नि. 12 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 13/2011 नोंदणी तारीख - 20/1/2011 निकाल तारीख - 11/4/2011 निकाल कालावधी - 82 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ श्री संतोष राजाराम पाटील रा.मु.पो.कातरखटाव ता.खटाव जि. सातारा ----- अर्जदार (अभियोक्ता श्री जे.डी.मुल्ला) विरुध्द निगडे बॉडी बिल्डर्स तर्फे प्रोप्रा. श्री लालासो रावसाहेब निगडे जुना फलटण रोड, ता.लोणंद जि. सातारा ----- जाबदार (एकतर्फा) न्यायनिर्णय 1. अर्जदार यांनी ट्रक खरेदी करण्याचे ठरविले. सदरचे ट्रकच्या खुल्या चासीसवर बॉडी बांधणेबाबत अर्जदार व जाबदार यांचेमध्ये बोलणी होवून कोटेशन तथा लेखी करार अस्तित्वात आला होता. सदरचे कामाकरिता जाबदार यांनी अर्जदार यांना रु.1,80,000/- इतका खर्च येणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार अर्जदार यांनी जाबदार यांना रक्कम रु.40,000/- आगाऊ स्वरुपात दिले होते. सदरचे ट्रकचे बॉडीचे काम 30 दिवसांत करुन देणेची जाबदार यांनी ग्वाही दिली होती. त्यानंतर अर्जदार यांनी खुली चासीस खरेदी करुन ती जाबदार यांचे शेडमध्ये उभी केली होती व त्यावेळी उर्वरीत रु.90,000/- जाबदार यांना दिले होते. परंतु जाबदार हे ट्रकचे काम करण्यास जाणुनबुजून दिरंगाई करीत होते. म्हणून अर्जदार यांनी जाबदार यांना लेखी पत्रही दिले. परंतु तरीही जाबदार यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. जाबदारने ट्रकचा ताबा देण्यास 34 दिवसांचा विलंब लावला. जाबदार यांचे सदरचे कृत्यामुळे अर्जदार यांचे एकूण रु.55,132/- चे नुकसान झाले. सबब नुकसानीपोटी रु.1,06,832/- व्याजासह मिळावेत व अर्जाचा खर्च मिळावा म्हणून अर्जदार यांनी या मंचासमोर दाद मागितली आहे. 2. जाबदार यांना याकामी प्रस्तुत तक्रारअर्जाचे नोटीसची बजावणी होवूनही ते याकामी हजर झाले नाही तसेच त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे व शपथपत्र दाखल केले नाही. सबब जाबदार यांचे विरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला. 3. अर्जदारतर्फे तोंडी युक्तिवाद ऐकणेत आला तसेच दाखल कागदपत्रे पाहणेत आली. 4. अर्जदारची तक्रार पाहता जाबदार बॉडी बांधणेचा, दुरुस्तीचा व्यवसाय करतात. सबब अर्जदारने घेतलेल्या मालट्रकची बॉडी बांधणेचे काम अर्जदारने जाबदारला दिले. जाबदारने एक महिन्यात बॉडी बांधून मिळेल असे कबूल केले परंतु 37 दिवस मुद्दाम जाणुनबूजून उशिराने गाडी दिली. सबब रक्कम रु.1,03,332/- चे नुकसान झाले ते देणेचा आदेश व्हावा अशी तक्रार दिसते. 5. निर्विवादीतपणे जाबदार हजर झाले नाहीत अथवा त्यांनी त्यांचे म्हणणे दाखल केले नाही. अर्जदारने स्वतःचे कथनापृष्ठयर्थ नि.5 सोबत कागदपत्रे तसेच नि.2 कडे शपथपत्र दाखल केले आहे. त्याचे अवलोकन करता नि.5/6 कडे जाबदारने अर्जदार यास गाडीला कोणत्या गोष्टी बसवायच्या आहेत, त्याचा तपशील लिहून दिलेला आहे. तसेच त्यासाठी एकूण रक्कम रु.1,80,000/- खर्च आहे तसेच अॅडव्हान्स दि.10/5/2010 रोजी रक्कम रु.40,000/- दिलेला आहे असे लिहून दिलेला कागद आहे तसेच नि.5/7 कडे जाबदारने दि.26/5/2010 रोजी रु.90,000/- मिळाले व एकूण रक्कम रु.1,30,000/- (एक लाख तीस हजार) मिळाले व चेस सोडल्यापासून 1 महिन्याचे आत गाडी बांधून मिळेल असे लिहून दिलेली पावती दाखल केली आहे. निर्विवादीतपणे कागदपत्रांवरुन अर्जदारने एकूण देय असलेल्या रकमेपैकी रु.1,30,000/- (एक लाख तीस हजार) दि.26/5/2010 पर्यंत जाबदारला दिले आहे असे दिसते व नि.5/10 कडील पावतीचे अवलोकन करता दि.3/7/10 रोजी रु.40,000/- अर्जदारने जाबदारला दिलेले दिसतात म्हणजे एकूण रक्कम रु.1,70,000/- दिलेले दिसतात म्हणजे अर्जदारनेच 1 महिनेचे नंतरच उर्वरीत रकमेपैकी रु.40,000/- दिले आहेत व रु.10,000/- देणेचे ठेवलेले दिसतात. अर्जदारने नि.5/16 कडे जाबदारने लिहून दिलेला एक कागद दाखल केला असून त्याचे अवलोकन करता “लोड शेडींग व पावसामुळे गाडी बांधून तयार होण्यास वेळ लागला. आज तारीख 29/7/2010 वार गुरुवार रोजी गाडी बांधून तयार झाली. ” असे कथन असलेला कागद आहे. सबब दि.3/7/2010 पर्यंत अर्जदारने एकूण रु.1,80,000/- पैकी रु.1,70,000/- दिले आहेत व गाडी दि.29/7/2010 रोजी बांधून अर्जदारला दिलेचे दिसते. सबब काही दिवसांचा झालेला उशिर हा नगण्य दिसतो. तसेच लोड शेडींग व पावसामुळे उशीर झालेला दिसतो हेही कारण योग्य वाटते. सबब अर्जदार म्हणतात मुद्दाम जाणुनबुजून जाबदारने गाडी बांधणेस उशीर केला हे पटण्यासारखे नाही. तसेच अर्जदार म्हणतात गाडी अर्धवट बांधून दिली त्यात सुध्दा खर्च आला हेही नि.5/16 कडील कागदावरुन खरे वाटत नाही. सबब दाखल कागदपत्रे पाहता अर्जदार जाबदारविरुध्द आपली तक्रार शाबीत करु शकलेले नाहीत या निर्णयाप्रत हा मंच आला आहे. 6. सबब आदेश. आदेश 1. अर्जदारचा तक्रारअर्ज नामंजूर करणेत येत आहे. 2. अर्जदार व जाबदार यांनी स्वतःचा खर्च स्वतः सोसणेचा आहे. 3. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 11/4/2011 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |