(मा.अध्यक्ष,श्री.आर.एस.पैलवान यांनी निकालपत्र पारीत केले) नि का ल प त्र अर्जदार यांना सामनेवालाकडून अर्ज कलम 8 मध्ये नमूद केल्याप्रमाणे रक्कम रु.81,975/-मिळावेत, सदर रकमेवर अर्ज दाखल तारखेपासून रक्कम अदा करेपर्यंत द.सा.द.शे.18% दराने व्याज मिळावे, अर्जाचा खर्च मिळावा या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे. सामनेवाला यांनी पान क्र.39 लगत लेखी म्हणणे व पान क्र.40 लगत प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे. अर्जदार व सामनेवाला यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतलेले आहेतः मुद्दे 1. अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय? -- होय 2. सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यात कमतरता केली आहे काय? -होय 3. अर्जदार क्र.1 हे सामनेवाला यांचेकडून विमा क्लेमपोटी व्याजासह रक्कम वसूल होऊन मिळणेस पात्र आहेत काय? --- होय 4. अर्जदार क्र.1 हे सामनेवाला यांचेकडून मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी रक्कम वसूल होऊन मिळणेस पात्र आहेत काय? -- होय 5. अंतीम आदेश? -- अर्जदार क्र.1 यांचा तक्रार अर्ज सामनेवाला विरुध्द अंशतः मंजूर करण्यात येत आहे. विवेचनः याकामी अर्जदार यांचे वतीने अँड.एस.एस.कोतवाल यांनी युक्तीवाद केलेला आहे तसेच ग्राहक तक्रार अर्ज क्र.31/2011 मध्ये पान क्र.43 लगत एकत्रित लेखी युक्तीवाद दाखल केलेला आहे. सामनेवाला यांचेवतीने अँड. एस.एस.पुर्णपात्रे यांनी युक्तीवाद केलेला आहे तसेच ग्राहक तक्रार अर्ज क्र.31/2011 मध्ये पान क्र.60 लगत एकत्रित लेखी युक्तीवाद दाखल केलेला आहे. सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये, “सामनेवाला यांनी ग्रृप पर्सनल अँक्सीडेंट पॉलिसी दिलेली आहे. विमा पॉलिसीच्या अटी व शर्ती नुसार मृत्युच्या दिनांकापासून एक महिन्याच्या आत माहिती देणे आवश्यक आहे. मिळकत मालकाच्या कुटुंबातील व्यक्तींना संरक्षण दिलेले नाही. सर्व आवश्यक कागदपत्र दिल्यानंतर दोन महिन्यानंतर मुदत सुरु होते. अर्जदार यांनी खुप उशिरा माहिती दिलेली आहे, इन्शुरन्स पॉलिसी हाच अंतीम करार आहे, पॉलिसीपुर्वी अंतीम करार झालेला आहे असे अर्जदार क्र.2 यांचे म्हणणे आहे. याबाबत चौकशी केली असता सामनेवाला यांनी त्या कराराबाबत वाद उपस्थित केलेला आहे. तथाकथीत करार अंतीम नाही. विमा पॉलिसी हाच अंतीम करार आहे, मिळकत मालकाच्या अपघाती मृत्युबद्दल फक्त रु.50,000/- देण्याची पॉलिसी आहे. मिळकत मालकाव्यतिरीक्त कुटुंबातील अन्य व्यक्तिंच्या अपघाती मृत्युबाबत संरक्षण देण्यास सामनेवाला जबाबदार नाहीत, 18 ते 70 वर्ष याच वयोगटातील मिळकत मालकाकरीता पॉलिसीप्रमाणे संरक्षण दिलेले आहे, अर्जदार यांनी पॉलिसीप्रमाणे संपुर्ण पुर्तता केलेली नाही, सेवा देण्यात कमतरता केलेली नाही,” असे म्हटलेले आहे. अर्जदार यांनी पान क्र.25 लगत मागील बाजुस अर्जदार क्र.1 यांचे नावे मिळकत असल्याबाबत व घरपट्टी भरल्याबाबत अर्जदार नं.2 यांचा दाखला हजर केलेला आहे. तसेच अर्जदार यांनी पान क्र.16 लगत मिळकत कराचे बिल व मिळकत कराची पावती हजर केलेली आहे. अर्जदार क्र.1 हया कै.उदयनारायण गोरखनाथ मिश्रा यांच्या पत्नी म्हणून वारस आहेत ही बाब सामनेवाला यांनी नाकारलेली नाही. अर्जदार यांनी पान क्र.5 ते 9 लगत अर्जदार क्र.2 व सामनेवाला यांचेमधील विमा करार हजर केलेला आहे. हा करार सामनेवाला यांनी जरी नाकारलेला असला तरी या करारावर शाखा प्रबंधक म्हणून सामनेवाला यांचे अधिकारी यांनी सही केलेली आहे. सामनेवाला यांनी हा करार अर्जदार क्र.1 यांचेकरीता अर्जदार क्र.2 यांचेबरोबर केलेला आहे. पान क्र.5 ते 9 चा विमा करार व पान क्र.25 चा दाखला तसेच पान क्र.10 व 11 चे विमा सर्टिफिकेट व पान क्र.16 चे बिल व पावती यांचा विचार होता अर्जदार क्र.1 हया कै.उदयनारायण गोरखनाथ मिश्रा यांच्या पत्नी म्हणून वारस आहेत व त्यामुळे ते सामनेवाला यांचे लाभधारक ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांनी अर्जदार क्र.2 यांचेमार्फत विमा क्लेमच्या कागदपत्रांची संपूर्ण पूर्तता पान क्र.25 चे पत्रानुसार नाशिक येथे केलेली आहे. सामनेवाला यांचेवतीने अर्जदार क्र.2 यांचे बरोबर करार केलेला आहे. सामनेवाला यांचे नाशिक येथे कार्यालय आहे. यामुळे या मंचासमोर तक्रार अर्ज चालणेस पात्र आहे. पान क्र.25 चे पत्रानुसार अर्जदार क्र.2 यांनी सामनेवाला यांचेकडे दि.01/10/2009 रोजी विमा पॉलिसीचा क्लेम फॉर्म व सर्व कागदपत्रांची पुर्तता केलेली आहे हे स्पष्ट होत आहे. यानंतर अर्जदार क्र.2 यांनी सामनेवाला यांना पान क्र.26, पान क्र.27, पान क्र.28 व पान क्र.29 लगतचे दि.12/08/2009, दि.03/11/2009, दि.11/12/2009 व दि.17/02/2010 चे पत्राप्रमाणे लेखी पत्रव्यवहार करुन क्लेमबाबतची चौकशी केलेली आहे असे दिसून येत आहे. परंतु यानंतरही सामनेवाले यांनी क्लेमची रक्कम दिलेली नाही. याचा विचार होता सामनेवाले यांनी अर्जदार यांना सेवा देण्यात कमतरता केलेली आहे असे या मंचाचे मत आहे. पान क्र.5 ते पान क्र.9 लगतचा करारनामा व पान क्र.10 व 11 ची विमा पॉलिसी यांचा विचार होता सामनेवाला यांनी अर्जदार क्र.1 करीता दि.30/01/2009 ते दि.29/01/2010 या कालावधीसाठी मिळकतधारकांचे वारसांकरीता रु.50,000/- ची विमा जोखीम स्विकारलेली आहे हे स्पष्ट होत आहे. याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून विमा क्लेमपोटी रु.50,000/- इतकी रक्कम वसूल होऊन मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. पान क्र.5 ते 9 चे विमा करारामधील पान क्र.7 वरील अट क्र.5 मध्ये, “सामनेवाला यांना क्लेमची कागदपत्रे मिळाल्यापासून दोन महिन्यांचे आंत विमा क्लेम मंजूर करावयाचा आहे, असे न केल्यास 18% दराने व्याज दयावयाचे आहे,” असा उल्लेख या करारात आहे. पान क्र.25 चे पत्रानुसार अर्जदार क्र.2 यांनी अर्जदार क्र.1 यांचेकरीता विमा क्लेमची संपूर्ण कागदपत्रे सामनेवाला यांचेकडे दि.01/10/2009 रोजी दिलेली आहेत व ही कागदपत्रे सामनेवाला यांना मिळालेली आहेत हे स्पष्ट होत आहे. परंतु त्यानंतर दोन महिन्यांचे आंत सामनेवाला यांनी विमा क्लेम मंजूर केलेला नाही. याचा विचार होता अर्जदार हे सामनेवालाकडून विमा करारानुसार दि.01/10/2009 पासून दोन महिन्यानंतर म्हणजे दि.02/12/2009 पासून मंजूर रक्कम रु.50,000/- या रकमेवर संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे. 18% दराने व्याज मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. सामनेवाला यांचेकडून अर्जदार यांना योग्य त्या वेळेत विमा क्लेमची रक्कम मिळालेली नाही. यामुळे अर्जदार क्र.2 यांनी सामनेवाला यांचेबरोबर पत्रव्यवहार केला आहे. अर्जदार यांनीही पान क्र.12 प्रमाणे पत्रव्यवहार केलेला आहे व पान क्र.30 नुसार वकिलांचे मार्फत नोटीस दिलेली आहे. वरील सर्व कारणांमुळे अर्जदार क्र.1 यांना निश्चितपणे मानसिक त्रास सहन करावा लागला आहे व प्रस्तुत तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी खर्चही करावा लागलेला आहे. याचा विचार होता अर्जदार क्र.1 हे सामनेवाला यांचेकडून मानसिक त्रासापोटी रु.3500/- व अर्जाचे खर्चापोटी रु.1000/- अशी रक्कम वसुल होऊन मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, वकिलांचा युक्तीवाद व लेखी युक्तीवाद तसेच सामनेवाला यांचे लेखी म्हणणे, प्रतिज्ञापत्र, त्यांनीदाखल केलेली सर्व कागदपत्रे, वकीलांचा युक्तीवाद व लेखी युक्तीवाद आणि वरील सर्व विवेचन यांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहेः आ दे श 1) अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवालाविरुध्द अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2) आजपासून 30 दिवसांचे काळात सामनेवाला यांनी अर्जदार क्र.1 यांना पुढीलप्रमाणे रकमा दयाव्यातः अ. विमा क्लेमपोटी रक्कम रु.50,000/- दयावेत व या मंजूर रकमेवर दि.02/12/2009 पासून संपूर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.18% दराने व्याज दयावे. ब. मानसिक त्रासापोटी रक्कम रु.3500/- दयावेत. क. अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.1000/- दयावेत. |