द्वारा: मा.अध्यक्षा : श्रीमती प्रणाली सावंत // नि का ल प त्र // 1) प्रस्तुत प्रकरणातील जाबदारांनी आपल्या फी ची रक्कम परत केली नाही म्हणून तक्रारदारांनी सदरहू अर्ज दाखल केला आहे. या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, तक्रारदार कु. हर्षदा भटेवरा यांच्या वडिलांनी तक्रारदारांसाठी जाबदार एन आय आय टी लि यांचे कडे दिनांक 22/12/2008 रोजी रक्कम रु 25,182/- मात्र भरुन कॉम्प्युटरच्या कोर्ससाठी अडमिशन घेतली होती. तक्रारदारांचे वडिल त्याच संस्थेमध्ये एक अभ्यासक्रम पुर्ण करत असल्यामुळे संबंधीत अभ्यासक्रम सुरु होण्यापूर्वीच काही सवलतींचा लाभ मिळण्यासाठी तक्रारदारांच्या वडिलांनी जाबदारांना फी ची रक्कम आधीच अदा केली होती. अभ्यासक्रम सुरु झाल्यानंतर तक्रारदारांचा चेक वटवण्यात येईल तसेच तक्रारदारांना अभ्यासक्रम सुरु झाल्याची माहीती कळविण्यात येईल असे आश्वासन जाबदारांनी दिले होते. तक्रारदारांना फक्त सकाळच्या सत्रातीलच अभ्यासक्रम करणे शक्य होते याची पूर्ण कल्पना तक्रारदारांनी जाबदारांना दिली होती. तक्रारदारांच्या वडिलांनी जाबदारांना चेक दिल्या नंतर अभ्यासक्रम कधी सुरु होणार याची माहीती जाबदारांकडून मिळण्यासाठी ते जाबदारांच्या पत्राची वाट पाहत होते. मात्र अभ्यासक्रम सुरु होण्यापूर्वीच तक्रारदारांचा चेक जाबदारांनी वटवण्यास टाकला. या नंतर तक्रारदारांचे वडिल वारंवार जाबदारांना जावून भेटले व अभ्यासक्रम सुरु होण्यापूर्वी चेक वटवला आहे याची तक्रारदारांच्या वडिलांनी जाबदारांना कल्पना दिली. या नंतर जाबदारांच्या एकुण वर्तणूकीची दखल घेऊन तक्रारदारांच्या वडिलांनी आपल्या फी ची रक्कम परत मिळावी असा अर्ज जाबदारांकडे दिला. ही रक्कम परत मिळण्यासाठी जाबदारांनी तक्रारदारांच्या वडिलांना वांरवार संस्थेत बोलावले मात्र त्यांची रक्कम परत केली नाही अशी तक्रारदारांची तक्रार आहे. तक्रारदाराची रक्कम परत मिळण्याची हे लेखी निवेदन स्वीकारण्यास सुरुवातीला जाबदारांनी नकार दिला होता. ब-याच प्रयत्ना नंतर तक्रारदारांच्या वडिलांना जाबदार भेटले असता संपूर्ण रक्कम परत मागण्या ऐवजी अन्य एखादया अभ्यासक्रमाला तक्रारदारांनी प्रवेश घ्यावा व उर्वरित रक्कम परत मागावी असे त्यांनी तक्रारदारांच्या वडिलांना सुचविले. ज्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतला होता तो अभ्यासक्रम सुरु न करता अशा प्रकारे त्या अभ्यासक्रमाची फी अन्य ठिकाणी वर्ग करण्याची सूचना तक्रारदारांच्या वडिलांनी अमान्य केली. वारंवार प्रयत्न करुन सुध्दा जाबदारांनी आपल्या फी ची रक्कम परत न केल्यामुळे ही फी ची रक्कम व्याज व इतर अनुषंगीक रकमांसह देवविण्यात यावी अशी तक्रारदारांच्या वडिलांनी विनंती केली आहे. तक्रारदारांनी तक्रार अर्जाचे पुष्ठयर्थ प्रतिज्ञापत्र व निशाणी – 4 अन्वये एकुण तीन कागदपत्रे मंचापुढे दाखल केले आहेत. 2) प्रस्तुत प्रकरणातील जाबदारांवरती मंचाच्या नोटिसीची बजावणी झाले नंतर विधिज्ञां मार्फत त्यांनी आपले म्हणणे मंचापुढे दाखल केले. आपल्या म्हणण्यामध्ये जाबदारांनी तक्रारदारांच्या सर्व तक्रारी नाकारल्या असून सदरहू अर्ज मंचाच्या अधिकारक्षेत्राच्या अधिन नाही असा आक्षेप उपस्थित केला आहे. जाबदार संस्थेने फी परत करण्यासाठी काही नियम तयार केलेले असून तक्रारदारांची मागणी या नियमास अधिन नसल्यामुळे ती नामंजूर करण्यात आली असे जाबदारांनी नमूद केले आहे. संबंधीत अभ्यासक्रम सुरु होण्याच्या दोन दिवस आधी जर तक्रारदारांनी प्रवेश रद्द केला असता तर नोंदणी व अडमिशनची फी वजा करुन टयुशन फी परत करणे शक्य झाले असते असे जाबदारांचे म्हणणे आहे. अभ्यासक्रमाचे दिलेले कोर्स मटेरिअल तक्रारदारांनी परत केलेले नसल्यामुळे त्यांना रक्कम परत मागण्याचा अधिकार नाही असेही जाबदारांचे म्हणणे आहे. जाबदार संस्था ही शैक्षणिक क्षेत्रामधील अत्यंत नावाजलेली संस्था असून या संस्थेच्या नियमाप्रमाणे अभ्यासक्रम सुरु झाल्यानंतर फी ची रक्कम परत करणे शक्य असल्याने तक्रारदारांचा हा खोटा अर्ज खर्चासह नामंजुर करण्यात यावा असे जाबदारांनी विनंती केली आहे. जाबदारांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्ठयर्थ प्राधिकृत अधिका-याचे प्रतिज्ञापत्र व निशाणी – 10 अन्वये तीन कागदपत्रे मंचापुढे दाखल केले आहेत. 3) प्रस्तुत प्रकरणातील जाबदारांचे म्हणणे दाखल झाले नंतर जाबदारांना काही कागदपत्रे हजर करण्याचे निर्देश देण्यात यावे असा अर्ज तक्रारदारांनी मंचापुढे दाखल केला होता. तक्रारदारांच्या या विनंती प्रमाणे कागदपत्रे हजर करण्याचे निर्देश जाबदारांना देण्यात आले असता त्यांनी ही कागदपत्रे मंचापुढे हजर केली नाहीत. या नंतर जाबदारांनी निशाणी – 13 अन्वये तर तक्रारदारांनी निशाणी – 24 अन्वये आपला लेखी युक्तिवाद मंचापुढे दाखल केला व या नंतर उभयपक्षकारांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून सदरहू प्रकरण निकालासाठी नेमण्यात आले. 4) प्रस्तुत प्रकरणातील तक्रारअर्ज, म्हणणे, दाखल कागदपत्रे व उभयपक्षकारांच्या वकिलांचा युक्तिवाद याचा साकल्याने विचार करता खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ उपस्थित होतात. मंचाचे मुद्दे व त्यांची उत्तरे पुढीलप्रमाणे - मुद्दे उत्तरे 1. जाबदारांनी तक्रारदारांना सदोष सेवा : दिली ही बाब सिध्द होते काय ? : होय. 2. तक्रारअर्ज मंजूर होण्यास पात्र ठरतो : काय ? : होय. 3. काय आदेश : अंतिम आदेशाप्रमाणे. विवेचन: मुद्दा क्रमांक 1 व 2 : हे दोन्ही मुद्दे एकमेकांशी संलग्न असल्याने त्यांचे एकत्रित विवेंचन करण्यात आले आहे. प्रस्तुत प्रकरणातील तक्रारदारांच्या अर्जाचे अवलोकन केले असता अभ्यासक्रम सुरु करण्यापूर्वी जाबदारांनी आपला चेक वटवण्यास टाकला तसेच अभ्यासक्रम सुरु झाला असल्याची आपल्याला सूचना दिलेली नाही अशा त्यांच्या तक्रारी असल्याचे लक्षात येते. तक्रारदारांचे वडिल जाबदार संस्थे मध्ये अन्य एका अभ्यासक्रमासाठी जात होते. तेथील अधिका-यांशी झालेल्या ओळखीमुळे अभ्यासक्रम सुरु होण्यापूर्वीच त्यांनी जाबदारांकडे चेक दिला व अभ्यासक्रम सुरु झाल्यानंतर हा चेक बँकेत भरावा असे त्यांना सांगितले. अभ्यासकम सुरु झाल्याची सूचना न देताच जाबदारांनी तक्रारदारांचा चेक बँकेमध्ये भरल्यामुळे तक्रारदारांनी जाबदारांकडे चौकशी केली असता त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. तक्रारदारांच्या सर्व तक्रारींच्या अनुषंगे जाबदारांचे म्हणणे पाहीले असता अभ्यासक्रम सुरु होवून कोर्स मटेरीअल तक्रारदारांना देण्यात आले होते असे त्यांनी नमुद केलेले आढळते. जाबदारांची ही दोन्ही निवेदने तक्रारदारांनी स्पष्ट शब्दात नाकारली आहेत. जाबदारांनी आपल्याला कोर्स सुरु झाल्या बद्दल कळविले नाही तसेच कोर्स मटेरीअल दिलेले नाही असे तक्रारदारांचे म्हणणे असल्यामुळे त्यांनी या संदर्भांत काही कागदपत्रे मंचापुढे हजर करण्याचे जाबदारांना निर्देश देण्यात यावे अशी मंचास विनंती केली होती. मंचाने असे निर्देश देवूनही जाबदारांनी कोणतेही कागदपत्रे मंचापुढे हजर केलेले नाहीत. जाबदारांनी ज्या कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती मंचापुढे हजर केलेल्या आहेत त्याचे अवलोकन केले असता त्यामध्ये ब-याच प्रमाणात खाडाखोड आढळून येते. तक्रारदारांच्या पॅन कार्ड वरील सही व कागदपत्रांवरील सही मधील तफावत साध्या डोळयावरुनही स्पष्ट लक्षात येते. तक्रारदारांचे वडील आपल्याकडे कधीही आलेले नव्हते असे जाबदारांनी नमूद केले असल्यामुळे जाबदार संस्थेकडील व्हिजीटर्स रजिस्टर तक्रारदारांनी मागितले होते. मात्र मंचाने निर्देश देवूनही हे रजिस्टर जाबदारांनी दाखल केलेले नाही. हे रजिस्टर दाखल झाले असते तर तक्रारदारांचे वडील जाबदारांकडे गेले होते का व ते नेमके किती वेळा तेथे गेले होते ही बाब सिध्द होऊ शकली असती. मात्र जाबदारांनी हे रजिस्टर दाखल न केल्यामुळे या अनुषंगे त्यांच्या विरुध्द प्रतिकुल निष्कर्ष निघतो. जाबदारांनी आपल्याला अभ्यासक्रम सुरु झाल्याची सूचना दिलेली नाही, आपल्याला कोणतेही स्टडी मटेरीअल दिलेले नाही. आपल्या मुलीने या अभ्यासक्रमाला कधीही उपस्थिती लावली नाही अशा सर्व तक्रारी तक्रारदारांनी स्पष्ट शब्दामध्ये करुन या संदर्भांतील सर्व कागदपत्रे मंचापुढे दाखल करण्याचे जाबदारांना निर्देश देण्यात यावेत असा अर्ज दाखल केला होता. मंचाने आदेशित करुनही जाबदारांनी ही कागदपत्रे मंचापुढे दाखल केलेली नाहीत. अर्थातच अशा परिस्थितीत जाबदारांचे विरुध्द या संदर्भांत प्रतिकूल निष्कर्ष निघतो. अभ्यासक्रम सुरु झाल्याची कल्पना आपण तक्रारदारांना दिली होती तसेच त्यांना आपण स्टडी मटेरिअल दिले होते या संदर्भांत जाबदारांनी कोणताही सबळ व विश्वसनिय पुरावा दाखल केलेला नाही. अर्थांत अशा परिस्थितीत कोर्स सुरु होण्यापूर्वी दोन दिवस आधी कळविलेले नाही व स्टडी मटेरियल परत केले नाही म्हणून तक्रारदारांच्या फी ची रक्कम परत न करण्याची जाबदारांची कृती असमर्थनिय व अयोग्य ठरुन त्यांच्या सेवेत दोष निर्माण करते असा मंचाचा निष्कर्ष आहे. या संदर्भांत नोंद घेण्याजोगी बाब म्हणजे तक्रारदारांनी चेक द्वारे रक्कम अदा केलेली असून या संदर्भांत जाबदारांनी आपल्याला कोणतीही पावती दिलेली नाही असे त्यांनी नमूद केलेले आहे. अशा प्रकारे कोणतीही पावती दिलेला पुरावा या कामी जाबदारांनी दाखल केलेली नाही. एकूणच या प्रकरणातील सर्व वस्तुस्थितींचे एकत्रित अवलोकन केले असता अभ्यासक्रम सुरु केल्याची कल्पना तक्रारदारांना न देताच तसेच त्यांना कोणतेही स्टडी मटेरियल न देता तक्रारदारांच्या फी ची रक्कम परत न करण्याची जाबदारांची कृती सदोष सेवा ठरते असा मंचाचा निष्कर्ष असल्यामुळे तक्रारदारांनी अदा केलेली फी ची रक्कम चेक वटविल्या तारखे पसून 9 % व्याजासह परत करण्याचे जाबदारांना निर्देश देण्यात येत आहेत. बँकेला आपण 14 % व्याज अदा करत आहोत असे जरी तक्रारदारांनी नमूद केले असले तरी या दराने व्याज अदा केल्याचा पुरावा तक्रारदारांनी मंचापुढे दाखल केला नसल्यामुळे त्यांची ही मागणी नामंजूर करण्यात येत आहे. जाबदारांनी या प्रकरणामध्ये ज्या प्रकारची सदोष सेवा दिलेली आहे तसेच मंचाने निर्देश देवूनही त्यांनी कागदपत्रे हजर केलेली नाहीत या सर्व बाबींचा विचार करुन तसेच जाबदारांच्या सेवेमुळे तक्रारदारांना झालेला शारीरिक व मानसिक त्रासाचा विचार करुन तक्रारदारांना स्वतंत्रपणे शारीरिक व मानसिक त्रासाची नुकसानभरपाई म्हणून रु 5,000/- व सदरहू अर्जाचा खर्च रु 3,000/- मात्र मंजुर करण्यात येत आहे. या नमूद निष्कर्ष व विवेंचनावरुन जाबदारांनी तक्रारदारांना सदोष सेवा दिली तसेच तक्रारअर्ज मंजूर होण्यास पात्र ठरतो ही बाब सिध्द होतात. सबब त्या प्रमाणे मुद्दा क्रमांक 1 व 2 चे उत्तर होकारार्थि देण्यात आले आहे. मुद्दा क्रमांक 3 : मुद्दा नंबर 1 व 2 मध्ये नमूद निष्कर्षाचे आधारे प्रस्तुत प्रकरणात पुढील प्रमाणे आदेश निर्गमीत करण्यात येत आहेत. सबब आदेश की, // आदेश // 1. तक्रार अर्ज अंशत: मंजूर करण्यात येत आहे. 2. यातील जाबदारांनी तक्रारदारांना रक्कम रु 25,281/- ( पंचवीस हजार मात्र दोनशे एक्याऐंशी) मात्र दिनांक 3/1/2009 पासून संपूर्ण रक्कम फिटे पर्यंन्त 9 % व्याजासह अदा करावेत. 3. यातील जाबदारांनी तक्रारदारांना शारिरिक व मानसिक त्रासाच्या नुकसानीपोटी रक्कम रु 5,000/- ( रु पाच हजार ) व तक्रार अर्जाच्या झालेल्या खर्चापोटी रक्कम रु 3,000/- ( रु. तीन हजार) अदा करावेत. 4. वर नमूद आदेशाची अंमलबजावणी जाबदारांनी निकालपत्राची प्रत मिळाले पासून तिस दिवसांचे न केल्यास तक्रारदार त्यांचे विरुध्द ग्राहक संरक्षण कायदयातील तरतूदी अंतर्गत प्रकरण दाखल करु शकतील. 5. निकालपत्राच्या प्रती दोन्ही पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात
| [ Smt. Sujata Patankar] MEMBER[ Smt. Pranali Sawant] PRESIDENT | |