नि.29
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – श्री ए.व्ही.देशपांडे
मा.सदस्य - श्री के.डी.कुबल
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 2/2010
तक्रार नोंद तारीख : 01/01/2010
तक्रार दाखल तारीख : 02/01/2010
निकाल तारीख : 28/06/2013
----------------------------------------------
सु्प्रिया राजेंद्र पवार
तर्फे अ.पा.क. जनक वडील
श्री राजेंद्र शिवाजी पवार
रा. उटगी, ता.जत जि. सांगली ....... तक्रारदार
विरुध्द
1. निखिल नागरी सहकारी पतसंस्था लि.सांगली
मुख्य शाखा सांगली, शाहू उदयानाजवळ,
राधाकृष्ण वसाहत, सांगली तर्फे प्रशासक
2. श्री जगन्नाथ पांडुरंग माने
निखिल भवन, राधाकृष्ण वसाहत, सांगली
3. श्री वसंत दत्तात्रय माळी,
1106, निळकंठ नगर, हरीपूर रोड, सांगली
4. श्री अर्जुन प्रल्हाद घाटुळे,
विजयनगर, मिरज रोड, सांगली
5. श्री रविंद्र सदाशिव आडके
केमिस्ट भवनजवळ, गणेशनगर, सांगली
6. श्री प्रकाश नारायण नागावकर
रा.प्रकाश आर्ट, कोल्हापूर रोड, सांगली
7. श्री सुनिल महादेव फुटाणे,
तांदूळ मार्केट, मिरज
8. श्री शिवाजी दत्तू पिंपळे
कसबे डिग्रज, ता.मिरज जि.सांगली
9. श्री गजानन बाबूराव गावडे
कसबे डिग्रज, ता.मिरज जि.सांगली
10. श्री राजेश आण्णा देवर्षी
रा. गाळा नं.9, कृष्णात्रय कॉम्प्लेक्स,
वखार भाग, सांगली
11. श्री महावीर आण्णा सकळे
मु.पो.नांद्रे ता.मिरज जि. सांगली
12. श्री वसंत आण्णा कोळी,
रा.पवनकुमार प्रिंटर्स, शास्त्री चौक, सांगली ...... जाबदार
तक्रारदार तर्फे : अॅड ए.बी.जवळे
जाबदारक्र.1, 8 ते 10 व 12: एकतर्फा
जाबदारक्र.2 ते 4, 6, 7 व 11 : वगळले
जाबदारक्र.5 तर्फे : अॅड एच.आर.पाटील
- नि का ल प त्र –
द्वारा: मा. अध्यक्ष: श्री. ए.व्ही.देशपांडे
1. प्रस्तुतची तक्रार, तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 खाली दाखल केली असून, जाबदारांनी दिलेल्या दूषित सेवेकरिता त्यांचेकडून तक्रारअर्ज परिच्छेद क्र.3 मध्ये नमूद केलेल्या ठेव पावत्यांची रक्कम वसूली व त्यास झालेल्या मानसिक व आर्थिक नुकसानीकरीता रक्कम रु.2,000/-, अर्जाचा खर्च रु.1,000/- जाबदार क्र.1 ते 12 कडून वैयक्तिक व संयुक्तरित्या मागितला आहे.
2. थोडक्यात हकीकत अशी की, तक्रारदाराने खालील रकमा जाबदार क्र.1 या पतसंस्थेत मुदत ठेवीमध्ये त्यात नमूद केलेल्या पावती क्रमांकानुसार ठेवलेल्या आहेत.
पावती क्र. |
ठेव रक्कम |
ठेव तारीख |
ठेव समाप्ती तारीख |
138 |
1000 |
15/4/03 |
15/4/09 |
272 |
18000 |
20/7/02 |
20/7/06 |
273 |
18000 |
20/7/02 |
20/7/06 |
274 |
17250 |
20/7/02 |
20/7/06 |
1660 |
5000 |
15/4/03 |
15/4/07 |
मुदतीनंतर सदर देय रकमा तक्रारदाराने वेळोवेळी जाबदारांकडून मागितल्या असता जाबदारांनी त्या रकमा तक्रारदारास परत केल्या नाहीत. सबब तक्रारदारास प्रस्तुत तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. जाबदार क्र.2 हे जाबदार क्र.1 संस्थेचे संस्थापक चेअरमन असून जाबदार क्र.3 हे व्हाईस चेअरमन आहेत तर जाबदार क्र.4 ते 14 हे संचालक आहेत. जाबदार क्र.2 ते 14 हे संस्थेच्या दैनंदिन कामकाजास वैयक्तिक आणि संयुक्तरित्या जबाबदार आहेत. सबब जाबदार हे वैयक्तिक व संयुक्तरित्या तक्रारदारास वर नमूद रकमा देण्यास जबाबदार आहेत अशा कथनांवरुन तक्रारदाराने वर नमूद केलेल्या मागण्या केलेल्या आहेत.
3. तक्रारदाराने आपले कथनांचे पुष्ठयर्थ नि.3 ला शपथपत्र दाखल करुन, नि.5 या फेरिस्तसोबत एकूण 6 कागदपत्रे दाखल केलेली आहेत. त्यात वर नमूद केलेल्या ठेवपावत्यांच्या प्रती आणि दि.31 मार्च 2006 अखेरची जाबदार क्र.1 संस्थेच्या संचालक मंडळाची यादी यांचा समावेश आहे.
4. प्रस्तुत प्रकरणात, नोटीसांची बजावणी यथायोग्यरित्या होवून देखील जाबदार क्र.1, 8, 9, 10 व 12 हे प्रस्तुत प्रकरणात गैरहजर राहिले. त्यामुळे सदरचे प्रकरण त्यांचेविरुध्द एकतर्फा चालविण्यात आले.
5. जाबदार क्र.5 स्वतः हजर होवून त्यांनी आपली कैफियत नि.21 ला दाखल केली व तक्रारदाराची संपूर्ण कथने अमान्य केली. जाबदार क्र.5 यांच्या म्हणण्याप्रमाणे तो जाबदार क्र.1 संस्थेचा कधीही संचालक नव्हता. उपनिबंधक, सहकारी संस्था मिरज यांनी आपल्या दि. 8/3/2007 चे पत्रानुसार, जाबदार क्र.5 हे सदर संस्थेचे संचालक असल्याचे निदर्शनास येत नाही असे कळविले आहे, त्यामुळे जाबदार क्र.1 संस्थेच्या कोणत्याही कामकाजाची कोणतीही जबाबदारी जाबदार क्र.5 यांचेवर येत नाही. त्यामुळे प्रस्तुत तक्रार जाबदार क्र.5 विरुध्द चालणेस पात्र नाही. सबब त्यास या प्रकरणातून वगळण्यात यावे, तक्रारीतील त्यांचेविरुध्दचा सर्व मजकूर खोटा असून तो जाबदार यास मान्य नाही. तक्रारदार मागणी करीत असलेल्या ठेवींच्या रकमा देण्यास जाबदार क्र.5 जबाबदार नाहीत. सबब प्रस्तुतची तक्रार जाबदार क्र.5 यांचेविरुध्द खर्चासह फेटाळणेत यावी असे जाबदार क्र.5 यांनी म्हणणे मांडले आहे.
6. सदरचे म्हणण्याचे पुष्ठयर्थ जाबदार क्र.5 ने नि.22 ला आपले शपथपत्र दाखल केले असून नि.23 सोबत उपनिबंधक सहकारी संस्था मिरज यांचे दि.8/3/07 चे वर नमूद पत्राची प्रत याकामी दाखल केली आहे.
7. तक्रारदारतर्फे नि.26 ला पुरसीस दाखल करुन त्याने जाबदार क्र.2, 3, 4, 6, 7 व 11 यांना सदर कामातून वगळण्याची विनंती करण्यात आल्याचे दिसते. सदर अर्ज मंजूर करण्यात आल्याचे दिसते. त्यामुळे सदर जाबदारांना प्रस्तुत प्रकरणातून वगळण्यात आले आहे.
8. तक्रारदाराने नि.27 ला पुरसीस दाखल करुन आपला पुरावा संपल्याचे घोषीत केले व त्याच दिवशी नि.28 ला आपला लेखी युक्तिवाद सादर केला. जाबदार क्र.5 तर्फे कोणताही पुरावा प्रस्तुत प्रकरणात देण्यात आलेला नाही. तथापि त्यांनी त्यांचे कैफियतीचे पुष्ठयर्थ सादर केलेले शपथपत्र नि.22 हाच त्याचा पुरावा समजण्यात आला.
9. प्रस्तुत प्रकरणात खालील मुद्दे आमच्या निष्कर्षाकरिता उपस्थित होतात.
मुद्दे उत्तरे
1. तक्रारदार हे ग्राहक होतात काय ? होय.
2. जाबदारांनी त्यास दूषित सेवा दिली हे तक्रारदारांनी शाबीत होय, जाबदार क्र.2 ते 7 व
केले आहे काय ? 11 वगळता इतर
जाबदारांनी.
3. तक्रारदारास तक्रारअर्जात नमूद केलेल्या रकमा जाबदारकडून होय, जाबदार क्र.2 ते 7 व
वसूल करुन मागण्याचा हक्क आहे काय ? 11 वगळता इतर
जाबदारांकडून.
4. अंतिम आदेश खालीलप्रमाणे.
10. आमच्या वरील निष्कर्षांची कारणे खालीलप्रमाणे आहेत.
- कारणे -
मुद्दा क्र.1
11. वस्तुतः प्रस्तुत प्रकरणामध्ये तक्रारदाराने जी वस्तुस्थितीबाबत कथने आपल्या तक्रारअर्जात व त्यांच्या शपथपत्रात केली आहेत, त्या वस्तुस्थितीबद्दल जाबदारांपैकी कोणीही काहीही उजर केलेला नाही. जाबदार क्र.5 यांनी जरी आपली लेखी कैफियत दाखल केली असली तरी त्याचा बचाव हा संपूर्णतया वेगळा असून तो जाबदार क्र.1 संस्थेचा संचालक नाही, त्यामुळे जाबदार क्र.1 संस्थेच्या कृत्यास तो जबाबदार नाही असे त्याचे म्हणणे आहे. तक्रारअर्जात नमूद केलेली वस्तुस्थिती त्याने स्पष्टपणे मान्य केली नाही. इतर संचालक, ज्यांचेविरुध्द प्रस्तुत प्रकरण चालवावयाचे आहे, त्यांनी सदर प्रकरणात हजर होवून तक्रारदाराचे कथन स्पष्टपणे नाकबूल केलेले नाही. तक्रारदार हा ग्राहक होत नाही असे कोणाही जाबदारचे म्हणणे नाही किंबहुना तक्रारदाराने जाबदार क्र.1 या संस्थेमध्ये तक्रारअर्जात नमूद केलेल्या रकमा मुदत ठेव पावतीने जमा केल्या होत्या ही बाब देखील जाबदारांनी अमान्य केली नाही, त्यामुळे तक्रारदार हा ग्राहक होतो असे या मंचाचे मत झाले आहे. सबब आमच्या वर नमूद केलेल्या मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी दिलेले आहे.
मुद्दा क्र.2
12. आम्ही हे वर नमूद केले आहे की, तक्रारदाराने जाबदार क्र. 2, 3, 4, 6, 7 व 11 यांना प्रस्तुत तक्रारीतून वगळले आहे व जाबदार क्र.1,8,9,10 व 12 यांचेविरुध्द प्रकरण एकतर्फा चालले आहे. या जाबदारांनी लेखी कैफियत दिलेली नाही किंवा तक्रारदाराची कथने स्पष्टपणे अमान्य केलेली नाहीत. त्यामुळे तक्रारदाराची संपूर्ण कथने या जाबदारांनी मान्य केलेली आहेत असे गृहीत धरता येवू शकते आणि केवळ या गृहितकावर तक्रारदाराची तक्रार मंजूर करता येवू शकते. तथापि वर नमूद केल्याप्रमाणे तक्रारदाराने तक्रारअर्जात नमूद केलेल्या ठेव पावत्या प्रस्तुत प्रकरणात हजर केल्या असून आपले शपथपत्रदेखील हजर केलेले आहे (नि.13). त्यास जाबदारतर्फे कोणताही उजर करण्यात आलेला नाही, त्यामुळे तक्रारअर्जात नमूद केलेली सर्व कथने ही आपोआपच सिध्द झाली आहेत असे या मंचाचे मत आहे. तक्रारदाराने दाखल केलेल्या ठेवपावत्यांच्या प्रतींवरुन स्पष्टपणे दिसून येते की, तक्रारदाराने त्या त्या ठेवपावत्यांमध्ये नमूद केलेल्या दिनांकास सदर पावतीत नमूद केलेल्या रकमा जमा केलेल्या होत्या व त्या सर्व रकमा ठेवपावतीत ठेव समाप्तीच्या तारखेस देय झालेल्या होत्या. तक्रारदाराच्या शपथपत्रातून असे सिध्द होते की, मुदतीनंतर तक्रारदाराने वारंवार देय रकमांची मागणी जाबदारकडून केली. परंतु जाबदारांनी त्या रकमा देण्यास टाळाटाळ केली व त्यायोगे जाबदारांनी तक्रारदारास दूषित सेवा दिली ही बाब आपोआपच सिध्द होते.
13. जाबदार क्र.5 यांना तक्रारदारास रकमा देण्यास जबाबदार धरता येत नाही याचे कारण असे की, उपनिबंधक, सहकारी संस्था, मिरज, तालुका मिरज यांचे दि.8/3/07 चे पत्रावरुन हे स्पष्टपणे सिध्द होते की, जाबदार क्र.5 हा जाबदार क्र.1 संस्थेचा संचालक नाही. तथापि तक्रारदाराने नि.5 सोबत दाखल केलेल्या संचालकांच्या यादीत जाबदार क्र.5 चे नाव संचालक म्हणून नमूद केले आहे. सदरची यादी दि.31/3/2000 अखेर पर्यंतची असल्याचे दिसते. उपनिबंधक, सहकारी संस्था, मिरज यांचे वर नमूद केलेल्या पत्रातून असे दिसते की, जाबदार क्र.5 यांनी दाखल केलेल्या दि.13/2/2007 च्या अर्जाची सुनावणी घेण्यात आली. त्या सुनावणीचे दरम्यान संस्थेतर्फे कोणीही प्रतिनिधी हजर राहिले नाहीत व त्या चौकशीअंती जाबदार क्र.5 यांचे नाव संचालक पदी नमूद असल्याचे कोठेही दिसून आले नाही. परंतु संस्थेच्या सन 2002-06 च्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी जाबदार क्र.5 यांना निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम केल्याचे दिसते. संस्थेचे निवडणूक अधिका-यास संस्थेवर संचालक म्हणून निवडणूकीकरिता उमेदवार होता येत नसल्याकारणाने जाबदार क्र.5 यांना संचालक म्हणता येत नाही आणि संस्थेचे तत्कालिन चेअरमन यांनी जाबदार क्र.5 यांचे नाव ठिकठिकाणी संचालक म्हणून उपनिबंधक कार्यालय आणि इतर ठिकाणी खोटेपणाने कळविलेले आहे. या सर्व बाबींवरुन जाबदार क्र.5 हा संचालक होत नाही असे उपनिबंधकांचे मत असल्याचे त्यांनी प्रमाणपत्र दिले आहे. या पुराव्यावरुन जाबदार क्र.5 हा संचालक नाही आणि संबंधीत कालावधीत तो जाबदार क्र.1 संस्थेचा संचालक नव्हता ही बाब सिध्द झाली आहे, त्यामुळे त्यास तक्रारदाराच्या मागणीकरिता जबाबदार धरता येत नाही. म्हणून जाबदार क्र.5 यास प्रस्तुत प्रकरणातील आदेशातून वगळावे लागेल असे या मंचाचे मत आहे. तक्रारदाराने जाबदार क्र. 2, 3, 4, 6, 7 व 11 यांना वगळल्याने उर्वरीत जाबदार क्र.1,8,9,10 व 12 यांना याकामी जबाबदार धरावे लागेल. करिता मुद्दा क्र.2 चे उत्तर आम्ही वर नमूद केल्याप्रमाणे दिलेले आहे.
मुद्दा क्र.3
14. प्रस्तुत प्रकरणांत तक्रारदाराने आपली संपूर्ण तक्रार सिध्द केलेली आहे व त्यायोगे त्यास जाबदार क्र. 1,8,9,10 व 12 यांचेकडून मागितलेल्या सर्व रकमा व्याजासह मिळणेस तो पात्र आहे अशा निष्कर्षाला हे मंच आलेले आहे. सबब, आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत.
- आ दे श -
1. तक्रारदाराची तक्रार ही खर्चासह मंजूर करणेत येत आहेत.
2. जाबदार क्र. 1, 8, 9, 10 व 12 यांनी संयुक्तरित्या अथवा वैयक्तिकरित्या तक्रारदारास वर नमूद ठेव पावतींच्या मुदतीनंतरच्या देय रकमा ठेवीची मुदत संपले तारखेपासून संपूर्ण रक्कम अदा करेपावेतो द.सा.द.शे.8.5% दराने व्याजासह द्याव्यात.
3. जाबदार क्र.1, 8, 9, 10 व 12 यांनी संयुक्तरित्या अथवा वैयक्तिकरित्या तक्रारदारास मानसिक व शारिरिक त्रासापोटी म्हणून रु.5,000/- द्यावेत.
4. तसेच जाबदार क्र. 1, 8, 9, 10 व 12 यांनी संयुक्तरित्या अथवा वैयक्तिकरित्या तक्रारदारास तक्रारीचा खर्च म्हणून रक्कम रु.1,000/- द्यावेत.
5. जाबदार क्र. 1, 2, 4 ते 14 यांनी सदर संपूर्ण रकमा या आदेशाच्या तारखेपासून 45 दिवसांत तक्रारदारास द्याव्यात अन्यथा तक्रारदारास ग्राहक संरक्षण कायदयातील कलम 25 किंवा 27 खाली प्रकरण दाखल करता येईल.
सांगली
दि. 28/06/2013
( के.डी.कुबल ) ( ए.व्ही.देशपांडे )
सदस्या अध्यक्ष