निकालपत्र :- (दि.14/03/2011) ( सौ. वर्षा एन.शिंदे,सदस्या) (01) तक्रार स्विकृत करुन सामनेवालांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांना नोटीस लागू होऊन सामनेवाला हे त्यांचे वकीलांमार्फत हजर होऊन त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे दाखल केले. उभय पक्षकारांचे वकीलांचा युक्तीवाद ऐकणेत आला. सदरची तक्रार ही तक्रारदाराचा योग्य व न्याय दावा नाकारुन सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी ठेवलेमुळे दाखल केली आहे. (02) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी :- अ) तक्रारदार यांनी सामनेवालांकडे स्वत:च्या टेंपो ट्रॅक्स नं.MH-11-B-1226 या वाहनाचा विमा उतरविलेला असून त्याचा पॉलीसी क्र.151203/31/06/01/00000464 असा असून सदर पॉलीसीचा कालावधी दि.06/05/2006 ते 05/05/2007 असा असून सदर वाहन घेऊन तक्रारदार हे पाण्याचे पंप घेण्यास गेले असता त्यांनी सदरचे वाहन हे राणीबाग इचलकरंजी येथे लावून जवळच पाण्याचे पंपाबाबत चौकशी करुन परत आलेनंतर सदरचे वाहन टेंपो ट्रॅक्स जिथे लावले होते. तिथे आढळून न आलेने तक्रारदार यांनी सदर स्वत:च्या वाहनाचा संपूर्ण शहरभर शोध घेतला. शेवटी वाहन चोरीस गेले याची पक्की खात्री झालेनंतर तक्रारदार यांनी लगेचच शिवाजीनगर इचलकरंजी पोलीस चौकीस फिर्याद नोंदवली. परंतु पोलीस तक्रार नोंदवूनदेखील तक्रारदाराचे वाहन सापडत नाही. या दरम्यान तक्रारदार यांनी सामनेवालांकडे आवश्यक त्या सर्व कागदपत्र जोडून दावा मागणी केली असता दि.17/03/2008 च्या पत्राने सामनेवाला यांनी तक्रारदारांचा न्याययोग्य दावा “ तक्रारदार यांची पॉलीसी दि.05/05/2007 संपलेली आहे व तक्रारदार यांना वाहन चोरीची दुर्घटनेबाबत दि.25/06/2007 ला म्हणजे दुर्घटनेनंतर 2 महिन्यांनी कळविलेने दावा देता येत नाही तसेच तक्रारदार यांनी दाव्याबाबत उशीर केलेने दावा देता येत नाही.’’ या कारणाने नाकारलेला आहे. वास्तविक तक्रारदार यांनी दि.20/04/2007 रोजी त्यांचे वाहन चोरीला गेलेनंतर स्वत: संपूर्ण शहरभर शोध घेऊन शेवटी गाडी चोरीस गेलेची खात्री झालेनंतर पोलीस फिर्याद केलेली आहे व सदरची फिर्याद ही दि.20/04/2007 या तारखेची आहे. सबब तक्रारदाराचा न्याययोग्य पारदर्शी दावा सामनेवाला यांनी खोटया कारणास्तव नाकारुन सेवा त्रुटी केलेने प्रस्तुतचा तक्रार अर्ज दाखल करावा लागला. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह मंजूर होऊन तक्रारदारास विम्याची रक्कम रु.70,000/-, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.20,000/- तसेच तक्रार अर्जाचा खर्च रु.2,000/- सामनेवालांकडून वसुल होऊन मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (03) तक्रारदाराने आपल्या तक्रारीच्या पुष्टीप्रित्यर्थ तक्रारदार यांनी पोलीस स्टेशनला दिलेली फिर्याद, पॉलीसी, व सामनेवाला यांनी दावा नाकारलेचे पत्र इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (04) सामनेवाला यांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार अ) तक्रार अर्जातील मजकूर नाकारलेला आहे. सामनेवाला यांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही. प्रस्तुतची तक्रार चालविणेचा अधिकार मे. मंचास नाही. सामनेवाला पुढे असे प्रतिपादन करतात की, तक्रारदाराचे वाहन टेंपो ट्रॅक्स नं.MH-11-B-1226 चा विमा सामनेवाला यांचेकडे उतरविलेला होता. त्याचा पॉलीसी क्र.151203/31/06/01/00000464असा असून सदर पॉलीसीचा कालावधी दि.06/05/2006 ते 05/05/2007 असा असा होता. तक्रारदाराचे तक्रारीतील कलम 2 मधील सदरचा मजकूर वगळता इतर सर्व मजकूर अमान्य आहे. तक्रार अर्जातील कलम 3 ते 9 मधील सर्व मजकूर अमान्य आहे. ब) सामनेवाला आपल्या लेखी म्हणणेत पुढे सांगतात, वास्तविक तक्रारदाराकडून जेव्हा दाव्याची माहिती मिळाली असता सामनेवाला यांनी स्वंतत्र इव्हेस्टीगेटरकडून इन्व्हेस्टीगेशन केले. त्यावेळी कागदपत्र आणि अहवाल यांची छाननी केली असता नमुद विमा उतरविलेले वाहनाचा कालावधी हा दि.06/05/2006 ते 05/05/2007 असा आहे. तर फिर्याद आणि पंचनामा दि.15/06/2007चा आहे. वस्तुत: तक्रारदाराने घटना घडलेबरोबर सुचना दयावयास हवी होती. नमुदचे वाहन दि.20/04/2007 रोजी चोरीस गेलेले आहे. त्याच दिवशी फिर्याद दयावयास हवी होती ती दिलेली नाही. तसेच सदर घटनेची सुचना दि.25/06/2007 रोजी सामनेवाला तसेच आर.टी.ओ. यांना मागील तारीख घालून कळवलेली आहे. प्रस्तुतची घटना पॉलीसी कालावधीनंतर घडलेली दाखल कागदपत्रावरुन दिसून येते. मात्र पॉलीसी कालावधीत प्रस्तुत घटना आणणेसाठी तक्रारदाराने मागील तारखेची नोंद हेतूपूर्वक केलेली आहे. सबब सामनेवालांनी योग्य कारणास्तव दावा नाकारुन कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह फेटाळणेत यावा अशी विनंती सामनेवालांनी सदर मंचास केली आहे. (05) सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेच्या पुष्टयर्थ इन्शुरन्स पॉलीसी व अॅड; पोतनीस यांचा इन्व्हेस्टीगेशन रिपोर्ट इत्यादी कागदपत्रे प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेली आहे. (06) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवालांचे लेखी म्हणणे, दाखल कागदपत्रे, उभय पक्षकारांच्या वकीलांचा युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केल असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1) सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? --- होय. 3) तक्रारदार विमा रक्कम मिळणेस पात्र आहे काय ? --- होय. 4) काय आदेश ? --- शेवटी दिलेप्रमाणे. मुद्दा क्र.1:-तक्रारदाराच्या टेंपो ट्रॅक्स नं.MH-11-B-1226 या वाहनाचा सामनेवालांकडे विमा उतरविलेला असून त्याचा पॉलीसी क्र.151203/31/06/01/ 00000464 असा असून सदर पॉलीसीचा कालावधी दि.06/05/2006 ते 05/05/2007 असा होता त्याबाबत वाद नाही. सदरचे वाहन हे दि.20/04/2007 रोजी राणीबाग इचलकरंजी येथे लावले होते. पाण्याचे पंपाबाबत चौकशी करुन परत आलेनंतर सदरचे वाहन टेंपो ट्रॅक्स जिथे लावले होते. तिथे तक्रारदारास आढळून आले नाही. त्यामुळे तक्रारदाराने शिवाजीनगर पोलीस ठाणेमध्ये तशी वर्दी दिलेली आहे. तक्रारदाराने तक्रारीसोबत पोलीस निरीक्षक शिवाजीनगर पोलीस ठाणे इचलकरंजी यांची सहीशिक्क्यानिशी असलेली सत्यप्रत दाखल केलेली आहे. सदर कागदपत्राचे अवलोकन केले असता दि.20/04/2007 रोजी फिर्यादी म्हणून तक्रारदाराचे नांव व पत्ता व फोन नंबर नमुद आहे. तसेच घटनेचीही नोंद केलेली आहे. तक्रारदाराचे टेंपो ट्रॅक्स नं.MH-11-B-1226 वाहन राणीबाग इचलकरंजी येथे पाण्याचा पंप आणण्यास गेलो असता सदर वाहन कोणीतरी नेलेची वर्दी देणेत आलेली आहे ही वस्तुस्थिती दाखल कागदपत्रावरुन निर्विवाद आहे. तक्रारदाराने दि.25/06/2007 रोजी आर.टी.ओ. ऑफिस कोल्हापूर यांना नमुद वाहन दि.20/04/2007 रोजी कोणीतरी नेलेबाबत कळवलेले दाखल कागदपत्रावरुन दिसून येते. सामनेवाला यांनी दाखल केलेल्या विमा पॉलीसी नुसार नमुद वाहनाचा विमा सामनेवालांकडे उतरविलेला होता. सदर वाहनाची एकूण व्हॅल्यू रु.70,000/- होती. तसेच सामनेवाला यांचे इन्व्हेस्टीगेटर अड. पोतनीस यांनी दाखल केलेल्या अहवालाचे अवलोकन केले असता नमुद वाहन चोरीस गेलेची सुचना दि.25/06/2007 रोजी दिलेली आहे. तसेच प्रस्तुतचे वाहन दि.20/04/2007 रोजी चोरीस गेलेले आहे. त्यामुळे वाहन चोरीबाबत तपास करणेसाठी चोरीची नेमकी तारीख कोणती? दाखल केलेला कच्ची नोंदीचा कागद अधिकृत आहे किंवा नाही? विमा क्लेम न्याययोग्य आहे किंवा नाही? याबाबत नमुद तक्रारदार व त्यांचे मित्र घोरपडे यांचेकडून तोंडी माहिती घेतली. त्यानुसार विमा कालावधी सामनेवाला कंपनीस दिलेली सुचना एफ.आय.आर. नमुद फायनान्सर बँकेस दिलेली सुचना आर.टी.ओ. कोल्हापूर यांना दिलेली सुचना व चोरीची तारीख याची माहिती घेतलेली दिसून येते. सदर माहितीनुसार नमुद वाहन दि.20/04/2007 रोजी चोरीस गेले फिर्याद दि.15/06/2007 रोजी दिलेली आहे व सदर फिर्यादीत वाहनाची चोरी दि.20/04/2007 रोजी झालेचे नमुद केले आहे. फायनान्स करणा-या बॅंकेस दि.29/5/2007 रोजी चोरीबाबत कळवलेले आहे. आर.टी.ओ. ऑफिसला दि.25/06/2007 रोजी कळवलेले आहे व सामनेवाला कंपनीस दि.25/06/2007 रोजी कळवलेले आहे. तक्रारदाराचे मताप्रमाणे नमुद वाहन चोरीस गेलेपासून ते दोन महिन्याचे कालावधीत बँक, इन्शुरन्स तसेच पोलीस स्टेशनला कळवलेले नाही. प्रस्तुत वाहनाच्या चोरी झालेस दिलेल्या कच्च्या नोंदीबाबत प्रस्तुत कच्च्या नोंदीस सी.आर.पी.सी. व इव्हीडन्स् अॅक्टच्या तरतुदीचा विचार करता कोणतेही अधिकृत वैधता नाही. तसेच तक्रारदाराने नमुद वाहनाचे पॉलीसीचे नुतनीकरण केलेले नाही. नमुद कच्च्या नोंदीच्या आधारे तक्रारदार फायदा घेणेचा प्रयत्न करीत आहे. वाहन चोरीची एफ.आय.आर. दि.15/06/2007 रोजीची नोंद आहे व तदनंतर पोलीसांनी तपास केलेला आहे. त्यामुळे नमुदचे वाहन दि.20/04/2007 रोजी चोरीस गेलेले नाही. यासाठी इन्व्हेस्टीगेटर यांनी चंद्र नागरी सह.पत संस्था यांचेकडील दाखल कागदपत्र व वरील विवेचनाआधारे प्रस्तुतची चोरी दि.20/04/2007 रोजी झालेली नसलेबाबत प्रतिपादन केलेले आहे. सामनेवालाने दि.17/03/2008 रोजी पॉलीसी कालावधी दि.05/05/2007 रोजी संपलेला आहे. तसेच दि.25/06/2007 रोजी सामनेवालांना कळवलेले आहे. वाहन चोरीची निश्चित तारखेचा कायदेशीर पुरावा नसलेने प्रस्तुतचा दावा नाकारलेला आहे. दाखल कागदपत्रे व वरील विस्तृत विवेचनाचा विचार करता तक्रारदाराने पोलीस निरीक्षक शिवाजीनगर पोलीस ठाणे यांचे सहीशिक्क्यानिशीची सत्य प्रत प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेली आहे. सदर प्रतीनुसार वाहन कोणीतरी नेलेबाबतची फिर्याद दि.20/04/2007 रोजीच दिलेची दिसून येते. सामनेवालांचे कथनाप्रमाणे तसेच त्यांचे इन्व्हेस्टीगेटरच्या मताप्रमाणे प्रस्तुत कच्च्या नोंदीस सी.आर.पी.सी. व इव्हीडन्स अॅक्टच्या तरतुदीचा विचार करता कोणतीही कायदेशीर वैधता सदर कागदपत्रास नाही. सदर कागदपत्रावर दि.20/04/2007 नंतर दि.22/04/2007 रोंजीची तसेच दि.20/04/2007 रोजीची अन्य एका इसमाची फिर्यादीची नोंद दिसून येते. प्रस्तुतच्या फिर्यादीबाबतची कच्च्या नोंदी या निरीक्षकाच्या सहीशिक्क्यानिशी आहेत. सी.आर.पी.सी. च्या तरतुदीप्रमाणे पोलीसांचे कामकाज चालते. सामनेवालांच्या मताप्रमाणे सदर कच्च्या नोंदीस कायदेशीर वैधता नसेल तर या नोंदी फिर्यादीच्या असून सहीशिक्क्यानिशी करण्यामागे पोलीसांचा काय हेतू असेल किंवा त्यांचे तपासाचा तो एक भाग असू शकेल. सर्वसामान्य माणूस पोलीस स्टेशनला फिर्याद देणेस गेला असता फिर्याद योग्यरित्या नोंदवण्याची जबाबदारी संबंधीत पोलीसांची असते. ती फिर्यादीची कधीच नसते. फिर्यादी फक्त हकीकत सांगत असतो व त्याप्रमाणे त्याची नोंद एफ.आय.आर. म्हणून केली जाते. याबाबत तक्रारदारास दोष देता येणार नाही. प्रस्तुतचा कागद हा नमुद पोलीस अधिका-याचे सहीशिक्क्यानिशी आहे. त्यामुळे त्यास कोणतीही कायदेशीर वैधता नाही असे म्हणणे चुकीचे ठरेल. सबब नमुद वाहन दि.20/04/2007 रोजी कोणीतरी नेले असलेबाबतची फिर्याद तक्रारदार शिवाजीनगर पोलीस ठाणे इचलकरंजी येथे नोंदविणेसाठी त्यादिवशी गेलेला होता व तशी फिर्याद नोंदवलेली आहे ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. सामनेवाला यांनी दाखल केलेला अंतिम अहवालामध्ये नमुद वाहन दि.20/04/2007 रोजी चोरीस गेलेची नोंद आहे. तसेच प्रस्तुत एफ.आय.आर. दि.15/06/2007 रोजी नोंदविलेली असून त्याप्रमाणे तपास करता नमुद वाहन हस्तगत न झालेने आरोपी समीर मुसा शेख यास सी.आर.पी.सी.169(1)ब प्रमाणे अटक हुकूमबाबत विनंती केलेली आहे. दाखल कागदपत्रांचा विचार करता दि.20/04/2007 रोजी नमुद वाहन कोणीतरी नेलेची फिर्याद तक्रारदाराने दिलेली आहे. शोधाशोध करुनही प्रस्तुतचे वाहन मिळून न आलेने वर नमुद संशयित आरोपी विरुध्द गुन्हा नोंद केलेला आहे ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. तसेच इन्व्हेस्टीगेटर यांनी दिलेला अहवाल प्रस्तुत प्रकरणी सामनेवालांनी दाखल केलेला आहे. मात्र नमुद इन्व्हेस्टीगेटरचे शपथपत्र तसेच नमुद अहवालात उल्लेख केलेल्या वेगवेगळे पत्रे व अन्य कागदपत्रे यांच्या सत्यप्रती नमुद अहवालासोबत सामनेवालांना दाखल करणेस काहीच अडचण नव्हती. सदर अहवालात नमुद असलेली कोणतीही कागदपत्रे (दि.15/06/07 चा एफ.आय.आर. सोडलेस) दाखल केलेली नाही. वरील विस्तृत विवेचन व दाखल कागदपत्रे इत्यादीचा विचार करता तक्रारदाराचे वाहन दि.20/04/2007 रोजीच चोरीस गेलेले आहे. तशी फिर्याद तक्रारदाराने संबंधीत पोलीस ठाणेस दिलेली आहे. संबंधीत एफ.आय.आर. योग्यरित्या नोंदणेची जबाबदारी पोलीसांची आहे. याबाबींचा विचार करता नमुद वाहन सदर दिवशी चोरीस गेले आहे त्याअनुषंगाने तक्रारदाराने पुढील कार्यवाही केलेली आहे. पॉलीसीचा मूळ हेतू घडलेली घटना वस्तुस्थिती इत्यादीचा विचार न करता कायदयाचे तांत्रिक बाबींवर बोट ठेवून सामनेवालांनी तक्रारदाराचा न्याययोग्य क्लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवलेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र.2:- वरील मुद्दा क्र.1 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता तक्रारदार हा विमा पॉलीसीप्रमाणे रक्कम रु.70,000/-व्याजासह मिळणेस पात्र आहेत. तक्रारदार यांचा क्लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवलेने तक्रारदार झालेल्या मानसिक त्रासापोटी व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करणेत येते. 2) सामनेवाला यांनी तक्रारदारांना विमा दाव्याची रक्कम रु.70,000/-(रु. सत्तर हजार फक्त) त्वरीत अदा करावी. सदर रक्कमेवर दि.17/03/2011 पासून ते संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत सदर रक्कमेवर द.सा.द.शे. 9 टक्के व्याज अदा करावे. 3) सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) अदा करावेत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |