जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे
तक्रार क्रमांक – 178/2011 तक्रार दाखल तारीख 28/11/2011
चंद्रभान पि. दगडु घुगे
वय 62 वर्षे धंदा शेती व मजुरी .तक्रारदार
रा.बोरफडी ता.जि.बीड
विरुध्द
1. दि न्यु इंडिया एश्योरन्स कंपनी लि. सामनेवाला
मार्फत मा. शाखा व्यवस्थापक,.
दि न्यु इंडिया एश्योरन्स कंपनी लि.
विभागीय कार्यालय, सोलापूर,
नोटीस तामीलीचा पत्ता, मा.शाखा व्यवस्थापक,
दि न्यु इंडिया एश्योरन्स कंपनी लि.
आशीयाना बिल्डींग, सुभाष रोड, बीड
2. मा.कार्यकारी संचालक,
श्री.स्वामी समर्थ सहकारी साखर कारखाना म.
दहिटणे, ता.अक्कलकोट जि.सोलापुर
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.जी.एस.घुगे
सामनेवाला क्र.1 तर्फे ः- अँड.एस.एल.वाघमारे सामनेवाला क्र.2 तर्फे ः- अँड.एस.बी.इनामदार
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदार मौजे बोरफडी ता.बीड येथील रहीवासी आहे.शेती व मजूरी करुन घर चालवतो. तक्रारदाराची पत्नी सौ. गंगुबाई भ्र.चंद्रभान घुगे हिच्यासह सहकारी साखर कारखान्यावर ऊस तोडणीचे काम करत असे. तक्रारदार व त्यांचे कूटूंबीय बैलजोडीने ऊसतोडणीचे काम करतो व त्यांनी तोडलेल्या ऊसाची वाहतूक करण्याकरिता साखर कारखान्याकडून बैलगाडी (टायर) दिले जात असे. त्यात तक्रारदार व त्यांचे कूटूंबीय तोडलेल्या ऊसाची वाहतूक करत असत.
सालाबादा प्रमाणे सन 2007-08 या वर्षाचे गळीत हंगामासाठी देखील तक्रारदार व त्यांची पत्नी व कुटूंबातील इतर लोक सामनेवाला क्र.2 यांच्या साखर कारखान्याला ऊस तोडण्याकरिता गेले होते. यावर्षी तक्रारदार यांना देण्यात आलेल्या बैलगाडी/टायरचा क्रमांक 515 असा होता. सन 2007-08 सालचये गळीत हंगामात ऊस तोडणीचे काम तक्रारदार, त्यांची पत्नी व त्यांचे गांवचे इतर लोक करत होते.
दि.09.02.2008 रोजी मौजे रामपूर ता. अक्कलकोट या गावातील शिवारातून ऊसतोडणीचे काम सुरु होते. त्यादिवशी देखील तक्रारदाराचे बैलगाडी/टायर सह इतरही सहा बैलगाउया ऊस तोडणीचे व तोडलेल्या ऊसाची वाहतुकीचे काम करत होत्या. ऊस तोडणीचे काम करुन तक्रारदार व इतर लोकांच्या बैलगाडया सकाळी 11.00 वाजता सामनेवाला क्र.2 चे साखर कारखान्याला निघाले असता त्यावेळी तक्रारदाराची बैलगाउी सर्वाचे मागे होती.
तक्रारदार व इतर लोकांच्या बैलगाडया या अक्कलकोट शहरातून कारखाना रोडने जात असताना, हन्नूर नाक्याजवळ रस्ता हा उताराचा असल्यामुळे बैलगाडया जोरात धावतात व बैलगाडी जोरात धावल्यामुळे बैलगाडी रोडचे खाली उतरते. त्यामुळे बैलगाडीचे समोर एक व्यक्तीला जू धरुन चालावे लागते. त्यामुळे त्यावेळी तक्रारदाराची पत्नी सौ. गंगुबाई ही बैलगाडीचे समोर, बैलगाडीचे जु धरुन चालत होती. रस्ता उताराचा असल्याकारणामुळे बैलगाडी अचानक जोरात पळू लागली व बैलगाडी चालकाला बैलगाडी आवरणे शक्य झाले नाही व बैलगाडी अचानक रस्ता सोडून रोडच्या कडेला लाईटच्या पोलवर आदळली. तक्रारदाराची पत्नी जू आणि विद्युत पोल या दोन्हीच्या मध्ये सापडून गंभीर जखमी झाली. सदर अपघातात गंगुबाई हिचे तोंडास व डोक्यास जबर मार लागला व अति रक्तस्त्राव होऊन लागीच मयत झाली. तिला तात्काळ ग्रामीण रुग्णालय अक्कलकोट येथे इलाजासाठी शरीक करण्यात आले.परंतु संबंधीत वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून तिला मयत झाल्याचे घोषित केले.
तक्रारदार यांनी पोलिसात दिलेल्या जवाबावरुन अक्कलकोट पोलिस स्टेशनला गुन्हा नंबर 24/08 दि.09.02.2008 रोजी नोंद केला. गून्हयाचा तपास संबंधीत पोलिस अधिका-याने तक्रारदार व त्यांचे इतर सह कामगांराचे जवाब नोंदवले, घटनास्थळाचा पंचनामा, मयताचा पंचनामा, पोस्ट मार्टेम अहवाल, संबंधीत सर्व कागदपत्राच्या प्रमाणित प्रति तक्रारदाराने तक्रारीत दाखल केल्या आहेत.
सामनेवाला क्र.2 यांनी सन 2007-08 या साला करिता ऊस तोडणीचे काम करणा-या ऊस तोड मजुरांचे सुरक्षेच्या हमी करिता सामनेवाला क्र.1 यांचेकडे विमा काढलेला होता. सदर विमा पॉलिसीचा नंबर 151300/42/06/05/00000404 दि.02.03.2007 असा असून सदर विमा पॉलिसीचा कालावधी दि.02.03.2007 ते 01.03.2008 पर्यत होता. सदर कालावधीत अपघात समाविष्ट आहे.
अपघातानंतर तक्रारदारांनी अनेकदा विम्याच्या रक्कमेची मागणी केली परंतु तक्रारदारांना काही तरी कारण सांगून विमा रक्कम देण्यास सामनेवाला यांनी टाळाटाळ केली. तक्रारदारांना दयावयाचे सेवेत कसूर केला म्हणून तक्रारदारांनी त्यांचे वकिलामार्फत दि.26.08.2009 रोजी रजिस्ट्रर पोस्टाने पाठवून नूकसान भरपाई रक्कमेची मागणी केली. सदर नोटीस दि.31.08.2009 रोजी मिळाली परंतु सामनेवाला यांनी नोटीसप्रमाणे कारवाई केली नाही. नुकसान भरपाई दिली नाही म्हणून ग्राहक तक्रार अर्ज क्रमांक 179/2009 चा तक्रारदारांनल सामनेवाले विरुध्द दाखल केला होता. त्यांचा निकाल दि.05.03.2010 रोजी झालेला आहे. सदर निकालानुसार सामनेवाला क्र.2 यांनी सामनेवाला क्र.1 कडे दावा अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह आदेश प्राप्तीपासून एक महिन्याचे आंत दाखल करावा. सदरचा दावा सामनेवाला क्र.1 यांनी दाखल झाल्यापासून एक महिन्याचे आंत विलंब व तांत्रिक मूददा वगळून गुणवत्तेवर निकाली करावा असे आदेश सामनेवाला क्र.1 यांना देण्यात आलेले आहे.
त्यानुसार सामनेवाला क्र.2 यांनी दि.4.4.2010 रोजी पर्यत प्रस्ताव अर्ज सामनेवाला क्र.1 कडे दाखल करणे आवश्यक होते परंतु सामनेवाला यांनी सदरचा प्रस्ताव दि.28.11.2011 रोजी पर्यत दाखल केलेला नाही. सामनेवाला क्र.2 यांनी आदेशाचे पालन केले नाही म्हणून त्यांचे विरुध्द ग्राहक संरक्षण कायदा कलम 27 प्रमाणे अर्ज दाखल केला होता. त्यानुसार सामनेवाला क्र.2 यांनी सामनेवाला क्र.1 कडे दि.04.01.2011 रोजी प्रस्ताव अर्ज दाखल केला. सामनेवाला क्र.1 यांनी त्यावर कोणतीही कारवाई केली नाही. नूकसान भरपाई देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे तक्रारदारांना मनस्ताप झाला. त्यामुळे तक्रारदार रक्कम रु.25,000/- शारीरिक व मानसिक त्रासाचे मिळण्यास पात्र आहे. तसेच तक्रारदारीच्या खर्चापोटी रु.10,000/- देण्या बाबत सामनेवाला यांना आदेश होणे न्यायाचे दृष्टीने उचित होईल.
विनंती की, सामनेवाला क्र.1 यांनी विमा रक्कम रु.1,00,000/- तक्रारदारांना देण्या बाबत आदेश व्हावेत, मानसिक शारीरिक त्रास बाबत सामनेवाला यांनी रक्कम रु.25,000/- व खर्चापोटी रु.10,000/- देण्या बाबत आदेश व्हावेत. सदर रक्कमेवर दि.15.02.2008 पासून रक्कम प्रत्यक्ष मिळेपर्यत द.सा.द.शे.15 टक्के व्याज देण्याबाबत आदेश व्हावेत.
सामनेवाला क्र.1 यांनी दि.04.04.2012 रोजी त्यांचा खुलासा दाखल केला. तक्रारीतील सर्व आक्षेप त्यांनी नाकारलेले आहेत. तक्रारीतील विधानावरुन स्पष्ट होते की, तक्रारदार आणि त्यांचे पत्नी यांची चूक आहे. त्यांचे चूकीच्या बाबत त्यांना नूकसान भरपाई मिळू शकत नाही. सदरचा अपघात हा अपघात नसून ती एक दैवि कृती (Act of God) आहे. किंवा मयताची चूक आहे. ही बाब कधीही विमा पत्रा अंतर्गत नव्हती व नाही. त्यामुळे नूकसान भरपाई देण्याचा प्रश्नच येत नाही.
तक्रार क्रमांक 179/2009 चा दि.05.03.20910 रोजी निकाल होऊन विमा प्रस्ताव शक्य तितक्या लवकर दाखल करण्या बाबत आदेश झालेले आहे. या बाबत तक्रारदाराचा प्रस्ताव हा त्यातील घटना आणि परिस्थिती पाहता तो सामनेवाले यांचे लिगल अँथोरिटी कडे पाठविला आहे. तो प्रलंबित आहे तो नामंजूरही नाही. त्यामुळे सदरची तक्रार अपरिपक्व आहे. तक्रारीस कोणतेही कारण नाही. ती रदद होण्यास पात्र आहे. सामनेवाले यांचे सेवेत कसूर नाही. विनंती की, तक्रार खर्चासह रदद करण्यात यावी.
सामनेवाला क्र.2 यांनी त्यांचा खुलासा दि.08.02.2012 रोजी दाखल केला. खुलाशात तक्रारीतील सर्व आक्षेप त्यांनी नाकारलेले आहेत. तक्रारदार हा सामनेवाला यांचा ग्राहक नव्हता व नाही. सबब ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदीप्रमाणे तक्रार चालविण्याचा व निर्णय घेण्याचा अधिकार मंचास प्राप्त होत नाही. अधिकारा बाबत प्राथमिक मुददा उपस्थित होत असल्याने सदरचा अर्ज रदद करण्यात यावा. तसेच सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदयातील कलम 24 (अ) प्रमाणे मूदतबाहय आहे. तक्रारदारांना दोन मूले असून दोन्ही मूलाना तक्रारीत पक्षकार केलेले नाही. त्यामुळे नॉन जॉइंडर ऑफ नेससरी पार्टीच्या कारणाने तक्रार रदद करण्यात यावी.
प्रकरणात अत्यंत क्लीष्ट मूददा समाविष्ट असल्याने त्यावर उलट तपासणी होणे जरुरीचे आहे त्यामुळे सदर तक्रार दिवाणी न्यायालयात दाखल होणे जरुरीचे आहे.
तक्रारदार व त्यांची पत्नी सामनेवाला क्र.2 कारखान्याचे कामगार नव्हते व नाही. त्यामुळे तक्रारदारांना कोणत्याही प्रकारची नूकसान भरपाई देण्याचा प्रश्न उदभवत नाही. तक्रारदाराने मे.कोर्टाची दिशाभूल करुन खरी हकीकत लपवून एकतर्फा निकाल तक्रार नंबर 179/2009 मध्ये घेतलेला आहे. सामनेवाला क्र.2 यांनी सन 2007-08 मध्ये सालातील गळीत हंगामाकरिता आवश्यक असणा-या ऊस तोंडणी वाहन कामगार ठेकेदाराकडून करार केला होता. सदर वर्षासाठी कारखान्यावर आवश्यक असणा-या सुमारे 1100 मजूराचा विमा सामनेवाला क्र.1 कडून उतरविला होता. तक्रारदाराची पत्नी अपघाताने मयत झाल्यानंतर तक्रारदारांनी बीड येथील कामगार आयूक्त बीड यांचेकडे डब्ल्यू अँन्ड सी नंबर 23/08 चा दाखल केला होता. सदर अर्जाचा निकाल दि.09.04.2009 रोजी होऊन तक्रारदाराचा दावा नामंजूर झालेला आहे. त्यावर मा.उच्च न्यायालय, खंडपिठ औरंगाबाद येथे तक्रार नंबर 1242/2009 चे अपिल दाखल केले. त्यांचे कामकाज प्रलबित आहे. सदरु अर्जास रेस ज्यूडिकेटाची बांधा येत आहे. यात सामनेवाला यांनी कोणताही कसूर केलेला नाही.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचे शपथपत्र, सामनेवाला क्र.1 व 2 यांचा खुलासा, यांचे सखोल वाचन केले.
तक्रारदाराचे विद्वान वकील श्री.घुगे व सामनेवाले क्र.1 यांचे विद्वान वकील श्री.वाघमारे व सामनेवाला क्र.2 यांचे विद्वान वकील श्री.इनामदार यांचा यूक्तीवाद ऐकला.
तक्रारीतील सर्व कागदपत्रे पाहता तक्रारदारांनी या जिल्हा मंचात तक्रार क्र.179/2009 दाखल केली होती. त्यांचा निकाल दि.05.03.2010 रोजी झालेला असून सदर निकालाप्रमाणे सामनेवाला क्र.2 यांनी सामनेवाला क्र.1 कडे प्रस्ताव अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह पाठविला आहे.
सदरचा प्रस्ताव सामनेवाला क्र.1 यांनी विलंबाचे कारणाने नाकारल्याचे संबंधीत वकिलाचे यूक्तीवादात सांगितले परंतु या संदर्भात सामनेवाला क्र.1 चे खुलाशात त्या बाबतचा कूठलाही उल्लेख नाही. तसेच खुलासा पाहता प्रस्ताव अर्ज कागदपत्रासह मिळाल्याचे सामनेवाला क्र.1 चे म्हणणे आहे. सदरचा अर्ज हा लिगल अँथोरिटी कडे कार्यवाहीसाठी पाठविला आहे. तो नाकारला नाही. त्यामुळे तक्रार अपरिपक्व आहे असा बचाव सामनेवाला क्र.1 यांनी घेतला आहे. त्यामुळे सामनेवाला क्र.1 यांचेकडे प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रासह आल्याची बाब स्पष्ट होते त्यात कोणत्या कागदपत्राची अपूर्णतः नसल्याचे दिसत नाही. कारण त्या बाबतची तपासणी होऊन सदरचा अर्ज लिगल अँथोरिटीकडे पाठविण्यात आलेला आहे व त्या संदर्भात अपूर्णतेचया बाबत लिगल अँथोरिटीचे कोणतेही मत नाही किंवा मागणी नाही. त्यामुळे सामनेवाला क्र.2 यांनी सामनेवाला क्र.1 कडे पाठविलेला प्रस्ताव हा परिपूर्ण आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यामुळे तक्रारतील घटना पाहता सदरची घटना ही अपघात या सदरात येते. ती तक्रारदाराची किंवा मयताच चूक आहे असे म्हणणे योग्य ठरणार नाही. कारण उतारावर बैलगाडीचा वेग वाढल्याने बैलगाडी विजेच्या खांबावर आदळलेली आहे. यात बैलगाडीचे जु धरुन तक्रारदाराची पत्नी पूढे चालत असताना बैलगाडी जोरात आल्याने त्यात बैलगाडी व विजेचा खांबामध्ये सापडून त्या जखमी झाल्या व त्यांतच त्यांचा मृत्यू झालेला आहे. सदरची घटना ही निव्वळ अपघात या सदरात येते. त्यामुळे सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारांना पत्नीच्या अपघाती मृत्यूची रककम रु.1,00,000/- देणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सामनेवाला क्र.2 यांनी जिल्हा मंचाचे आदेशानुसार सदरचा दावा हा सामनेवाला क्र.1 कडे एक महिन्याचे कालावधीत पाठविला नाही. जिल्हा मंचाचा आदेश दि.05.03.2010 रोजीचा आहे परंतु सदरचा दावा त्यांनी सामनेवाला क्र.1 कडे नोव्हेंबर 2011 चे दरम्यान पाठविला आहे. या बाबत सामनेवाला क्र.2 यांनी त्यांचा खुलासा पहाता आहे. त्यांनी सन 2007-08 मध्ये सालातील गळीत हंगामाकरिता आवश्यक असणा-या ऊस तोंडणी वाहन कामगार ठेकेदाराकडून करार केला होता. सदर वर्षासाठी कारखान्यावर आवश्यक असणा-या सुमारे 1100 मजूराचा विमा सामनेवाला क्र.1 कडून उतरविला होता.त्यात मयताचे नांव नाही अशी हरकत नाही. तक्रारदाराची पत्नी अपघाताने मयत झाल्यानंतर तक्रारदारांनी बीड येथील कामगार आयूक्त बीड यांचेकडे डब्ल्यू अँन्ड सी नंबर 23/08 चा दाखल केला होता. सदर अर्जाचा निकाल दि.09.04.2009 रोजी होऊन तक्रारदाराचा दावा नामंजूर झालेला आहे. त्यावर मा.उच्च न्यायालय, खंडपिठ औरंगाबाद येथे तक्रार नंबर 1242/2009 चे अपिल दाखल केले. त्यांचे कामकाज प्रलबित आहे. सदरु अर्जास रेस ज्यूडिकेटाची बांधा येत आहे. यात सामनेवाला यांनी कोणताही कसूर केलेला नाही.
सदर कार्यवाहीची कागदपत्र सामनेवाला क्र.2 यांनी दाखल केलेली आहे. त्यात विम्याचे संदर्भात कूठलाही संदर्भ नाही. सदरची कार्यवाही ही वेगळया विषयावर आहे. तसेच त्या कार्यवाहीत विमा हा नसल्याने रेस ज्युडीकेटाचा प्रश्न उदभवत नाही. ग्राहक कायदयात रेस ज्युडीकेटा हे तत्व स्विकारलेले नाही.
तक्रार क्रमांक 179/2008 चे निकाला विरुध्द सामनेवाला क्र.2 यांनी कोणतेही अपिल केलेले नाही व त्याप्रमाणे कार्यवाही करणे त्यांचेवर बंधनकारक असताना सामनेवाला क्र.2 यांनी मूदतीत कारवाई न केल्यामूळे तक्रारदारांना दयावयाचे सेवेत कसूर केल्याची बाब स्पष्ट होते असे न्यायमंचाचे मत आहे. त्यामुळे सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासाची रक्कम रु.5,000/- व तक्रारीचा खर्च रु.5,000/- देणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाला क्र.1 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना
पत्नीच्या अपघाती मृत्यूच्या विम्याची रक्कम रु.1,00,000/-
(अक्षरी एक लाख फक्त) आदेश मिळाल्यापासून एक महिन्याचे
आंत अदा करावी.
3. सामनेवाला क्र.1 यांना आदेश देण्यात येतो की,वरील रक्कम मूदतीत
न दिल्यास वरील रक्कमेवर द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज तक्रार
दाखल दि.07.08.2011 पासून देण्यास जबाबदार राहतील.
4. सामनेवाला क्र.2 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना
मानसिक त्रासाची रक्कम रु.5,000/- (अक्षरी रुपये पाच हजार
फक्त) व तक्रारीच्या खर्चाची रककम रु.5,000/-(अक्षरी रु.पाच
हजार फक्त) आदेश प्राप्तीपासून 30 दिवसांचे आंत अदा करावी.
5. सामनेवाला क्र.2 यांना आदेश देण्यात येतो की, वरील रक्कम
मुदतीत न दिलस वरील रक्कमेवर द.सा.द.शे.9 टक्के दराने व्याज
तक्रार दाखल दि.07.08.2011 पासुन देण्यास जबाबदार राहतील.
6. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम-20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड