नि.20 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 190/2010 नोंदणी तारीख – 11/8/2010 निकाल तारीख – 29/10/2010 निकाल कालावधी – 78 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्री सुनिल कापसे, सदस्य यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ श्री दत्तात्रय निवृत्ती शिंदे रा.वर्ये, ता.जि.सातारा ----- अर्जदार (अभियोक्ता श्री आनंद कदम) विरुध्द व्यवस्थापक, अमोल सावंत नेक्स्ट रिटेल इंडिया लि. शाखा – सातारा दुर्गा पेठ, राजपथ रोड, पोलिस करमणुक केंद्रासमोर, सातारा ----- जाबदार (अभियोक्ता श्री भाऊसो पवार) न्यायनिर्णय अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे - 1. अर्जदार यांनी जाबदार यांचेकडून केनस्टार कंपनीचा मिक्सर दि.9/6/2009 रोजी रोख रक्कम रु.3,360/- देवून खरेदी केलेला आहे. सदरचे मिक्सरला जाबदार यांनी दोन वर्षाची वॉरंटी दिली आहे. सदरचे खरेदीनंतर सदरचा मिक्सर हा फक्त 15 दिवस व्यवस्थित चालला त्यानंतर मिक्सरवरील भांडे मशिनच्या वेगाने फूटू लागले. त्यामुळे मिक्सरबरोबर दिलेली सर्व भांडी फूटून गेली. सदरची बाब जाबदार यांना कळविली असता त्यांनी भांडी पुणे येथून बदलून आणावी लागतील असा सल्ला दिला. म्हणून अर्जदार यांनी पूणे येथील कार्यालयात मिक्सर सेट बदलून देण्याची मागणी केली असता त्यांनी जेथून मिक्सर विकत घेतला त्यांचेकडूनच बदलून घ्यावा असे सांगितले. सदरचा मिक्सर सेट जा जाबदार यांचेकडे जमा आहे. तो जाबदार यांनी आजअखेर बदलून दिलेला नाही. त्यामुळे अर्जदार यांना त्रास सहन करावा लागत आहे. सबब अर्जदार यांनी जाबदार यांना नोटीस पाठविली परंतु जाबदार यांनी त्यास कोणताही प्रतिसाद दिला नाही. सबब मिक्सरची मूळ किंमत वसूल होवून मिळावी, नुकसान भरपाईपोटी व अर्जाचे खर्चापोटी रक्कम मिळावी यासाठी अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज दाखल केला आहे. 2. जाबदार यांनी प्रस्तुतचे कामी त्यांचे लेखी म्हणणे/कैफियत नि. 14 ला दाखल केली आहे. त्यामध्ये त्यांनी अर्जदारचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारलेला आहे. जाबदार यांनी फक्त मिक्सरला वॉरंटी दिली होती त्यासोबतच्या भांडयांसाठी ही वॉरंटी नव्हती व नाही. जाबदार यांनी अर्जदार यांना पुण्याहून भांडी बदलून घेण्याचा सल्ला कधीही दिलेला नव्हता. मिक्सरसोबत असलेल्चा वॉरंटी कार्डवरील अटी व शर्तींच्या अधीन राहूनच अर्जदारने सदर वस्तूंची खरेदी केली आहे. अर्जदारची तक्रार आलेनंतर जाबदार यांनी मिक्सरची तपासणी केली त्यावेळी तो व्यवस्थित असलेचे दिसून आले. अर्जदाराने मिक्सरसोबत असणा-या भांडयाचा सेट परत घेण्यास नकार दिला व त्याचे पैसे परत मागितले. जाबदार यांनी त्यास नकार दिला. फुटलेली भांडी ही अर्जदारच्या चुकीच्या हाताळणीमुळे फुटलेलली आहेत. सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी त्यांचे कैफियतीमध्ये कथन केले आहे. 3. अर्जदारातर्फे अभियोक्ता श्री कदम यांनी व जाबदारातर्फे अभियोक्ता श्री पवार यांनी केलेला युक्तिवाद ऐकला. तसेच अर्जदारातर्फे दाखल कागदपत्रे पाहिली. 4. प्रस्तुतचे कामी प्रामुख्याने खालीलप्रमाणे मुद्दे उपस्थित होत आहेत. हे मुद्दे व त्यांना दिलेली उत्तरे खालीलप्रमाणे आहेत. मुद्दे उत्तरे अ) अर्जदार व जाबदार यांचे दरम्यान ग्राहक व सेवा देणारे असे नाते आहे काय ? होय. ब) जाबदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय ? होय. अंशतः क) अंतिम आदेश - खाली दिलेल्या कारणास्तव अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. कारणे 5. निर्विवादीतपणे अर्जदारने जाबदाराकडून खरेदी केलेल्या मिक्सरचा वापर सुरु केल्यानंतर त्याची भांडी फुटली. परंतु मिक्सरचे प्रमुख मशिनमध्ये दोष असल्याबाबत अर्जदारने तक्रारअर्जात काहीही नमूद केलेले नाही. तसेच सदरचा मिक्सर हा अर्जदारकडेच असून त्याची भांडी जाबदारकडे आहेत. जाबदार यांनी युक्तिवादामध्ये सदरची फुटलेली भांडी बदलून देण्यास तयार असल्याचे कथन केले आहे. 8. अर्जदारने तक्रारअर्जात जाबदारकडून मिक्सरच्या मूळ सेटची किंमत परत मागितली आहे. परंतु सदरचे मिक्सरमध्ये उत्पादीत दोष आहे हे दर्शविणारा कोणाही तज्ञ व्यक्तीचा अहवाल अर्जदार यांनी याकामी सादर केलेला नाही. सदरचा मिक्सर आजही अर्जदार यांचेच ताब्यात आहे. त्यामुळे केवळ मिक्सरसोबतची भांडी फुटली म्हणून संपूर्ण मिक्सरसेटची किंमत परत मिळावी ही अर्जदारची मागणी मान्य करता येणार नाही. 9. अर्जदारचे तक्रारअर्जातील मुख्य तक्रार अशी आहे की, त्यांनी मिक्सरचा वापर सुरु केल्यानंतर त्याची भांडी फुटली ती त्यांनी जाबदारकडे बदलून मागितली असता ती त्यांनी बदलून दिली नाहीत. सदरचे मिक्सर सेटची वॉरंटी ही दोन वर्षाची आहे परंतु तरीही जाबदार हे भांडी बदलून देण्यास तयार नाहीत असे कथन केले आहे. परंतु जाबदारने त्यांचे युक्तिवादामध्ये ते भांडी बदलून देण्यास तयार आहेत असे स्पष्ट कथन केले आहे. सबब जाबदार यांनी मिक्सरसोबतची फुटलेली भांडी बदलून नवीन भांडी अर्जदारला द्यावीत असा आदेश याकामी करणे योग्य व संयुक्तिक ठरणारे आहे. 10. अर्जदाराने मिक्सरसेट खरेदी केल्यानंतर त्याची भांडी फुटल्यामुळे अर्जदारला मिक्सरचा वापर करता आलेला नाही तसेच जाबदार यांनी त्यांना सदरची फुटलेली भांडी बदलून देण्यास नकार दिला त्यामुळे अर्जदारास मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे व या मे. मंचासमोर दाद मागावी लागलेली आहे. सबब अर्जदार हे जाबदार यांचेकडून मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. 10. या सर्व कारणास्तव व वर नमूद मुद्दयांच्या दिलेल्या उत्तरास अनुसरुन अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. 2. आजपासून 30 दिवसांचे आत जाबदार यांनी अर्जदार यांना त्यांना पुरविण्यात आलेल्या मिक्सरसेटमधील सर्व फुटलेली भांडी बदलून द्यावीत. 3. मानसिक त्रासापोटी रक्कम रु.500/- द्यावेत. 4. अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.500/- द्यावेत. 3. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 29/10/2010 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |