निकालपत्र प्रेरणा रा.काळुंखे,सदस्या यांनी पारीत केले
नि का ल प त्र
तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 (यापुढे संक्षेपासाठी ग्रा.स.कायदा) कलम 12 नुसार सदरची तक्रार दाखल केलेली आहे.
2. तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, त्यांचा औषधांसाठी लागणा-या प्लॅस्टीकच्या बाटल्यांचे उत्पादन करण्याचा व्यवसाय आहे. त्यांनी उत्पादीत केलेल्या मालाचे वाहतुकी दरम्यान झालेल्या नुकसानीस संरक्षण मिळावे म्हणुन सामनेवाल्यांकडून मरिन कार्गो ओपन पॉलीसी क्र.15280021110200000019 दि. 27/01/2012 ते 26/01/2013 या कालावधीसाठी घेतली होती. दि.4/10/2012 रोजी डिक्लरेशन फॉर्म् क्र.5882 नुसार सामनेवाल्यांना कळवून त्यांचा माल बायोडील फार्मास्युटीकल्य प्रा.लि. यांना बडडी, हिमाचल प्रदेश,येथे दि.16/10/2012 रोजी पोहोचविण्यात आला. परंतु एकुण मालाच्या खोक्यांपैकी काही खोके ओल्या अवस्थेत असल्याने माल घेण्यास बायोडील फार्मास्युटीकल्य प्रा.लि. यांनी नकार दिला. सदर घटनेची माहिती त्यांनी सामनेवाल्यांना दि. 11/10/2012 रोजी तातडीने दिली असता सामनेवाल्यांचे सर्व्हेअर मे. प्रोटेक्ट इंजिनिअर्स व लॉस असेसर्स,न्यु चंदीगड यांच्या मार्फत त्या मालाचा सर्व्हे करण्यात येवून त्यात त्यांच्या मालाचे रु. 1,42,965.26 पैसे इतके नुकसान झाल्याचा रिपोर्ट देण्यात आला. त्यांनी सदर रकम मिळण्याकरीता सामनेवाल्यांकडे विमादावा केला असता सामनेवाल्यांनी कोणतेही सबळ कारण नसतांना दि.29/03/2013 रोजी पत्र पाठवून त्यांचा विमादावा नाकारला. त्यामुळे सामनेवाल्यांकडून विमादाव्याची रक्कम रु. 1,42,965.26 पैसे व्याजासह मिळावीत तसेच मानसिक त्रासापोटी रु. 10,000/- अर्ज खर्चासह मिळावेत, अशा मागण्या त्यांनी मंचाकडे केलेल्या आहेत.
3. तक्रारदार यांनी तक्रार अर्जाच्या पुष्ठयर्थ दस्तऐवज यादी नि.4 लगत,
विमा पॉलीसी, तक्रारदारांचा विमा दावा नाकारल्याचे पत्र,डिक्लरेशन फॉर्मस,सर्व्हेअर रिपोर्टस, इ.कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
4. सामनेवाला यांनी जबाब नि.11 दाखल करुन प्रस्तूत अर्जास विरोध केला. त्यांच्या मते, तक्रारदाराने व्यापारी कारणा करिता विमा पॉलीसी घेतलेली असल्याने प्रस्तुत तक्रार अर्ज चालविण्याचा या मंचास अधिकार नाही. तक्रारदाराने गंजलेल्या व छिद्र पडलेल्या छप्पर असलेल्या ट्रकमध्ये माल चढविला तसेच तो माल पुरेशा प्लॅस्टीक वेष्टनात पॅक केलेला नसल्याने पाऊस पडून जे काही नुकसान झाले ती नुकसान भरपाई देण्याची पॉलीसीच्या एक्सक्लुजन क्लॉज 2.3 नुसार त्यांची जबाबदारी नाही. त्यांनी तक्रारदारांचा विमादावा योग्य कारणाने नाकारुन सेवा देण्यात कोणतीही कमतरता केलेली नाही. त्यामुळे तक्रारदारांचा तक्रार अर्ज रद्द करण्यात यावा. अशी विनंती त्यांनी मंचास केलेली आहे.
5. सामनेवाल्यांनी त्यांच्या बचावा पुष्टयर्थ दस्तऐवज यादी नि. 15 व 20 लगत अटी व शर्तीसह विमा पॉलीसी,सर्व्हे रिपोर्टनुसार झालेल्या नुकसानीचे फोटोग्रा्फस, इ.कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
6. तक्रारदार तर्फे त्यांचे वकील अॅड.श्री.दायमा यांचा लेखी युक्तीवाद नि. 26 व सामनेवाला यांचे वकील अॅड.श्रीमती पुर्णपात्रे यांचा लेखी युक्तीवाद नि. 27 त्यांच्या तोंडी युक्तीवादांसह विचारात घेण्यात आलेत.
7. निष्कर्षांसाठीचे मुद्दे व त्यावरील आमचे निष्कर्ष कारणांसहीत खालीलप्रमाणे आहेत.
मुद्दे निष्कर्ष
1.प्रस्तुत तक्रार अर्ज टेनेबल आहे काय ? होय.
2. सामनेवाला यांनी तक्रारदारास
सेवा देण्यात कमतरता केली काय ? होय.
3. आदेशाबाबत काय ? अंतीम आदेशाप्रमाणे
का र ण मि मां सा
मुद्दा क्र.1 बाबतः-
8. तक्रारदार यांनी व्यापारी कारणा करीता विमा पॉलीसी घेतलेली असल्याने प्रस्तुत तक्रार अर्ज टेनेबल नाही असा बचाव सामनेवाल्यांनी घेतलेला आहे. मात्र सामनेवाल्यांच्याया बचावाशी आम्ही सहमत नाहीत. तक्रारदारांनी सामनेवाल्यांकडून घेतलेल्या पॉलिसीमधून तक्रारदारास कोणताही नफा अगर उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे तक्रारदार ग्रा.सं.कायदा कलम 2(1)(ड) नुसार ग्राहक ठरत असल्याने प्रस्तूत तक्रार अर्ज टेनेबल आहे असे आमचे मत आहे. यास्तव मुद्दा क्र.1 चा निष्कर्ष आम्ही होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र.2 बाबतः
9. सामनेवाल्यांचे वकील अॅड.पुर्णपात्रे यांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारदाराने गंजलेल्या व छिद्र पडलेल्या छप्पर असलेल्या ट्रकमध्ये माल चढविला. तसेच तो माल पुरेशा प्लॅस्टीक वेष्टनात पॅक केलेला नसल्याने पाऊस पडून जे काही नुकसान झाले, ती नुकसान भरपाई देण्याची पॉलीसीच्या एक्सक्लुजन क्लॉज 2.3 नुसार सामनेवाल्यांची जबाबदारी नाही. परिणामी सामनेवाल्यांनी तक्रारदाराचा विमा दावा योग्य कारणाने नाकारुन सेवा देण्यात कोणतीही कमतरता केलेली नाही. याबाबतीत तक्रारदारांचे वकील अॅड.दायमा यांचा असा युक्तीवाद आहे की, विमा पॉलिसी काढतांना तक्रारदारास फक्त कव्हर नोट देण्यात आलेली होती. तेव्हा अगर त्यानंतरही एक्सक्लुजन क्लॉजेसची कोणतीही माहिती सामनेवाल्यांनी तक्रारदारास दिलेली नव्हती.
सामनेवाल्यांनी तक्रारदाराचे जे दोन विमा दावे मंजूर केलेले आहेत, त्यातील नुकसानीचे कारण व नाकारण्यात आलेल्या विमा दाव्यातील नुकसानीचे कारण सारखेच असतांनाही तक्रारदारांचा विमा दावा नाकारुन सेवा देण्यात कमतरता केलेली आहे.
10. वरील युक्तीवाद विचारात घेण्यात आलेत. तक्रारदारांना विमा पॉलिसी काढतांना फक्त कव्हर नोट देण्यात आलेली होती. त्या सोबत एक्सक्लुजन क्लॉजेसची कोणतीही माहिती अथवा कागदपत्रे तक्रारदारास देण्यात आलेली नव्हती, असे तक्रारदारांनी शपथेवर कथन केलेले आहे. सामनेवाल्यांनी त्याबाबतीत ठोस पुरावा देवून त्याचे खंडन केलेले नाही. आपल्याला माहित असलेल्या कराराच्या अटी व शर्ती विमा पॉलिसी सोबत ग्राहकांना देण्याची जबाबदारी विमा कंपनीची असतांनाही विमा पॉलीसीचा फॉर्म ठराविक असतो. आय.आर.डी.ए. कडून मान्यता प्राप्त असतो. त्यात कोणताच बदल नसतो इंटरनेटवरही सदर फॉर्म उपलब्ध् असतात असा सामनेवाल्यांचा युक्तीवाद स्विकारार्ह नाही. विमा पॉलीसीचे फॉर्म इंटरनेटवरही उपलब्ध असतात असे सांगुन आपली जबाबदारी पार न पाडणे ही सुध्दा सेवेतील कमतरताच ठरते, असे आमचे मत आहे.
11. प्रस्तूत कामी दाखल करण्यात आलेली कागदपत्रे हेच दर्शवितात की, सामनेवाल्यांनी तक्रारदाराचे जे दोन विमा दावे मंजूर केलेले आहेत, त्यातील नुकसानीचे कारण व नाकारण्यात आलेल्या विमा दाव्यातील नुकसानीचे कारण सारखेच असतांनाही तक्रारदारांचा विमा दावा नाकारलेला आहे. पुराव्याच्या कायद्यातील estopel च्या तत्वानुसार सामनेवाल्यांना प्रस्तुत विमा दावा नाकारता येणार नाही. परिणामी तक्रारदारास विमा पॉलिसी काढतांना एक्सक्लुजन क्लॉजेसची माहिती न देवून तसेच कोणतेही योग्य कारण नसतांना सामनेवाल्यांनी तक्रारदारांचा विमा दावा नाकारुन सेवा देण्यात कमतरता केलेली आहे, असे आमचे मत आहे.
मुद्दा क्र.3 बाबतः
12. मुद्दा क्र.1 व 2 चे निष्कर्ष स्पष्ट करतात की, तक्रारदार यांची तक्रार अर्ज टेनेबल असुन तक्रारदारास पॉलीसी काढतांना एक्सक्लुजन क्लॉजेसची माहिती न देवून तसेच कोणतेही योग्य कारण नसतांना सामनेवाल्यांनी तक्रारदारांचा विमा दावा नाकारुन सेवा देण्यात कमतरता केलेली आहे. तक्रारदार यांनी विमा दाव्याची रक्कम रु.1,42,965/- मिळावेत अशी मागणी केलेली आहे. सामनेवाल्यांनी तक्रारदाराचे वरील रकमेचे नुकसान झाल्याची बाब विवादीत केलेली नाही. परिणामी तक्रारदार विमा दाव्याची रक्कम रु.1,42,965/- विमा दावा नाकारल्याची तारीख म्हणजेच दि.29/3/2013 पासून प्रत्यक्ष रक्कम हाती मिळेपावेतो द.सा.द.शे.10% व्याजाने मिळण्यास पात्र आहे. त्याचप्रमाणे तक्रारदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रु.15,000/- व अर्ज खर्चापोटी रु.3000/- मिळण्यास देखील तक्रारदार पात्र आहेत, असे आमचे मत आहे. यास्तव मुद्दा क्र.3 च्या निष्कर्षापोटी आम्ही खालील आदेश देत आहोत.
आ दे श
1. सामनेवाला यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यांना विमा दाव्याची रक्कम रु.1,42,965/- दि.29/3/2013 पासून प्रत्यक्ष रक्कम हाती मिळेपावेतो द.सा.द.शे.10% व्याजासह परत करावेत.
2. सामनेवाला यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांने तक्रारदारास मानसिक व आर्थीक त्रासापोटी भरपाई म्हणून रक्कम रु.15,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु.3000/- अदा करावेत.
3. निकालपत्राच्या प्रती उभय पक्षास विनामुल्य देण्यात याव्यात.
नाशिक
दिनांकः 13/03/2015.