नि. २१
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचे समोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र.९७६/२००८
-------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : २९/८/२००८
तक्रार दाखल तारीख : ६/९/२००८
निकाल तारीख : १३/१०/२०११
---------------------------------------------------------------
श्री प्रमोद श्रीकांत वेर्णेकर
व.व. ४०, धंदा – व्यापार
रा.३२९, रविवार पेठ, कराड जि.सातारा ..... तक्रारदारú
विरुध्दù
१. न्यू इंडिया इन्शुरन्स कं.लि.
क्षेत्रीय कार्यालय, शारदा सेंटर,
दुसरा मजला, नळ स्टॉपच्या पाठीमागे,
कर्वे रोड, पुणे ४११ ००४
२. न्यू इंडिया इन्शुरन्स कं.लि.
ब्रॅंच ऑफिस १५१००४, कौस्तुभ
सी.एस.नं.३५२४/२५२६, मेनरोड,
इस्लामपूर – ४१५४०९ .....जाबदारúö
तक्रारदारतर्फेò : +ìb÷.श्री.डी.आर.पाटील
जाबदारक्र.१ व २तर्फे : +ìb÷.सौ एम.एम.दुबे
नि का ल प त्र
द्वारा- अध्यक्ष- श्री.अनिल य.गोडसे
१. तक्रारदार यांनी सदरचा तक्रार अर्ज त्यांचे वाहनाचे विमादाव्याबाबत दाखल केला आहे.
२. सदर तक्रार अर्जाचा थोडक्यात तपशील पुढीलप्रमाणे –
तक्रारदार यांनी दि.२६/४/२००५ रोजी टाटा इंडिका हे वाहन खरेदी केले. सदरचे वाहनाचा त्यांनी जाबदार यांचेकडे संपूर्ण विमा उतरविला होता. तक्रारदार यांनी सदरचे वाहनाचे तात्पुरते रजिस्ट्रेशन दि.१६/५/२००५ रोजी केले. तक्रारदारांना त्यांच्या वाहनास फॅन्सी सिरियल नंबर हवा असल्याने व त्यासाठी अवधी असलेने त्यांनी वाहनाचे कायमस्वरुपी रजिस्ट्रेशन करण्याचे प्रलंबित ठेवले. सदरचे वाहन दि.३१/१/२००६ रोजी बिघाड होवून, सरळ रस्त्यावर अचानक थांबून पलटी झाले त्यामुळे वाहनाचे नुकसान झाले. सदरच्या नुकसान भरपाईच्या रकमेची तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडे मागणी केलेनंतर जाबदार यांनी त्यांचे सर्व्हेअरमार्फत वाहनाची पाहणी करुन अहवाल मागवला. सदरचे अहवालामध्ये वाहनाचे नुकसानीची रक्कम रु.२,९८,४०१/- इतकी झालेचे नमूद केले आहे. सर्व्हेअर यांनी अहवाल सादर केल्यानंतर जाबदार यांनी वाहनाचे तात्पुरत्या रजिस्ट्रेशनची मुदतवाढ केली नाही या कारणास्तव विमादावा नाकारला. तक्रारदारांचे वाहन दि.३१/१/२००६ पासून बंद अवस्थेत असलेने त्यांचे दरमहा रु.१०,०००/- इतके नुकसान झाले, त्यामुळे वाहनाचे नुकसानीची रक्कम मिळावी व इतर तदनुषंगिक मागण्यांसाठी तक्रारदार यांनी सदरचा तक्रारअर्ज दाखल केला आहे. तक्रारदार यांनी नि.४ चे यादीने १३ कागद दाखल केले आहेत.
३. जाबदार क्र.१ व २ यांनी याकामी नि.१४ वर आपले म्हणणे दाखल केले आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये तक्रारदार यांचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारला आहे. यापूर्वी तक्रारदार यांनी या कोर्टात तक्रारअर्ज क्र.७१२/२००७ दाखल केला होता. सदर तक्रारअर्जामध्ये इंजिन नंबर वेगळा होता. सदर वाहन या जाबदाराकडे विमाकृत नाही असे म्हणणे दाखल केल्यानंतर अर्जदार यांनी इंजिन नंबर बदलला. सदरचा बदल कोणत्या कागदपत्रांच्या आधारे केला याबाबत स्पष्टीकरण अर्जामध्ये केलेले नाही त्यामुळे तक्रारदार यांचे वाहन जाबदार यांचेकडे विमाकृत नव्हते ही बाब सिध्द होते. तक्रारदार यांनी वाहनाची आर.टी.ओ.कडे नोंदणी न करता वाहन रस्त्यावर आणून स्वत:च नियमाचा भंग केला आहे. त्यामुळे अर्जदार यांचा विमादावा जाबदार यांनी नाकारला आहे त्यामुळे जाबदार यांनी तक्रारदार यांना कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही. या सर्व कारणांचा विचार करुन तक्रारदार यांचा तक्रारअर्ज फेटाळणेत यावा. जाबदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयर्थ नि.१५ ला प्रतिज्ञापत्र व नि. १६ च्या यादीने १ कागद दाखल केला आहे.
४. तक्रारदार यांनी नि.१८ ला आपले शपथपत्र दाखल केले आहे, तसेच नि.१९ ला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. तक्रारदार यांचा तक्रारअर्ज, जाबदार यांनी दिलेले म्हणणे, दाखल करण्यात आलेली कागदपत्रे व तक्रारदार यांचा दाखल लेखी युक्तिवाद यांचे अवलोकन केले. तक्रारदार यांचे विधिज्ञांचा तोंडी युक्तिवाद ऐकला. जाबदार यांचे विधिज्ञ तोंडी युक्तिवादासाठी उपस्थित राहिले नाहीत. तक्रारदार यांचे तक्रारीचे स्वरुप पाहता तक्रारदार यांचे वाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात कायमपणे नोंदविले नाही त्यामुळे सदर वाहनास नोंदणी क्रमांक मिळालेला नाही. त्यामुळे सदर वाहनास वाहन क्रमांक नाही. सदरचे वाहन हे तात्पुरत्या स्वरुपात नोंदविलेले होते. सदरच्या तात्पुरत्या नोंदणीच्या अनुषंगाने पॉलिसी घेण्यात आली आहे. सदर पॉलिसीवर असणारा इंजिन क्रमांक व तक्रारअर्जामध्ये नमूद केलेल्या इंजिन क्रमांकामध्ये तफावत आहे. तक्रारदार यांनी तक्रारअर्जामध्ये इंजिन क्रमांकामध्ये ५८३ हे नंतर लिहिले आहे. तात्पुरते रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटवर इंजिन नंबर हा ५५८०६ असा आहे. तक्रारदार यांनी तक्रारअर्जामध्ये इंजिन क्रमांकामध्ये नि.१ वर टंकलिखित ठिकाणी हाताने ५८३ असा क्रमांक लिहिला आहे व सदरचा बदल हा नंतर केला आहे. ज्याठिकाणी खाडाखोड केली त्याठिकाणी सही केलेली नाही. पूर्ण तक्रारअर्जातील नि.१ ची प्रत ही शपथपत्राच्या स्वरुपात आहे. त्यामुळे असा बदल तक्रारदार यांनी केव्हा केला व कोणत्या आदेशाने केला याबाबत साशंकता निर्माण होते. तक्रारदार यांनी जाबदार यांनी पॉलिसीमध्ये इंजिन क्रमांक चुकविला म्हणून आपण तक्रारअर्जामध्ये असा बदल केला असा खुलासा आपल्या युक्तिवादामध्ये केला आहे. जाबदार यांनी सदरच्या वाहनाचा विमा आपल्याकडे उतरविला नाही असे नमूद केले आहे. तात्पुरते रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटवरील Chasis No. व पॉलिसीवरील Chasis No. व सर्व्हेअर यांनी सर्व्हे रिपोर्टमध्ये नमूद केलेला Chasis No. हा एकच असल्यामुळे सदरचे वाहन विमाकृत नव्हते या कथनामध्ये तथ्य नाही असे या मंचाचे मत आहे.
५. तक्रारदार यांचा विमादावा जाबदार यांनी दि.६/१०/२००६ च्या पत्राने नाकारला आहे. त्यामध्ये विमादावा नाकारण्यास कारण हे वाहन अपघाताच्या तारखेस नोंदणीकृत नव्हते असे नमूद केले आहे. तक्रारदार यांनी आपल्या तक्रारअर्जामध्ये त्यांना फॅन्सी नंबर घ्यावयाचा होता त्यामुळे वाहनाची तात्पुरत्या स्वरुपात नोंदणी केली असे नमूद केले आहे. वाहन तात्पुरत्या स्वरुपात नोंदविल्याबाबतचे प्रमाणपत्र नि.४/१० वर दाखल आहे. सदरची नोंदणी ही दि.२२ मे २००५ पर्यंत अधिकृत आहे. दि.२२ मे २००५ नंतर सदर वाहनाची तात्पुरत्या स्वरुपातील नोंदणी वाढवून घेतलेली नाही अथवा अद्याप वाहनाची कायम स्वरुपाची नोंदणी केलेली नाही ही बाब तक्रारदार यांचे विधिज्ञांनी युक्तिवादाचे दरम्यान स्पष्ट केली. सदर वाहनाची तात्पुरत्या स्वरुपातील नोंदणी दि.२२ मे २००५ पर्यंत अस्तित्वात होती. सदर वाहनाचा अपघात हा दि.३१/१/२००६ रोजी झाला आहे. दि.२२ मे २००५ रोजी वाहनाचा नोंदणी कालावधी संपला असताना तक्रारदार यांनी वाहन रस्त्यावर आणले आहे. मोटार अपघात कायद्यातील कलम ३९ नुसार एखादे वाहन सार्वजनिक ठिकाणी अथवा इतर ठिकाणी चालवायचे असेल तर सदर वाहन नोंदणीकृत करणे बंधनकारक आहे. मोटार वाहन कायद्यातील कलम १४६ नुसार वाहन रस्त्यावर चालविणेसाठी सदरचे वाहन विमाकृत असणे बंधनकारक आहे. एखादे वाहन नोंदणीकृत व विमाकृत नसेल तर मोटार वाहन कायद्यातील कलम १९२ व १९६ नुसार गुन्हा मानण्यात आला आहे व सदर गुन्हयासाठी शिक्षा व तुरुंगवासाची तरतूद करण्यात आली आहे. तक्रारदार यांचे वाहनाची नोंदणी दि.२२ मे २००५ रोजी संपली आहे व त्यानंतर जवळजवळ सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीनंतर सदर वाहनास रस्त्यावर अपघात झाला आहे. तक्रारदार यांनी वाहनाची नोंदणी नसताना रस्त्यावर वाहन चालविले आहे. त्यामुळे मोटार वाहन कायद्यातील तरतुदींचा भंग केला आहे व त्या कारणास्तव जाबदार यांनी तक्रारदार यांचा विमादावा नाकारला आहे. वाहनाची नोंदणी नसताना वाहन रस्त्यावर आणून अपघात झाल्यास सदर वाहनाची नुकसान भरपाई मिळणेस तक्रारदार निश्चितच पात्र नाहीत. जाबदार यांनी तक्रारदार यांचा विमादावा नाकारुन तक्रारदार यांना कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही या निष्कर्षाप्रत सदरचा मंच आला आहे.
वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
१. तक्रारदार याचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
२. खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
सांगली
दिनांकò: १३/१०/२०११
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.
प्रत: तक्रारदार यांना हातपोहोच/रजि.पोस्टाने दि.//२०११
जाबदार यांना हातपोहोच/रजि.पोस्टाने दि.//२०११