निकालपत्र
(दि. 19.08.2015)
(घोषीत द्वारा- मा. श्री. आर.एच.बिलोलीकर, सदस्य)
1. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेविरुध्द सेवेत त्रुटीच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे.
अर्जदार यांचे तक्रारीतील कथन थोडक्यात खालील प्रमाणेः-
2. अर्जदार संतोषी भ्र. केशव मोरे ही पानशेवडी,तालुका कंधार,जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून ती मयत शेतकरी केशव मोरे यांची पत्नी आहे. दिनांक 20.03.2012 रोजी अर्जदाराचे पती केशव मोरे हा पानशेवडी येथून कंधारकडे मोटारसायकलने जात असतांना कैन्यातांडा गावासमोर रोडवर आले असता पाठीमागुन जीप क्रमांक एमएच 24/जे 4760 च्या चालकाने निष्काळजीपणे जीप चालवून मोटारसायकलला धडक दिल्याने केशव मोरे यास गंभीर जखमी केले. त्यानंतर दिनांक 31.03.2012 रोजी यशोदा हॉस्पीटल,नांदेड येथे उपचारादरम्यान केशव मोरे यांचा मृत्यु झाला. पोलीस स्टेशन कंधार यांनी गुन्हा क्रमांक 20/22012 कलम 279,337,304(अ) भा.द.वि.प्रमाणे नोंदवून घटनास्थळ पंचनामा केला. अर्जदाराचे पती हे व्यवसायाने शेतकरी होते, त्याचे नावाने पानशेवडी,तालुका कंधार,जिल्हा नांदेड येथे गट क्रमांक 506 मध्ये 2 हेक्टर 93 आर एवढी शेतजमीन होती. शेतकरी या नात्याने तो महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी वैयक्तीक अपघात योजनेचा लाभार्थी होता, ज्याची पॉलिसी गैरअर्जदार यांचेकडे महाराष्ट्र शासनाने घेतली होती. महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी वैयक्तीक अपघात योजनेंतर्गत अर्जदार यांनी त्यांचे पतीचे मृत्यु पश्चात तालुका कृषी अधिकारी कंधार यांचेकडे आवश्यक त्या कागदपत्रांसह विमा प्रस्ताव दाखल केला. गैरअर्जदार यांनी दिनांक 04.03.2013 रोजी अर्जदारास पत्र देऊन ड्रायव्हींग लायसन्सचे आरटीओ एक्सट्रॅक्ट दाखल केलेले नाही त्यामुळे सदरील प्रकरण बंद केल्याचे कळविले. अर्जदाराचे म्हणणे आहे की, जीप चालकाच्या चुकीमुळे सदर अपघात घडलेला आहे. तसेच अर्जदाराचे पतीचा वाहन चालविणेचा परवाना होता. परंतु तो अपघाताच्या वेळी गहाळ झाला. म्हणून गैरअर्जदार यांनी नुकसान भरपाई देण्यास नाकारलेले कारण बेकायदेशीर आहे. म्हणून अर्जदार यांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारीमध्ये अर्जदार यांनी विम्याची रक्कम रु.1,00,000/- द.सा.द.शे. 12 टक्के व्याजासह गैरअर्जदार यांचेकडून अर्जदारास देण्याचा आदेश करावा. तसेच मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- व दावा खर्च रु.5,000/- इत्यादी रक्कमेची मागणी गैरअर्जदार यांचेकडून तक्रारीव्दारे केलेली आहे.
3. गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांना नोटीस तामील झाल्यानंतर तक्रारीत हजर झाले. गैरअर्जदार 2 यांनी तसेच गैरअर्जदार क्र. 3 यांनी स्वतंत्रपणे आपले लेखी जबाब व शपथपत्र दाखल केलेले आहे.
गैरअर्जदार क्र. 1 यांचा लेखी जबाब थोडक्यात पुढील प्रमाणेः-
4. गैरअर्जदार क्र. 1 यांना सदर दावा मिळाल्यानंतर त्यांनी तो गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविला. त्यामुळे त्यांना या प्रकरणात जबाबदार धरण्यात येऊ नये.
गैरअर्जदार क्र. 2 यांचा लेखी जबाब थोडक्यात पुढील प्रमाणेः-
5. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी,नांदेड यांचेकडून त्यांना दाव्याची कागदपत्रे मिळाल्यानंतर गैरअर्जदार क्र. 2 यांनी सदर दावा गैरअर्जदार क्र. 3 व 4 यांचेकडे कागदपत्रांसह पाठविला. दिनांक 04.03.2013 रोजी गैरअर्जदार विमा कंपनीने मागणी केलेल्या अपूर्ण कागदपत्रांची पुर्तता दावेदाराने केलेली नाही म्हणून सदर दावा बंद केलेला आहे. त्यामुळे गैरअर्जदार क्र. 2 यांना सदर प्रकरणात जबाबदार धरण्यात येऊ नये अशी विनंती गैरअर्जदार क्र. 2 यांनी केलेली आहे.
गैरअर्जदार क्र. 3 व 4 यांचा लेखी जबाब थोडक्यात पुढील प्रमाणेः-
6. अर्जदाराचा तक्रार अर्ज हा वस्तुस्थितीला सोडून ग्राहक संरक्षण कायदयाच्या तरतुदीविरध्द आहे. शेतकरी जनता अपघात विमा पॉलिसीच्या अटी व शर्ती प्रमाणे एक महत्त्वाची अट अशी आहे की, अपघाताच्या वेळेस मयत विमाधारक वाहन चालवित असेल तर त्याचे जवळ वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे. अन्यथा विमा कंपनी अर्जदारास काहीही देणे लागत नाही. प्रस्तुत प्रकरणामध्ये मयत केशव मोरे हा मोटारसायकल क्रमांक एमएच 26/एफ 1894 चालवित होता. अर्जदारास मागणी करुनही मयताचे ड्रायव्हींग लायसन्स विमा कंपनीस दिलेले नाही. म्हणून विमा कंपनीने अर्जदाराचा दावा हा बंद केलेला आहे. जर अर्जदाराने मयताचे ड्रायव्हींग लायसन्स विमा कंपनीकडे दिले तर त्यांचे दाव्याबाबत विमा कंपनीला त्यावर योग्य तो निर्णय घेता येईल. विमा कंपनीने अर्जदाराचे दाव्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नसल्यामुळे अर्जदाराचा प्रस्तुत अर्ज अपरिपक्व आहे. त्यामुळे गैरअर्जदार हे अर्जदारास काहीही देणे लागत नाही. या सर्व गोष्टींचा विचार करता अर्जदाराचा तक्रारी अर्ज खारीज होणे उचीत आहे.
7. अर्जदार व गैरअर्जदार यांनी पुराव्याकामी आपले शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकला. दोन्ही बाजूंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील गोष्टी स्पष्ट होतात.
8. अर्जदार यांचे पती मयत केशव मोरे हे व्यवसायाने शेतकरी होता हे अर्जदाराने दाखल सातबारा उता-यावरुन स्पष्ट आहे. अर्जदाराचे पती केशव मोरे यांचा दिनांक 20.03.2012 रोजी मोटार सायकलवर जात असतांना जीप क्रमांक एमएच 24/जे 4760 च्या चालकाने निष्काळजीपणे जीप चालवून मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातामुळे दिनांक 31.03.2012 रोजी केशव मोरे याचा मृत्यु झाला हे अर्जदार यांनी दाखल केलेल्या पोलीस पेपर्स व मृत्यु प्रमाणपत्रावरुन स्पष्ट आहे. अर्जदार यांनी दाखल केलेल्या एफआयआर च्या प्रतीचे अवलोकन केले असता त्यात पुढील प्रमाणे नमुद आहेः-
‘’ आरोपीने आपल्या ताब्यातील जीप क्रमांक एमएच 24/जे 4760 ही भरधाव वेगात हयगयी व निष्काळजीपणे चालवून फिर्यादी व त्याचा साक्षीदार
केशव मोरे यांची मोटारसायकल क्रमांक एमएच 26/एफ 1894 ला धडक देऊन फिर्यादी व त्याच्या साक्षीदारास गंभीर जखमी केले म्हणून गुन्हा. तसेच मोटारसायकलचे रक्कम रु.10,000/- चे नुकसान केले व जीप घेऊन पळून गेला आहे म्हणून गुन्हा.’’
अर्जदार हीचा पती केशव मोरे हा शेतकरी होता व शेतकरी या नात्याने महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी वैयक्तीक अपघात योजनेचा लाभार्थी होता हे स्पष्ट आहे. महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी वैयक्तीक अपघात योजनेनुसार अर्जदार यांनी पतीचे मृत्यु नंतर गैरअर्जदार यांचेकडे विमा रक्कम मिळणेसाठी अर्ज तालुका कृषि अधिकारी यांचेमार्फत विमा कंपनीकडे केला. परंतु सदरील विमा प्रस्ताव विमा कंपनीने दिनांक 04.03.2013 रोजीच्या पत्रान्वये बंद केल्याचे अर्जदारास कळविले. सदर पत्राचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, अर्जदार यांनी तीच्या पतीच्या ड्रायव्हींग लायसन्सचे आरटीओ एक्ट्रॅक्ट दाखल केलेले नसल्यामुळे सदर दावा बंद केलेला आहे.
अर्जदाराचे म्हण्णे आहे की, गैरअर्जदाराचे सदरचे कृत्य हे बेकायदेशीर असून अर्जदारावर अन्यायकारक आहे. अर्जदार यांनी त्यांच्या म्हणणेच्या पृष्ट्यर्थ मा.उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद रिट पिटीशन क्रमांक 9650/2014 च्या निर्णयाचा संदर्भ मंचासमक्ष दाखल केलेला आहे. सदर निर्णयात मा. उच्च न्यायालयाने पुढील प्रमाणे मत व्यक्त केलेले आहे.
1. A proposal for extension of benefits under Shetkari Apghat Vima Yojna has been rejected on the ground that the agriculturist, whose heirs are claiming compensation, died in an vehicular accident, was not possessed of a valid driving licence. On perusal of first information report lodged in respect of occurrence of accident, it does not appear that any charge in respect of driving the vehicle without valid licence has been incorporated. Apart from this, the scheme itself stipulates presentation of only four documents together with the proposal, which condition has been fulfilled by the petitioners. Prima facie, clause 21 contained in the Government Resolution cannot be considered to be mandatory and the benefits of scheme framed for social advancement cannot be denied to the heirs of the deceased.
मा. उच्च न्यायालयाने व्यक्त केलेले उपरोक्त मत प्रस्तुत प्रकरणात तंतोतंत लागु होते असे मंचाचे मत आहे. गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराचा दावा बंद करुन अर्जदारास मानसिक त्रास दिलेला आहे व सेवेत त्रुटी दिलेली आहे
वरील विवेचनावरुन मंच खालील आदेश देत आहे.
आ दे श
1. अर्जदार यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. गैरअर्जदार क्र. 3 व 4 विमा कंपनी यांनी अर्जदारास विम्याची रक्कम रु.1,00,000/- दिनांक 04.03.2013(दावा बंद केल्या तारखेपासून) द.सा.द.शे. 6 टक्के व्याजासह आदेश तारखेपासून तीस दिवसाच्या आत द्यावेत.
3. गैरअर्जदार क्र. 3 व 4 यांनी अर्जदार यास सेवेत त्रुटी दिल्याबद्दल मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 2000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.1500/- आदेश तारखेपासून तीस दिवसाचे आत द्यावेत.
4. दोन्ही पक्षकारास निकालाच्या प्रती मोफत पुरविण्यात याव्यात.
5. वरील आदेशाच्या पुर्ततेचा अहवाल दोन्ही पक्षकारांनी निकालाच्या तारखेपासून 45 दिवसांच्या आत मंचात दाखल करावा. प्रकरण 45 दिवसानंतर आदेशाच्या पुर्ततेसाठी ठेवण्यात यावे.