निकालपत्र
(द्वारा- मा.अध्यक्षा - सौ.व्ही.व्ही.दाणी)
(१) तक्रारदार यांनी त्यांच्या पतीचा अपघाती मृत्यू झाल्याने त्यांच्या विमा पॉलिसीची रक्कम तसेच शारीरिक, मानसिक त्रासापोटी व अर्जाच्या खर्चाची रक्कम सामनेवाले विमा कंपनीकडून मिळावी म्हणून सदरचा तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम १२ अन्वये या मंचात दाखल केला आहे.
(२) तक्रारदार यांची तक्रार थोडक्यात अशी आहे की, तक्रारदार यांचे मयत पती यांनी सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा यांच्याकडून पिक कर्ज घेतले होते. दि.२५-११-२००९ रोजी तक्रारदारांचे मयत पती भगवान नागो पाटील हे स्वत:चे शेतात कपाशीच्या पिकावर औषधांची फवारणी करीत असतांना, नाकातोंडात विषारी औषध फवारा मारतांना गेल्याने त्यांना विषबाधा झाली त्यामुळे त्यांचा दि.२६-११-२००९ रोजी मृत्यू झाला. त्याबाबत संबंधीत पोलीसस्टेशनला खबर देण्यात आली व सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया यांच्याकडे कर्जमाफी करिता अर्ज दिला. सदर अर्ज बॅंकेने सामनेवाले यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविला. परंतु सामनेवाले यांनी दि.१६-१०-२०१० च्या पत्राने तो नाकारला. त्यामुळे सदरची तक्रार मंचात दाखल करणे भाग झाले आहे. तक्रारदार यांना कबाल इन्शुरन्स ब्रोकिंग सर्व्हीस प्रा.लि. यांच्याकडून व्यक्तिगत अपघात विमा योजनेअंतर्गत क्लेमची रक्कम मिळालेली आहे. त्यावेळी त्यांच्याकडे सदर घटनेचा पंचनामा, पी.एम.रिपोर्ट, खाते उतारा, पोलीस अहवाल इत्यादी दाखल केले होते. याप्रमाणे कबाल इन्शुरन्स यांनी सदरचा क्लेम हा मंजूर केलेला आहे. परंतु त्याचे अवलोकन करुन सामनेवाले विमा कंपनीने सदर दावा नाकारुन सामनेवाले यांनी चुकीच्या पध्दतीचा अवलंब केला आहे व कागदपत्रांची छाणणी न करता क्लेम नाकारलेला आहे. अशा प्रकारे सामनेवाले यांनी सेवेत दोष दिल्यामुळे अनुचित प्रथेचा मार्ग अवलंबला आहे. त्यामुळे तक्रारदारांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
तक्रारदारांची अशी विनंती आहे की, तक्रारदार यांचे मयत पतीचा अपघाती मृत्यू झाला असून, त्यांचा के.सी.सी. योजनेअंतर्गत शेतक-याचा जोखीम विमा देय रक्कम रु.५०,०००/- दि.१६-१०-२०१० पासून व्याजासह मिळावे, तसेच मानसिक त्रासाबद्दल रक्कम रु.२५,०००/- व अर्जाचा खर्च रु.२०,०००/- मिळावा.
(३) तक्रारदार यांनी त्यांच्या कथनाच्या पुष्टयर्थ नि.नं.४ वर शपथपत्र, नि.नं.५ वरील दस्तऐवज यादीसोबत एकूण १२ कागदपत्रे छायांकीत स्वरुपात दाखल केली आहेत. यात खबर, पंचनामा, पोस्टमॉर्टेम रिपोर्ट, अर्ज, ७/१२ उतारा, खाते उतारा व कबाल इन्शुरन्सने दिलेल्या धनादेशाबाबतचे कागदपत्रांची प्रत यांचा समावेश आहे.
(४) सामनेवाले यांनी त्यांचा खुलासा नि.नं.१५ वर दाखल केला आहे. त्यात त्यांनी सदर अर्ज नाकारला असून असे नमुद केले आहे की, सामनेवालेंनी कोणतीही सेवेत त्रुटी केलेली नाही. त्यामुळे प्रथमदर्शनी सदर तक्रार रद्द होण्यास पात्र आहे. तसेच मयताने सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा यांच्याकडून पिक कर्ज घेतले होते. मयताचा अपघाती विमा के.सी.सी. योजनेअंतर्गत उतरविण्यात आला होता. त्या योजनेअंतर्गत रु.५०,०००/- चे विमा संरक्षण मयतास मिळाले होते. पॉलिसीमध्ये समावेश असलेल्या एक्सक्ल्युजन क्लॉजमध्ये विमा पॉलिसी फक्त अपघाती मृत्यू झाल्यासच संरक्षण देते. तक्रारदाराचे मयत पती भगवान नागो पाटील हे अपघाताने मयत पावले नसून त्यांचा विषबाधेमुळे मृत्यू झाला आहे. पॉलिसीअंतर्गत फक्त अपघाती मृत्यू चा समावेश असल्यामुळे विषबाधेमुळे झालेला मृत्यू त्यात समावेश होत नाही. त्यामुळे सदर क्लेम नाकारला आहे. कंपनीचा निर्णय हा कायदेशीर असून नियमा प्रमाणे आहे. सबब सामनेवालेंच्या सेवेत त्रुटी नसून सदरची तक्रार खर्चासह रद्द करण्याची विनंती केली आहे.
(५) सामनेवाले यांनी त्यांच्या कथनाच्या पुष्टयर्थ नि.नं.१६ वर पुराव्याचे शपथपत्र दाखल केले आहे.
(६) तक्रारदारांचा तक्रार अर्ज, शपथपत्र व पुराव्यासाठी दाखल कागदपत्रे पाहता तसेच सामनेवाले यांचा खुलासा व शपथपत्र पाहता तसेच दोन्ही पक्षांच्या विद्वान वकीलांनी केलेला युक्तिवाद ऐकल्यानंतर आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.
मुद्दे निष्कर्ष
- तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? : होय
- सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यात : होय
कमतरता केली आहे काय ?
- तक्रारदार सामनेवाले यांचेकडून अनुतोष मिळण्यास : होय
पात्र आहेत काय ?
- आदेश काय ? : अंतीम आदेशाप्रमाणे
विवेचन
(७) मुद्दा क्र. ‘‘१’’ – तक्रारदार यांचे मयत पती कै.भगवान नागो पाटील यांनी सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा यांच्याकडून पिक कर्ज घेतले होते. त्याबाबत मयताचा अपघाती विमा के.सी.सी. योजने अंतर्गत् सामनेवाले विमा कंपनीने उतरविलेला आहे हे सामनेवाले यांनी मान्य केले आहे. तसेच तक्रारदार या मयत विमेधारकाच्या कायदेशीर वारसदार पत्नी असल्याने त्या सामनेवाले यांच्या ग्राहक असल्याचे स्पष्ट होते. म्हणून मुद्दा क्र. ‘‘१’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(८) मुद्दा क्र. ‘‘२’’ : तक्रारदार यांच्या पतीचे दि.२६-११-२००९ रोजी शेतामध्ये कपाशीच्या पिकावर औषधाची फवारणी करीत असतांना, नाकातोंडात विषारी औषध गेल्याने विषबाधा होऊन निधन झाले आहे. याबाबत संबंधीत धुळे शहर पोलिसस्टेशनला आकस्मात मृत्यूची घटना नोंदविण्यात आली आहे. त्या बाबतची कागदपत्रे, खबर नि.नं.५/१, घटना स्थळाचा पंचनामा नि.नं.५/२, मरणोत्तर पंचनामा नि.नं. ५/३, पोलिस अहवाल नि.नं. ५/४, पोस्टमॉर्टेम अहवाल नि.नं. ५/५ वर दाखल आहे. या कागदपत्रांचा विचार करता तक्रारदारांचे पतीचा विषबाधेमुळे मृत्यू झाला आहे असे दिसते.
तक्रारदारांच्या पतीने सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा यांच्याकडून पिक कर्ज घेतले होते व सदर मयताचा अपघाती विमा उतरविला असल्याने त्याबाबतचे विमा क्लेमची रक्कम मिळणेकामी तक्रारदारांनी बॅंकेकडे दि.०१-०१-२०१० रोजी अर्ज दिलेला आहे. सदर अर्ज नि.नं. ५/७ वर दाखल आहे. सदर अर्ज पाहता यामध्ये असे नमूद आहे की, तक्रारदारांचे पतीचा दि.२५-११-२००९ रोजी अपघाती मृत्यू झाल्याकारणाने बॅंकेमार्फत शेतकरी विम्याची रक्कम मिळवून देण्याबाबत पुढील कार्यवाही करण्याकामी अर्ज दिलेला दिसत आहे. अर्जाप्रमाणे सदर बॅंकेने विमा कंपनीकडे पत्रव्यवहार केलेला आहे. परंतु विमा कंनीने सदरचा विमा क्लेम हा दि.१६-०२-२०१० रोजीच्या पत्रान्वये नाकारला आहे व तसे बॅंकेने तक्रारदारास दि.१७-०२-२०१० च्या पत्राने कळविले आहे, सदर पत्र नि.नं. ५/८ वर दाखल आहे. या पत्रावरुन असे दिसते की, न्यु इंडिया इन्शुरन्स कंपनी शाखा नंदूरबार यांचे क्र.एनबीओ/सिकेएस/ २०१०/केसीसी/६६२६६ दि.१६-०२-२०१० या पत्रान्वये विमेधारकाचा विषबाधेने मृत्यू झाल्यामुळे कंपनीच्या मतानुसार क्लेम देता येत नाही, असे तक्रारदार यांना कळविलेले आहे. या पत्राप्रमाणे असे स्पष्ट होते की, सदर विमा योजनेनुसार तक्रारदाराचे पतीचा विषबाधेमुळे मृत्यू झाल्यामुळे क्लेम देय नाही व तो सामनेवाले यांनी नाकारलेला आहे.
याबाबत सामनेवाले यांनी लेखी खुलाशामध्ये असा बचाव घेतला आहे की, मयताचा मृत्यू हा अपघाती नसून त्यांचा विषबाधेने मृत्यू झाला आहे व पॉलिसी अंतर्गत फक्त अपघाती मृत्यू चा समावेश असल्यामुळे सदर विषबाधेमुळे झालेला मृत्यू समाविष्ठ होत नाही, त्यामुळे क्लेम नाकारला आहे. असे सामनेवालेंचे म्हणणे आहे. परंतु याबाबत सामनेवाले यांनी त्यांची विमा पॉलिसीची प्रत व त्यातील अटी व शर्ती दाखल केलेल्या नाहीत. त्यामुळे याबाबतचा खुलासा होऊ शकत नाही. तसेच तक्रारदारांचे पतीचा आकस्मीक मृत्यू झालेला आहे. सदर मृत्यू नैसर्गिकरित्या झालेला नाही. मयताचे संबंधीत पोलिसस्टेशनला दिलेल्या कागदपत्राप्रमाणे व पि.एम. रिपोर्ट प्रमाणे मयताचा मृत्यू हा आकस्मीकरित्या झालेला आहे अशी नोंद केलेली आहे. यावरुन सदर मृत्यू हा नैसर्गिकरित्या झालेला नसून तो आकस्मीक अपघाती मृत्यू हा विषबाधेमुळे झालेला आहे हे स्पष्ट होते. सदरचा मृत्यू हा अपघाती मृत्यू आहे. सामनेवाले यांनी सदर कारणाने क्लेम नाकारला याबाबत तथ्य आढळून येत नाही. यात केवळ तांत्रीक बाबीचा आधार घेऊन क्लेम नाकारला आहे हे स्पष्ट होते. त्यामुळे सामनेवाले यांच्या सेवेत त्रृटी स्पष्ट होत आहे. म्हणून मुद्दा क्र. ‘‘२’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
- ९) मुद्दा क्र. ‘‘३’’ : सदर विमा दाव्याची रक्कम वेळेत न दिल्याकारणाने तक्रारदारांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला आहे, तसेच या तक्रार अर्जाचा खर्च करावा लागला आहे. त्यामुळे विम्याची रक्कम रु.५०,०००/-, मानसिक त्रासाकामी रु.३,०००/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.२,०००/- देण्यास सामनेवाले जबाबदार आहेत असे आमचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र. ‘‘३’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(१०) मुद्दा क्र. “४” : तक्रारदार व सामनेवाले यांचे अर्ज, प्रतिज्ञापत्र व दाखल केलेली सर्व कागदपत्रे, उभयपक्षांच्या विद्वान वकिलांचा युक्तिवाद तसेच वरील सर्व विवेचन यांचा विचार होऊन पुढील प्रमाणे आदेश करण्यात येत आहे.
आदेश
(अ) तक्रारदार यांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येत आहे.
(ब) सामनेवाले यांनी सदर आदेशाचे तारखेपासून पुढील तीस दिवसांचे आत.
- १) तक्रारदार यांना, त्यांच्या पतीच्या अपघाती विमा के.सी.सी. योजने अन्वये रक्कम ५०,०००/- (अक्षरी रक्कम रूपये पन्नास हजार मात्र) द्यावेत.
- २) तक्रारदार यांना, शारीरिक व मानसिक त्रासापोटी एकूण रक्कम ३,०००/- (अक्षरी रक्कम रूपये तीन हजार मात्र) व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम २,०००/- (अक्षरी रक्कम रूपये दोन हजार मात्र) द्यावेत.
(क) उपरोक्त आदेश कलम (ब) (१) मध्ये नमूद केलेली रक्कम सामनेवाले यांनी तीस दिवसांचे मुदतीत न दिल्यास, निकाल दिनांकापासून संपूर्ण रक्कम देईपर्यंतचे पुढील कालावधीसाठी द.सा.द.शे. ९ टक्के व्याजासह रक्कम देण्यास सामनेवाले जबाबदार राहतील.
धुळे.
दिनांक : ११-०९-२०१४