिकार क्षेत्रात घडले असल्याने ग्राहक संरक्षण अधिनियमाच्या कलम 11 (2) (6) आणि (सी) अन्वये मंचाला सदर तक्रार चालविण्याची अधिकार कक्षा म्हणून मुद्दा क्र. 1 वरील निष्कर्ष होकारार्थी नोंदविला आहे.
5. मुद्दा क्र. 2 बाबत – तक्रारकर्त्याचे शपथेवर कथन आहे की, मोबाईल खरेदीपासूनच त्यात निर्मिती दोष असल्याने चार्जिंगला लावल्यावर 4-5 मिनिटात आपोआप बंद पडणे, इंटरनेट किंवा इतर अॅप्स चालू केल्यावर आपोआप बंद पडणे इ. समस्या उद्भवल्या. त्यामुळे सप्टेंबर 2015 च्या पहिल्या आठवडयांत म्हणजे दि.29.08.2015 रोजी मोबाईल खरेदी केल्यानंतर एक आठवडयातच तो वि.प.क्र. 1 कडे नेला आणि सदोष मोबाईल बदलवून देण्याची विनंती केली. त्यांनी मोबाईल बदलवून न देता फॉर्मेटींग करुन दिला. मात्र फार्मेटींग नंतरही मोबाईलमधील दोष दूर झाले नाही. वि.प.क्र.1 ला सांगितल्यावर त्यांनी कंपनीचे अधिकृत सेवा केंद्र वि.प.क्र. 3 कउे मोबाईल दाखविण्यास सांगितले. सप्टेंबर 2015 च्या शेवटच्या आठवडयात वि.प.क्र. 3 कडे दुरुस्तीसाठी मोबाईल नेता असता त्यांनी जॉबशिट न बनविता मोबाईल फार्मेटींग करुन दिला. 15-20 दिवस मोबाईल चांगला चालला परंतू पुन्हा जुन्याच समस्या निर्माण झाल्या. म्हणून डिसेंबर 2015 मध्ये पुन्हा मोबाईल वि.प.क्र. 3 कडे नेल्यावर त्यांनी 8 दिवस ठेऊन दुरुस्त झाल्याचे सांगून परत केला. मात्र 3-4 दिवसातच जुन्या समस्या कायम असल्याचे निदर्शनास आल्याने 11 जानेवारी 2016 रोजी पुन्हा दुरुस्तीकरीता वि.प.क्र. 3 कडे दिला. मात्र तरीही जुन्याच समस्या कायम असल्याने तक्रारकर्ता मोबाईचा उपभोग घेऊ शकत नाही. वि.प.क्र. 1 ला मोबाईल बदलवून देण्याची किंवा किंमत परत करण्याची विनंती केली. परंतू त्याने ती पूर्ण केली नाही.
तक्रारकर्त्याने दि.11.01.2016 ची वि.प.क्र. 3 ने दिलेली जॉब शिटची प्रत दस्तऐवज क्र. 2 वर दाखल केली आहे. त्यांत तक्रारीचे स्वरुप “No power on” असे नमूद आहे. वि.प.क्र. 1 व 3 यांनी लेखी जवाबात नमूद केले आहे की, सदर मोबाईल त्यांनी वि.प.क्र. 2 कडे तपासणीसाठी पाठविला असता मोबाईलमध्ये कोणताही दोष नसल्यामुळे नो फॉल्ट फाऊंड अशा शे-यासह परत पाठविण्यांत आला. परंतू सदर मोबाईल कंपनीकडे पाठविल्याबाबत आणि कंपनीने नो फॉल्ट फाऊंड शे-यासह परत पाठविल्याबाबत कोणताही दस्तऐवज वि.प.नी दाखल केलेला नाही. अशा पुराव्याअभावी सदर मोबाईलमध्ये कोणताही निर्मिती दोष नव्हता हे वि.प.चे म्हणणे स्विकारणे कठीण आहे. याऊलट तक्रारकर्त्याचा शपथपत्रावरील पुरावा व त्याने दाखल केलेल्या वि.प.क्र. 3 ने निर्गमित जॉब शिट वरील नोंदीवरुन वि.प.क्र. 1 ने तक्रारकर्त्यास विकलेला मोबाईल हँडसेट निर्मिती दोषयुक्त असल्यानेच त्यांत तक्रारीत नमुद समस्या निर्माण झाल्या होत्या आणि त्या वि.प.क्र. 3 ने दूर केल्या नाही किंवा तक्रारकर्त्याने दस्तऐवज क्र. 3 प्रमाणे मागणी करुनही वि.प.नी मोबाईल हँडसेट बदलून दिला नाही किंवा मोबाईलची किंमतही परत केली नाही. ही निश्चितच सेवेतील न्यूनता आणि अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब आहे. म्हणून मुद्दा क्र. 2 वरील निष्कर्ष होकारार्थी नोंदविला आहे.
5. मुद्दा क्र. 3 व 4 बाबत – वि.प.क्र. 1 ने तक्रारकर्त्यास विकलेला मोबाईल हँडसेट सदोष असल्याने व तो वि.प.क्र. 2 व 3 यांनी दुरुस्त करुन दिला नसल्याने तक्रारकर्ता सदर सदोष मोबाईल हँडसेटऐवजी त्याच मॉडेलचा दुसरा हँडसेट एक वर्षाच्या वारंटीसह मिळण्यास किंवा हँडसेटची किंमत रु.8,250/- खरेदी दि.29.08.2015 पासून प्रत्यक्ष अदाएगीपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह मिळण्यास पात्र आहे.
याशिवाय, आर्थिक व मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई रु.3,000/- आणि तक्रारीचा खर्च रु.2,000/- मिळण्यास देखिल तक्रारकर्ता पात्र आहे. म्हणून मुद्दा क्र. 3 व 4 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविले आहेत.
वरील निष्कर्षास अनुसरुन खालीलप्रमाणे आदेश पारित करण्यांत येत आहे.
- आ दे श -
तक्रारकर्त्याची ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 च्या कलम 12 खालिल तक्रार वि.प.क्र. 1 ते 3 विरुध्द संयुक्त व वैयक्तीकरीत्या खालीलप्रमाणे अंशतः मंजूर करण्यांत येते.
1) वि.प.नी तक्रारकर्त्यास त्याच किंमतीचा व त्याच मॉडेलचा नविन मोबाईल हँडसेट पुढील एक वर्षाच्या वारंटीसह बदलवून द्यावा.
किेंवा
मोबाईलची हँडसेटची किंमत रु.8,250/- दि.29.08.2015 पासून प्रत्यक्ष अदाएगीपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह परत करावी.
2) शारिरीक, आर्थिक व मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई रु.3,000/- आणि तक्रार खर्चाबाबत रु.2,000/- वि.प.नी तक्रारकर्त्यास द्यावा.
3) वि.प.क्र. 1 ते 3 ने सदर आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांचे आत संयुक्तपणे व वैयक्तीकरीत्या करावी.
4) तक्रारीची ‘ब’ व ‘क’ प्रत तक्रारकर्त्यास परत करावी.
5) आदेशाची प्रत उभय पक्षांना विनामुल्य पुरवावी.