निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 24/11/2010 तक्रार नोदणी दिनांकः- 02/12/2010 तक्रार निकाल दिनांकः- 26/04/2011 कालावधी 04 महिने 25 दिवस. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. धोंडीबा पिता हरी मुदगले. अर्जदार वय 33 वर्षे.धंदा शेती व्यापार. अड.टी.के.पंडीत. रा.दगडगांव ता.लोहा जि.नांदेड. ह.मु.शिवाजीनगर.परभणी. विरुध्द 1 न्यु इंडिया अशुरन्स कंपनी लि. गैरअर्जदार. मार्फत शाखा व्यवस्थापक. अड.जी.एच.दोडीया. लाहोजी कॉम्प्लेक्स,वजिराबाद,नांदेड ता.जि.नांदेड. 2 दि न्यु इंडिया अश्युरन्स कंपनी लि. मार्फत शाखा व्यवस्थापक. यशोदीप बिल्डींग.शिवाजी रोड. परभणी. ------------------------------------------------------------------------------------- कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा श्री.सी.बी.पांढरपट्टे.अध्यक्ष. ) अर्जदाराच्या इन्शुअर्ड जीपची अपघातात झालेली नुकसान भरपाई गैरअर्जदार विमा कंपनीने देण्याचे नाकारले म्हणून प्रस्तुतची तक्रार आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदाराच्या मालकीची जीप रजि. नं.एम.एच. 26 डी. 9358 चा गैरअर्जदार क्रमांक 2 कडून विमा उतरविलेला होता. त्याची मुदत 11/10/2006 ते 10/10/2007 अखेर होती. तारीख 07/04/2007 रोजी परभणी ते हिंगोली रोड वर बाराशिव जवळ जीपला अपघात झाला व गाडीचे सुमारे रु.80,000/- चे नुकसान झाले.अपघात घटने विषयी अर्जदाराने गैरअर्जदारांना लगेच कळवले होते.त्यानुसार सर्व्हेअरने घटनास्थळी भेट देवुन सर्व्हे केला.त्यानंतर अर्जदाराने आवश्यक त्या कागदपत्रासह व खर्चाच्या कोटेशनसह गैरअर्जदाराकडे नुकसान भरपाई मिळणेसाठी क्लेम दाखल केला.परंतु गैरअर्जदारानी नुकसान भरपाई दिली नाही.म्हणून 11/10/2010 रोजी नोटीस पाठवली होती. त्यानंतर तारीख 11/03/2008 चे गैरअर्जदारांनी पत्र पाठवुन त्यानी मागणी केलेल्या कागदपत्राची पुर्तता केली नाही म्हणून फाईल बंद केली असल्याचे कळवले. म्हणून कायदेशिर दाद मिळणेसाठी अर्जदाराने ग्राहक मंचात प्रस्तुतचा तक्रार अर्ज दाखल करुन जीपची नुकसान भरपाई रु.80,000/- 18 टक्के व्याजासह मिळावी याखेरीज मानसिकत्रासाठी पोटी रु.5000 व अर्जाचा खर्च रु 5000 मिळावा अशी मागणी केली आहे. तक्रार अर्जातील पुष्टयर्थ अर्जदाराचे शपथपत्र (नि.2) आणि पुराव्यातील कागदपत्रात नि.5 लगत एकुण 10 कागदपत्रे दाखल केली आहेत. तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करणेसाठी गैरअर्जदारास मंचातर्फे नोटीस पाठविल्यावर त्यानी तारीख 09/02/2011 रोजी एकत्रितरित्या आपले लेखी म्हणणे ( नि.12) दाखल केला आहे. तक्रार अर्जामधील पॉलिसी संबंधीचा मजकूर वगळता बाकीची सर्व विधाने त्यानी साफ नाकारली आहेत.त्यांचे म्हणणे असे की,अर्जदाराने क्लेम सोबत पाठवलेली कागदपत्रे अपुर्ण होती त्यामध्ये आर.सी.बुक,ड्रायव्हींग लायसेन्स,फिटनेस सर्टीफिकेट,परमिट, पोलिस पेपर्स, इस्टीमेट व जीप दुरुस्ती केल्याची बिले ही कागदपत्रे पाठविली नसल्यामुळे कंपनीला फाईनल सर्व्हे करुन घेता आला नाही.आणि ती कागदपत्रे दिल्याखेरीज नुकसान भरपाईचे मुल्यांकन करता येणे शक्य नव्हते. अर्जदाराने अद्यापी ही कागदपत्रे दिलेली नाहीत.त्यामुळे गैरअर्जदारा विरुध्द केलेली प्रस्तुतची तक्रार फेटाळण्यात यावी.तक्रार अर्जास मुदतीचीही बाधा येत असल्याचा आक्षेप लेखी निवेदनात घेतलेला आहे वरील सर्व बाबी विचारात घेवुन तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा.अशी शेवटी विनंती केली आहे. गैरअर्जदाराने लेखी निवेदना सोबत शपथपत्र (नि.13) व पुराव्यातील कागदपत्रात नि.15 लगत एकुण 7 कागदपत्रांच्या छायाप्रती दाखल केल्या आहेत. प्रकरणाच्या अंतिम सुनावणीच्या वेळी अर्जदारा तर्फे अड.गिरी आणि गैरअर्जदारा तर्फे अड. दोडीया यांनी युक्तिवाद केला. निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे. मुद्दे. उत्तर. 1 गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्या मालकीची जीप क्रमांक एम एच 26 डि 9358 ची अपघातात झालेली नुकसान भरपाई देण्याचे बेकायदेशिररित्या नाकारुन सेवात्रुटी केली आहे काय ? नाही. 2 निर्णय ? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे. मुद्दा क्रमांक 1 अर्जदाराच्या मालकीची जीप रजि.क्रमांक एम.एच. 26 डी. 9358 चा गैरअर्जदाराकडून विमा उतरविलेला होता.त्याची मुदत 11/10/2006 ते 10/10/2007 अखेर होती ही अडमिटेड फॅक्ट आहे.अर्जदाराने या गोष्टी शाबीत करण्यासाठी पुराव्यात नि.5/3 ला आर.सी.बुकची छायाप्रत आणि नि.5/4 ला विमा पॉलिसीची छायाप्रत दाखल केली आहे.सदरचा विमा गैरअर्जदारांनी रु.1,50,000 च्या नुकसान भरपाई हमीसाठी दिलेला असल्याचे पॉलिसीचे अवलोकन करता दिसून येते.तारीख 07/04/2007 रोजी जीपला परभणी हिंगोली रोडवर हट्टा पोलिस स्टेशनच्या हद्दीत अपघात झाला होता.व वाहनाचे बरेच नुकसान झाले होते.ही गोष्ट शाबीत करण्यासाठी अर्जदाराने पुराव्यात हट्टा पोलिस स्टेशन गु.र.नं.37/07 मधील एफ.आय.आर.(नि.5/1), घटनास्थळ पंचनामा,(नि.5/2) दाखल केला आहे.त्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता भरधाव येणा-या मोटार सायकल स्वाराला वाचविण्याकरीता जीप बाजुने नेत असतांना ड्रायव्हरने स्टेअरींग सोडून बाहेर उडी मारली व जीप रोडच्याखाली जावुन पलटी होवुन अपघात झाला होता. अशी वस्तुस्थिती नमुद केली आहे. अर्जदाराने तक्रार अर्जात असे म्हंटले आहे की, अपघाताची घटना घडल्यानंतर त्याने गैरअर्जदारांना घटनेची माहिती दिल्यावर कंपनीच्या सर्व्हेअरने घटनास्थळी भेट देवुन नुकसानीचा सर्व्हे केला होता.परंतु अर्जदार अथवा गैरअर्जदार तर्फे संबंधीत सर्व्हे रिपोर्ट प्रकरणात दाखल केलेला नाही प्रकरण प्रलंबीत असतांना अर्जदाराच्या मागणी वरुन विमा कंपनीकडील अर्जदाराच्या जीपची क्लेम फाईल प्रकरणात मागवण्यासंबंधी अर्जदाराने विनंती केल्यानंतर तो अर्ज मंजूर केला त्यानंतर गैरअर्जदारांतर्फे संबंधीत क्लेम फाईल प्रकरणात दाखल करण्यात आलेली आहे.त्यामध्ये पान क्रमांक 18 वर स्पॉट सर्व्हे रिपोर्ट आहे.रिपोर्टच्या शेवटी अपघातात नुकसानी झालेल्या स्पेअर पार्टस् चा तपशिल आहे. मात्र अंदाजे नुकसानीची किंमत दिलेली नाही क्लेम फाईल मध्ये अपघातातील जीपचे 11 फोटोही आहेत. फोटोचे त्यांचे अवलोकन केले असता सदरची जीप काळी पिवळी प्रवाशी वाहतुकीची जीप असल्याचे लक्षात येते.स्पॉट सर्व्हे झाल्यानंतर अर्जदाराने जीप दुरुस्तीची बिले व इतर आवश्यकती सर्व कागदपत्रे क्लेमफॉर्मसह गैरअर्जदाराकडे पाठविलेली होती मात्र त्याने नुकसान भरपाई मंजुरी संबंधी अर्जदारास काहीही कळविलेले नाही. असे तक्रार अर्जात नमुद केलेले आहे.