Complaint Case No. CC/23/34 | ( Date of Filing : 06 Mar 2023 ) |
| | 1. Shri.Pralhad Bisanji Balpande | Dr.Ganvir yanche hospital jawal,shanti nagar,Brahmapuri,T.Brahmapuri,Dist.Chadrapur | CHANDRAPUR | MAHARASHTRA |
| ...........Complainant(s) | |
Versus | 1. Nilesh Dineshrao Ghadage | Badwaik dudha deary chya mage,Rambhau mahlgi chowk,Hudkeshwar,Nagpur,T.Dist.Nagpur | Nagpur | MAHARASHTRA |
| ............Opp.Party(s) |
|
|
Final Order / Judgement | (पारित दिनांक २४/०५/२०२४) आयोगाचे आदेशान्वये श्रीमती वैशाली आर. गावंडे, मा. अध्यक्ष - प्रस्तुतची तक्रार ही तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ चे कलम ३५ सह कलम ३८ अन्वये विरूद्ध पक्षाने तक्रारदाराचा वैध दावा नाकारल्याने अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केल्याने तसेच ग्राहक म्हणून सेवेमध्ये त्रुटी ठेवल्याने दाखल केलेली आहे.
- तक्रारदाराने कथन केले आहे की, तक्रारदाराने विरुद्ध पक्ष यांचे चिमूर साइटवर प्रदर्शित केलेली दस्त क्रमांक १ वर दाखल केलेली जाहिरात फलक बघून व त्यावर नमूद फोन क्रमांक ९५५२४२५७१४ वर विरुद्ध पक्ष यांच्याशी संपर्क केला.
- तक्रारदारानुसार विरुद्ध पक्ष हे निलेश दिनेशराव घाडगे साईकृपा डेव्हलपर्स अँड बिल्डर्स या नावाने भूखंड विक्री करण्याचा व्यवसाय करतात. विरुद्ध पक्ष यांनी तक्रारदारास मौजा वडाळा (पैकु), तहसील चिमूर, जिल्हा चंद्रपूर येथील तलाठी साजा क्रमांक १४५, ब.न.४५९, भूमापन क्रमांक ४२ ही जागा अकृषक करून त्यावरील प्रस्तावित लेआउट विकसित होत आहे व या परिसरात लवकरच मोठमोठ्या कॉलनी तयार होणार आहेत असे प्रस्तावित लेआउट नकाशा दाखवून सांगितले. सदरहू प्रस्तावित योजनेचा लेआउट नकाशा दस्त क्रमांक २ वर दाखल केलेला आहे.
- तक्रारदार पुढे नमूद करतात की, तक्रारदाराने प्रस्तावित लेआउट मधील भूखंड क्रमांक ६ आराजी १३० चौरस मीटर (१६१९ चौरस फूट) आणि भूखंड क्रमांक ३४ आराजी १५४ चौरस मीटर (१६५७ चौरस फूट) अशा वर्णनाचे भूखंड तक्रारदारास बुक करण्याकरिता प्रेरित केले. तक्रारदाराने सदर भूखंड खरेदी करण्याकरिता विरुद्ध पक्ष यांच्यासोबत बोलणी केली तेव्हा विरुद्ध पक्ष यांनी तक्रारदारास सदरहू भूखंड एकूण मोबदला रुपये १,४६,०००/- मध्ये विकण्याचे कबूल केले त्यापैकी रुपये १,००,०००/- अगोदर भूखंड बुकिंग करताना द्यायची व उर्वरित रक्कम रुपये ४६,०००/- ही सदर भूखंड एन. ए. टी. पी. करून तसेच आवश्यक सरकारी कार्यालयांची परवानगी घेतल्यानंतर देण्याचे निश्चित झाले. त्याचप्रमाणे लेआउट मधील रस्ते नाल्या विद्युतीकरण व बगीचा विकसित करून तक्रारदारास विक्रीपत्र करून देण्याची जबाबदारी स्वीकारली.
- तक्रारदारानुसार तक्रारदाराने दिनांक ०१/०१/२०११ रोजी विरुद्ध पक्ष यांना रुपये १,००,०००/- सदर भूखंड बुकिंग करिता म्हणून दिले व तक्रारदाराचे लाभात आपसी करारनामा दोन साक्षीदारांच्या समक्ष करून दिला. सदरहू करारनामा दस्त क्रमांक ३ वर दाखल केलेला आहे.
- तक्रारदारानुसार विरुद्ध पक्ष यांनी तक्रारदाराकडून भूखंडाची मोबदला रक्कम स्वीकारून सुद्धा प्रस्तावित लेआउट एन. ए. टी. पी. करून घेतला नाही किंवा करारात कबूल केल्याप्रमाणे भूखंड विकसित करून विक्रीपत्र करुन दिले नाही व भुखंड परावर्तीत झाला नसल्यामुळे करारनाम्याची मुदत वाढवून दिली.
- यानंतर तक्रारदार नमूद करतात की, प्रस्तावित भुखंडाची मोबदला रक्कम भरणा केल्यानंतरही तक्रारदारास सदरहू भुखंडाचा ताबा मिळाला नाही व याबाबत तक्रारदाराने विरुध्द पक्ष यांचेकडे व्यक्तीशः भेटून पाठपुरावा केला असता एन.ए.टी.पी. होने बाकी आहे असे कारणे सांगून विरुध्द पक्ष यांनी तक्रारदारास विक्रीपञ करुन देण्यास टाळाटाळ केली.
- यानंतर तक्रारदार पुढे नमूद करतात की, विरुध्द पक्ष यांनी दिनांक २९/०६/२०१५ रोजी अधिवक्ता नेगी यांचे मार्फत खोट्या आशयाचा नोटीस तक्रारदार यांना पाठविला. सदरहू नोटीसचे सविस्तर उत्तर तक्रारदार यांनी दिनांक २२/०९/२०१५ रोजी अधिवक्ता सरोजिनी पाटील निमगडे यांचे मार्फत विरुद्ध पक्ष यांना पाठविले आहे. सदरहू नोटीस व त्याचे उत्तर अनुक्रमे दस्त क्रमांक ४ व दस्त क्रमांक ५ वर दाखल आहे. व तशाच प्रकारे झालेले नोटीसचे देवानघेवान दस्त क्रमांक ६ व ७ वर दाखल आहे.
- तक्रारदारानुसार विरुद्ध पक्ष यांनी तक्रार दाखल करेपर्यंत सर्वे क्रमांक ४२ चा उर्वरित भाग परावर्तित करून घेण्याकरिता शासन दरबारी कोणतीही कारवाई सुरू केलेली नाही असे लक्षात आल्याने तक्रारदार यांनी विरुद्ध पक्ष यांचे विरुद्ध विद्यमान आयोगासमोर सदरहू वाद दाखल करून तक्रार अर्जात नमूद प्रार्थनेनुसार मागणी केलेली आहे.
- तक्रारदाराने आपल्या तक्रार अर्जाच्या समर्थनार्थ निशाणी क्रमांक २ वरील दस्तऐवजांची यादी नुसार एकूण ८ दस्तऐवज सादर केलेली आहेत ज्यात विरुद्ध पक्ष यांनी लेआउट संदर्भात केलेली जाहिरात, बोर्डचा फोटो, प्रस्तावित लेआऊटचा नकाशा, दिनांक १/१/२०११ रोजीचा करारनामा तसेच तक्रारदार यांनी विरुद्ध पक्ष यांना पाठविलेले नोटीस दस्त क्रमांक ४,५,६ आणि ७ वर दाखल केलेली आहेत.
- प्रस्तुत प्रकरणी तक्रारदाराची तक्रार व दस्त पडताळल्यानंतर विरुद्ध पक्षाला सूचना पत्र बजाविण्याकरिता पाठविण्यात आले. प्रस्तुत तक्रार प्रकरणाची सूचना विरुद्ध पक्षाला सूचना पत्राची बजावणी झाली परंतु विरुद्ध पक्ष प्रकरणांमध्ये हजर होऊ शकले नाही. कारणाने विद्यमान आयोगाने दिनांक ०६/११/२०२३ रोजी प्रकरण एकतर्फी निकाली काढण्याचे आदेश पारित केले.
- तक्रारदार यांनी पुरसीस सादर करून तक्रारदार यांचा अर्ज हा ‘Continuous Cause of Action’ या तत्त्वावर सतत तक्रारीस कारण घडत असल्यामुळे ग्राहक तक्रार मुदतीत आहे असे सांगितले आहे. तक्रारदार यांचे नुकसान मुदतीत तक्रार सादर करणे संदर्भात Ramakant Raghunath Malusare & Ors Vs. Lilabai G. Lokhande & Ors. Appeal No. 193/2007, dated 16/03/2008, passed by State Consumer Disputes Redressal Commission, Circuit Bench, Nagpur नुकसान भरपाईचे अनुषंगाने Ramesh B. Talewar Vs. Sahara India Commercial Co. Ltd., First Appeal No. 11/8, dated 04/11/2015, passed by State Consumer Disputes Redressal Commission, Circuit Bench, Nagpur.
असे दोन केस लॉ अभिलेखावर दाखल केलेले आहेत. - तक्रारदार पुढे नमूद करतात की, तक्रारदार यांनी दुय्यम निबंधक, चिमूर येथे माहिती काढली असता सर्वे क्रमांक ४२ मधील काही भूखंडाचे मूल्यांकन हे प्रति चौरस फूट १७५० असल्याबाबत त्यांना माहिती मिळालेली आहे.
- विरुद्ध पक्ष यांना सदरहू प्रकरणात हजर होऊन बचाव करण्याची पुरेपूर संधी देऊन सुद्धा विरुद्ध पक्ष हे हजर झाले नाहीत. कारणाने तक्रारदार यांनी तक्रार अर्जातील प्रार्थनेनुसार मागणी बाबत योग्य आदेश विरुद्ध पक्ष यांचे विरुद्ध पारित व्हावा अशी विनंती केली आहे.
- तक्रारदाराने दाखल केलेला तक्रार अर्ज व त्या समर्थनार्थ दाखल केलेले दस्तऐवज तसेच शपथपत्र व लेखी आणि तोंडी युक्तिवाद व तक्रारीच्या समर्थनार्थ मा. राज्य आयोग, पारिक्रमा खंडपीठ, नागपूर यांनी पारित केलेले न्यायनिवाड्यांचे अवलोकन केले असता आयोग खालील प्रमाणे मुद्दे निर्णयाकरिता उपस्थित करीत आहे.
मुद्दे उत्तर - तक्रारदार हा विरुद्ध पक्षाचा ग्राहक आहे कायॽ होय
- तक्रारदाराने सदरहू तक्रार विहित मुदतीत दाखल केली होय
आहे कायॽ - विरुद्ध पक्ष यांनी तक्रारदाराप्रती अनुचित व्यापार होय
पद्धती व सेवान्युनता प्रदान केली आहे कायॽ - आदेश कायॽ अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा मुद्दा क्रमांक १ ते ३ बाबतः- - मुद्दा क्रमांक १ ते ३ हे परस्पर एकमेकांशी संलग्नित असल्याने आम्ही मुद्दा क्रमांक १ ते ३ यांना कारणमीमांसा व आमचे निष्कर्ष नोंदवतो ते खालीलप्रमाणे.
- तक्रारदारांनी दाखल केलेली तक्रार व त्यासोबत दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारदार याने विरुध्द पक्ष निलेश दिनेशराव घाडगे साईकृपा डेव्हलपर्स अँड बिल्डर्स या नावाने भूखंड विक्री करण्याचा व्यवसाय करत असणा-या व्यक्तीचे मौजा वडाळा (पैकु) तहसील चिमूर, जिल्हा चंद्रपूर येथील तलाठी साजा क्रमांक १४५ ब.न. ४५९, भूमापन क्रमांक ४२ या जागेमधील भूखंड क्रमांक ६ आराजी १३० चौरस मीटर (१६१९ चौरस फूट) आणि भूखंड क्रमांक ३४ आराजी १५४ चौरस मीटर (१६५७ चौरस फूट) अशा वर्णनाचा भुखंड रुपये १,४६,०००/- चे मोबदल्यात घेण्याचे कबूल करुन त्यापैकी रुपये १,००,०००/-दिनांक ०१/०१/२०११ रोजी बुकींग करिता विरुद्ध पक्ष यांना दिले, ही बाब तक्रारदार यांनी दाखल केलेल्या दस्तऐवजांवरून स्पष्ट होत आहे. तक्रारदार यांनी दिनांक ०१/०१/२०११ रोजी विरुद्ध पक्ष यांचेसोबत साक्षीदारांसमक्ष करून दिलेला करारनामा दस्त क्रमांक ३ वरील दाखल दस्तऐवजावरून तक्रारदार हा विरुद्ध पक्ष यांचा ग्राहक होत असल्याची बाब सिद्ध होत आहे तसेच विरुद्ध पक्ष यांनी तक्रारदारास भूखंड बाबत विचारणा केली असता दिनांक ०७/१२/२०१५ रोजीच्या नोटीसचे उत्तरामध्ये विरुध्द पक्ष यांनी मालमत्ता अकृषक होईपर्यंत थांबण्याची विनंती तक्रारदार यांना केली. सदरहू उत्तर नोटीस दस्त क्रमांक ७ वर दाखल आहे त्यावरून विरुद्ध पक्ष यांनी तक्रारदाराप्रती अनुचित व्यापार प्रथा व सेवा न्यूनता अवलंबली, ही बाब स्पष्ट होत आहे. तक्रारदाराने तक्रार मुदतीत दाखल केल्याचे संदर्भाने पुढीलप्रमाणे न्यायनिवाडे दाखल केलेले आहेत.
Ramakant Raghunath Malusare & Ors Vs. Lilabai G. Lokhande & Ors. Appeal No. 193/2007, dated 16/03/2008, passed by State Consumer Disputes Redressal Commission, Circuit Bench, Nagpur आणि नुकसान भरपाईचे अनुषंगाने Ramesh B. Talewar Vs. Sahara India Commercial Co. Ltd., First Appeal No. 11/8, dated 04/11/2015, passed by State Consumer Disputes Redressal Commission, Circuit Bench, Nagpur. उपरोक्त दोन्ही केस लॉ चे अवलोकन केले असता तक्रारदाराची तक्रार ही मुदतीत दाखल केली असल्याचे तसेच तक्रारदार हा नुकसान भरपाई पात्र ठरत असल्याची बाब स्पष्ट होत आहे. कारणाने मुद्दा क्रमांक १ ते ३ होकारार्थी दर्शवीत आहोत. - सदरहू प्रकरणात विरुद्ध पक्ष यांना प्रकरणात हजर होऊन आपले म्हणणे मांडण्याची पुरेपूर संधी दिल्यानंतरही ते प्रकरणात हजर होण्यास असमर्थ ठरले. कारणाने त्यांना काहीही म्हणावयाचे नाही, असे स्पष्ट होत आहे.
- तक्रारदाराने तक्रार अर्जासोबत दाखल केलेले दस्तऐवज, शपथपत्र, लेखी व तोंडी युक्तिवाद तसेच प्रकरण मुदतीत असल्याबाबत व नुकसान भरपाई बाबत स्पष्टीकरणाकरिता दाखल केलेले न्यायनिवाडे यांचे अवलोकन केले असता आयोग विरुद्ध पक्ष यांनी तक्रारदाराप्रति सेवान्युनता अवलंबल्याची बाब स्पष्ट करीत पुढील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
अंतिम आदेश - तक्रारकर्ता यांची तक्रार क्रमांक सी.सी ३४/२०२३ अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुद्ध पक्ष यांनी तक्रारदाराप्रति अवलंबलेली कृती ही अनुचित व्यापार पद्धती तसेच सेवान्युनता असल्याचे आयोग याद्वारे घोषित करीत आहे.
- विरुद्ध पक्ष यांनी तक्रारदारास कबूल केल्याप्रमाणे मौजा वडाळा (पैकु) तहसील चिमूर, जिल्हा चंद्रपूर येथील तलाठी साजा क्रमांक १४५ ब.न. ४५९, भूमापन क्रमांक ४२ या जागेमधील भूखंड क्रमांक ६ आराजी १३० चौरस मीटर (१६१९ चौरस फूट) आणि भूखंड क्रमांक ३४ आराजी १५४ चौरस मीटर (१६५७ चौरस फूट) ताब्यात देऊन त्याचे पंजीबध्द विक्रीपत्र तक्रारदाराचे लाभात आदेशाचे प्रत मिळाल्यापासून ४५ दिवसांचे आत करून द्यावे.
- विरुद्ध पक्ष यांनी सदर भूखंडाचे विक्रीपत्र तक्रारदाराचे लाभात करण्यास अशक्य झाल्यास विरुद्ध पक्ष यांनी तक्रारदारास रक्कम रुपये १,००,०००/- व त्यावर दिनांक ०१/०१/२०११ पासून द.सा.द.शे. ९ टक्के व्याजाने रक्कम नुकसान भरपाई म्हणून आदेशाची प्रत मिळाल्यापासून ४५ दिवसाचे आत अदा करावे.
- तक्रारदारास सदरहू प्रकरणाकरिता लागलेला खर्च रुपये ५,०००/- विरुध्द पक्ष यांनी तक्रारदारास आदेशाची प्रत मिळाल्यापासून ४५ दिवसांचे आत अदा करावे.
- उभयपक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य देण्यात यावी.
| |