जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,धुळे.
मा.अध्यक्षा- सौ.व्ही.व्ही.दाणी
मा.सदस्या – सौ.एस.एस.जैन
मा.सदस्य - श्री.एस.एस.जोशी
---------------------------------------- ग्राहक तक्रार क्रमांक – १७०/२०११
तक्रार दाखल दिनांक – ०६/०९/२०११
तक्रार निकाली दिनांक – ३०/०७/२०१३
(१)श्रीमती अनिता भ्र.वसंत पारधी ----- तक्रारदार.
उ.व.२२,धंदा-घरकाम.
(२)कु.दिव्या वसंत पारधी
उ.व.३,धंदा-काही नाही.
(३)कु.संध्या वसंत पारधी
उ.व.१.५,धंदा-काही नाही.
अर्जदार नं.२ व ३ ची अ.पा.क.
अर्जदार नं.१
(४)सौ.लताबाई भ्र.शिवराम पारधी
उ.व.५०,धंदा-घरकाम.
(५)श्री.शिवराम सुका पारधी
उ.व.५५,धंदा-शेतमजूरी.
सर्व रा.ममाणे,पो.त-हाडी,
ता.शिरपूर,जि.धुळे.
विरुध्द
(१)मैत्रेय सर्व्हिसेस प्रा.लि. ----- सामनेवाले.
नोटीसीची बजावणी –व्यवस्थापक,
मैत्रेय सर्व्हिसेस प्रा.लि.
मांडळ रोड,डॉ.शिसोदे यांच्या दवाखान्याच्या
मागे,शिरपूर,ता.शिरपूर,जि.धुळे.
(२)मोहन उखा पाटील
उ.व.सज्ञान,धंदा-व्यवसाय.
रा.ममाणे (त-हाडी),ता.शिरपूर जि.धुळे.
न्यायासन
(मा.अध्यक्षाः सौ.व्ही.व्ही.दाणी )
(मा.सदस्याः सौ.एस.एस.जैन)
(मा.सदस्य: श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – वकील श्री.डी.डी.जोशी)
(सामनेवाले क्र.१ तर्फे – वकील श्री.सी.आर.गुजराथी)
(सामनेवाले क्र.२ तर्फे – स्वत:)
---------------------------------------------------------------------
निकालपत्र
(द्वाराः मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही.दाणी)
(१) तक्रारदारांनी, सामनेवाले यांच्याकडून भुमी युनिटची रक्कम मिळणेकामी सदर तक्रार या न्यायमंचात दाखल केली आहे.
(२) तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, मयत वसंत शिवराम पारधी हे तक्रारदार नं.१ यांचे पती आहेत व तक्रारदार क्र.२ व ३ हे मुले आहेत, तसेच तक्रारदार क्र ४ व ५ हे मयत वसंत शिवराम पारधी यांचे आई-वडील आहेत. मयत वसंत शिवराम पारधी यांनी भुमी युनिट योजना ही दि.२६-०६-२००६ रोजी सामनेवाले क्र.१ यांच्याकडून घेतली होती. मयत वसंत शिवराम पारधी हे शिरपुर तालूक्यातील राहणार असल्यामुळे तेथील मतदार संघात त्यांचे नांव होते. त्यांचे दि.१९-०१-२०१० रोजी मोटारसायकल अपघातात निधन झाले आहे. मयताने सदर योजनेमध्ये दि.२६-११-२००९ पावेतो एकूण ४२ हप्ते भरलेले आहेत. पॉलिसीची देय किंमत रु.११,६००/- असून त्यात अपघाती मृत्यु कव्हर केलेला आहे. त्यामुळे सदरची रक्कम मिळणेकामी तक्रारदारांनी सामनेवाले यांच्याकडे कागदपत्रे सादर केली. परंतु सामनेवाले यांनी लाभ देण्यास टाळाटाळ केली आहे. त्याप्रमाणे सामनेवालेस नोटिस पाठविली, परंतु त्यास सामनेवाले यांनी खोटे उत्तर देऊन जबाबदारी टाळली आहे. सबब सदरचा तक्रार अर्ज दाखल करणे भाग पडले आहे.
(३) तक्रारदारांची विनंती अशी आहे की, वरील युनिट्स चे सर्व फायदे व लाभ मिळावेत व सामनेवाले यांचेकडे जमा असलेली रक्कम व्याजासह मिळावी. शारीरिक, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रु.५०,०००/- मिळावेत.
(४) सामनेवाले क्र.१ यांनी त्यांचा जबाब दाखल केलेला आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की, विमा धारकाने सदर भुमि युनिट योजना खरेदी केली आहे व त्याचा मोबदला ते हप्त्याने देत होते. ही विमा पॉलिली नसून ती भुमि युनिट सर्टीफीकेट योजना आहे व त्याच्या नियमा प्रमाणे मृत्यु किंवा अपंगत्व आल्यास नुकसानीपोटी रक्कम दिली जाते. मयताने प्रत्येक महिन्याच्या २६ तारखेला हप्ता भरणे अपेक्षीत होते. परंतु दि.२६-१०-२००९ चा हप्ता हा दि.१६-११-२००९ रोजी भरला होता. त्यानंतर २६-११-२००९ रोजी पुढील हप्ता भरावयाचा होता, परंतु विमेधारकाने तो जमा केलेला नाही. त्यामुळे नियमाप्रमाणे सदर योजना ही खंडीत झाली आहे. त्यामुळे त्या अंतर्गत मिळणारे फायदे घेण्यास तक्रारदार हे अपात्र ठरतात. सामनेवालेंचे पुढे असे म्हणणे आहे की, तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडे भरणा केलेली रक्कम व त्यावरील उर्वरीत फायदे हे नियमाप्रमाणे तक्रारदारास देण्यास तयार आहेत. इतर कुठल्याही प्रकारची रक्कम देण्यास सामनेवाले जबाबदार नाहीत, त्यामुळे सदरचा अर्ज खर्चासह रद्द करण्याची मागणी केली आहे.
(५) सामनेवाले क्र.२ हे प्रकरणात हजर आहेत. परंतु त्यांनी अद्याप पर्यंत खुलासा अथवा कोणतीही कागदपत्रे पुराव्याकामी दाखल केलेली नाहीत. त्यामुळे त्यांचे विरुध्द नि.नं.१ वर “नो-से” आदेश करण्यात आला आहे.
(६) तक्रारदारांचा अर्ज, शपथपत्र, दाखल कागदपत्र तसेच सामनेवाले यांची कैफीयत, शपथपत्र, दाखल कागदपत्र पाहता तसेच उभयपक्षांच्या विद्वान वकीलांनी केलेला युक्तिवाद ऐकल्यानंतर, आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुद्देः | निष्कर्षः |
(अ)तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? | : होय. |
(ब)सामनेवाले क्र.१ यांच्या सेवेत त्रृटी स्पष्ट होते काय ? | : होय. |
(क)आदेश काय ? | : अंतिम आदेशा प्रमाणे |
विवेचन
(६) मुद्दा क्र. ‘‘अ’’ – तक्रारदार यांच्या मयत पतीने, सामनेवाले क्र.१ कंपनीचे सामनेवाले क्र.२ कडून भुमि सर्टीफीकेट योजना घेतलेली आहे. ती नि.नं.८ वर दाखल केली आहे. सदर सर्टीफीकेट पाहता ती मयत वसंत शिवराम पारधी यांचे नांवे असून सदर योजना ही दि.२६-०६-२००६ रोजी घेतलेली असून तिचा कालावधी ६ वर्ष ६ महिने असा असून, युनिटची किंमत ही रु.७८,०००/- या प्रमाणे रु.१००/- हप्ता नमूद आहे. त्याच प्रमाणे या सर्टीफीकेटवर वारस म्हणून मयताची आई नामे श्रीमती लताबाई एस.पारधी असे नमूद केलेले आहे. याचा विचार होता सर्व तक्रारदार हे मयताचे वारस असल्याने, सामनेवालेंचे ग्राहक असल्याचे स्पष्ट होते. म्हणून मुद्दा क्र. ‘‘अ’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(७) मुद्दा क्र. ‘‘ब’’ – सदर भुमि युनिट सर्टीफीकेट हे मयत वसंत शिवराम पारधी यांनी खरेदी केलेले आहे. त्यांचे दि.१९-०१-२०१० रोजी अपघातात निधन झाले आहे. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी योजनेच्या नियमा प्रमाणे नुकसान भरपाई मिळणेकामी रकमेची मागणी केली आहे. परंतु त्याबाबत सामनेवाले यांनी असा बचाव घेतला आहे की, सदर योजनेचा दि.२६-११-२००९ रोजीचा हप्ता हा विमेधारकाने भरलेला नाही. त्यामुळे सदर युनिट योजना ही खंडीत झालेली आहे. योजने अंतर्गत मिळणारे फायदे घेण्यास तक्रारदार हे अपात्र ठरत आहेत. या बाबत सामनेवाले यांनी परीशीष्ठ “अ” मध्ये मयताची खाते पुस्तीका नि.नं. ७ वर दाखल केलेले आहे. ही खातेपुस्तीका पाहता असे दिसते की, युनिट धारक मयत वसंत शिवराम पारधी यांनी दि.२६-०७-२००६ ते दि.२६-०६-२००९ पावेतो रु.१००/- प्रमाणे हप्ते भरलेले आहेत. त्याची एकूण रक्कम ही रु.४,१००/- अशी जमा आहे. यामध्ये शेवटचा हप्ता हा दि.२६-१०-२००९ चा असून तो मयताने दि.१६-११-२००९ रोजी भरलेला दिसत आहे. त्यानंतरचा दि.२६-११-२००९ चा हप्ता हा भरावयाचा होता. परंतु विमेधारकाने तो जमा केलेला नाही.
(८) विमेधारकाचा मृत्यु हा दि.१९-०१-२०१० रोजी झालेला आहे. यावरुन असे लक्षात येते की, दि.२६-११-२००९ व दि.२६-१२-२००९ असे दोन हप्ते मयताने भरलेले नाहीत. यावरुन सदर युनिट योजना ही खंडीत झालेली आहे हे स्पष्ट हेते. त्यानंतर सामनेवाले यांनी सदर योजनेच्या अटी शर्ती या नि.नं.८ वर दाखल केलेल्या आहेत. यामध्ये अपघाती अपंगत्व किंवा मृत्यु झाल्यास नियमानुसार मोबदला दिला जाईल. परंतु यामध्ये मृत्यु समयी संयुक्त उपक्रम लागू असला पाहिजे, खंडीत झालेला नसावा अशी अट नमूद केलेली आहे. या अटीचा विचार होता जर योजना खंडीत झालेली असेल तर नियमा प्रमाणे मोबदला मिळू शकत नाही. विमेधारकाची सदर युनिट योजना ही खंडीत झालेली आहे. त्यामुळे तक्रारदारास अपघाती अपंगत्व किंवा मृत्यु झाल्यास मिळणारी नुकसान भरपाई ही मिळणार नाही ही बाब स्पष्ट होत आहे.
(९) त्यानंतर सामनेवाले यांचे असे म्हणणे आहे की, तक्रारदार यांनी भरणा केलेली रक्कम व त्यावरील फायदे देण्यास तयार आहेत. याचा विचार होता विमेधारकाने दि.१६-११-२००९ पर्यंत एकूण हप्त्यापोटी एकूण रक्कम रु.४,१००/-हे जमा केलेले आहेत. सदरची रक्कम ही परिपक्वता दि.२६-१२-२०१२ रोजी व्याजासह रु. रु.४,५१०/- एवढी मिळणार आहे. त्यामुळे दि.२६-१२-२०१२ पासून व्याजासह सदर रक्कम मिळण्यास तक्रारदार पात्र आहेत. ही रक्कम सामनेवाले यांनी तक्रारदार यांना वेळेत परत केलेली नाही, त्यामुळे सामनेवालेंच्या सेवेत त्रृटी स्पष्ट होत आहे. म्हणून मुद्दा क्र. ‘‘ब’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(१०) या तक्रार अर्जामध्ये एकूण ५ तक्रारदार आहेत. परंतु ही रक्कम मिळण्याकामी सदर भुमि युनिट सर्टीफीकेटवर वारस म्हणून तक्रारदार नं.४ सौ.लताबाई भ्र.शिवराम पारधी. यांना मयताची आई म्हणून वारस दर्शविलेले आहे. त्यामुळे कायद्याप्रमाणे सदर रक्कम ही तक्रारदार क्र.४ यांचे नांवे देण्यात यावी.
(११) तक्रारदार हे योजनेकामी रु.४,५१०/- मिळण्यास पात्र आहेत. सदरची रक्कम सामनेवाले यांनी तक्रारदारास वेळेत न दिल्यामुळे, तक्रारदार यांना सदर तक्रार अर्ज दाखल करावा लागला आहे व मानसिक, शारीरिक त्रास सहन करावा लागला आहे. याचा विचार होता तक्रारदार हे सामनेवाले यांच्याकडून मानसिक, शारीरिक त्रास व तक्रार अर्जाचे खर्चापोटी एकूण रक्कम रु.१,०००/- मिळण्यास पात्र आहेत असे मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र. “ब” चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(१२) वरील सर्व कारणांचा विचार होता खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येत आहे.
आदेश
(अ) तक्रारदारांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करण्यात येत आहे.
(ब) सामनेवाले क्र. १ यांनी या आदेशाच्या दिनांका पासून पुढील तीस दिवसांचे आत.
(१) तक्रारदार क्र.४ सौ.लताबाई भ्र.शिवराम पारधी. यांना, योजनेची रक्कम ४,५१०/- (अक्षरी चार हजार पाचशे दहा मात्र) दि.२६-१२-२०१२ पासून ते संपूर्ण रक्कम देऊन होईपर्यंतचे कालावधीसाठी द.सा.द.शे.६ टक्के प्रमाणे व्याजासह द्यावेत.
(२) तक्रारदार क्र.४ सौ.लताबाई भ्र.शिवराम पारधी. यांना, मानसिक, शारिरीक त्रास व तक्रार अर्जाचे खर्चापोटी एकूण रक्कम १,०००/- (अक्षरी रु.एक हजार मात्र) द्यावेत.
धुळे.
दिनांकः ३०/०७/२०१३
(श्री.एस.एस.जोशी) (सौ.एस.एस.जैन) (सौ.व्ही.व्ही.दाणी)
सदस्य सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे. (महाराष्ट्र राज्य)