निकालपत्र :- (दि.05/10/2010) ( सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र. 2 व 3 त्यांचे वकीलांमार्फत हजर झाले. त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले. सामनेवाला क्र. 2 व 3 तर्फे लेखी युक्तीवाद दाखल, सामनेवाला क्र.1 यांना मंचातर्फे नोटीस लागू होऊनही ते सदर कामी हजर झालेले नाहीत किंवा त्यांनी लेखी म्हणणे दाखल केलेले नाही. सबब हे मंच त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश पारीत करीत आहे. तक्रारदारचे वकील व सामनेवाला क्र. 2 व 3 चे वकीलांचा युक्तीवाद ऐकणेत आला. सदरची तक्रार तक्रारदाराचा न्याययोग्य विमा दावा सामनेवाला विमा कंपनीने नाकारल्यामुळे दाखल करणेत आला आहे. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:- अ) यातील तक्रारदार हे मौजे पोरेवाडी पोष्ट आमरोळी ता.आजरा जि.कोल्हापूर येथील कायमचे रहिवाशी आहेत. तक्रारदार यांचे पती सुभाष जोतीबा पाटील यांनी सामनेवाला क्र. 2 व 3 यांचेकडे दि.22/05/2006 रोजी रक्कम रु.10,200/- भरुन पॅनकार्ड कम्फर्ट मेंबरशिप स्विकारली होती. त्याचा फोलीवो नं.AKV-372/1-20-00003758 असा आहे. सदरचे मेंबरशिप सोबत आयुर्विमा फायदे देय असलेबाबतची स्पष्ट हमी व खात्री सामनेवाला क्र. 2 व 3 यांनी दिलेली होती. त्याप्रमाणे समनेवाला क्र. 2 व 3 यांनी तक्रारदारचे पतीचा सामनेवाला क्र.1 इन्शुरन्स कंपनीकडे रक्कम रु.4,00,000/- ची ग्रुप विमा पॉलीसी उतरविलेली होती. तिचा पॉलीसी क्र.110800/42/04/03274 असा होता. सदर पॉलीसीचा अंमल दि.18/06/2006 पासून सुरु होता. प्रस्तुत सामनेवाला क्र. 2 व 3 यांनी उतरविला होता. तक्रारदारचे पती सुभाष जोतीबा पाटील हे दि.30/04/2009 रोजी मयत झाले.त्यानंतर दि.05/05/2009रोजी यातील तक्रारदार यांनी सामनेवाला विमा कंपनीकडे त्यांचे पतीचे ग्रुप विम्याच्या रक्कमेचा मागणी अर्ज व त्यासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडून सामनेवाला क्र.3 यांचेकडे जमा केला. त्यानंतर दि.19/05/2009 व 09/06/2009 रोजी सामनेवाला क्र.3 यांचेकडे प्रत्यक्ष भेटून ग्रुप विम्याच्या रक्कमेची मागणी केली असता सामनेवाला क्र.3 यायांनी उडवाउडवीची उत्तरे देवून विमा रक्कमेची मागणी मंजूर करता येणार नाही असे सांगितले व त्यांचेकडे विमा मागणीच्या दिलेल्या अर्जाची पोहोचही देणेचे टाळले आहे. ब) मयत सुभाष जोतीबा पाटील यांना तक्रारदार क्र. 1 ते 4 हे सरळ व कायदेशीर वारस आहेत. तक्रारदारचे मयत पतीचे पॉलीसीतील तरतुदीनुसार तक्रारदार व इतर सर्व वारसदार यांना सदर पॉलीसीची रक्कम व त्यावर मिळणारे सर्व आर्थिक फायदयांच्या रक्कमेसह एकूण होणा-या रक्कमेची मागणी सामनेवाला यांचेकडे वेळोवेळी प्रत्यक्ष भेटून केली. परंतु त्याची दखल सामनेवाला यांनी घेतली नाही. त्यामुळे तक्रारदाराने दि.08/08/2009रोजी सामनेवाला यांना वकीलांमार्फत कायदेशीर लेखी नोटीस पाठवली असता त्यास जुजबी उत्तर पाठवून दिलेले आहे. त्यास अनुसरुन तक्रारदाराने दि.11/09/2009 रोजी कागदपत्रांची पूर्तता करुन दिली. तरीही सामनेवाला यसांनी विम्याची रक्कम देणेचे टाळले. त्यामुळे प्रस्तुतची तक्रार मे. मंचात दाखल करणे भाग पडले. सबब सामनेवाला यांचेकडून विम्याची रक्कम रु.4,00,000/-,मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.10,000/-,प्रवास खर्चाची रक्कम रु.5,000/-, तक्रार अर्जाचा खर्च व वकील फी रक्कम रु.8,000/-असे एकूण रक्कम रु.4,23,000/- व्याजासह सामनेवाला यांचेकडून वसुल होऊन मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (3) तक्रारदाराने आपल्या तक्रारीसोबत पॅनकार्ड क्ल्ब्ज लि. चे प्रमाणपत्र, मृत्यू दाखला, सुभाष पाटील यांचे ओळखपत्र, संदर्भ चिठ्ठी, सामनेवाला यांना पाठविलेली नोटीस व त्याची रजि.ए.डी.ची पोहोच, त्यास सामनेवाला क्र.1 यांचे आलेले उत्तर, सामनेवाला यांना पाठविलेले पत्र व त्याची रजि.ए.डी.ची पोहोच इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (4) सामनेवाला क्र.2 व 3 यांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार तक्रारदार हे सामनेवाला क्र.2 व 3 यांचे ग्राहक संरक्षण कायदा 1986 चा विचार करता सामनेवाला यांचे ग्राहक होत नाहीत. सामनेवालांकडून ज्या व्यक्तीने मेंबरशिप घेतलेली होती त्या सामनेवाला यांचे मेंबरना सामनेवाला हे विमा उतरविणेबाबत सहकार्य करत असतात. त्यासाठी कोणत्याही प्रकारची फी आकारली जात नाही. त्याप्रमाणे तक्रारदाराचे पतीस सामनेवाला क्र.1 यांचेकडे विमा उतरविणेसाठी सामनेवाला क्र.2 यांना सहकार्य केलेले होते. सामनेवाला यांनी तक्रारदाराचे पतीकडून सामनेवाला क्र.1 या कंपनीकडे विमा उतरविणेसाठी घेतलेला हप्ता सामनेवाला क्र.1 या विमा कंपनीकडे पाठविलेला आहे. प्रथमत: सन 2006-07 काही व्यक्तीनी मेंबरशिप घेतलेली होती. त्याप्रमाणे दरवर्षी ती रिन्यू केली जात असे.त्याप्रमाणे सन 2007-08 व 08-09 साठीचा विमा हप्ता सामनेवाला कंपनीकडे पाठवून दिलेला आहे. सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदाराचे पतीस सदर विम्याबाबतची सुविधा उपलब्ध करुन दिलेली होती व त्याप्रमाणे तक्रारदाराचे पतीचे विमा हप्ते सामनेवाला क्र.1 यांचेकडे पाठवून दिलेले आहेत. सबब प्रस्तुत सामनेवाला यांची कोणतीही सेवात्रुटी नाही. सामनेवाला यांचे मार्फत सामनेवाला क्र.1 यांचेकडे विमा उतरविलेल्या विमाधारकाचा जर अपघात झाला अथवा अपघाती मृत्यू झाला तर प्रस्तुत विमाधारक हे विमा/मेडिक्लेम फायदे मिळणेस पात्र आहेत. सामनेवाला हे फक्त सदर व्यक्तींकडून विमा हप्ता घेणे व तो सामनेवाला क्र.1 कंपनीकडे पाठवून देणे असे फक्त मध्यस्थाचे कार्य करतात. तक्रारदारास सामनेवालाच्या मेंबरना सदर सामनेवाला क्र.1 कडून विमा सेवा मयत मेंबर व सामनेवाला क्र.2 यांचेमध्ये असलेल्या अटी व शर्तीनुसार मिळणेस पात्र आहेत. प्रस्तुतची तक्रार दाखल करणेपूर्वी सदर सामनेवाला यांना कोणतीही कल्पना दिलेला नाही. सामनेवाला क्र.2 व 3 असे प्रतिपादन करतात की, सामनेवाला क्र.2 हे सामनेवाला क्र.1 कडे मयत मेंबरने प्रथमत: सन 2006-07 मध्ये मेंबरशिप घेतलेली होती व दरवेळी ती वेळोवेळी रिन्यु केलेली आहे. त्याप्रमाणे तक्रारदारचे मयत पतीचा विमा उतरविणेसाठी प्रक्रिया केलेली आहे व त्याप्रमाणे सामनेवाला क्र.1 कडे विमा हप्ता पाठवून दिेलेला आहे. त्याची पावती सामनेवाला क्र.2 कडे आहे. सामनेवाला यांनी तक्रारदाराचे पतीचाही विमा हप्ता पाठवून दिलेला होता व त्याप्रमाणे रक्कम रु.4,00,000/- चा विमा सामनेवाला क्र.1 यांचेकडून मिळालेला होता. सबब तक्रार अर्ज कलम 2 मधील तक्रारदाराचे पती सामनेवाला यांचे मेंबरशिप फी पोटी रक्कम रु.10,200/- ही फोलीओ क्र.ए.के.व्ही/372/1-20-00003758 व्दारा घेतलेचे सामनेवाला क्र.2 यांनी नाकारलेले आहे. मात्र रक्कम रु.4,00,000/- चा विमा सामनेवाला क्र.1 कडून प्राप्त झालेची बाब खरी असलेचे नमुद केले आहे. तसेच तक्रार अर्ज कलम 3 मधील तक्रारदारचे पती दि.30/04/2009 रोजी मयत झाले व सदर क्लेमचे कागदपत्रे सामनेवाला क्र.3 यांचेकडे दि.05/05/2009 रोजी पाठवलेची बाब सामनेवाला यांनी नाकारलेली आहे. त्याचप्रमाणे दि.19/05/09 व 09/06/09 रोजी विमा रक्कमेचे मागणीबाबत सामनेवाला क्र.2 यांचेकडे तक्रारदाराने भेट दिलेचे नाकारलेले आहे. सामनेवाला पुढे असे प्रतिपादन करतात की, तक्रारदार हा विमा रक्कम मागणीच्या प्रक्रियेत अत्यावश्यक असणारी कागदपत्रे दाखल करणेस असमर्थ ठरला. तक्रार अर्ज कलम 4 मधील वारसाबाबतच्या मजकूराबाबत सामनेवालांना ज्ञान नाही. तक्रार अर्ज कलम5 मधील मजकूर नाकारलेला आहे. मात्र सदर मजकूरातील तक्रारदाराकडून दि.08/08/2009 रोजी नोटीस मिळालेबाबत तसेच सदर नोटीसला दि.17/08/2009 रोजी उत्तर दिलेचे मान्य केलेले आहे. तक्रारदाराने तक्रार अर्ज कलम 6 मध्ये मागणी केलेप्रमाणे रक्कमा देणेस सामनेवाला जबाबदार नाही. प्रस्तुतची तक्रार चालविणेचे अधिकार क्षेत्र सदर मंचास येत नाही. कारण काही वाद निर्माण झालेस क्लॉज 19 प्रमाणे फक्त मुंबईत येथील कोर्टाला अधिकारक्षेत्र राहील असे नमुद केले आहे. 30 दिवसांच्या आत मृत्यू दावा व त्याबाबतचे कागदपत्रे विमा कंपनीकडे पाठवणे आवश्यक आहे. तसेच सामनेवालांचे मेंबरचा नैसर्गिक अथवा अपघाती मृत्यू झालेस त्याची मेंबरशिप त्यांचे नॉमिनीला वर्ग केली जाते व तो नॉमिनी “ Entitlement of unused room night or surrender value” चा लाभ मिळणेस पात्र राहतो व सदरच्या सेवा हया विनामुल्य दिल्या जात असलेने तक्रारदार त्यांचे ग्राहक होत नाहीत. तक्रार अर्ज कलम 7 ते 9 व 11 मधील मजकूर नाकारला आहे. विमा रक्कम देणेस सामनेवाला क्र. 2 व3 यांना जबाबदार धरता येणार नाही. सबब सामनेवाला क्र. 2 व 3 यांचेविरुध्द केलेली मागणी मान्य करता येणार नाही. कारण सामनेवाला क्र. 2 व 3 यांचे विरुध्द तक्रारीस कोणतेही कारण उदभवलेले नाही. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासहीत नामंजूर करावी अशी विनंती केलेली आहे. (5) सामनेवाला क्र. 2 व 3 यांनी शपथपत्रासह आपले म्हणणे दाखल केले आहे.तसेच तक्रारदारचे मयत पतीचा मेंबरशिप अॅप्लीकेशन फॉर्म दाखल केला आहे. (6) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवाला क्र. 2 व3 यांचे लेखी म्हणणे व सामनेवाला क्र. 2 व 3 यांचा लेखी युक्तीवाद तसेच उभय पक्षांचा युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1. सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? ---होय सामनेवाला क्र.1 2. तक्रारदार विमा रक्कम व्याजासहीत मिळणेस पात्र आहे काय ?--- होय. 3. काय आदेश ? --- शेवटी दिलेप्रमाणे मुद्दा क्र.1 व 2 :- तक्रारदाराने दाखल केलेल्या निशान क्र.3-ए च्या दाखल कागदपत्राचे अवलोकन केले असता तक्रारदाराचे मयत पती सुभाष पाटील यांनी सामनेवाला क्र. 2 व 3 यांचेकडे रक्कम रु.10,200/- भरुन मेंबरशिप घेतलेली होती व सदर मेंबरशिपचा कालावधी हा 3 वर्षाचा असून त्याचा कालावधी हा दि.22/05/2006 ते 22/05/2009 असा होता व सदर मेंबरशिपपोटी पर्सनल अॅक्सिडेंटल डेथ इन्शुरन्स पॉलीसी क्र.110800/42/04/03274 विमा रक्कम रु.4,00,000/- सदर विमा प्रभावीत दि.18/06/2006 अशा प्रकारचा विमा लाभ मिळणेस पात्र असलेचे नमुद केले आहे. सामनेवाला यांनी आपल्या युक्तीवादमध्ये मयत सुभाष पाटील यांनी सामनेवाला क्र. 2 व 3 कडे रक्कम रु.10,200/- भरुन मेंबरशिप मिळणेसाठी अर्ज केलेला होता. त्याप्रमाणे सामनेवाला यांनी मेंबरशिप सर्टीफिकेट पाठवून दिले आहे. तसेच सदर प्रमाणपत्रानुसार नमुद विमा सरंक्षण कोणत्याही प्रकारची फी न घेता सामनेवाला क्र.1 यांना विम्यापोटी हप्ता दिलेला आहे व त्याप्रमाणे दि.18/06/2006 रोजी विमा लाभ मिळणेस नमुद मेंबर पात्र आहेत. नमुद मेंबर सुभाष जोतीबा पाटील हे दि. 30/04/2009 रोजी मयत झालेचे मृत्यू प्रमाणपत्रावरुन दिसून येते व सदरचा मृत्यू हा कुत्रा चावून रॅबिज झालेने झाला आहे. सबब तो अपघाती मृत्यू आहे. त्याबाबत तक्रारदाराने तक्रारीत नमुद केलेप्रमाणे दि.05/05/2009 रोजी क्लेम मागणी केली मात्र त्यासोबत सामनेवाला क्र.1 कडे कोणताही कागदोपत्री पुरावा जोडलेला नाही. तसेच तक्रारदाराने सामनेवाला क्र. 1 ते 3 यांना रजिस्टर ए.डी.ने नोटीस पाठवलेल्या आहेत व सदरच्या नोटीस सामनेवाला यांना मिळालेबाबतची पोच प्रस्तुत प्रकरणी दाखल आहे. दि.08/08/2009 रोजी प्रस्तुत नोटीसा पाठवलेल्या आहेत व सदर नोटीसमध्ये नमुद विमा लाभापोटी पात्र असणारी रक्कम रु.4,00,000/- ची मागणी तक्रारदाराने केलेली आहे. त्यास सामनेवाला क्र. 2 व 3 यांनी दि.17/08/2009 रोजी प्रतिउत्तरी नोटीस पाठवून सदर विमा रक्कम देणेची जबाबदारी सामनेवाला क्र. 2 व 3 यांची नसून ती सामनेवाला क्र.1 यांची असलेबाबत कळवलेचे दिसून येते. प्रस्तुत कागदपत्रावरुन तक्रारदारचे पती सुभाष पाटील यांचा विमा सामनेवाला क्र.1 यांचेकडे उतरविलेची वस्तुस्थिती निर्विवाद आहे. मुद्दा उपस्थित होतो तो तक्रारदाराचे पतीचा मृत्यू हा अपघाती आहे किंवा नाही. तक्रारदाराने दि. 21/04/2010 रोजी दाखल केलेल्या आरोग्य विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर प्राथमिक आरोग्य केंद्र आडकुर ता.चंदगड जि.कोल्हापूर क्र.6911 दि.30/04/2009 च्या केसपेपरवरुन नमुद सुभाष पाटील यास दि.30/04/2009 रोजी उपचारासाठी नातेवाईकांनी दाखल केलेले होते व सदर नातेवाईकांनी त्याला दोन महिन्यापूर्वी कुत्रा चावल्याचे माहिती दिलेली आहे व त्यावेळी त्यास अन्टी रॅबीजचे इंजेक्शन घेतलेले नाही व तो रॅबीज झालेल्या व्यक्तीप्रमाणे वर्तन करत आहे तसेच प्रस्तुतचा रोगी हा बोलण्याच्या परिस्थितीत नव्हता व तो अनकॉन्शन्स होता असे नमुद केले आहे. तसेच दाखल पंचनाम्यावरुन दोन महिन्यापूर्वी सुभाष पाटील याना पिसाळलेले कुत्रे चावले होते मात्र सदर कुत्रे साधे आहे की पिसाळलेले आहे हे त्यास समजून आले नाही. त्याने दोन धनूर्वाताचे इंजेक्शन घेऊन तो कामास गेला जखम बरी झाली मात्र कुत्रयाच्या लाळेपासून रॅबीज नावाचा आजार झाला व त्याचे विष त्याचे शरिरात मिसळले गेले. तो कामानिमित्त म्हापसा गोवा येथे राहत होता. त्याने घरी काहीच कळवले नव्हते. दोन महिन्यानंतर त्याचा आजार शेवटच्या टप्यात येऊन पोहोचला. त्याचे पोटात दुखायला लागलेवर त्याचा मृत्यू होण्याच्या दोन दिवस आधी तो त्याचे गावी आला. सदर प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी त्यांचेवर उपचार केले मात्र त्याचावर उपयोग झाला नाही. पुढील उपचारासाठी सी.पी.आर.हॉस्पिटल,कोल्हापूर येथे नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला ही बाब नमुद केली आहे. तसेच महाराष्ट्र आरोग्य सेवा विकास प्रकल्प संदर्भ चिठ्ठी, प्राथमिक आरोग्य केंद्र, आडकूर ता.चंदगड जि.कोल्हापूर यांनी संदर्भीत केलेनुसार सुभाष जोतीबा पाटील वय 30 पुरुष नोंदणी क्र.6911 पत्ता–पेरेवाडी ता.चंदगड संदर्भाची तारीख 30/04/2009 रोजी नोंदवलेल्या निष्कर्षानुसार रोग्याचे उजव्या पायास दोन महिन्यापूर्वी कुत्रे चावले होते व तो पाण्यास भित होता. तो रॅबीज झालेल्या व्यक्तीप्रमाणे वर्तन करत होता. अशा नोंदी केलेल्या आहेत. सदर नोंदीचा आधार घेता तक्रारदाराचे पतीचा कुत्रा चावुन अपघाती मृत्यू झालेचे निदर्शनास येते. तक्रारदाराने दि.08/08/2009 रोजी सामनेवाला क्र.1 यांनाही नोटीस पाठवलेली होती. सदर नोटीस सामनेवाला यांना मिळालेबाबतची पोच प्रस्तुत प्रकरणी दाखल आहे. सदर नोटीसमध्ये सर्व कागदपत्रे जोडून ती सामनेवाला यांचेकडे जमा केलेचे नोंद केली आहे. तसेच प्रस्तुतचा विमा हा ग्रुप विमा असून त्यास सामनेवाला हे उडवाउडवीची उत्तरे दिलेली आहेत व अर्जास पोच देणेचे टाळले आहे. तक्रारदार व त्यांचे वारस पॉलीसीची रक्कम रु.4,00,000/- व त्याप्रमाणे फायदे मिळणेस पात्र आहेत. सबब सदरची रक्कम देणेची व्यवस्था करणेबाबत कळवलेचे दिसून येते. त्यास सामनेवाला क्र.1 यांनी उत्तर दिलेले नाही. तसेच सदर मंचामार्फत प्रस्तुत प्रकरणी पाठवलेली नोटीस सामनेवाला यांनी स्विकारुनही ते मंचासमोर आलेले नाहीत व लेखी म्हणणेही दाखल केलेले नाही अथवा युक्तीवादही केलेला नाही. सबब याचा अर्थ तक्रारदाराची तक्रार त्यांना मान्यच आहे असाच निघतो. वरील विस्तृत विवेचनाचा विचार करता सामनेवाला क्र. 2 व 3 यांनी मयत सुभाष पाटील यांचेकडून विमा हप्ता स्विकारुन ती रक्कम सामनेवाला क्र.1 यांना पाठविलेली आहे. व त्याप्रमाणे पॉलीसीचा नंबर व रक्कम व कालावधी त्यांचे प्रमाणपत्रावर नोंद आहे. यामध्ये सामनेवाला क्र. 2 व 3 यांची कोणतीही सेवात्रुटी दिसून येत नाही. कारण ते फक्त मध्यस्थाचे काम करतात. नमुद सामनेवालांचे मेंबरशिपचे प्रमाणपत्रावर व्यक्तीगत अपघात मृत्यू विमा पॉलीसी क्र.110800/42/04/03274 नोंद आहे. तसेच सदरचा विमा हा ग्रुप पॉलीसी अंतर्गत उतरविलेचे सामनेवाला यांनी मान्य केले आहे. सबब तक्रारदार त्याप्रमाणे रक्कम रु.4,00,000/- व्याजासहीत मिळणेस पात्र आहेत. तक्रारदाराने नोटीस देऊनही सामनेवाला क्र.1 यांनी त्याबाबत कोणतेही पाऊल उचललेले नाही. ही सामनेवाला क्र.1 यांचे सेवेतील गंभीर त्रुटी आहे. मुद्दा क्र.3 :- तक्रारदाराने सदर विमा रक्कम मिळणेसाठी प्रस्तुत तक्रार दाखल करणेपूर्वी प्रयत्न केलेले आहेत. प्रस्तुत सामनेवाला यांना वकीलांमार्फत नोटीसही पाठविलेली आहे. त्याची सामनेवाला यांनी दखल घेतलेली नाही. त्यामुळे तक्रारदारास प्रस्तुतची तक्रार दाखल करावी लागली आहे. तक्रारदार क्र.1 ही विधवा असून ती मयत सुभाष पाटील यांचे पत्नी आहे. तक्रारदार क्र.2 ही पाच वर्षाची मुलगी आहे. तक्रारदार क्र. 3 व 4 हे तक्रारदाराचे सासु-सासरे आहेत. घरातील कर्त्या पुरुषाच्या मृत्यूमुळे त्यांचे कुटूंबावर ओढवलेल्या आर्थिक आपत्तीमध्ये सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदाराचे क्लेमबाबत कारवाई करणे भाग होते ते न केलेने तक्रारदार हे शारिरीक व मानसिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करणेत येते. 2) सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारास विमा रक्कम रु.4,00,000/- त्वरीत अदा करावेत. सदर रक्कमेवर दि.08/08/2009 पासून ते संपूर्ण रक्कम अदा होईपर्यत द.सा.द.शे. 9 टक्के व्याज अदा करावे. 3) सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 2,000/-(रु.दोन हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.1,000/-( रु. एक हजार फक्त) अदा करावेत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |