::: आ दे श :::
( पारित दिनांक : 26/02/2018 )
माननिय अध्यक्षा, सौ. एस. एम. उंटवाले, यांचे अनुसार : -
1) तक्रारकर्ता यांनी सदरहू तक्रार, ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम 12 अन्वये, दोषपूर्ण सेवे संदर्भात विरुध्द पक्षांविरुध्द दाखल केली आहे.
2) तक्रारकर्ता यांची तक्रार, विरुध्द पक्ष क्र. 1 चा लेखी जबाब, उभय पक्षाने दाखल केलेले सर्व दस्तऐवज व तक्रारकर्त्याचा लेखी युक्तिवाद, यांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन खालील निर्णय पारित केला.
सदर प्रकरणात विरुध्द पक्ष क्र. 2 ला संधी देवूनही त्यांनी लेखी जबाब दाखल केला नाही. म्हणून विरुध्द पक्ष क्र. 2 विरुध्द विनाजबाब आदेश पारित करण्यात आला.
3) उभय पक्षाचे कथन व दाखल दस्त यावरुन असा बोध होतो की, तक्रारकर्त्याकडील स्वराज कंपनीचा जुना ट्रॅक्टर विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी
रक्कम रुपये 2,60,000/- ईतक्या रक्कमेत घेवून, त्याबदल्यात मॅसी फर्ग्युसन कंपनीचा नवा ट्रॅक्टर व रोटावेटर विरुध्द पक्ष क्र.1 ने तक्रारकर्त्यास रुपये 5,25,900/- या रक्कमेत देवून, ट्रॅक्टरचा ताबा तक्रारकर्त्यास दिनांक 05/01/2017 रोजी दिला होता, व या रक्कमेचे विरुध्द पक्ष क्र. 2 यांनी अर्थसहाय्य दिले होते. म्हणून तक्रारकर्ते हे विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 चे ग्राहक आहे, या निष्कर्षावर मंच आले आहे.
3) तक्रारकर्ते यांची अशी तक्रार आहे की, सदर नविन ट्रॅक्टर विरुध्द पक्ष क्र. 1 कडून घेतांना विरुध्द पक्ष क्र. 1 हे जुन्या ट्रॅक्टरवरील उर्वरीत फायनान्स रक्कम व त्याचा खर्च श्रीराम फायनान्स, वाशिम यांच्याकडे भरेल व ट्रॅक्टरचा NOC करुन देतील व नवीन ट्रॅक्टर पासींग होईपर्यंत नविन ट्रॅक्टरची जबाबदारी तक्रारकर्त्यावर राहील. तक्रारकर्ता हा फायनान्ससाठी लागणा-या कागदपत्राची पुर्तता विरुध्द पक्ष क्र. 1 कडे करेल, असे ठरले होते. दिनांक 21/06/2017 रोजी तक्रारकर्ता व त्याचा भाऊ गजानन, रोटावेटरच्या दुरुस्तीकरिता, विरुध्द पक्ष क्र. 1 कडे गेले असता, विरुध्द पक्ष क्र. 1 ने तक्रारकर्त्याचा भाऊ गजानन याला, ट्रॅक्टरच्या हिशोबाचे देणेघेणे बाकी आहे, असे म्हणून शिवीगाळ करुन मारहाण केली व नविन मॅसी फर्ग्युसन कंपनीचा ट्रॅक्टर जबरदस्तीने जमा करुन घेतला. वास्तविक जुन्या ट्रॅक्टरचे काही एक देणेघेणे बाकी राहिले नाही. त्यामुळे प्रार्थनेनुसार तक्रार मंजूर करावी, अशी विनंती केली.
4) यावर विरुध्द पक्षाचे असे म्हणणे आहे की, तक्रारकर्त्याने त्याचा जुना ट्रॅक्टर रुपये 2,60,000/- ईतक्या किमतीत विरुध्द पक्ष क्र.1 ला देवून, त्या मोबदल्यात नविन मॅसी फर्ग्युसन कंपनीचा ट्रॅक्टर रुपये 6,65,000/- मध्ये विकत घेतला होता. त्याच्या जुन्या ट्रॅक्टरवर कर्ज रक्कम बाकी आहे, ती कर्ज रक्कम पूर्ण भरुन त्याची NOC तक्रारकर्ता विरुध्द पक्ष क्र.1 ला देणार होता. परंतु तक्रारकर्त्याने जुन्या ट्रॅक्टरवरील कर्ज रक्कम न भरल्यामुळे जुन्या ट्रॅक्टरची रक्कम रुपये 2,60,000/- नविन ट्रॅक्टरच्या किंमतीतून वजा होवू शकत नाही. म्हणून तक्रारकर्त्याने दिनांक 21/06/2017 रोजी स्वइच्छेने तसे लेखी लिहून देवून मॅसी फर्ग्युसन ट्रॅक्टर, विरुध्द पक्ष क्र.1 कडे सरेंडर केला आहे. त्यामुळे यात विरुध्द पक्षाची सेवा न्युनता नाही.
