::: आ दे श :::
( पारीत दिनांक : 21.08.2015 )
आदरणीय सदस्य श्री कैलास वानखडे, यांचे अनुसार
सदर फिर्याद ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, दाखल करण्यात आली. सदर तक्रारीचा सारांश खालील प्रमाणे आहे.
तक्रारकर्त्याने मायक्रोमॅक्स कंपनीचा, मॉडेल नं.ए-76 हा मोबाईल रु. 7,700/- किमतीमध्ये दि. 04/03/2014 रोजी विरुध्दपक्ष क्र. 1 कडून खरेदी केला, त्याचा पावती क्र. 7941 असा आहे. सदर मोबाईलची एक वर्षाची वारंटी देण्यात आली. सदर मोबाईल खरेदी केल्यानंतर एप्रिल 2014 च्या पहील्या आठवड्यामध्ये सदर मोबाईल मध्ये दोष आढळून आला. मोबाईल वारंवार बंद पडत होता, बॅटरी बँकअप कमी झाला, तो खुप गरम होत होता व कव्हरेज देखील दाखवत नव्हता. त्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 1 कडे तक्रार करुन मोबाईल मध्ये असलेल्या दोषाची संपुर्ण माहिती दिली. त्यावरुन विरुध्दपक्ष क्र. 1 ने विरुध्दपक्ष क्र. 2, अधिकृत सर्व्हीस सेंटर, यांच्याकडे जाण्यास सांगितले. तक्रारकर्ता दि. 21/04/2014 रोजी विरुध्दपक्ष क्र. 2 कडे सदर मोबाईल घेऊन गेला असता, विरुध्दपक्ष क्र. 2 ने मोबाईल दुरुस्तीसाठी 4/5 दिवसांनी घेवून जाण्यास सांगितले. दि. 25/04/2014 रोजी विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी सदर मोबाईल दुरुस्त झाला आहे, असे सांगून मोबाईल परत केला. परंतु त्या मोबाईलमध्ये पुर्वीप्रमाणेच दोष कायम होते. म्हणून त्याच दिवशी संध्याकाळी तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 2 कडे सदर मोबाईल परत दुरुस्तीसाठी दिला. त्याबाबतची पावतीसुध्दा तक्रारकर्त्यास देण्यात आली व मोबाईल बॅटरीसह दिला, असे त्यात नमुद केले व 5/6 दिवसांनी मोबाईल घेण्यास सांगितले. त्याप्रमाणे तक्रारकर्ता मोबाईल आणण्यास गेला असता, त्यास सांगण्यात आले की, सदर मोबाईल दुरुस्त झाला नाही. त्यानंतर तक्रारकर्ता बरेच वेळा विरुध्दपक्ष क्र. 2 कडे गेला व मोबाईल दुरुस्तीबाबत विचारणा केली. परंतु विरुध्दपक्ष क्र. 2 हे नेहमी उडवाउडवीची उत्तरे देत होता. शेवटी तक्रारकर्त्याने दि. 17/06/2014 रोजी वकीलामार्फत कायदेशिर नोटीस विरुध्दपक्षाला पाठविली. त्यानंतर दि. 03/07/2014 रोजी विरुध्दपक्ष क्र. 2 ने चुकीचा जबाब पाठविला. तक्रारकर्ता दि. 10/07/2014 रोजी विरुध्दपक्षाकडे गेला असता, विरुध्दपक्ष क्र. 2 ने मोबाईल देण्याअगोदर पावतीवर लिहून घेतले की, मोबाईल दुरुस्त झाला आहे. तक्रारकर्त्याने मोबाईल पाहील्यानंतर त्याच्या लक्षात आले की, मोबाईल मधील दोष जसेच्या तसेच होते. सदर मोबाईल मध्ये निर्मिती दोष आहे. दोषपुर्ण मोबाईल तक्रारकर्त्यास दिल्यामुळे व तो दुरुस्तीकरिता बराच कालावधी त्यांच्याकडे ठेवून सुध्दा दुरुस्त करुन न दिल्यामुळे तक्रारकर्त्यास खुप मानसिक, आर्थिक व शारीरिक त्रास झाला व म्हणून तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार वि. मंचासमक्ष दाखल करुन विनंती केली की, तक्रारकर्त्याची तक्रार मंजुर करण्यात यावी व विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी तक्रारकर्त्यास नविन थ्रीजी मॉडेलचा उत्कृष्ट मोबाईल त्वरीत द्यावा. तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक, आर्थिक व शारीरिक त्रासापोटी रु. 50,000/- नुकसान भरपाई द्यावी तसेच तक्रार खर्चापोटी रु. 5000/- देण्यात यावे.
तक्रारकर्त्याने सदर तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली असून पुरावा म्हणून तक्रारीसोबत एकुण 4 दस्तऐवज दाखल केलेले आहेत.
विरुध्दपक्ष क्र. 1 चा लेखी जवाब
2. विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी प्रस्तुत प्रकरणात लेखी जबाब दाखल करुन तक्रारकर्त्याच्या तक्रारीतील बहुतांश विधाने नाकबुल केली आहेत व पुढे असे नमुद केले आहे की, विरुध्दपक्ष क्र. 1 हा मोबाईल विक्री करण्याचा व्यवसाय करतो. मोबाईल मध्ये काही त्रुटी अथवा निर्मिती दोष असल्यास त्याच्याशी विरुध्दपक्ष क्र. 1 चा काहीही संबंध नाही, कारण तो मोबाईल तयार करीत नाही. कंपनीच्या नियमानुसार अकोला मनपा हद्दीत विरुध्दपक्ष क्र. 2 हे अधिकृत दुरुस्तीचे सर्व्हीस सेंटर आहे. तक्रारकर्त्याच्या मोबाईल मध्ये दोष आढळल्यानंतर तो विरुध्दपक्ष क्र. 2 कडे गेला व त्यांचे काय संभाषण झाले तसेच सदर मोबाईल मध्ये कोणता दोष होता व त्यांनी तो काढून दिला अथवा नाही, या बाबींशी विरुध्दपक्ष क्र. 1 चा काहीही संबंध नाही. विरुध्दपक्ष क्र. 1 हे मोबाईल विक्रीचे काम करतात व कुठल्याही कंपनीच्या नियमानुसार मोबाईल मध्ये दोष आढळल्यास ते त्यांच्या अधिकृत सर्व्हीस सेंटरकडेच दुरुस्तीकरिता पाठवितात. तक्रारकर्त्याने मायक्रोमॅक्स कंपनीला सदर तक्रारीमध्ये पक्ष बनविले नाही. वरील सर्व कारणांमुळे तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात यावी.
विरुध्दपक्ष क्र. 2 चा लेखी जवाब
3. विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी सदर प्रकरणात लेखी जवाब दाखल केला आहे, त्यानुसार त्यांनी तक्रारीतील बहूतांश विधाने नाकबुल केली आहे व पुढे असे नमुद केले की, तक्रारकर्ता दि. 25/04/2014 रोजी त्यांच्या मोबाईल मध्ये बिघाड असल्याच्या कारणांमुळे विरुध्दपक्ष क्र. 2 च्या दुकानावर आले होते. त्यावेळी विरुध्दपक्ष क्र. 2 ने तक्रारकर्त्यास जॉबकार्ड देऊन मोबाईल दुरुस्तीकरिता ठेवून घेतला. सदर मोबाईल वारंटीमध्ये असल्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी सदर मोबाईल दुरुस्तीसाठी मुंबई (एल-3) येथे पाठविला व तो दुरुस्त करुन तक्रारकर्त्याला दि. 10/07/2014 रोजी दिला. सदर मोबाईल मधील दोषाबाबत व तो किती दिवसांनी परत येईल, याबाबत तक्रारकर्त्यास कल्पना देण्यात आली होती, परंतु तक्रारकर्ता दिलेल्या वेळेत विरुध्दपक्ष क्र. 2 कडे सदरहू मोबाईल घेण्याकरिता आला नाही, जो फार पुर्वीच दुरुस्त करुन तयार होता. विरुध्दपक्ष क्र. 2 ने तक्रारकर्त्याच्या नोटीसला जबाब पाठविल्यानंतर दि. 10/07/2014 रोजी तक्रारकर्ता मोबाईल पुर्ण दुरुस्त अवस्थेत असल्याची खात्री व समाधानी होऊन नंतरच तसा शेरा जॉब शिटवर लिहून मोबाईल परत घेऊन गेला होता. त्यानंतर सदर मोबाईल तक्रारकर्त्याने कधीही विरुध्दपक्ष क्र. 2 कडे आणला नाही. याचाच अर्थ की सदरहू मोबाईल योग्य रितीने काम करीत आहे. विरुध्दपक्ष क्र. 2 कडे सदरहू मोबाईल कंपनीचे अधिकृत सर्व्हीस सेंटर माहे जुन 2014 पर्यंतच होते, व या बाबीची कल्पना तक्रारकर्त्याला होती. अशा प्रकारे विरुध्दपक्ष क्र. 2 ने सेवेमध्ये कोणतीही त्रुटी केलेली नाही व त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात यावी.
विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी सदर जवाब हे प्रतिज्ञालेखावर दाखल करुन त्यासोबत संबंधीत दस्तऐवज जोडले.
::: का र णे व नि ष्क र्ष :::
4. सदर प्रकरणात तक्रारकर्त्याची तक्रार, उभय पक्षांनी दाखल केलेले दस्त, विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी दाखल केलेला लेखी जवाब व उभय पक्षांचा तोंडी युक्तीवाद यांचा सखोल अभ्यास करुन मंचाने खालील प्रमाणे निष्कर्ष काढला, तो येणे प्रमाणे …
सदर प्रकरणात तक्रारकर्ता यांचे असे म्हणने आहे की, तक्रारकर्त्याने दि. 04/03/2014 रोजी मायक्रोमॅक्स कंपनीचा, ज्याचा मॉडेल नं. ए-76, रु. 7700/- नगदी देवून विरुध्दपक्ष क्र. 1 यांच्याकडून विकत घेतला. तक्रारकर्त्याने त्याची पावती सोबत जोडली आहे, ते दस्त क्र. 13 वरुन दिसून येते. त्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांचा “ग्राहक” आहे, हे सिध्द होते. तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार सदर मोबाईल हा एप्रिल 2014 मध्ये एक महिन्यामध्ये वारंवार बंद पडत होता, गरम होत होता, त्यामुळे तक्रारकर्ता मोबाईल दुरुस्तीसाठी विरुध्दपक्ष क्र. 1 कडे गेला. विरुध्दपक्ष क्र. 1 हा विक्रेता असल्यामुळे त्याला विरुध्दपक्ष क्र. 2 कडे दुरुस्तीसाठी पाठविले. विरुध्दपक्ष क्र. 2 हे अधिकृत दुरुस्ती सेंटर आहे. तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्ष क्र. 2 कडे दि. 24/04/2014 ला मोबाईल दुरुस्तीसाठी दिला व विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी दि. 25/04/2014 ला मोबाईल दुरुस्त करुन तक्रारकर्त्याला दिला. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या जॉब शिट ( दस्त क्र. 14 ) वरुन हे दिसून येते.
तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी दि. 25/4/2014 ला मोबाईल दुरुस्त करुन दिल्यानंतर देखील मोबाईल मध्ये पुर्वी प्रमाणेच दोष कायम होते. त्यामुळे परत संध्याकाळी तक्रारकर्ता विरुध्दपक्ष क्र. 2 कडे मोबाईल घेऊन गेला. विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी मोबाईल दुरुस्तीसाठी घेतला व 5/6 दिवसांनंतर बोलावले. विरुध्दपक्ष क्र. 2 च्या म्हणण्यानुसार मोबाईल वारंटीमध्ये असल्यामुळे तक्रारकर्त्याचा मोबाईल दुरुस्तीसाठी मुंबई (एल-3) येथे पाठविला होता, त्यामुळे तो किती दिवसात दुरुस्त होवून येईल, याची पुर्व कल्पना तक्रारकर्त्याला विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी दिली होती. परंतु तक्रारकर्ता हा दिलेल्या वेळेत विरुध्दपक्ष क्र. 2 कडे सदरहू मोबाईल घेण्याकरिता आला नाही, तो मोबाईल फार पुर्वीच दुरुस्त करुन तयार होता.
तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 2 कडून मोबईल घेण्यापुर्वी दि. 17/6/2014 ला विरुध्दपक्षाला नोटीस पाठविली होती व त्या नोटीसला विरुध्दपक्ष क्र. 2 ने दि. 3/7/2014 ला प्रतिउत्तर दिले आहे आणि त्यात असे कथन आहे की, मोबाईल दुरुस्त झालेला आहे. नोटीस मिळाल्यानंतर तिन दिवसात तक्रारकर्त्याने मोबाईल घेऊन जावा, असा देखील त्यात उल्लेख आहे. परंतु यावर तक्रारकर्त्याचे असे कथन आहे की, विरुध्दपक्षाची नोटीस मिळाल्यानंतर तो मोबाईल घेण्यासाठी दि. 10/7/2014 ला विरुध्दपक्षाकडे गेला व विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी मोबाईल घेण्याअगोदर पावतीवर लिहून घेतले की, मोबाईल दुरुस्त झाला आहे व तक्रारकर्त्याला सुपुर्द करीत आहे. यावर विरुध्दपक्ष क्र. 2 च्या म्हणण्यानुसार तक्रारकर्त्याला दि. 10/7/2014 रोजी सदरहू मोबाईल पुर्ण दुरुस्त अवस्थेत असल्याची खात्री करुन समाधानी होवून नंतरच तसा शेरा जॉबशिटवर लिहून त्याने तो परत केला आहे. यावरुन मंचाच्या असे निदर्शनास येते की, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 2 कडे जाण्यापुर्वी विरुध्दपक्षाला नोटीस पाठविली आहे. म्हणजे तक्रारकर्ता हा जागरुक आहे व त्याने मोबाईल चेक करुनच नंतर जॉब शिटवर लिहून मोबाईलचा स्विकार केला आहे. सदर तक्रार विरुध्दपक्ष क्र. 2 ची नोटीस मिळाल्यानंतर दाखल केलेली आहे. त्यामुळे तकारकर्त्याच्या म्हणण्यामध्ये काही तथ्य दिसून येत नाही. तक्रारकर्ता हा दि. 10/7/2014 नंतर विरुध्दपक्ष क्र. 2 कडे कधीही मोबाईल दुरुस्तीसाठी घेऊन गेलेला नाही व मायक्रोमॅक्स कंपनीचे नविन अधिकृत सर्व्हीस सेंटरकडे देखील नेलेला नाही. दि. 10/7/2014 नंतरचा कोणताही पुरावा किंवा तज्ञाचा पुरावा तक्रारकर्त्याने दाखल केलेला नाही व कुठेही सिध्द केलेले नाही.
उभय पक्षांचा युक्तीवाद व दाखल दस्तांचे अवलोकन केल्यावर मंचाच्या असे निदर्शनास आले की, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 1 कडून सदर मोबाईल विकत घेतलेला आहे व विरुध्दपक्ष क्र. 1 हा फक्त मोबाईल विक्रेता आहे. त्यामुळे त्याला मोबाईल दुरुस्ती करुन देण्यास जबाबदार धरता येणार नाही. त्याने वेळोवेळी तक्रारकर्त्याला विरुध्दपक्ष क्र. 2 कडे जाण्यास सांगितले आहे, जे मोबाईल दुरुस्ती करुन देण्याचे अधिकृत सर्व्हीस सेंटर आहे. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या जॉब शिट वरुन दि. 25/4/2014 ला विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी मोबाईल दुरुस्तीसाठी ठेवून घेतला व दुरुस्तीसाठी लागणारा वेळ, याबद्दल त्याला पुर्व कल्पना दिली होती. तक्रारकर्ता हा दि. 10/7/2014 ला विरुध्दपक्ष क्र. 2 कडे मोबाईल घेण्यासाठी आला तेंव्हा मोबाईल पुर्ण चेक करुन तक्रारकर्त्याला दिला, तसा शेरा जॉब शिटवर दिलेला आहे. तक्रारकर्ता हा दि. 10/7/2014 नंतर कधीही विरुध्दपक्ष क्र. 2 कडे मोबाईल दुरुस्तीसाठी आला नाही व नविन सेंटरवर देखील गेलेला नाही, तसा कोणत्याही प्रकारचा पुरावा दस्त तक्रारकर्त्याने दाखल केला नाही.
तक्रारकर्त्याने प्रार्थनेमध्ये केलेली विनंती की, मोबाईल बदलून द्यावा. परंतु मोबाईल बदलून देण्याचा अधिकार फक्त कंपनीचा आहे व तक्रारकर्त्याने कंपनीला पक्ष केले नाही. त्यामुळे ही प्रार्थना मान्य करता येणार नाही. विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला वेळोवेळी सहाय्य केले आहे व तक्रारकर्त्याच्या नोटीसला देखील उत्तर दिले आहे. विरुध्दपक्ष क्र. 2 कडे सदरहू मोबाईल कंपनीचे अधिकृत सर्व्हीस सेंटर माहे जुन 2014 पर्यंत होते व त्याची जाहीर नोटीस व सुचना विरुध्दपक्ष क्र. 2 ने फलकावर लावली होती. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 2 कडून दि. 10/7/2014 ला मोबाईल घेतला व विरुध्दपक्ष क्र. 2 ने जॉब शिटवर मोबाईल दुरुस्त करुन दिला, असा शेरा दिलेला आहे. तक्रारकर्त्याने दि. 10/7/2014 रोजी नेलेला मोबाईल परत कधी विरुध्दपक्ष क्र. 2 कडे आणला नाही. त्या संबंधीचा पुरावा किंवा पावती प्रकरणात दाखल केलेली नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याच्या या म्हणण्यामध्ये तथ्य वाटत नाही. विरुध्दपक्षाने कोणताही निष्काळजीपणा व सेवा देण्यामध्ये त्रुटी केलेली आहे, असे दिसून येत नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याच्या तक्रारीत कोणत्याही प्रकारचे तथ्य मंचाला आढळून येत नाही, म्हणून तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करणे न्यायोचित होईल, असे मंचाचे मत आहे.
सबब अंतिम आदेश पारीत केला तो खालील प्रमाणे……
::: अं ति म आ दे श :::
- तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येत आहे.
2) न्यायिक खर्चाबाबत आदेश नाही.
3) सदर आदेशाच्या प्रती उभयपक्षांना नि:शुल्क देण्यात याव्या.