जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – १४०/२०१०
तक्रार दाखल दिनांक – १३/०४/२०१०
तक्रार निकाली दिनांक – २५/०३/२०१४
ताराचंद भिला जाधव
उ.व.५२ धंदा – शेती
रा.हिसाळे ता.शिरपूर जि.धुळे. ....…........ तक्रारदार
विरुध्द
१) प्रो.जयपाल राजपूत
निकीता कृषी सेवा केंद्र बभळाज
ता.शिरपूर जि.धुळे
२) मॅनेजर झुआरी सिड्स लि.
७-१-१६, सरस्वती विलास,
मनुकुंज, बल्कम पेठ,
एस.आर.नगर हैद्राबाद ५०००१६.
३) मॅनेजर यशोदा हायब्रिड सिडस् लि.
लक्ष्मी ऑकीज हिंगनघाट जवळ ४४२,३०१
ता.जि.वर्धा ............. सामनेवाला
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – अॅड.श्री.एच.पी. परदेशी)
(सामनेवाला नं.१ तर्फे – अॅड.श्री.डी.एन.पिंगळे)
निकालपत्र
(द्वाराः मा.सदस्य – श्री.एस.एस. जोशी)
१. अपेक्षेप्रमाणे भेंडीचे उत्पादन आले नाही. भेंडी पिकावर किडींचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे नुकसान झाले. त्याची भरपाई मिळावी या मागणीसाठी तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा कलम १२ अन्वये सदरचा तक्रार अर्ज दाखल केला आहे.
२. तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की त्यांनी सामनेवाले नं.१ यांच्याकडून सामनेवाले नं.२ व सामनेवाले नं.३ यांच्या कंपन्यांची जयकिसान ६२ जातीची २५० ग्रॅम वजनाची १६ पाकीटे, अनुजातीची २५० ग्रॅमची चार पाकीटे, यशोदा सीड्सचे राधिका जातीची २५० ग्रॅमचे एक पाकीट, भेंडीचे बियाणे खरेदी केले. त्याची एकत्रित किंमत रूपये १०,१७३ एवढी होते. या बियाण्यांची ०.६० आर एवढया जमिनीवर पेरणी केली. त्यानंतर पिकाला आवश्यक तेवढी खते, कीटकनाशके दिली. मात्र तरीही भेंडी पिकाची अपेक्षीत वाढ झाली नाही. पिकावर हळद्या रोगाचा प्रादुर्भाव झाला. बोगस बियाण्यांमुळे हे घडल्याचे आणि त्यामुळे आपले रूपये २,८७,६७३ रूपयांचे नुकसान झाले, असे तक्रारदार यांनी नमूद केले असून ती भरपाई सामनेवालेंकडून मिळावी अशी मागणी केली आहे.
३. तक्रारदार यांनी आपल्या तक्रारीच्या पुष्ट्यर्थ निशाणी १ सोबत खते खरेदीच्या पावत्या, बियाणे खरेदीच्या पावत्या, कीटकनाशके खरेदीची पावती, सातबारा उतारा, सामनेवाले यांना वकिलामार्फत पाठविलेली नोटीस, पीक परिस्थिती पंचनामा, पीक पाहणी अहवालाची माहिती, तक्रारदाराची साक्ष, बियाणे कंपनी प्रतिनिधीची साक्ष, जय किसान भेंडी पिकाबाबत माहितीपत्रक, पिकाची छायाचित्रे दाखल केली आहेत.
४. सामनेवाले नं.१,२ व ३ यांनी हजर होवून आपला खुलासा दाखल केला. सामनेवाले नं.२ यांनी आपल्या खुलाशात म्हटले आहे की, तक्रारदाराची तक्रार खोटी असून ती मान्य नाही. सामनेवाले यांनी पीक लागवडीसाठी जे निकष सांगितले आहेत त्यांचे पालन तक्रारदार यांनी केलेले नाही. ज्या कालावधीत पेरणी केली पाहिजे त्या कालावधीत तक्रारदार यांनी पेरणी केलेली नाही. कंपनीने सुचविलेली उच्च प्रतीच्या खतांची मात्रा दिलेली नाही आणि फवारणी केलेली नाही. कंपनीने प्रमाणित करून वाण बाजारात विक्रीसाठी आणले आहे. त्यामुळे वाणात दोष नाही. इतर शेतक-यांना याच वाणापासून चांगले उत्पन्न मिळाले आहे. दि.२०/०३/२०१० च्या पंचनाम्यानुसार आंतरमशागतही कमी दिसते. त्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला. त्यासाठी सामनेवाले नं.२ यांना जबाबदार धरता येणार नाही असे सामनेवाले नं.२ यांनी म्हटले आहे.
५. सामनेवाले नं.२ यांनी आपल्या खुलाशाच्या पुष्ट्यर्थ जय किसान ६२ चे माहितीपत्रक, अनु भेंडीचे स्टेटमेंट, जयकिसान ६२ चे स्टेटमेंट, अत्तरसिंग चंद्रसिंग यांचा जबाब, झुआरी सीडस् अॅग्रोचे पत्र दाखल केले आहे.
६. सामनेवाले नं.३ यांनीही आपला खुलासा दाखल केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, तक्रारदाराची तक्रार खोटी व लबाडीची आहे. ती कबुल नाही. त्यांच्या तक्रारीतील मजकूर आणि दाखल केलेल्या पावत्या यात तफावत दिसते. तक्रारीतील मजकुराशी पावत्यांचे क्रमांक जुळत नाही. यशोदा हायब्रिड सीड्सने लॉट क्रमांक ९२९४ चे राधिका भेंडीचे कोणतेही पाकीट विक्री केलेले नाही. पीक पाहणी अहवालात यशोदा बियाण्याचा लॉट क्रमांक ०५०१ दिला आहे. या लॉटची विक्री आम्ही केलेली नाही. या लॉटची पावती तक्रारदाराने जोडलेली नाही. खेरेदीबाबत कोणताही पुरावा दिलेला नाही. राधिका जातीच्या २५० ग्रॅम पाकिटाची किंमत तक्रारदार यांनी १८५ रूपये दिली आहे. मात्र त्या पाकिटाची किंमत १८५ रूपये नाही, असे सामनेवाले नं.३ यांनी म्हटले आहे. तक्रारदार यांनी दिलेले लॉट क्रमांक, किंमती यात तफावत आहे. यावरून सदर बियाणांची त्याने पेरणीच केली नाही, असे दिसते. त्यामुळे सामनेवाले नं.३ यांना या दाव्यातून मुक्त करावे अशी मागणी सामनेवाले नं.३ यांनी केली आहे.
७. सामनेवाले नं.३ यांनी आपल्या खुलाशाच्या पुष्ट्यर्थ राधिका भेंडीचे माहितीपत्रक, राधिका भेंडीबाबत वैज्ञानिक माहिती (अॅपेंडीक्स-९), स्टेटमेंट-१, स्टेटमेंट-२, ५ शेतक-यांचा अभिप्राय दाखल केला आहे.
८. सामनेवाले नं.१ हे नोटीस मिळाल्यावर मंचात हजर झाले, मात्र त्यांनी खुलासा दाखल केला नाही. त्यामुळे त्यांच्याविरूध्द ‘नो से’ आदेश करण्यात अला आहे.
९. तक्रारदार यांची तक्रार, त्यावर सामनेवाले नं.२ व ३ यांनी दिलेला खुलासा, उभय पक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे पाहता आणि तक्रारदार व सामनेवाले नं.२ व ३ यांच्या विद्वान वकिलांनी केलेला युक्तिवाद ऐकल्यावर आमच्यासमोर खालील मुददे उपस्थित होतात. त्यांची उत्तरेही आम्ही सकारण देत आहोत.
मुददे निष्कर्ष
अ. तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत का ? होय
ब. बियाण्यांची पेरणी करण्यापूर्वी आणि
केल्यानंतर तक्रारदार यांनी मार्गदर्शक सुचनांचा
अवलंब केला का ? नाही
क. सामनेवाले यांचे बियाणे सदोष आहे हे
तक्रारदार यांनी सिद्ध केले आहे का ? नाही
ड. आदेश काय ? सविस्तर आदेशाप्रमाणे
विवेचन
१०. मुद्दा ‘अ’ - तक्रारदार यांनी सामनेवाले नं.१ यांच्याकडून सामनेवाले नं.२ व ३ यांच्या कंपनीचे बियाणे खरेदी केले आहे. त्याच्या पावत्याही तक्रारदार यांनी दाखल केल्या आहेत. ही बाब सामनेवाले यांना मान्य असून त्यांनी नाकारलेली नाही. यावरून तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत हे स्पष्ट होते. म्हणून मुददा ‘अ’ चे उत्तर आम्ही होय असे देत आहोत.
११. मुद्दा ‘ब’- तक्रारदारयांनी त्यांच्या तक्रारीत केलेल्या कथनानुसार दि.०२/११/२००९ ते दि.११/११/२००९ या कालावधीत आपल्या शेतात भेंडी बियाणांची लागवड केली. लागवडीपूर्वी त्यांनी २ ट्रॉलीशेणखत टाकून मशागत केली. लागवडीपूर्वीच त्यांनी ३ बॅग डी.ए.पी., १ बॅग पोटॅश, १ बॅग युरीया अशी खतांची मात्रा दिली. त्यानंतर टोकन पध्दतीने ओळीतील अंतर ३० से.मी., रोपातील अंतर १० से.मी. अशा पध्दतीने पेरणी केली. पेरणीनंतर १ महिन्याने २०x२०x०याची १ बॅग, ग्रॅन्युल सुक्ष्म अन्नद्रव्य ५ किलो असा दुसरा डोस दिला. त्यानंतर तीन वेळा कीटकनाशकांची फवारणी केली. तरीही भेंडीवरील हळद्या रोगाचा प्रादुर्भाव कमी झाला नाही, असे तक्रारदाराने म्हटले आहे. सामनेवाले यांचे जयकिसान-६२ भेंडी बाबतचे माहितीपत्रक तक्रारदार यांनीच दाखल केले आहे. त्यात म्हटले आहे की, संकरीत भेंडी लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी, मध्यम ते भारी वालुकामय जमीन असावी. कडाक्याच्या थंडीत हे पीक चांगले येत नाही. धुक्याचा त्याच्यावर अनिष्ट परिणाम होतो. रब्बी हंगामात पीक घ्यायचे असेल तर हवामान सौम्य आणि धुके कमी असेल तरच पीक घ्यावे. खरिपासाठी जून/ जुलै आणि रब्बीसाठी डिसेंबर ते मार्च हा पेरणीचा हंगाम योग्य. बियाण्यांचे प्रमाण ३ ते ४ किलो एकरी. लागवडीसाठी ओळीतील अंतर ६० सें.मी. व रोपातील अंतर ३० सें.मी. असावे. जमिनीची मशागत करतांना पूर्णता चांगले विघटन झालेले शेणखत ६ ते ८ टन एकरी एवढया प्रमाणात वापरावे. त्यासोबत मशागत करतांना २५ टक्के नत्र ५० टक्के स्फूरद ५० टक्के पालाश द्यावे. लागवडीपासून २० दिवसांनी फक्त २५ टक्के नत्र, फुलो-यापूर्वी फक्त २५ टक्के नत्र आणि पहिल्या तोडणीनंतर फक्त २५ टक्के नत्र द्यावे. वरील खतांची मात्रा जयकिसानच्या उच्च प्रतीच्या खतांद्वारेच द्यावी असेही सामनेवाले नं.२ यांनी सुचविले आहे.
