श्री. प्रदीप पाटील, सदस्य यांचे कथनांन्वये.
- आदेश -
(पारित दिनांक – 12 मार्च, 2015)
1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ही ग्रा.सं.का. 1986 अंतर्गत कलम 12 अन्वये कलम 12 अंतर्गत दाखल केली असून, तक्रारकर्त्याच्या तक्रारीचा थोडक्यात आशय असा आहे की, वि.प. यांचा जमिनी खरेदी करुन व त्यावर लेआऊट पाडून ते गरजू लोकांना विकण्याचा व्यवसाय आहे. वि.प. यांच्या मौजा भोजापूर, प.ह.क्र.38, ता.रामटेक, जि.नागपूर येथील गैरकृषी 56/1 या जागेचे मालक असून त्यावर त्यांनी लेआऊट पाडून भुखंडाची विक्री करीत आहे. वि.प.ने तक्रारकर्त्याशी संपर्क साधून पाडलेल्या भूखंडापैकी भुखंड विकत घेण्याची विनंती केली. वि.प. यांनी दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवून तक्रारकर्त्याने भुखंड क्र. 31, क्षेत्रफळ 1165 चौ.फु. हा रु.5,22,200/- ला विकत घेण्याचा सौदा केला. दि.16.03.2013 रोजी तक्रारर्त्याने रु.25,000/- वि.प.ला देऊन भुखंड क्र. 31 आपल्या मुलाच्या नावे अखिलेश आनंद मेंढे नावाने नोंदणी केला. वि.प. यांनी रु.25,000/- बयाना मिळाल्याबाबतची पावती तक्रारकर्त्याला दिली. तक्रारकर्त्याने त्यानंतर 03.04.2013 रोजी रु.1,00,000/- वि.प. यांना देऊन करारनामा करण्यात आला व उर्वरित रक्कम रु.3,87,200/- विक्रीपत्राचेवेळी देण्याचे ठरविले. विक्रीपत्राची मुदत 03.07.2013 पर्यंत निश्चित करण्यात आली. त्यानंतर तक्रारकर्त्याने वि.प.सोबत संपर्क साधून विक्रीपत्र करुन देण्याची विनंती केली. परंतू वि.प.ने सतत विक्रीपत्र करुन देण्याचे टाळाटाळ केल्याने तक्रारकर्तीने त्या जमिनीसंबंधी चौकशी केली असता ती जागा वि.प. यांच्या मालकीची नसून महिपाल चौकसे यांच्या नावे असल्याचे माहित झाल्यामुळे त्यांना आपली फसवणूक झाल्याचे कळले व मानसिक धक्का बसला. तक्रारकर्तीने त्यानंतर वि.प.यांना वकिलांमार्फत कायदेशीर नोटीस पाठविली व उर्वरित रक्कम घेऊन विक्रीपत्र करुन देण्याची विनंती केली. परंतू वि.प.ने नोटीसची दखल घेतली नाही व विक्रीपत्र करुन दिले नाही, म्हणून तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमोर दाखल केलेली आहे. आपल्या तक्रारीत तक्रारकर्त्याने भुखंडाचे विक्रीपत्र करुन मिळावे किंवा वि.प.ला अदा केलेली रक्कम व्याजासह परत करण्यात यावी, नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळावा अशा मागण्या केलेल्या आहेत.
2. मंचामार्फत वि.प.ला नोटीस प्राप्त झाल्यावर ते मंचासमोर हजर झाले. परंतू पूरेशी संधी देऊनही त्यांनी तक्रारीस लेखी उत्तर दाखल केले नाही. म्हणून त्यांचेविरुध्द लेखी उत्तराशिवाय कारवाई चालविण्याचा आदेश पारित केला. मंचाने तक्रारीसोबत दाखल दस्तऐवज व तक्रारीचे अवलोकन केले असता मंचाचे निष्कर्ष खालीलप्रमाणे.
-निष्कर्ष-
3. तक्रारकर्तीचा युक्तीवाद ऐकण्यात आला, तसेच दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले. तक्रारकर्तीने दाखल केलेल्या कागदपत्रांमध्ये वि.प.ने तक्रारकर्तीला नोंदणीदाखल रु.25,000/- दिल्याचे व त्याबाबत पावती अदा केल्याचे दस्तऐवज निदर्शनास येतात. तसेच दि.03.04.2013 रोजी उभय पक्षांमध्ये विक्रीचा करारनामा/बयानापत्र झाल्याचे दिसून येते. सदर विक्रीचा करारनामा/बयानापत्रानुसार भुखंड क्र. 31 वि.प.ने तक्रारकर्त्याला रु.5,22,200/- ला विकल्याचे दिसून येत असून त्याबाबत एकूण रु.1,25,000/- अदा केलेली आहे. तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार व त्यांना माहिती मिळाल्यानुसार सदर जमिन ही वि.प.च्या नावावर नाही, त्यामुळे सदर भुखंडाचे विक्रीपत्र तक्रारकर्त्याचे नावावर करुन देणे अशक्य असल्यामुळे तक्रारकर्तीने भुखंडाच्या किमतीदाखल जी रु.1,25,000/- रक्कम वि.प.ला अदा केलेली आहे, ती व्याजासह परत करणे न्यायोचित होईल असे मंचाचे मत आहे.
4. तक्रारकर्तीला भुखंडाचे विक्रीपत्र करुन न मिळाल्याने तिला मानसिक त्रास होणे साहजिकच आहे. तसेच प्लॉटच्या वैधानिक हक्कापासून तिला वंचित राहावे लागले. म्हणून तक्रारकर्ती सदर प्रकरणी मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई व पर्यायाने सदर तक्रार दाखल करावी लागल्याने तक्रारीचा खर्च मिळण्यास पात्र आहे. वि.प.ने तक्रारकर्तीला रु.1,25,000/- ही रक्कम दि.03.04.2013 पासून तर प्रत्यक्ष रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे.11 टक्के व्याजासह परत करावी. तसेच मानसिक त्रासाबद्दल रु.10,000/- व तक्रारीच्या खर्चाबाबत रु.5,000/- वि.प.ने तक्रारकर्तीला अदा करावे असे मंचाचे मत आहे.
उपरोक्त निष्कर्षावरुन मंच सदर प्रकरणी खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-आदेश-
1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) वि.प.ने तक्रारकर्तीला रु.1,25,000/- ही रक्कम दि.03.04.2013 पासून तर प्रत्यक्ष रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे.11 टक्के व्याजासह परत करावी.
3) मानसिक व शारिरीक त्रासाबद्दल रु.10,000/- व तक्रारीच्या खर्चाबाबत रु.5,000/- वि.प.ने तक्रारकर्तीला अदा करावे.
4) सदर आदेशाचे पालन वि.प.ने आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून एक महिन्याचे आत करावे.