नि. 21 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 34/2011 नोंदणी तारीख - 28/2/2011 निकाल तारीख - 30/11/2011 निकाल कालावधी - 92 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्री सुनिल कापसे, सदस्य यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ श्री निवृत्ती छानबा जाधव मु.पो. अतित, ता.खंडाळा जि. सातारा ----- अर्जदार (अभियोक्ता सौ एस.एच.कदम) विरुध्द व्यवस्थापक श्री एम.बी.भोसले, न्यु इंडिया अॅश्युरन्स कं.लि. 2396, धुमाळ बिल्डींग, मुख्य पोस्ट ऑफिसजवळ, वाई, ता.वाई जि. सातारा ----- जाबदार (अभियोक्ता श्री के.आर.माने) न्यायनिर्णय अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे - 1. अर्जदार हे खंडाळा येथील रहिवासी असून त्यांचा वाहतुकीचा व्यवसाय आहे. अर्जदार यांनी महिंद्रा मॅक्स पिकअप हे वाहन खरेदी केले. त्याचा विमा त्यांनी जाबदार यांचेकडे उतरविला होता. सदरचे वाहनास दि. 26/11/2008 रोजी अपघात होवून वाहनाचे नुकसान झाले. वाहनाचे दुरुस्तीसाठी रु.2,53,000/- इतका खर्च आला. तदनंतर अर्जदार यांनी जाबदार यांचेकडे विमादाव्याची मागणी केली असता जाबदार यांनी तुमच्या गाडीत ओव्हरलोड असल्यामुळे तुम्हास क्लेम मिळणार नाही. त्यामुळे कंपनी देईल ती रक्कम मला मान्य असेल असे जर लिहून दिले तरच तुम्हाला क्लेम देणेत येईल. म्हणून अर्जदारने त्यांचे इच्छेविरुध्द तसे कंपनीला लिहून दिले. त्यानंतर जाबदार यांनी रु.1,33,325/- चा चेक अर्जदारास दिला. याबाबत अर्जदार यांनी लेखी पत्र देवून जाबदार यांना खुलासा मागितला असता जाबदार यांनी त्यास उत्तर देवून सदरचा क्लेम तडजोड तत्त्वावर देण्यात आला आहे असे कळविले. अर्जदारचे वाहन अपघाताचे वेळी ओव्हरलोड नव्हते. तसेच अपघातही ओव्हरलोडमुळे झालेला असल्याचे तपासात निष्पन्न झालेले नाही. सबब जाबदारकडून रक्कम रु.1,14,675/- व्याजासह मिळावी, मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी रक्कम मिळावी म्हणून अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज दाखल केला आहे. 2. जाबदार यांनी प्रस्तुतचे कामी त्यांचे लेखी म्हणणे/कैफियत नि. 10 ला दाखल केली आहे. त्यामध्ये त्यांनी अर्जदारचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारलेला आहे. अर्जदारचे वाहनास अपघात झालेनंतर जाबदार यांनी श्री अजित नवले या सर्व्हेअरची नेमणूक करुन वाहनाची पाहणी करुन घेतली. त्यांनी एक्सेस व सॅल्वेज वजा जाता वाहनाचे दुरुस्तीची रक्कम रु. 2,10,728 इतकी निश्चित केली. अर्जदारने सादर केलेल्या कागदपत्रांची छाननी केली असता जाबदार यांना असे आढळून आले की, सदरचे वाहनातून क्षमतेपेक्षा 207 कि.ग्रॅ. एवढया जास्त वजनाचा माल वाहून नेला जात होता. त्यामुळे अर्जदारचा विमादावा नामंजूर होणेस पात्र होता. परंतु अर्जदार यांनी दि. 15/4/2009 रोजी जाबदार यांना अर्जाद्वारे देय रकमेच्या 70 टक्के रक्कम मिळाली तरी काही तक्रार नाही असे कळविले. अर्जदारचे सदरच्या अर्जाचा विचार करुन जाबदार यांनी अर्जदार यांचा रु.1,33,325/- या रकमेचा विमादावा नॉन स्टॅडर्ड बेसीसवर मंजूर केला. केवळ तडजोड म्हणून व अर्जदार हे जाबदारचे प्रतिष्ठित ग्राहक असल्यामुळे सदरचा क्लेम जाबदार यांनी मंजूर केला. सदरचे रकमेचा चेक अर्जदार यांन विनातक्रार, कोणतीही हरकत न नोंदविता स्वीकारला आहे. सबब जाबदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कोणतीही कमतरता केलेली नाही असे जाबदार यांनी त्यांचे कैफियतीमध्ये कथन केले आहे. 3. जाबदारतर्फे अभियोक्ता श्री कालिदास माने यांनी केलेला युक्तिवाद ऐकला. अर्जदारतर्फे दाखल लेखी युक्तिवाद नि. 20 ला पाहिला. तसेच अर्जदार व जाबदारतर्फे दाखल कागदपत्रे पाहिली. 4. प्रस्तुतचे कामी प्रामुख्याने खालीलप्रमाणे मुद्दे उपस्थित होत आहेत. हे मुद्दे व त्यांना दिलेली उत्तरे खालीलप्रमाणे आहेत. मुद्दे उत्तरे अ) अर्जदार व जाबदार यांचे दरम्यान ग्राहक व सेवा देणारे असे नाते आहे काय ? होय ब) जाबदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय ? नाही क) अंतिम आदेश - खाली दिलेल्या कारणास्तव अर्जदार यांचा तक्रारअर्ज नामंजूर करणेत येत आहे. कारणे 5. जाबदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे पाहिली असता असे दिसून येते की, अर्जदार यांनी दि.15/4/2009 रोजी जाबदार यांना अर्ज देवून मला देय रकमेच्या 70 टक्के रक्कम मिळाली तरी माझी तक्रार असणार नाही, सदरचा क्लेम हा नॉन स्टँडर्ड क्लेम करुन 70 टक्के मंजूर केल्यास मला ते मान्य राहील असे नमूद केले आहे. सदरचा अर्जदार यांचे स्वहस्ताक्षरातील अर्ज पाहता अर्जदार यांनी स्वतःहून जाबदार यांचेकडे 70 टक्के रकमेच्या क्लेमची मागणी केली होती हे स्पष्ट होते व त्यानुसार जाबदार यांनी सर्व्हेअरने निश्चित केलेल्या रकमेपैकी 70 टक्के रक्कम ग्राहय धरुन अर्जदार यांना विमादाव्याचा धनादेश प्रदान केला आहे व तो अर्जदार यांनी विनातक्रार स्वीकारलेला आहे. अर्जदार यांना सदरची रक्कम मान्य नव्हती तर अर्जदार यांनी धनादेश स्वीकारतेवेळी जाबदार यांचेकडे तशी हरकत नोंदविणे आवश्यक होते. परंतु तशी कोणतीही हरकत नोंदविल्याचे दाखल कागदपत्रांवरुन दिसून येत नाही. सदरचा सर्व घटनाक्रम विचारात घेता अर्जदार यांनी 70 टक्के रकमेची नुकसान भरपाई मिळालेनंतर पश्चातबुध्दीने या मे.मंचासमोर तक्रारअर्ज दाखल केला आहे हे दिसून येते. सबब तक्रारअर्ज फेटाळणेस पात्र आहे असे या मंचाचे मत आहे. 6. अर्जदार व जाबदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे पाहिली असता असे स्पष्ट दिसून येते की, अपघाताचेवेळी अर्जदार यांचे वाहनातून क्षमतेपेक्षा जास्त वजनाचा माल वाहून नेला जात होता. सदरची बाब विचारात घेता जाबदार यांचा नॉन स्टँडर्ड बेसीसवर विमादावा मंजूर करण्याचा निर्णय योग्य, संयुक्तिक व कायदेशीर आहे असे या मंचाचे मत आहे. सबब जाबदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कोणतीही त्रुटी केलेली नाही. 7. या सर्व कारणास्तव व वर नमूद मुद्दयांच्या दिलेल्या उत्तरास अनुसरुन अर्जदार यांचा तक्रारअर्ज नामंजूर करणेत येत आहे. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज फेटाळणेत येत आहे. 2. खर्चाबाबत काहीही आदेश करणेत येत नाहीत. 3. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 30/06/2011 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |