--- आदेश ---
(पारितदि. 15-03-07 )
द्वारा श्रीमतीप्रतिभाबा. पोटदुखे, अध्यक्षा
अर्जदार श्रीमती हेमलता तुळशीराम पालीवाल व इतर यांनी दाखल केलेल्या ग्राहक तक्रारीचा आशय असा की,.......................
1 मृतक श्री. तुळशीराम गेंदलाल पालीवाल यांनी जनता वैयक्तिक अपघात विमा पॉलिसी ही समुहा अंतर्गत गैरअर्जदार क्रं. 1 यांचे कडून घेतली होती. ती रु.1,00,000/- रकमेची असून तिचा विमा हप्ता हा रु.240/- असा होता. सदर विमा पॉलिसीचा कालावधी हा 25.10.01 ते 24.10.06 असा होता तर समुह पॉलिसी क्रमांक 160302/47/01807290 हा होता.
2 श्री. तुळशीराम गेंदलाल पालीवाल यांचा दि. 08.11.03 रोजी रस्ता अपघातात मृत्यु झाला. त्यांचे वारसदार म्हणून अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्याकडे विमा रकमेची मागणी केली असता दि. 23.02.05 च्या पत्राद्वारे शाखा अधिकारी, मुरमाडी, द भंडारा डिस्ट्रक्ट सेंट्रल को.ऑप बँक लि. भंडारा यांनी अर्जदार यांना गैरअर्जदार क्रं. 2 यांचेकडून विमा क्लेम परत आल्याचे कळविले.
3 अर्जदार म्हणतात की, त्यांचा विमा दावा नाकारणे ही गैरअर्जदार यांच्या सेवेतील न्यूनता आहे. अर्जदार यांनी मागणी केली आहे की, त्यांना विमा दाव्याची रक्कम रु.1,00,000/- ही विमा दावा नाकारल्याच्या तारखेपासून ती अर्जदार यांना मिळेपर्यंत 18% व्याजाने देण्यात यावी. अर्जदार यांना शारीरिक व मानसिक त्रासासाठी रु.1,00,000/- तर ग्राहक तक्रारीचा खर्च म्हणून रु.5,000/- मिळावेत.
4 गैरअर्जदार क्रं.1 व 2 यांनी त्यांचे लेखी बयाण नि.क्रं. 15 वर दाखल केले आहे. गैरअर्जदार क्रं. 1 व 2 म्हणतात की, अर्जदार यांची पॉलिसी ही रु.1,00,000/- करिता नसून रु.50,000/- करिता होती. मृतक रु.240 असा विमा हप्ता भरत नव्हते. श्री. तुळशीराम पालीवाल हे दारु पिवून गाडी चालवित असतांना त्यांच्या मृत्यु झाला. त्यामुळे पॉलिसीतील अटीप्रमाणे विमा रक्कम मिळण्यास अर्जदार पात्र नाहीत.
5 गैरअर्जदार क्रं.3 यांनी दि. 31.01.07 च्या पत्राद्वारे नि.क्र.9 विद्यमान न्यायमंचास असे सुचित केले की, त्यांचा ग्राहक तक्रारीशी कोणताही संबंध नाही.
कारणे व निष्कर्ष
6 अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे, शपथपत्र, पुरावा व केलेला युक्तिवाद यावरुन असे निदर्शनास येते की, मृतक श्री. तुळशीराम पालीवाल यांचा मृत्यु हा पॉलिसी कालावधीत झाला व मृत्युचे वेळी त्यांचेकडे वैध चालक परवान होता .
7 गैरअर्जदार क्रं. 1 व 2 दि. 27.02.07 रोजी ग्राहक तक्रारीचे उत्तर देण्यासाठी वेळ देण्यात यावा म्हणून तिसरा अर्ज न्यायमंचासमोर सादर केला तो रु. 500/- हे ग्राहक मंचाच्या ग्राहक कायदे विषयक सहायता निधीमध्ये भरण्याचे निर्देश देवून मंजूर करण्यात आला. दि. 03.03.07 रोजी गैरअर्जदार यांनी त्यांचे लेखी बयाण रेकॉर्डवर दाखल केले परंतु रु.500/- ही रक्कम विद्यमान न्यायमंचात भरलेली नाही. त्यामुळे गैरअर्जदार क्रं.1 व 2 यांनी दाखल केलेले लेखी बयाण नि.क्रं. 15 विचारात घेता येत नाही.
8 गैरअर्जदार क्रं.1 व 2 यांचे तर्फे दि. 9.3.07 रोजी दाखल करण्यात आलेल्या दस्ताऐवजावरुन तसे दिसून येते की, मृतक श्री. तुलसीराम गेंदलाल पालीवाल यांनी घेतलेली पॉलिसी ही रु.1,00,000/- ची नसून रु.50,000/- ची होती.
अशा स्थितीत सदर आदेशपारितकरण्यातयेतआहे.
आदेश
1 गैरअर्जदार क्रं. 1 व 2 यांनी अर्जदार यांना विमा रक्कम रु.50,000/-ही ग्राहक तक्रार दाखल झाल्याच्या तारखेपासून म्हणजेच दि. 0ि4.12.06 पासून ती अर्जदार यांना मिळेपर्यंत 9%व्याजासह द्यावी.
2 गैरअर्जदार क्रं. 1 व 2 यांनी अर्जदार यांना शारीरिक व मानसिक त्रासासाठी रु.3000/- तर ग्राहक तक्रारीचा खर्च म्हणून रु.1000/- द्यावेत.
3 गैरअर्जदार क्रं. 1 व 2 यांनी आदेशाचे पालन आदेशाच्या तारखेपासून 1 महिन्याच्या आत करावे. अन्यथा गैरअर्जदार क्रं. 1 व 2 हे ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 27 अंतर्गत दंडाहर्य कारवाईस पात्र असतील.