याउलट गैरअर्जदारानी आपल्या लेखी निवेदनात क्लेमफॉर्म सोबत इस्टीमेट, आर.सी.बुक, ड्रायव्हींग लायसेंन्स, फिटनेस सर्टिफिकेट,परमिट, पोलिस रिपोर्ट, जीप दुरुस्तीची बिले ही आवश्यक कागदपत्रे पाठवलेली नव्हती व त्याची मागणी करुनही अर्जदाराने दिलेली नसल्याने नाईलाजाने गैरअर्जदारास मंजुरीविना क्लेम फाईल बंद करावी लागली आहे असे म्हंटलेले आहे अर्जदाराकडे कागदपत्रांची मागणी केलेली होती.त्या 11/03/2008 च्या पत्राची ऑफिस प्रत क्लेम फाईल मध्ये पान क्रमांक 3 वर आहे.त्या पत्रातील मागणी प्रमाणे अर्जदाराने संबंधीत कागदपत्रांची पुर्तता गैरअर्जदाराकडे केलेली होती असा कोणताही सबळ पुरावा प्रकरणात दाखल केलेला नाही.त्यातील काही कागदपत्रांच्या छायाप्रती प्रकरणात नि.5 लगत दाखल केलेल्या असल्यातरी ती कागदपत्रे गैरअर्जदारांना दिलेली होती हे पुराव्यातून शाबीत झालेले नाही. अर्जदाराने वकिला मार्फत तारीख 11/10/2010 रोजी गैरअर्जदारांना रजि.नोटीसा पाठविलेल्या होत्या त्याची स्थळप्रत पुराव्यात नि.5/6 ला दाखल केलेली आहे. सदर नोटीसीला गैरअर्जदारातर्फे तारीख 04/11/2010 रोजी उत्तर पाठवलेले होते त्या नोटीस उत्तराची स्थळप्रत गैरर्जदारांच्या क्लेम फाईलमध्ये पान क्रमांक 8 वर आहे त्यामध्येही क्लेम मंजूर करण्याच्या बाबतीत अत्यावश्यक असणा-या वर नमुद केलेल्या कागदपत्रांचा उल्लेख केलेला आहे.म्हणजेच माहे ऑक्टोबर 2010 पर्यंत अर्जदाराकडून त्या कागदपत्रांची पुर्तता झालेली नव्हती असाच निष्कर्ष निघतो.असे असतांनाही अर्जदाराने गैरअर्जदारावरच ठपका ठेवुन त्यांनी बेकायदेशिररित्या क्लेम नाकारल्याचा केलेला आरोप चुकीचा व खोटा आहे असे मंचाचे मत आहे.कारण मुळातच अर्जदाराकडून जीप दुरुस्तीची बिले दिल्याखेरीज गैरअर्जदारास नुकसान भरपाईचे मुल्यांकन करताच येणार नाही. त्यामुळे याबाबतीत गैरअर्जदाराकडून सेवात्रुटी होण्याचा प्रश्नच उदभवत नाही अपघाता नंतर अर्जदाराने गॅरेज मध्ये जीप दुरुस्तीसाठी नेवुन दुरुस्तीचे इस्टीमेट घेतलेले होते.आणि त्यानंतर जीप दुरुस्त करुन घेतली होती हे शाबीत करण्यासाठी इस्टीमेट ( कोटेशन ) आणि जीप दुरुस्तीची बिले यापैकी एकही पुरावा प्रकरणात दाखल केलेला नाही.एवढेच नव्हेतर गैरअर्जदारांच्या मुळ क्लेम फाईल मध्ये ही ती कागदपत्रे दिसत नसल्यामुळे अर्जदाराकडून त्याची पुर्तता झालेलीच नव्हती याबद्दल कोणतीही शंका उरत नाही. वरील सर्व बाबी विचारात घेता गैरअर्जदारा विरुध्द प्रस्तुत प्रकरणा व्दारे अर्जदाराने जी दाद मागितलेली आहे तो अर्जच प्रिमॅच्युअर असल्याचे मंचाचे मत आहे.गैरअर्जदाराकडून सेवात्रुटी झाल्याचे अर्जदाराकडून शाबीत झालेले नसल्यामुळे मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर नकारार्थी देवुन आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोंत. आदेश 1 अर्जदाराचा तक्रार अर्ज फेटाळण्यात येत आहे. 2 तक्रारीचा खर्च संबंधीतांनी आपआपला सोसावा. 4 संबंधीतांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. श्रीमती अनिता ओस्तवाल. सौ.सुजाता जोशी. श्री.सी.बी.पांढरपट्टे. सदस्या. सदस्या. अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. JUSTICE C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |