View 8452 Cases Against New India Insurance
SOPANRAO SHANKARAO SHELKE , filed a consumer case on 14 Jul 2015 against NEW INDIA INSURANCE CO LTD in the Satara Consumer Court. The case no is CC/12/83 and the judgment uploaded on 02 Sep 2015.
सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर
उपस्थिती - मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा.
मा.श्री.श्रीकांत कुंभार, सदस्य.
मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्या.
तक्रार क्र. 83/2012.
तक्रार दाखल ता.8-5-2012.
तक्रार निकाली ता.14-7-2015.
श्री.सोपानराव शंकरराव शेळके,
रा.मु.पो.निंबोडी, ता.खंडाळा,
जि.सातारा. ....तक्रारदार.
विरुध्द
दि न्यू इंडिया अँश्युरन्स कं.लि.
सातारा विभागीय कार्यालय,
जीवनतारा, महिला मजला,
कलेक्टर ऑफिससमोर, सदर बझार,
सातारा 415 001. ..... जाबदार.
तक्रारदारतर्फे – अँड.एस.एन.महामुलकर.
जाबदारातर्फे – अँड.आर.एन.कुलकर्णी.
न्यायनिर्णय
सदर न्यायनिर्णय मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्य यांनी पारित केला.
1. प्रस्तुतची तक्रार या तक्रारदारानी जाबदाराविरुध्द त्यांनी तक्रारदारास दिलेल्या सदोष सेवेबाबत दाखल केलेली आहे.
तक्रारदाराचे तक्रारीचा थोडक्यात आशय खालीलप्रमाणे-
2. तक्रारदार हा मु.पो.निंबोडी, ता.खंडाळा, जि.सातारा येथील रहिवासी असून त्याचा शेतीचा व्यवसाय आहे. त्याचप्रमाणे स्वतःचे व कुटुंबियांचे वापरासाठी म्हणून त्यानी ते स्वतः ड्रायव्हर असलेने त्यानी महिंद्रा मॅक्स ट्रक (लाईट मोटार व्हेईकल) हे वाहन खरेदी केले. त्याचा क्र.MH-11-T-8802 असा होता. सदर वाहनाचा विमा यातील जाबदाराकडे तक्रारदाराने उतरविला होता, त्याचा पॉलिसी क्र.151701/391/09/01/00004171 असा असून या विम्याचा वैध कालावधी दि.29-6-2009 ते दि.28-6-2010 असा होता. याप्रमाणे प्रस्तुत तक्रारदार हे स्वतः वाहन चालवून वाहतुकीचा व्यवसाय करीत असताना कार्यबाहुल्यामुळे प्रस्तुत तक्रारदारानी दि.11-9-2009 पासून विषयांकित वाहनावर हरिभाऊ विनायक माने या वैध चालक परवानाधारक व्यक्तीस चालक म्हणून नेमले होते, त्याचे वैध लायसेन्सचा कालावधी दि.13-6-2009 ते 12-8-2012 असा होता. दि.11-8-2009 रोजी निंबोडे येथील श्री.बोरकर यांचे बैलगाडीचा सांगाडा निंबोडी येथून दालवडी, ता.फलटण, येथे पोहोचवणेसाठी गेले असता सदर सांगाडा पोहोचवून त्या ठिकाणाहून श्री.बोरकर यांचे इतर साहित्य घेऊन निंबोडीकडे पुसेगांव फलटण रस्त्याने येत असता व विषयांकित वाहन वाठार निंबाळकर हद्दीत संध्याकाळी 5.00 चे सुमारास आले असता प्रस्तुत रस्ता हा अत्यंत खराब व खड्डेमय असल्याने व त्यामध्ये पावसाचे पाणी साठल्याने विषयांकित वाहनाचा चालकावर त्याच्या वाहन चालवणेचे वेगावर नैसर्गिकरित्या मर्यादा आली होती व त्याप्रमाणे विषयांकित वाहनाचा चालक विषयांकित वाहन ताशी 30 ते 35 कि.मी.वेगाने चालवीत होता. अचानक पडणा-या पावसाने रस्त्यावरील खड्डयात पाणी साचल्याने त्याचा अंदाज विषयांकित वाहनचालकास न आल्याने व वाहनाचे डाव्या बाजूचे पुढील चाक खड्डयात गेले व खड्डयाचे बाजूस असलेल्या डांबरी सडकेवर ते आदळले. विषयांकित वाहन चालू स्थितीत असल्याने वाहनाचे डाव्या बाजूचे चाक डांबरी रस्त्याच्या कडेला घासले गेले व अचानक टायर फुटला व प्रसतुत वाहन हे झिगझॅग पध्दतीने चालू लागले व प्रसंगावधान राखून सदर वाहन कंट्रोल करणेपूर्वीच विषयांकित वाहन रस्त्याच्या दक्षिण बाजूला असलेल्या झाडावर जाऊन जोराने आदळला व अपघात झाला, त्यामध्ये वाहन चालक माने व तक्रारदाराचा मुलगा रत्नसिंह किरकोळ जखमी झाला. या रत्नसिंह यानेच सदर अपघाताची खबर फलटण पोलिस स्टेशनला दिली, त्याप्रमाणे फलटण पोलिस स्टेशनने गु.र.नं.265/2009 ने गुन्हा नोंद केला. सदर अपघातामध्ये विषयांकित वाहनाचे संपूर्ण चॅसीचे पूर्ण नुकसान झाले, वाहनाचे डाव्या बाजूचे बॅनेट, पुढील काचा यांचे पूर्ण नुकसान झाले. डाव्या बाजूच्या टायररिमचे संपूर्ण नुकसान झाले. सदर अपघाताची माहिती प्रस्तुत अर्जदाराने यातील जाबदारास अपघाताचे दुसरे दिवशी समक्ष जाऊन दिली, त्यानंतर प्रस्तुत जाबदारानी त्यांचे सर्व्हेअरतर्फे विषयांकित वाहनाचे नुकसानीचा सर्व्हे केला व जाबदाराचे पूर्व परवानगीने तक्रारदाराने वाहन ताब्यात घेऊन दुस-या वाहनाचे सहाय्याने मे.सहयाद्री मोटर्स, प्रा.लि. ए 22 जुनी एम.आय.डी.सी.सातारा येथे दुरुस्तीसाठी सोडले व या कंपनीने जाबदारांचे सूचनेप्रमाणे वाहनाची सर्व दुरुस्ती करुन यामध्ये चॅसी बदलणे, डाव्या बाजूची रिम बदलणे व बॉनेटची दुरुस्ती अशी कामे केली व साधारण चार महिन्याने विषयांकित वाहन दि.30-1-2010 रोजी तक्रारदाराचे ताब्यात मिळाले. प्रस्तुत वाहनाचे दुरुस्तीसाठी या तक्रारदारास एकूण रु.2,60,000/- (रु.दोन लाख साठ हजार मात्र)खर्च आला व त्याप्रमाणे तक्रारदाराने वरील वाहनाची अपघाती नुकसानी रु.2,60,000/- मिळणेसाठी सर्व कागदपत्रे, बिले जोडून क्लेम नं.15170131090100066 ने क्लेम नं.151701/2009 जाबदाराकडे दाखल केला व त्यावर जाबदार विमा कंपनीने अपघातसमयी विषयांकित वाहनावर चालक म्हणून काम करीत असलेल्या श्री.हरीभाऊ विनायक माने यांचा चालक परवाना वैध नसल्याने तक्रारदाराचा विमा दावा नामंजूर करणेत आलेचे कळविले. वास्तविक विषयांकित वाहनाचा विमा वैध असताना तो किरकोळ कारणाने नाकारुन जाबदारानी सेवेत त्रुटी केली असल्याने तक्रारदारानी जाबदारांचे विमा अपघात नुकसानी दायित्व नाकारलेने मे.मंचात दाद मागितली असून त्यानी जाबदाराकडून वाहन दुरुस्त खर्च रु.2,60,000/- व्याजासह व वाहनदुरुस्ती कालावधीत चार महिने वाहन बंद होते त्याची नुकसानी प्रतिमाह रु.10000/-प्रमाणे रु.45,000/-, शारिरीक, मानसिक त्रासापोटी रु.50,000/- व अर्जाचा खर्च मिळावा अशी विनंती मंचाकडे केली आहे.
3. तक्रारदारानी प्रकरणी नि.1 कडे तक्रार, त्याचे पृष्टयर्थ नि.2 कडे प्रतिज्ञापत्र, नि.3 सोबत पुराव्याचे एकूण 9 दस्तऐवज पैकी नि.3/1 कडे अपघात प्रथम वर्दीची सर्टीफाय प्रत, नि.3/2 कडे घटनास्थळाचा पंचनामा, नि.3/3 कडे विषयांकित अपघातग्रस्त वाहनाची विमा पॉलिसी, नि.3/4 कडे अपघातसमयी वैध असलेले चालक प्रमाणपत्र, नि.3/5 कडे अपघातग्रस्त वाहनाचे आर.सी.बुक प्रत, नि.3/6 कडे दि.1-10-09 ते 31-1-10 ची बिलाची कॉम्प्युटरप्रत, नि.3/7 कडे जाबदारांचे विषयांकित वाहनाचे आर.सी.पुस्तकाची प्रत, नि.3/8 कडे जाबदारानी तक्रारदारांचा वाहन अपघाती दावा नाकारलेचे पत्र, नि.3/9 कडे एफ.आय.आर.ची प्रत, नि.8 कडे नि.8/1 कडे ची प्रत, नि.8/2 कडे याच अर्जातील नि.23 ची प्रत, नि.23 कडे सातारा मो.अ.क्लेम्स ट्रॅब्युनल यांचे कोर्टातील नि.23/1 एम.ए.सी.पी.क्र.289/2010 चे निकालपत्र, नि.23/2 कडे वरील कामातील अवॉर्डची नक्कल व नि.23/3 कडे वरील निकालपत्रातील सर्व्हेअर रिपोर्ट, नि.24 कडे अर्जदाराचे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र, नि.4 कडे विलंबमाफीचा अर्ज, नि.5 कडे त्याचे पृष्टयर्थ प्रतिज्ञापत्र दाखल केले असून तक्रार दाखल करणेस एकूण 38 दिवसांचा झालेला विलंब माफ करावा असा अर्ज दिला आहे.
4. सदर प्रकरणाच्या नोटीसा रजि.पोस्टाने यातील जाबदारांना मंचातर्फे पाठविणेत आल्या. सदर प्रकरणाची नोटीस यातील जाबदाराना मिळाली, त्याप्रमाणे प्रस्तुत जाबदार हे नि.11 कडे दाखल केलेले वकीलपत्राने जाबदाराचे वतीने अँड.के.आर.माने हजर झाले. त्यांनी त्यांचे विलंमाफीचे अर्जावर त्यांचे म्हणणे, नि.13 कडे व नि.14 कडे त्याचे पृष्टयर्थ प्रतिज्ञापत्र, नि.26 कडे नि.26/1 कडे क्लेमफॉर्म, नि.26/2 कडे सातारा आर.टी.ओ.कडील अपघातग्रस्त वाहनाचे चालकाचे लायसन्सबाबतची माहिती, नि.26/3 कडे तक्रारदारांचे जाबदाराला दिलेले सूचनापत्र, नि.26/4 कडे नवले सर्व्हेअर यांचा रिपोर्ट, नि.25 कडे जाबदारातर्फे अँड.आर.एन.कुलकर्णी यांचे वकीलपत्र, नि.27 कडे जाबदाराविरुध्द झालेला नो से आदेश रद्द करुन मिळणेचा अर्ज व त्यासाठी नि.27/1 कडे म्हणणे/कैफियत, नि.27/2 कडे म्हणण्याचे पृष्टयर्थ प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. प्रस्तुत जाबदारानी तक्रारदारांची तक्रार खोटी आहे, अपघातग्रस्त वाहनावर काम करणा-या चालकाकडे अपघाताचे वेळी वैध (एल.एम.व्ही.ट्रान्स्पोर्ट) असा परवाना असणे आवश्यक होते तो तसा चालकाकडे नव्हता. वाहनामध्ये अपघाताचेवेळी प्रस्तुत वाहनचालकाने प्रवासी वाहतूक केली होती त्यामुळे पॉलिसीच्या अटी व शर्तीचा भंग झाला आहे, त्यामुळे दि.31-3-2010 चे लेखी पत्राने जाबदारानी त्यांचा विमा क्लेम नाकारलेचे कळविले आहे. अपघात झालेपासून किंवा विमा दावा नाकारलेपासून एक वर्षाचे आत सक्षम कोर्टात दावा दाखल करणे आवश्यक होते, त्यामुळे सदरचा तक्रारअर्ज मुदतीत नाही, त्यामुळे तो फेटाळणेत यावा, तक्रारदारांचा क्लेम मंजूर होण्याच्या निष्कर्षाप्रत मंच आले व या कामातील सर्व्हेअरच्या रिपोर्टप्रमाणे साल्व्हेज व्हॅल्यू वजा जाता वाहनाच्या अपघातग्रस्त नुकसानीचे दायित्व रु.1,65,575/- येते ते तेवढयावर मर्यादित ठेवणेत यावे असे आक्षेप जाबदारानी प्रकरणी नोंदवले आहेत.
5. प्रस्तुत तक्रारदारांची तक्रार व त्यासोबत दिलेले पुराव्याचे कागद व जाबदारांची कैफियत त्यातील आक्षेप व कथनांचा आशय लक्षात घेता आमचेपुढे सदर प्रकरणाचे निराकरणार्थ खालील मुद्दे निर्माण होतात-
अ.क्र. मुद्दा निष्कर्ष
1. प्रस्तुत तक्रारदार हा जाबदाराचा ग्राहक आहे काय? होय.
2. प्रस्तुत जाबदाराने तक्रारदार यांचा वैध वाहन अपघात
नुकसानभरपाई दावा मंजूर न करुन व तो
किरकोळ कारणांनी नामंजूर करुन तक्रारदार यांना
द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे काय? होय.
3. अंतिम आदेश काय? तक्रार अंशतः मंजूर.
6. कारणमिमांसा- मुद्दा क्र. 1 ते 3
यातील तक्रारदार हे निंबोडी ता.खंडाळा, जि.सातारा येथील रहिवाशी आहेत व शेती व्यवसाय करतात त्यांनी त्यांच्या कौटुंबिक गरजेसाठी नवीन व्यवसाय म्हणून महिंन्द्रा मॅक्स ट्रक (लाईट मोटर व्हेईकल) नं. एम.एच.11-टी-8802 हे खरेदी केले होते व सदर वाहनाचा सुरक्षिततेचा विमा यातील जाबदारांकडे उतरविला होता. त्याचा पॉलीसी क्र.151701/31/09/01/00004171 असा असून सदर पॉलीसी ही दि.29/6/2009 ते 28/06/2010 अखेर होती व ती वैध होती. या गोष्टी उभयता मान्य व कबूल आहेत याबाबत वाद नाहीत. वरीलप्रमाणे यातील जाबदार हे ग्राहकांच्या वाहनाला विम्याव्दारे ते पुरवित असलेल्या वेगवेगळया सुरक्षेपोटी त्यांनी ठरवलेली फी (हप्ता) आकारुन संबंधित वाहनधारकास एक वर्ष मुदतीची सुरक्षा सेवा पुरवली व हा जाबदारांचा व्यवसाय आहे. वरील व्यवहारावरुन यातील जाबदारांनी या तक्रारदार यास नमूद विषयांकित पॉलीसीने वरील नमूद वाहन क्र. एम.एच.11-टी-8802 यास संरक्षण पुरविलेले होते हे स्पष्ट होते ही बाब जाबदारांना मान्य व कबूल आहे. त्यामुळे याठिकाणी प्रस्तुत जाबदार हे सेवापुरवठादार व तक्रारदार हे सेवा घेणारे असे नाते याठिकाणी प्रस्थापित होते. त्यामुळे प्रस्तुत तक्रारदार हा जाबदाराचा ग्राहक आहे हे पूर्णतः स्पष्ट होते. त्यामुळे मुद्दा क्र. 1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देतो.
6(2) प्रस्तुत प्रकरणातील जाबदारांचे आक्षेप पाहता प्रस्तुत तक्रारदार यांनी नि. 3/7 कडे तक्रारदार यांचा मोटार अपघात नुकसानभरपाई दावा नाकारण्याचे दिलेले एकमेव कारण ‘अपघात समयी वि षयांकित वाहन चालकाकडे वैध चालक परवाना नव्हता’ या एकमेव आक्षेपावर प्रस्तुत तक्रारदार यांचा क्लेम नाकारलेला आहे. या महत्वपूर्ण आक्षेपांचा विचार करता, यातील तक्रारदार यांनी नि. ¾ कडील मा.जिल्हा न्यायालय,सातारा यांचेकडील दाव्यातील कागदपरतीचा (दस्तऐवज) या वि षयांकित वाहनावर अपघातादिवशी चालक म्हणून वाहन चालवणा-या श्री. हरिभाऊ माने यांचा ड्रायव्हींग लायसन दाखल केले आहे. नि.3/5 कडे विषयांकित वाहनाचे आर.सी.बुक (पान नं.77 ते 89 दाखल केले असून, प्रस्तुत अर्जदाराने नि. 23 सोबत नि. 23/1 कडे विषयांकित वाहनाच्या अपघातामध्ये मयत झालेल्या दत्तात्रय बाबूराव बोरकर चा अपघाती मृत्यू दावा (तृतीय पक्ष) दाखल झाला होता. त्या MACP NO. 289/2010 मधील न्यायनिर्णय व अँवॉर्डची प्रत प्रकरणी दाखल केलेली आहे. व नि. 23/3 कडे विमा कंपनीने सर्व्हेअर श्री. नवले यांचा सर्व्हे रिपोर्ट प्रकरणी दाखल केला आहे. वरील जाबदारांचे तक्रारदार यांचा विमा दावा नाकारण्याचे कारणांचा विचार करता, प्रस्तुत अपघातामधील वाहन हे दि.11/9/2009 रोजीच्या अपघातामध्ये नुकसानग्रस्त झाले. त्यावेळी पावसाचे पाणी भरलेल्या खड्डेमय रस्त्यावरुन सदरचे वाहन जात होते व वाहन चालकाला रस्त्यावरील पावसामुळे भरलेल्या खड्डयाचा अंदाज न आलेने विषयांकित वाहनाचे पुढील चाक खड्डयात गेले व वर येताना या वाहनाचा टायर फुटला व गाडीचा तोल जावून ती झीगझ्याग पध्दतीने रस्ता सोडून रस्त्याकडेच्या झाडावर आदळली व विषयांकित वाहन नुकसानग्रस्त झाले व त्याचे अंदाजे रक्कम रु.2,60,000/- (रुपये दोन लाख साठ हजार फक्त) चे नुकसान झाले आहे.
प्रस्तुत कामातील अपघातग्रस्त वाहन व त्यावरील चालक हरिभाऊ याने त्यांचे नि.3/5 व ¾ चे ड्रायव्हींग लायसन अभ्यासले असता असे स्पष्ट दिसते की, विषयांकित वाहन हे LMV Pick-Up या श्रेणीतील होते. व ते दि.1/7/2008 रोजी आर.टी.ओ. सातारा कडे रजिस्टर झाले आहे. व अपघातसमयी ते फिट होते हे पान नं.89 वरील Certificate of fitness कागदपत्रावरुन शाबीत होते. तसेच विषयांकित वाहनावरील चालक श्री. हरिभाऊ माने याचा वाहन चालक परवाना दि.13/8/2009 अखेर LMV (Non transport) असा होता. तो दि.13/08/2009 नंतर LMV(TR) असा झाला. तशाप्रकारच्या नोंदी आर.टी.ओ. सातारा यांनी दि. 13/08/2009 रोजी श्री. हरिभाऊ माने LMV(TR) प्रकारचे लायसन दिलेचे दिसते व तशा नोंदी वरील चालकाच्या अधिकृत लायसनवरती असून
त्याचा वैध कालावधी दि.13/8/2009 पासून पुढे चालू होतो व त्यामुळे प्रस्तुत वि षयांकित अपघातग्रस्त वाहन हे सुध्दा LMV जातीचे असून ते चालविण्याचा वैध चालक परवाना श्री. हरिभाऊ माने यांचेकडे होता हे निर्वादितरित्या शाबीत होते. याच बाबत प्रस्तुत जाबदारांनी आर.टी.ओ. सातारा यांचेकडे विषयांकित वाहनावरील चालकाचे बाबत मिळालेली माहीतीपत्र नि.26/2 कडे दाखल केलेली आहे. त्यामध्ये आर.टी.ओ. यांनी दिलेल्या माहीतीमध्ये व विषयांकित वाहन चालक हरीभाऊ याचे चालक वैध लायसनवरती LMV(TR) अशी नोंद आढळून येते. कदाचित आर.टी.ओ सातारा यांनी सदर नोंद त्यांचे रजिस्टरला केली नसेल, त्यामुळेही नि.26/2 चे आर.टी.ओ चे पत्रात त्याचा उल्लेख नसेल. सदरच्या दि.26/2 च्या नोंदी नि.3/4,नि.3/5 कडील विषयांकीत वाहनाचे चालक श्री. हरीभाऊ माने यांच्या त्यांना आर.टी.ओ यांनी अदा केलेल्या चालक परवान्यावरील नोंदी या आर.टी.ओ.,सातारा यांनी केलेल्या आहेत. याबाबत आमच्या मनात कोणतीच शंका नाही. प्रस्तुत जाबदारांना जर चालकाचे चालक परवाना हा वैध नाही व त्यावरील नोंदी ख-या नाहीत हे दाखवण्यासाठी नि.26/2 कडे जाबदारांनी दाखल केलेला पुरावा आर.टी.ओ. सातारा यांचे पत्र दाखल असून तो पुरेसा पुरावा होत नाही. त्यासाठी प्रस्तुत आर.टी.ओ.चे अँफीडेव्हीट याकामी जाबदारांनी दाखल केलेले नाही. त्यामुळे योग्य पुराव्यानिशी प्रस्तुत जाबदारांनी विमा अपघात नुकसानभरपाई दावा ज्या अवैध चालक परवान्याचे मुद्दयावर नाकारला तो मुद्दा त्यांनी पुराव्यानिशी मंचात शाबीत केलेला नाही. त्यामुळे विषयांकित अपघातग्रस्त वाहनावरील चालक श्री. हरीभाऊ माने यांचा चालक परवाना कायद्याने वैध होता व वि षयांकित अपघातग्रस्त वाहन चालवण्याचा त्यास पूर्ण अधिकार होता ही बाब पूर्णतः स्पष्ट शाबीत होते.
प्रस्तुत प्रकरणातील विषयांकित वाहनाचे अपघातामुळे तृतीयपक्ष मयत इसम दत्तात्रय बाबूराव बोरकर या मयताची अपघाती नुकसानभरपाई दावा मे. सातारा येथील मोटार अपघात न्यायधिकरणसो यांचे कोर्टात MACP No 289/2010 दाखल केला होता. त्यामध्येही प्रस्तुत कामातील जाबदारांकडून विषयांकित वाहनाचे चालकाचा वाहन चालकाचा परवाना वैध होता व त्यावरील LMV (TR)च्या नोंदी ख-या आहेत कारण त्या आर.टी.ओ.सातारा यानी त्यांच्या पत्रामध्ये अवैध आहेत किंवा त्या नाकारलेल्या आहेत असे नि.26/2 च्या पत्रात नोंदलेले नाही.
प्रस्तुत प्रकरणी तक्रारदार यांनी नि.3/4 व नि.3/5 कडे विषयांकीत अपघात वाहनाचे चालक यांचे ड्रायव्हींग लायसन्स दाखल केले आहे. त्याचप्रमाणे जाबदारांनी प्रस्तुत कामी विषयांकीहत वाहनाचा चालक हरिभाऊ माने याचे आ.टी.ओ.कडील वैध वाहन चालक परवाना बाबत आर.टी.ओ.चे पत्र हजर केले आहे. त्यावरील नोंदी पाहता असे दिसते की, विषयांकीत वाहनावरील चालक याला प्रथम दिलेला चालक परवाना हा LMV (Non transport) असा होता. त्यानंतर दि. 13/8/2009 रोजी यास आर.टी.ओ. नी Non transport याला गोल करुन वाहन चालकाच्या मुळ लायसनवरती LMV(TR) असा शिक्का मारलेला आहे. प्रिंटेड शिक्का असे दर्शवितो कि, विषयांकीत वाहन चालकाचे लायसन हे दि.14-5-2004 ते 14-5-2024 असे असल्याचे दर्शवितो. त्याचप्रमाणे विषयांकित वाहन चालक परवान्याच्या मागील पृष्ठावरील नोंदी तपासल्या असता सदर वाहन चालक परवानाधारकाने आर.टी.ओ.साताराकडे दि.13-8-2009 रोजी रिसीट क्र.83065/10 ने रु.30/- भरणा करुन टी.आर.वर्गाचे लायसन मागणी केले व सातारा आर.टी.ओ.अधिकारी यानी संबंधित वाहनचालकाला आवश्यक त्या परिक्षेनंतर एल.एम.व्ही (टी.आर) हा वाहनचालक परवाना दिलेला दिसतो. आमचे मते ही बाब संबंधित आर.टी.ओ.सातारा यानी त्यांच्या रेकॉर्डला नोंद करुन घेतली नसावी असे दिसते. परंतु यातील जाबदारानी प्रकरणी नि.26/2 कडे केलेले पत्र पहाता सदर आर.टी.ओ. सातारा यानी वाहनचालकाच्या प्रकरणी दाखल असलेल्या चालक परवान्यावरील सर्व नोंदीचा खुलासा वरील पत्रामध्ये केलेचे दिसून येत नाही. म्हणजेच आर.टी.ओ. कार्यालयाचे कारभारात त्रुटी आहेत हेच शाबित होते. एल.एम.व्ही.(टी.आर) या नोंदी 2009 पासून विषयांकित वाहन चालकाच्या चालक परवान्यावर नमूद आहेत, त्या खोटया असलेबाबत आर.टी.ओ.सातारा यानी विषयांकित माने चालकावर कोणतीही कारवाई केलेली नाही त्याचप्रमाणे प्रस्तुत कामातील जाबदारांकडून विषयांकित वाहनाचे चालकाचा वाहन चालकाचा परवाना वैध होता व त्यावरील LMV (TR)च्या नोंदी ख-या आहेत कारण त्या आर.टी.ओ.सातारा यानी त्यांच्या पत्रामध्ये अवैध आहेत किंवा त्या नाकारलेल्या आहेत असे नि.26/2 च्या पत्रात नोंदलेले नाही. त्यामुळे सदर वाहनाचे अपघाताचे वेळी वाहनचालक श्री.माने यांचे लायसन एल.एम.व्ही.(टी.आर)असे होते व कायद्याने वैध होते या निष्कर्षाप्रत हा मंच आला आहे त्यामुळे जाबदार विमा कंपनीने वरील मुद्दयावर तक्रारदारांचा वाहन अपघात नुकसानी दावा नाकारणेचे कारण हे अयोग्य व गैरलागू असलेने आम्ही ते फेटाळीत आहोत.
वरील आक्षेपाशिवाय या जाबदारांच्या वाहनाचा अपघात त्यांची नुकसानी याबाबत कोणतेही आक्षेप नाहीत. सदर वाहनाचे अपघातानंतर यातील जाबदारानी आर.टी.ओ.सातारा याना पत्र दिले असून ते प्रकरणी तक्रारदारानी नि.3/7 कडे दाखल केलेले आहे. यामध्ये जाबदार स्पष्टपणे कथन करतात की त्यानी तक्रारदारांचा विषयांकित वाहनाचा अपघात दावा रजिस्टर केला असून जाबदार क्र.2 ने नेमले सर्व्हेअरच्या रिपोर्टप्रमाणे अपघातग्रस्त वाहनास नवीन चेस बसवणेचा सल्ला दिला आहे त्यामुळे अपघातग्रस्त वाहनास नवीन चेसीस बसवणेस मंजुरी मिळावी अशा आशयाचे पत्र दिले आहे त्यामुळे वाहन अपघात जाबदाराना मान्य असल्याचे स्पष्ट होते. तक्रारदारांचा अपघात नुकसानग्रस्त वाहन भरपाइ दावा नाकारणेचे नि3/7 ए चे पत्रातील कारणाशिवाय जाबदार विमा कंपनीचे इतर कोणतेही आक्षेप नाहीत हे सुध्दा आमचेसमोर स्पष्ट झाले आहे. वरील आक्षेप(वैधचालक परवाना बाबत)चे ते अवैध असलेबाबत जाबदार विमा कंपनीने पुराव्यासह शाबीत केलेले नाहीत. जाबदारांचे नि3/7 ए कडील तक्रारदारांचा विमा दावा नाकारणा-या कारणाशिवाय प्रस्तुत जाबदारानी त्यांचे म्हणण्यामध्ये इतर आक्षेपही घेतलेले आहेत परंतु ज्यावेळी विमा कंपनी एखाद्याचा वाहन अपघात विमा दावा ज्या कारणासाठी नाकारलेचे संबंधित वाहनधारकास कळविते त्यावेळी तो एकमेव अंतिम असा महत्वाचा आक्षेप विमा कंपनीचा असतो व तो वगळता इतर सर्व बाबींचे समाधान विमा कंपनीचे झालेले असते असा त्याचा स्पष्ट अर्थ असतो, त्यामुळे जाबदारानी त्यांचे कैफियतीत (विमा दावा नाकारणेचे पत्रातील कारणाशिवाय)घेतलेले सर्व आक्षेप हे पश्चातबुध्दी (After thought) असे असलेने त्यांचा उहापोह करणेची मंचास आवश्यकता वाटत नाही त्यामुळे जाबदारांचे कैफियतीतील घेतलेले आक्षेप हे गैरलागू आहेत असे आमचे स्पष्ट मत आहे त्यामुळे तक्रारदारांचा विषयांकित वाहन अपघात नुकसानी विमा दावा तक्रारदारास देणे योग्य असताना तो निष्काळजीपणे किरकोळ कारण देऊन नाकारुन तक्रारदाराना जाबदारानी सदोष सेवा दिली असल्याचे निर्विवादरित्या शाबित होते व त्यामुळेच तक्रारदारांचा वाहन अपघाती विमा दावा अंशतः मंजूर करणेस पात्र आहे या निष्कर्षाप्रत हा मंच आला आहे त्यामुळे मुद्दा क्र.2 व 3 चे उत्तर आम्ही होकारार्थी देतो.
6.3- सदर प्रकरणी तक्रारदाराने मागणी केलेली विषयांकित वाहनाचे नुकसानीपोटी रक्कम रु.2,60,000/-ची मागणी केलेली आहे. या अनुषंगाने जाबदारांचा युक्तीवाद पाहिला असता त्यानी असा युक्तीवाद केला की, त्यानी मे.मंचाने तक्रारदारांचा वाहन अपघाती विमा क्लेम मंजूर करायचे निर्णयाप्रत हा मंच आलेस या कामी सदर जाबदारानी सदर प्रकरणी नि.26/4कडे दाखल केलेल्या श्री.नवले सर्व्हेअर यांच्या रिपोर्टमध्ये त्यानी दर्शविलेली जबाबदारीची रक्कम रु.1,78,075/- इतकीच मंजूर करावी असा युक्तीवाद केला. सदर कामी यातील तक्रारदारानी नि.3/6 कडे प्रत्यक्ष अपघातग्रस्त वाहनाची दुरुस्ती सहयाद्री मोटर्स प्रा.लि. सातारा यांचेकडून करुन घेऊन त्याप्रमाणे प्रत्यक्ष दुरुस्तीपोटी रक्कम रु.2,60,000/- ची रक्कम अदा केलेली आहे हे नि.3/6 कडील सादर केलेल्या मूळ टॅक्स इन्व्हॉईस (क्रेडिट सेल्स जॉब)या रोखीच्या पावतीवरुन स्पष्ट दिसून येते. म्हणजेच अपघातग्रस्त वाहनाची जी मोडतोड झाली तिला अनुसरुन प्रत्यक्ष गेलेले पार्टस् तक्रारदारांनी वाहनात घातलेले आहेत व त्याचे नेमके बिल व लेबर चार्जेस व व्हॅट टॅक्स इ.सर्व मिळून रक्कम रु.2,60,000/- सहयाद्री मोटर्स याना अदा केलेचे दिसते. यातील जाबदारांचा नि.26/4 कडील नवले सर्व्हेअरचा रिपोर्ट पहाता सदर सर्व्हेअरने समरी अँसेटसमध्ये एस्टिमेटेड रक्कम रु.3,87,534.04 इतकी दाखवली आहे व अँसेस्ड रक्कम रु.1,78,075.07 दाखवली आहे. परंतु ही बाब आम्हांस पटणारी नाही. कारण सदर तक्रारदारानी प्रत्यक्ष वाहनावरील केलेला खर्च व त्याची बिले सादर केली असताना नि.26/4 कडील सर्व्हेरिपोर्टवर आधारुन तक्रारदाराना अकारण कमी बिल देणे हे न्याय्य, योग्य व तर्कसंगत असलेचे आम्हांस वाटत नाही त्यामुळे सदर तक्रारदार हा त्याच्या मागणीप्रमाणे त्याने विषयांकित अपघातग्रस्त वाहनावर रक्कम रु.2,60,000/- इतका खर्च केल्याची बाब त्याने निर्विवादरित्या नि.3/6 कडील पुराव्याने शाबित केली आहे. त्यामुळे वाहनाच्या नुकसानीपोटी रु.2,60,000/- त्यावर दि.30-1-2010 पासून द.सा.द.शे.9% दराने संपूर्ण रक्कम फिटेपर्यंतचे व्याजासह होणारी संपूर्ण रक्कम व शारिरीक, मानसिक त्रासापोटी रु.25,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.5,000/- मिळणेस प्रस्तुत तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हा मंच आला आहे. तक्रारदारांचे विनंतीअर्ज कलम 14 ब प्रमाणे त्यानी व्यवसायाचे झालेले नुकसान सप्रमाण सिध्द न केलेमुळे सदर मागणी नामंजूर करणेत येते. सदर कामी तक्रारदारानी त्यांच्या नि.15 कडे एकूण 7 केसलॉज व नि.16 कडे एकूण 3 केसलॉज दाखल केले आहेत. सदरचे केसलॉज व सदर प्रकरणातील वस्तुस्थितीचा विचार करता त्या भिन्न असलेचे आढळते त्यामुळे सदर प्रकरणी सदर न्यायनिर्णय लागू होत नाहीत असे या मंचाचे स्पष्ट मत आहे.
7. वरील सर्व कारणमीमांसा व विवेचनास अधीन राहून खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करणेत येतात-
आदेश
1. तक्रारदारांची तक्रार अंशतः मंजूर करणेत येते.
2. जाबदारानी तक्रारदारांचा वैध वाहन अपघात नुकसानभरपाई दावा किरकोळ कारण देऊन नामंजूर करुन तक्रारदाराना द्यावयाचे सेवेत प्रस्तुत जाबदारानी त्रुटी केली आहे असे घोषित करणेत येते.
3. सदर जाबदारानी तक्रारदारांना विषयांकित वाहनाच्या नुकसानीपोटी रु.2,60,000/- (रु.दोन लाख साठ हजार मात्र) व त्यावर दि.30-1-2010 पासून द.सा.द.शे.9% दराने होणारे संपूर्ण व्याजासह होणारी संपूर्ण रक्कम सदर आदेश प्राप्त झालेपासून 4 आठवडयात तक्रारदाराना अदा करावी.
4. सदर जाबदारानी तक्रारदाराना शारिरीक, मानसिक त्रासापोटी रु.25,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.5,000/- सदर आदेश प्राप्त झालेपासून 4 आठवडयाचे आत तक्रारदाराना अदा करावी.
5. तक्रारदारांचा अर्ज कलम 14-ब मधील मागणी नामंजूर करणेत येते.
6. सदर न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
7. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य देणेत याव्यात.
ठिकाण- सातारा.
दि. 14-7-2015.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.