निकालपत्र :- (दि.28/09/2010) (सौ.प्रतिभा जे. करमरकर,सदस्या) (1) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी :- तक्रारदार क्र.2 हे तक्रारदार क्र.3 चे वडील आहेत. तक्रारदार क्र.2 व 3 हे एकत्र कुटूंबीय आहेत. त्यांचे एकत्र कुटूंबाचे मालकीची तक्रारदार क्र.1 ही बाळकृष्ण राईस मिल असून सदर तक्रारदार हे स्वत:चे भाताचे तांदळामध्ये रुपांतर करीत असतात. तक्रारदार सदरचे काम स्वत:चे उपजिविकेसाठी करतात. सदर तक्रारदार यांनी त्यांचे राईस मिलकरिता असणारा स्टॉक माल, बिल्डींग या सर्वाकरिता सामनेवाला कंपनीकडून तक्रारदार क्र.3 चे नांवे स्टॅन्डर्ड फायर अन्ड स्पेशल पेरील पॉलीसी नं.151102/11/06/11/00000023 ची दि.17/04/2006 ते दि.16/04/2007 या कालावधीकरिता एकूण रक्कम रु.53,00,000/- किंमतीची रु.18,690/- इतक्या रक्कमेचा एकरकमी हप्ता भरुन उतरवली होती. (2) तक्रारदार आपल्या तक्रारीत पुढे सांगतात,तक्रारदाराने आपले राईस मिलमध्ये जुलै-06 मध्ये 1357 पोती सोनामसुरी भात(वजन 94510कि.ग्रॅ.)ठेवला होता. सन-2006 साली संपूर्ण महाराष्ट्रात पावसाळी हंगामी जोरदार पाऊस पडला. तक्रारदाराची राईस मिल ही मल्हारपेठ येथे असून मल्हारपेठ हे गाव कासारी नदीकाठी वसले आहे. अतिवृष्टीमुळे कासारी नदीला महापुर आला व सदर नदीचे पाणी तक्रारदाराचे मिलमध्ये शिरले. सदर पुरामुळे मल्हारपेठ गावाचा 10 ते 15 दिवसांपेक्षा जास्त संपर्कही तुटला होता. पुराचे पाण्यामुळे तक्रारदाराचे मिलमध्ये पाणी शिरुन 1357 पोती सोनामसुरी भाताचे पूर्ण नुकसान झाले. पुराचे पाणी ओसरल्यानंतर व मल्हारपेठ गावाशी संपर्क पुर्नप्रस्थापित झाल्यानंतर तक्रारदाराने लगेचच सामनेवाला कंपनीशी संपर्क साधून झालेल्या भाताचे नुकसानीबाबत पहाणी करणेबाबत कळवले होते व सामनेवाला कंपनीकडे झाले नुकसानीबाबत क्लेम फॉर्म भरुन दिला होता. तक्रारदाराने सामनेवाला विमा कंपनीकडे रक्कम रु.18,690/- भरुन तक्रारदारानी विमा पॉलीसी घेतली होती व एकूण रक्कम रु.53,00,000/- इतक्या स्टॉकचा विमा उतरवला होता. सर्व कागदपत्रांसह सामनेवालांकडे तक्रारदाराने वेळोवेळी नुकसानभरपाई मागितली असता सामनेवालाने प्रकरण विचाराधीन आहे अशी उत्तरे देऊन टोलवत ठेवले. वेळेवर विमा क्लेम सेटल न करणे ही सामनेवालाच्या सेवेतील गंभीर त्रुटी आहे. म्हणून त्याविरुध्द दाद मागण्यासाठी तक्रारदाराने पुढीलप्रमाणे मागणी मान्य व्हावी अशी विनंती करुन मे. मंचासमोर आपली तक्रार नोंद केली आहे. तक्रारदाराचे स्टॉकची झालेले नुकसानीची रक्कम रु.6,26,366/-, सदर रक्कमेवर दि.01/08/06 ते 01/01/09 अखेर द.सा.द.शे.12 टक्के प्रमाणे होणारे व्याज, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/-व तक्रार अर्जाचा खर्च रु.10,000/- सामनेवाला यांचेकडून वसुल होऊन मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (3) तक्रारदाराने आपल्या तक्रारीसोबत सामनेवाला यांचेकडे क्लेम फॉर्म मिळणेबाबत केलेला अर्ज, क्लेम चेक मिळणेबाबत सामनेवाला यांना केलेला अर्ज, भात स्टॉक गाडयांची नोंद, सामनेवाला यांना वकीलांमार्फत तक्रारदाराने पाठविलेली नोटीस, त्याची पोहोच रिसीट, तक्रारदाराची पॉलीसी, सामनेवाला कंपनीने दिलेले पत्र इत्यादी कागदपत्र दाखल केली आहेत.तसेच दि.16/08/2010 रोजी बाळकृष्ण राईस मिलचे फोटो, ग्राहक तक्रार क्र.213/06 मधील निकालाची प्रत, राजशेखर पाटील यांनी दिलेला दाखला इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (4) सामनेवालाने आपल्या कथनात तक्रारदाराची विमा पॉलीसी मान्य केली आहे. परंतु इतर सर्व बाबींना तीव्र आक्षेप घेतला आहे. विशेषत: पॅरा 4 व पॅरा 5 मधील पुराचे पाणी अचानक राईस मिल कंपाऊंडमध्ये घुसले व पुराच्या पाण्यामुळे मिलमधील भाताचे मोठे नुकसान झाले या तक्रारदाराच्या विधानाला सामनेवाला यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. मे. पाटील सर्व्हेअर यांनी तक्रारदाराच्या राईस मिलचा सर्व्हे केल्यानंतर दिलेल्या आपल्या सर्व्हे रिपोर्टमध्येही तक्रारदाराचे झालेले नुकसान गोडावून मधील अत्यंत असुरक्षित व निष्काळजीपणाची स्टॉक ठेवण्याच्या पध्दतीमुळे तक्रारदाराचे भाताचे नुकसान झाले आहे. भाताची टरफलेमुळे (कोंडा)गटार तुंबाल्यामुळे पाणी ओव्हरफ्लो होऊन मिलमध्ये घुसले होते. याचाच अर्थ तक्रारदाराचे झालेले नुकसान हे पुरामुळे झालेले नसून गोडावूनच्या पाण्यापासूनच्या सुरक्षेबाबत केलेले अक्षम्य दुर्लक्ष हे आहे असे निरीक्षण केले आहे व ही बाब विमा पॉलीसीप्रमाणे कव्हर होत नाही त्यामुळे सामनेवाला कंपनी तक्रारदारांना नुकसानभरपाई देय नाही असेही सवर्हेअरने पुढे म्हटले आहे. त्यामुळे सदरची तक्रार खर्चासह काढून टाकावी असे सामनेवाला यांचे कथन आहे. तसेच रु.10,000/- काम्पेंसेंटरी कॉस्ट लावावी अशी विनंती सामनेवाला यांनी सदर मंचास विनंती केली आहे. (5) सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेसोबत पाटील सर्व्हेअर यांचा सर्व्हे रिपोर्ट, सामनेवाला यांनी तक्रारदारांना क्लेम नाकारलेचे पाठवलेले पत्र इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (6) या मंचाने दोन्ही बाजूंच्या वकीलांचे युक्तीवाद ऐकले. तसेच त्यांनी दाखल केलेले कागदपत्र तपासले. (7) तक्रारदाराची विमा पॉलीसी सामनेवाला विमा कंपनीने मान्य केली आहे. परंतु तक्रारदाराच्या इतर सर्व कथनाला सामेनवाला यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. आता, तक्रारदारचा विमा क्लेम निर्णय वेळेवर न घेण्यात सामनेवालाची सेवात्रुटी झाली आहे का? व असल्यास त्याबद्दल सामनेवाला विमा कंपनी तक्रारदारांना नुकसानभरपाई देय आहे का?याबाबत निष्कर्ष काढत असताना पुढील मुद्दयांचा विचार आम्ही प्रामुख्याने करणार आहोत. (8) तक्रारदाराच्या कथनाप्रमाणे जुल-2006 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीकाठी असलेल्या तक्रारदाराच्या राईसमिलमध्ये कासारी नदीचे पाणी घुसले व मिलमध्ये असलेल्या 1357 सोनामसुरी भाताचे भिजून अंदाजे रक्कम रु.6,50,000/- इतके नुकसान झाले. विमा पॉलीसीप्रमाणे तक्रारदाराने सामनेवाला विमा कंपनीकडे सर्व आवश्यक कागदपत्रांसह आपल्या झालेल्या नुकसानभरपाईची एकूण रक्कम रु.6,26,366/- इतक्या रक्कमेची मागणी केली. परंतु सामनेवालाने त्यावर आजपर्यंत कुठलाही निर्णय घेतला नाही व तक्रारदाराला त्याचा न्याययोग्य क्लेम दिला नाही. त्यामुळे तक्रारदाराने सामनेवाला यांना कायदेशीर नोटीसही पाठवली. परंतु तरीही सामनेवालाने टाळाटाळ करुन तक्रारदाराचा विमा क्लेम मंजूर केला नाही. तक्रारदारच्या राईस मिलमधील भाताचे नुकसान दि.26/07/2007 ते 03/08/2007 या काळात झाले. त्यानंतर तक्रारदाराने वेळेवर सर्व कागदपत्रांसह विमा क्लेम सामनेवालांकडे दाखल केला. त्यानंतर दि.03/11/2007 रोजी कायदेशीर नोटीसही पाठवली. परंतु तरीही सामनेवाला विमा कंपनीने क्लेमबाबत कुठलाही निर्णय घेतला नाही. (9) विमाधारकाचे नुकसान झाल्यावर व सर्व कागदपत्रांसह विमा क्लेम दाखल झाल्यावर त्याची योग्य ती छाननी करुन विमाधारकाच्या क्लेमचा पूर्ण जबाबदारीने निर्णय विहीत कालावधीत विमा कंपनीने घेणे हे अपेक्षित असते. परंतु सन2006 मध्ये झालेल्या नुकसानीबाबत विमा क्लेमचा निर्णय विमा कंपनीने सन 2010 पर्यंतही घेतला नाही ही सामनेवाला विमा कंपनीच्या सेवेतील निश्चित त्रुटी आहे अशा निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (10) आता तक्रारदाराच्या झालेल्या प्रत्यक्ष नुकसानीचा विचार करता तक्रारदाराने दाखल केलेले कागदपत्र, सर्व्हेअरचा रिपोर्ट व इतर कागदपत्रांची छाननी करता असे दिसून येते की तक्रारदाराचे झालेले नुकसान पुरामुळे झाले नसून भाताच्या कोंडयाने गटार तुंबल्यामुळे पाणी राईस मिलमध्ये शिरले. जुलै-2006 मध्ये अतिवृष्टी होऊन महापूर आल्याबद्दल कुठलेही रेकॉर्ड अथवा पुरावा तक्रारदाराने दाखल केलेला नाही. (11) तक्रारदाराने याच कारणासाठी सन-2005 मध्ये दुस-या विमा कंपनीविरुध्द दावा दाखल केला होता. सन-2005 साली झालेल्या अतिवृष्टीचा पुरावा मंचासमोर दाखल होता. त्यामुळे त्या तक्रारीत (ग्राहक तक्रार क्र.213/09) मध्ये उपरोक्त पुरावा ग्राहय मानून तक्रारदाराची तक्रार मंजूर केल्याचा आदेश दिला होता. सदर निकाल तक्रारदाराने या कामात दाखल केला आहे. या बाबींचा विचार करता आम्ही अशा निष्कर्षाप्रत पोचलो आहोत की, नदीजवळ असल्यामुळे पावसाळयात पुराचे पाणी घुसून राईस मिलमधील भात स्टॉकची नुकसानी होण्याची शक्यता गृहीत धरुन तक्रारदाराने आपल्या मिलमधील स्टॉकची योग्य काळजी घेण्याची आवश्यकता होती. सवर्हेअरच्या रिपोर्टप्रमाणे पूर्वानुभव असूनही तक्रारदाराने अशा त-हेची कुठलीही काळजी घेतलेली दिसून येत नाही हे सामनेवाला विमा कंपनीचे कथन हे मंच ग्राहय धरत आहोत. सबब हे मंच पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करणेत येते. 2) सामनेवाला कंपनीने तक्रारदारास विमा क्लेमचा निर्णय विहीत मुदतीत न कळवल्याबद्दल झालेल्या मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/-(रु.दहा हजार फक्त) दयावेत. 3) सामनेवाला यांनी तक्रारदारास तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) दयावेत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |