नि.20
मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – श्री ए.व्ही.देशपांडे
मा.सदस्य - श्री के.डी.कुबल – रजेवर
मा.सदस्या - श्रीमती वर्षा शिंदे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 2351/2009
तक्रार नोंद तारीख : 31/12/2009
तक्रार दाखल तारीख : 04/01/2010
निकाल तारीख : 01/07/2013
----------------------------------------------
श्री विक्रांत वसंतराव देवांगस्वामी
वय वर्षे 38, धंदा – व्यापार
रा.लिजंड ऑप्टीक्स, दुकान गाळा नं.2,
पिताश्री कॉम्प्लेक्स, वंटमुरे कॉर्नर,
मिरज ता.मिरज जि.सांगली ....... तक्रारदार
विरुध्द
श्री निरंजन किशोर ओझा
व.व.30, धंदा – व्यापार,
रा.द्वारा मारुती कुरीयर
बसवेश्वर ट्रान्स्पोर्ट शेजारी,
शनिवार पेठ, मिरज ता.मिरज जि.सांगली ........ सामनेवाला
तक्रारदार तर्फे : अॅड श्री एन.ए.व्हटकर
जाबदार तर्फे : अॅड श्री एस.जी.मालगांवकर
- नि का ल प त्र -
द्वारा: मा. सदस्या : श्रीमती वर्षा शिंदे
1. प्रस्तुतची तक्रार तक्रारदाराने सामनेवालाकडे कुरियरकरिता दिलेले पार्सल संबंधीतांना न मिळाल्याने, ते गहाळ झालेने दाखल केली आहे. प्रस्तुत तक्रार स्वीकृत करुन सामनेवालांना नोटीस आदेश झाला. सामनेवालांना नोटीस लागू झालेनंतर ते वकीलांमार्फत मंचासमोर हजर झाले व त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे दाखल केले. तक्रारदारांचे वकीलांचा व सामनेवालांचे वकीलांचा युक्तिवाद ऐकला.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात हकीकत अशी -
तक्रारदार हे मिरज येथे लिजंड ऑप्टीक्स या नावाने चष्मे गॉगल्स तयार करणे, विक्री करणे व दुरुस्ती देखभाल करणेचा व्यवसाय करतात. तक्रारदाराने त्याचे व्यवसायास लागणारे संबंधीत मटेरियल ते निव्होट्रॉनिक्स, 14, पंचकुटीर, नरीमन रोड, विलेपार्ले, मुंबई यांचेकडून मागवित असत. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी दि.10/9/09 रोजी रु.13,500/- चे मटेरियल मागवून घेतले. परंतु ते मागणीप्रमाणे नव्हते, म्हणून बदलणेचे होते म्हणून संबंधीत कंपनीकडे परत पाठविणेचे होते. म्हणून जाबदार यांचे कुरियर सेवामार्फत ते मुंबई येथे वर नमूद कंपनीला पाठविणेकरिता पार्सल तयार करुन दि.11/9/09 रोजी रितसर रु.40/- भरुन व रितसर पावती करुन पाठविले. परंतु सदरचे पार्सल ठरलेल्या वेळेत पाठविलेल्या पत्त्यावर अद्याप पोचलेले नाही. जाबदार यांचे मुंबई ऑफिस व मिरज ऑफिस दोन्ही कडून पार्सल हरविले असलेचे जाबदार यांचेकडून सांगणेत आले. म्हणून तक्रारदाराने जाबदारांकडे अर्ज देवून मटेरियलचे बिलाची रक्कम रु.13,500/- ची मागणी केली. परंतु जाबदार यांनी सदरची रक्कम दिलेली नाही.
सामनेवालाने सेवेत त्रुटी ठेवल्याने तक्रारदाराचे व्यवसायात रु.25,000/- चे आर्थिक नुकसान झाले आहे. सामनेवालाचे कृत्यामुळे मानसिक त्रास होत आहे. तक्रारदाराने दि.16/11/09 रोजी नोटीस पाठवून रु.48,500/- इतक्या रकमेची मागणी केली सामनेवालाने त्यास दाद दिली नाही. त्यामुळे तक्रारदाराने प्रस्तुतचा तक्रारअर्ज दाखल केला आहे. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह मंजूर करुन तक्रारीत कथन केलेप्रमाणे रु.48,500/- देणेबाबत हुकूम व्हावा अशी विनंती केली आहे.
3. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीच्या पुष्ठयर्थ नि.3 वर शपथपत्र व नि.5 चे कागदयादीप्रमाणे मटेरियलचे बिल, जाबदार यांना दिलेला क्लेम अर्ज, कुरियरची पावती, तक्रारदार यांनी जाबदार यांना पाठविलेली नोटीस, नोटीसची पोच, पोस्टाची पावती असे एकूण 6 कागद दाखल केले आहेत. तसेच नि.17 ला पुराव्याचे शपथपत्र दाखल केले आहे व नि.18 ला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
4. सामनेवालांनी नि.15 ला लेखी म्हणणे दाखल केले आहे. सामनेवालांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार तक्रारदाराची तक्रार स्पष्टपणे नाकारली आहे. सामनेवाला पुढे असे प्रतिपादन करतात की, निव्होट्रॉनीक्स विलेपार्ले मुंबई यांचेकडून दि.10/9/2009 चे मटेरिअल मागवून घेतले, ते कोणत्या कुरियरने आले याचे कोठेही कथन केलेले नाही. तसेच जकात भरलेचा पुरावा दि.19/9/2009 चे पत्राने मागणी करुनही सामनेवालांनी दिलेला नाही. सबब तक्रारदार म्हणतात त्याप्रमाणे सदर मागविलेले पाकीट सामनेवालाचे मार्फत कुरिअरने पाठविले हे कथन धादांत खोटे आहे. सामनेवाला पुढे असेही प्रतिपादन करतात की 10 व 11 सप्टेंबर 2009 रोजी मिरज शहरामध्ये जातीय दंगली उसळल्याने सांगली व मिरज शहरामध्ये संपूर्ण संचारबंदी लागू असल्याने तक्रारदाराचे मुंबईहून दि.10/9/09 चे आलेले पाकीट दि.11/9/09 रोजी पुन्हा मुंबईला पाठविले. हे कथन धादांत खोटे असून तक्रारदार स्वच्छ हाताने मंचासमोर आलेला नाही. संचारबंदीच्या काळात मटेरिअल पार्सल आले नव्हते व नाही. त्यामुळे नमूद पत्त्यावर पार्सल पोहोचवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. याउलट सामनेवालांनी सौजन्याने तक्रारदारास लेखी खुलासा मागितला होता तो त्याने दिला नाही. तसेच ज्याच्याकडे पार्सल पोचवायचे होते त्याची तक्रार किंवा पुरावा नाही. तक्रारदाराने खोटा बनाव रचला आहे. नव्याने कोणतेही पार्सल सामनेवालांकडून पाठविले नव्हते व नाही. त्यामुळे मानसिक व आर्थिक नुकसान होण्याचा प्रश्न उद्भवत नाही. तक्रारदाराचे दि.16/9/09 चे नोटीसीस सामनेवाला यांनी दि.19/11/09 रोजी लेखी खुलासा केला होता व मागितला होता व आहे. सामनेवाला यांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही. तक्रारदार उचापतीखोर माणूस असून खोटा अर्ज दाखल करुन रक्कम उकळण्याचा प्रयत्न करत आहे. सबब तक्रारदाराने सामनेवालांना नाहक त्रास दिलेने जबर दंड करावा व खर्चासह तक्रार फेटाळणेत यावी.
सामनेवालाने म्हणणेचे पुष्ठयर्थ नि.16 वर शपथपत्र दाखल केले आहे. तसेच म्हणण्याचे पुष्ठयर्थ इतर कोणतीही कागदपत्रे दाखल केलेली नाहीत.
5. तक्रारदाराची तक्रार, सामनेवालेचे म्हणणे, उभय पक्षांचा युक्तिवाद व दाखल पुरावे यांचा विचार करता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षाकरिता उपस्थित होतात.
मुद्दे उत्तरे
1. तक्रारदार हा ग्राहक आहे काय ? होय.
2. सामनेवाला यांनी सेवात्रुटी केली आहे काय ? होय.
3. तक्रारदाराने केलेल्या मागण्या मिळण्यास तो पात्र आहे काय ? होय.
4. अंतिम आदेश खालीलप्रमाणे
कारणे
मुद्दा क्र.1
6. तक्रारदाराने सामनेवाला यांचेकडे एक पार्सल कुरियरसाठी दिलेले होते. प्रस्तुत पार्सल निव्होट्रॉनिक्स, 14 पंचकुटीर, नरीमन रोड, विलेपाले पूर्व मुंबई 400057 यांचेकडे पाठविणेसाठी दिलेले होते. त्याबाबतची रिसीट नि.5/3 ला दाखला आहे तसेच प्रस्तुत पार्सल वर नमूद कंपनीस मिळाले नसल्याने दि.23/10/09 च्या नि.5/2 चे अर्जाने तक्रारदाराने सामनेवालाकडे नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे. यावरुन तक्रारदाराने सामनेवालाकडून कुरियर सेवा घेतलेली होती हे स्पष्ट होते. यावरुन तक्रारदार हा सामनेवाला यांचा ग्राहक आहे व प्रस्तुतचा वाद हा ग्राहकवाद असून प्रस्तुतची तक्रार चालवण्याचे अधिकार क्षेत्र या मंचास येते या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
मुद्दा क्र.2 ते 4
7. नि.1 वरील दाखल तक्रारीतील कथनानुसार तक्रारदाराचा चष्मे, गॉगल्स तयार करणे, त्यांची विक्री करणे तसेच दुरुस्ती देखभाल करण्याचा व्यवसाय आहे. तक्रारदाराचे व्यवसायाच्या ठिकाणी लिजंड ऑप्टिक्स दुकान गाळा क्र.2, पिताश्री कॉम्प्लेक्स, वंटमुरे कॉर्नर, मिरज जि. सांगली याठिकाणी तक्रारदांनी त्यांचे व्यवसायासाठी लागणारे संबंधीत मटेरियल निव्होट्रॉनिक्स, 14 पंचकुटीर, नरीमन रोड, विलेपाले पूर्व मुंबई 400057 यांचेकडून मागवित असत. त्याप्रमाणे दि.10/9/2009 रोजी W 6” – 2 नग रु.12,000/- अधिक 12.5 प्रमाणे व्हॅट रु.1500/- असे एकूण रु.13,500/- अदा करुन मटेरियल मागवून घेतले होते. सदर मटेरियल सेल्स टॅक्स इन्व्हाईस-कम-चलन नि.5/1 वर आहे. यावरुन प्रस्तुत मटेरियल तक्रारदारास नमूद कंपनीकडून खरेदी केले होते ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे.
8. मात्र प्रस्तुत मटेरियल हे तक्रारदाराने मागणी केल्याप्रमाणे नसलेने ते बदलणेचे असल्याने वर नमूद कंपनीकडे परत पाठविणेसाठी तक्रारदाराने सामनेवाला यांचे कुरिअरमार्फत वर नमूद कंपनीच्या पत्त्यावर दि.11/9/2009 रोजी रितसर रु.40/- इतका आकार भरुन व रितसर पावती घेवून पाठविले. सदर पावती नं.221185819 आहे. सदर पावती नि.5/3 वर आहे. सदर पावतीवर लिजंड ऑप्टिक्स यांचे पाठविणाराचे नाव यामध्ये नाव नमूद आहे तसेच सदर पार्सल वर नमूद कंपनीकडे देण्याचे असलेबाबतचेही नमूद आहे. चार्जेसमध्ये रु.40/- लिहिलेचे दिसून येते. तसेच त्यावर तारीखही नमूद आहे. यावरुन तक्रारदाराने वर नमूद मालाचे पार्सल सामनेवाला कुरिअरकडे नमूद कंपनीसाठी दिलेले होते ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे.
9. युक्तिवादाचे वेळेस सामनेवाला यांचे वकीलांनी प्रथमतः सदर पावती दुस-या मालाची असलेबाबत प्रतिपादन केले व तदनतर लगेचच प्रस्तुत पावती सामनेवालाची नसलेचे प्रतिपादन केले. वस्तुतः प्रस्तुत प्रकरण दि.4/1/2010 रोजी स्वीकृत केलेले आहे. दि. 2/7/10 रोजी सामनेवालाने वकीलामार्फत हजर राहून म्हणणे देणेसाठी नि.10 च्या अर्जाने मुदत मागितली. मुदत देवूनही सामनेवाला याने म्हणणे दाखल केले नसल्याने दि.18/12/10 रोजी सामनेवाला विरुध्द नो से आदेश नि.1 वर पारीत करण्यात आलेला आहे. त्याचदिवशी सामनेवाला यांनी सदर हुकूम रद्द होवून म्हणणे दाखल करणेसाठी अर्ज नि.13 ला दिलेला आहे. मात्र प्रस्तुतचा अर्ज तत्कालिन मंचाने प्रस्तुत प्रकरणी ज्या वकीलांनी हा अर्ज दाखल केला. त्यांचे वकीलपत्र नसल्याने सदरचा अर्ज केवळ दाखल करुन घेतला. तद्नंतर स्वतः सामनेवाला यांनी नो से आदेश करणेबाबत अर्ज नि.14 ला दिला. सदर अर्जावर तत्कालिन मंचाने रु.300/- तक्रारदारांना देण्याच्या अटीवर न्यायहितार्थ अर्ज मंजूर केला व त्यादिवशी सामनेवाला यांचे म्हणणे दाखल करुन घेण्यात आलेले आहे. सामनेवाला याने सदर म्हणणेचे पुष्ठयर्थ कोणताही पुरावा दिलेला नाही. तदनंतर दाखल रोजनाम्यावरुन सामनेवाला हे 10/8/11, 27/2/12, 19/3/13, 12/6/13 वगळता अन्य तारखांना गैरहजर आहेत. सामनेवाला यास त्याचे पुरावे दाखल करण्याची, त्याची बाजू मांडण्याची तसेच तक्रारदाराची तक्रार खोडून काढण्याची पूरेपुर संधी देवूनही सामनेवाला याने केवळ म्हणणे दाखल करण्याव्यतिरिक्त कोणतीही कृती केलेली नाही. प्रस्तुत प्रकरण युक्तिवादासाठी दि.20/6/2013 रोजी ठेवणेत आले. त्यादिवशी सामनेवाला तसेच त्यांचे वकीलही गैरहजर होते. तक्रारदारांच्या वकीलांचा अंतिम तोंडी युक्तिवाद ऐकणेत आला व प्रस्तुत प्रकरण दि.27/6/13 रोजी निकालावर ठेवण्यात आले. सदर दिवशी सामनेवाला गैरहजर मात्र त्यांचे वकील यांनी हजर राहून युक्तिवाद करणेची संधी देणेचा मुदतीचा अर्ज नि.19 वर दाखल करुन सोबत वैद्यकीय प्रमाणपत्र दाखल केले. सदर अर्ज मंचाने नामंजूर करुन आजच्या आज युक्तिवाद करण्याचा आदेश केला. त्यावेळी सामनेवाला यांच्या वकीलांचा अंतिम युक्तिवाद ऐकण्यात आला.
10. वस्तुतः सामनेवाला याने त्यांचे म्हणणेमध्ये तसेच युक्तिवादाचे वेळेस प्रस्तुत तक्रार नाकारली. तक्रारदाराने नि.5/2 वर प्रस्तुत पार्सल सामनेवाला कुरियरवाल्यांकडून नमूद कंपनीला मिळाले नसल्याने ते गहाळ झाले आहे, त्यामुळे सदर पार्सलमधील वस्तूंची नि.5/1 च्या बिलाप्रमाणे रु.13,500/- ची मागणी करणारा अर्ज सामनेवाला याने दि.26/10/2009 रोजी स्वीकारला. सदर अर्जावर रिसीव्हड म्हणून सामनेवाला याने सही केल्याचे सामनेवाला यांच्या वकीलांनी मे.मंचासमोर मान्य केले आहे याची न्यायीक नोंद या मंचाने घेतलेली आहे. दि.26/10/2009 ला तक्रारदाराचा नमूद पाठविलेले पार्सल गहाळ झालेबाबत त्याची नुकसान भरपाई करुन द्यावी म्हणून विनंती केलेली आहे. याची दखल सामनेवाला याने न घेतल्याने दि.16/11/2009 रोजी त्यास तक्रारदाराने नि.5/4 ने वकील नोटीस पाठविली. सदर नोटीस मिळालेबाबतची पोस्टाची आर.पी.ए.डी.ची पोचपावती नि.5/5 वर दाखल आहे. तसेच नि.5/6 वर सदर नोटीस पाठविलेबाबतची रिसीट दाखल आहे. तद्नंतरही सामनेवाला यांनी प्रस्तुत तक्रारदाराच्या तक्रारवजा अर्जावर कोणतीही कार्यवाही केलेली नाही. तसेच सदर नोटीशीला कोणतेही उत्तर दिल्याचा पुरावा प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेला नाही. मात्र सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणेतील कलम 6 पॅरा 2 मध्ये मटेरियलच्या पार्सल बाबत जकात पावती बिलाबाबत व संचारबंदीच्या काळाबाबत खुलासा मागूनही तसेच सदर खुलासा अथवा त्याचा पुरावा दिलेला नाही असे कथन केलेले आहे. याचा विचार करता तक्रारदाराने त्यांच्याकडे दि.23/10/09 च्या अर्जाने जी नुकसान भरपाईची मागणी केली होती, तो अर्ज सामनेवाला यांनी दि.26/10/09 ला स्वीकारुनही त्या अर्जास कोठेही लेखी उत्तर दिलेले नाही किंवा नोटीशीलाही उत्तर दिलेले नाही याबाबत सामनेवाला याने मौन बाळगलेले आहे, ही वस्तुस्थिती यावरुन निर्विवाद आहे.
11. सामनेवाला म्हणतात त्याप्रमाणे प्रस्तुत पार्सल नमूद कंपनीकडून कधी आले त्याची जकात भरली का किंवा अन्य आकार भरले का या बाबींच्या खुलाशांची मागणी करण्यापेक्षा प्रस्तुत पार्सल सामनेवाला यांचेकडे प्रस्तुत तक्रारदाराने दिलेच नाही याबाबतचा पुरावा सामनेवाला यांनी दाखल करणे आवश्यक होते. सदर दि.10/9/09 व 11/9/09 या काळात मिरजेमध्ये जातीय दंगल उसळल्याने संपूर्ण संचारबंदी लागू केली होती, त्यामुळे मुंबईहून सदर पार्सल येणे व ते त्याने त्याचे मागणीप्रमाणे नसलेने बदलून देणेसाठी पुन्हा त्या कंपनीकडे सामनेवाला कुरिअर यांचेकडे पाठविणे ही गोष्ट सदर वस्तुस्थितीचा विचार करता हास्यास्पद असल्याचे कथन केले आहे. तसेच तक्रारदाराने संबंधीत कंपनीला नमूद पार्सल मिळाले नसल्याबाबतचा कोणताही पुरावा दिलेला नाही असा आक्षेप घेतलेला आहे. याचा विचार करता तक्रारदार व त्यांचे वकीलांनी युक्तिवादाचे वेळीस सदर दिवशी जरी संचारबंदी असली तरी जनतेच्या सोयीसाठी दुपारच्या वेळेला काही कालावधीसाठी संचारबंदी शिथील करण्यात आली होती. सदर कालावधीत नमूद पार्सल सामनेवाला यांच्या कुरियरकडे नमूद कंपनीला पाठविण्यासाठी दिलेले होते व ते गहाळ झाले होते, या त्याने केलेल्या कथनासाठी व तक्रारीतील कथनासाठीसुध्दा त्याने नमूद पार्सल खरेदी केल्याची पावती तसेच पार्सल पाठविल्याबाबतचे सामनेवाला यांची पावती पार्सल गहाळ झालेमुळे नुकसान भरपाईचा मागणी अर्ज, वकील नोटीस, शपथपत्र इ. पुरावा दाखल केलेला आहे. याउलट सामनेवाला यांना तक्रारदाराची तक्रार खोडून काढण्यासाठी पुरेपुर संधी होती नमूद कंपनीकडून पार्सल मिळाले आहे अथवा नाही याचा खुलासा नमूद कंपनीकडे त्यांना मागविता आला असता तसेच दि.26/10/09 ला स्वीकारलेल्या तक्रारीचे निराकरण करता आले असते तसेच तक्रारदाराने खोटी तक्रार केलेली त्याच्या निदर्शनास आली असती तर त्याचेविरुध्द फौजदारी कारवाई करता आली असती. किमान अशी वस्तुस्थिती घडलीच नाही असे लेखी देण्याचे तसेच नोटीशीला उत्तर देण्याचेही कष्ट सामनेवालाने घेतलेले नाही. याचा विचार करता तक्रारदाराच्या तक्रारीत पुरेपुर तथ्य आहे याउलट सामनेवाला याने तक्रारदाराची तक्रार पुराव्यानिशी खोडून न काढता तसेच प्रस्तुत प्रकरण 2009 रोजी दाखल असून 2013 रोजी निकालावर घेतलेले आहे. जवळजवळ 4 वर्षाच्या कालावधीमध्ये जाबदार व त्यांचे वकील सातत्याने गैरहजर राहिलेले आहेत. आपली बाजू सिध्द करणेची पुरेशी संधी असतानाही नो से चा आदेश रद्द करुन केवळ म्हणणे दाखल करण्याव्यतिरिक्त त्यांनी त्याबाबत कोणतीही कारवाई केलेली नाही. सदर बाबीचा विचार करता तक्रारदार म्हणतो त्याप्रमणे तक्रारदाराने नमूद पार्सल सामनेवाला कुरियरमार्फत नमूद कंपनीकडे पाठविलेले आहे. मात्र सदर पार्सल नमूद कंपनीकडे न मिळाल्यामुळे प्रस्तुतची तक्रार त्याने पुरेपूर प्रयत्न करुनही सामनेवाला याने दाद न दिल्याने प्रस्तुतची तक्रार तक्रारदारास दाखल करणे भाग पडले. वरील विस्तृत विवेचन व पुराव्यावरुन सामनेवाला कुरियर याने नमूद पार्सल संबंधीतानां पोचवणिेबाबत सेवेत कसुर केलेला आहेया निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
12. तक्रारदारास सदर तक्रार दाखल करावी लागल्यामुळे त्यास व्यावसायिक नुकसान तसेच मानसिक त्रास झालेला आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मात्र तक्रारदाराने नेमके काय आर्थिक नुकसान झाले याबाबत कोणताही पुरावा न दिल्याने सदर व्यावसायिक कारणासाठी सर्वसाधारण रक्कम (lumpsum) मंजूर करण्याच्या निष्कर्षप्रत हे मंच येत आहे.
13. तक्रारदारांना झालेल्या मानसिक त्रासापोटी तसेच तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम मिळण्यास तो पात्र आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
14. वरील विस्तृत विवेचन व दाखल पुराव्यांचा विचार करता सामनेवाला यांनी सेवेत गंभीर त्रुटी ठेवली असल्याने सदर रकमा देण्यासाठी सामनेवाला जबाबदार आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
आदेश
1. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज मंजूर करणेत येत आहेत.
2. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना गहाळ झालेल्या पार्सलमधील वस्तूंची किंमत रक्कम
रुपये 13,500/- अदा करावेत.
3. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना व्यावसायिक नुकसानीपोटी 500/- अदा करावेत.
4. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी 500/- अदा करावेत.
5. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना तक्रार अर्जाचे खर्चापोटी रु. 1,000/- अदा करावेत.
6. वर नमूद आदेशाची पुर्तता सामनेवाला यांनी या आदेशाच्या तारखेपासून 45 दिवसांत
करणेची आहे.
7. सामनेवाला यांनी आदेशाची पुर्तता विहीत मुदतीत न केल्यास तक्रारदार त्यांचे विरुध्द
ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतूदीनुसार दाद मागू शकतील.
सांगली
दि. 1/07/2013
( वर्षा शिंदे ) ( ए.व्ही.देशपांडे )
सदस्या अध्यक्ष