तक्रारदार यांनी तक्रारीत दिलेली माहिती आणि सामनेवाले नं.२ यांनी सुचविलेली मार्गदर्शक तत्वे यात मोठी तफावत असल्याचे जाणवते. जयकिसान ६२ या भेंडीसाठी मध्यम ते भारी वालुकामय जमीन लागते. तक्रारदार यांनी मध्यम/ काळया जमिनीत लागवड केली. सामनेवाले नं.२ यांनी लागवडीसाठी खरीप हंगामात जून/ जुलै महिना तर रब्बी हंगामासाठी डिसेंबर ते मार्च कालावधी सुचविला आहे. तक्रारदार यांनी दि.०२/११/२००९ ते ११/११/२००९ या कालावधीत लागवड केली. कडाक्याच्या थंडीत पीक वाढत नाही असे सामनेवालेंनी सुचविले आहे. तक्रारदार यांनी ज्या कालावधीत लागवड केली, तो कडाक्याच्या थंडीचाच काळ असतो. लागवड करतांना २ ओळीतील अंतर ६० सें.मी. आणि रोपातील अंतर ३० सें.मी. असायला हवे. तक्रारदार यांनी हे अंतर अनुक्रमे ३० व १० सें.मी. ठेवले आहे. मशागत करताना शेणखताचे प्रमाण योग्य राखले गेले नाही असे दिसते. मशागत करतांना, लागवडीनंतर, फुलो-यापूर्वी आणि पहिल्या तोडणीनंतर रासायनिक खतांची मात्राही मार्गदर्शनानुसार वापरण्यात आली नाही. राधीका या वाणाबाबतही सामनेवाले नं.३ यांनी काही मार्गदर्शक तत्वे दिली आहे. या वाणाच्या लागवडीचा कालावधी खरीपासाठी जून/जुलै तर रब्बीसाठी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिना तर उन्हाळयात जानेवारी/ फेब्रुवारी महिना सुचविण्यात आला आहे. दोन ओळीतील अंतर ६० सें.मी. तर रोपातील अंतर ३० सें.मी. सुचविण्यात आले आहे. या मार्गदर्शनाचा अवलंब करण्यात आलेला नाही हे तक्रारदाराने दिलेल्या माहितीवरून स्पष्ट होते. म्हणूनच मुददा ‘ब’ चे उत्तर आम्ही नाही असे देत आहोत.
१२. मुद्दा ‘क’– सामनेवाले नं.१,२ व ३ यांनी सदोष बियाणे दिले. त्यामुळे उत्पादन कमी आले असे तक्रारदार यांचे म्हणणे आहे. मात्र तक्रारदार यांनी दाखल केलेल्या पीक परिस्थितीचा पंचनामा किंवा अन्य कागदपत्रात सदोष बियाण्यांमुळे तक्रारदार यांचे उत्पादन घटले असा उल्लेख नाही. पीक परिस्थिती पंचनाम्यात ‘प्रक्षेत्रावर रस शोषणारी कीडी, हळद्या, पांढरी माशी, फळ पोखरणारी अळी, आदी कीड/ रोगाचा मोठया प्रमाणावर प्रादुर्भाव आढळून आला व त्यामुळे पिकाची वाढ खुंटली असल्याचे दिसून येते’, असा उल्लेख आहे. ही परिस्थिती बोगस बियाण्यांमुळे निर्माण झाली याचा उल्लेख नाही. तक्रारदार यांनी बियाण्ंयाची प्रयोगशाळेत तपासणी केलेली नाही किंवा तसा अहवाल दाखल केलेला नाही. सामनेवाले नं.२ व ३ यांनी त्यांच्या बियाणे प्रमाणिकरणाचा अहवाल दाखल केला आहे. यावरून सामनेवाले यांच्याकडून घेतलेले बियाणे सदोष होते, हे तक्रारदार सिद्ध करू शकलेले नाहीत, हे स्पष्ट होते. म्हणूनच मुददा ‘क’ चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत.
१३. मुद्दा ‘ड’ - वरील सर्व मुददे, विवेचन याचा विचार करता तक्रारदार यांना भेंडीचे अपेक्षित उत्पादन मिळाले नाही, हे खरे असले तरी त्यास सामनेवाले यांचे बोगस बियाणे जबाबदार आहे असे म्हणता येणार नाही. तक्रारदार यांचे उत्पादन घटण्यामागे अन्य काही कारणे असावीत. सामनेवाले यांच्या माहितीपत्रकात दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचा तक्रारदार यांनी अवलंब केला नाही हे त्यामागील एक कारण असल्याचे स्पष्ट होते. ज्या तत्वानुसार, ज्या परिस्थितीत, ज्या हंगामात सामनेवाले यांनी भेंडी बियाणे लागवडीची शिफारस केली ती तक्रारदार यांनी पाळली नाही. त्यामुळे घटलेल्या उत्पादनासाठी सामनेवाले यांना जबाबदार धरता येणार नाही असे मंचाचे मत बनले आहे. याच कारणामुळे सामनेवाले यांच्याविरूध्द कोणतेही आदेश करणे योग्य होणार नाही, असे आम्हाला वाटते. म्हणून आम्ही पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
१. तक्रारदार यांची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
२. खर्चाबाबत इतर कोणतेही आदेश नाहीत.
धुळे.
दि.२५/०३/२०१४.
(श्री.एस.एस. जोशी) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.