5) अशाप्रकारे उभय पक्षाचे कथन व युक्तिवाद तपासल्यानंतर, दाखल दस्तांवरुन असा बोध होतो की, उभय पक्षाने रेकॉर्डवर दिनांक 05/01/2017 रोजीची सौदा/हिशोब पावती दाखल केली आहे. त्यावर असा मजकूर लिहलेला आहे की, ‘‘ जुन्या ट्रॅक्टरचा खर्च व NOC स्वतः करुन देणार. नविन ट्रॅक्टर पासींग होईपर्यंत ट्रॅक्टरला काही झाल्यास जबाबदारी स्वतःची राहिल व फायनान्स साठी लागणारे कागदपत्रे हे दिनांक 06/01/2017 रोजी देणार. ’’ सदर हिशोब पावतीवर विरुध्द पक्ष क्र.1 ची सही आहे व गजानन घुगे यांची सही आहे. तक्रारकर्त्याचे असे म्हणणे आहे की, गजानन घुगे हा त्याचा भाऊ आहे. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी याबद्दल आक्षेप घेतला नाही. सदर हिशोब पावती मजकूरावरुन तक्रारकर्त्याचे असे म्हणणे आहे की, जुन्या ट्रॅक्टरचा खर्च व NOC हे विरुध्द पक्ष क्र.1 करतील. परंतु तक्रारकर्त्याने सदर प्रकरण मंचात दाखल केल्यानंतर जुन्या ट्रॅक्टरवरील कर्ज हप्ता, श्रीराम फायनान्स कंपनीकडे भरल्याच्या पावत्या रेकॉर्डवर दाखल केल्या आहेत. त्यामुळे तक्रारकर्त्याच्या कथनात मंचाला तथ्य आढळत नाही. कारण तक्रारकर्त्याच्या नावे कर्ज असलेले जुने ट्रॅक्टर तक्रारकर्ता विरुध्द पक्ष क्र.1 ला कसे विकु शकतो ? ही बाब तक्रारकर्त्याने स्पष्ट केली नाही. त्यामुळे जुन्या ट्रॅक्टरचा खर्च व NOC तक्रारकर्ते करणार होते, असा अर्थ, संबंधीत हिशोब पावतीवरील मजकूरातुन निघतो, असे मंचाचे मत आहे. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी दाखल केलेली दिनांक 21/06/2017 ची ट्रॅक्टर जमा पावती, ज्यावर उभय पक्षाच्या सह्या व साक्षिदाराच्या सह्या आहेत, त्यातील मजकूरावरुन स्पष्ट असा बोध होतो की, तक्रारकर्त्याने नविन मॅसी फर्ग्युसन ट्रॅक्टर विरुध्द पक्ष क्र.1 कडे स्वतःहून जमा केला होता, व अशी कबुली दिली की, जुन्या ट्रॅक्टरचा हिशोब तक्रारकर्ते लवकरच करुन देतील. त्यामुळे तक्रारकर्त्याने, विरुध्द पक्ष क्र.1 ची सेवा न्युनता कागदोपत्री पुराव्याव्दारे सिध्द केली नाही.
तक्रारकर्ते यांनी प्रार्थनेत विरुध्द पक्ष क्र.2 कडून कोणतीही मदत मागीतली नाही. सबब तक्रारकर्ते यांची तक्रार खारिज करणे क्रमप्राप्त ठरते.
म्हणून, अंतिम आदेश खालीलप्रमाणे पारित केला.
अंतिम आदेश
- तक्रारकर्ते यांची तक्रार पुराव्याअभावी खारिज करण्यांत येते.
- न्यायिक खर्चाबाबत कोणताही आदेश पारित करण्यात येत नाही.
- उभय पक्षांना या आदेशाच्या प्रती निःशुल्क पुरवाव्या.
( श्री. कैलास वानखडे ) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.
svGiri