*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
अॅड एस.एस. देशमुख तक्रारदारांतर्फे
अॅड संजित शेणॉय जाबदेणारांतर्फे
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
द्वारा- मा. श्री. व्ही. पी. उत्पात, अध्यक्ष
:- निकालपत्र :-
दिनांक 18 फेब्रुवारी 2014
प्रस्तुतची तक्रार तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 12 अंतर्गत जाबदेणार यांच्या विरुध्द सेवेतील त्रुटी संबंधी दाखल केली आहे. यातील कथने थोडक्यात खालील प्रमाणे-
[1] तक्रारदार सुशिक्षित बेरोजगार असून त्यांनी व्यवसायासाठी टाटा इंडिका कार रजिस्टर्ड नंबर एम एच 12/डी जी 7314 विकत घेतली होती. सदरच्या कारचा विमा जाबदेणार यांच्याकडे उतरवला होता. दिनांक 27/3/2009 रोजी सदरची कार बेलापूर येथून डोंबिवली कडे जात असतांना समोरुन येणा-या चारचाकी वाहनाने धडक दिल्यामुळे कारचे नुकसान झाले. अपघातानंतर तुर्भे पोलिस ठाणे, नवी मुंबई येथे फिर्याद दाखल करण्यात येऊन घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. सदर कारचा विमा जाबदेणार यांच्याकडे उतरवला होता म्हणून तक्रारदार यांनी जाबदेणार क्र 1 यांच्याकडे क्लेम फॉर्म भरुन दिला. त्यासंबंधी आवश्यक कागदपत्रे दिली. तरीही दिनांक 08/09/2009 रोजी जाबदेणार यांनी नोटीस पाठवून मुळ कागदपत्रांची मागणी केली. जाबदेणार यांनी कागदपत्रांची शहानिशा न करताच तक्रारदारांचा क्लेम दिनांक 30/12/2009 रोजी नामंजूर केला. तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्याकडे यासंबंधी चौकशी केली असता सदरचा क्लेम परत उघडता येणार नाही असे जाबदेणार यांनी दिनांक 22/3/2010 रोजी कळविले. तक्रारदारांच्या कारचे 100 टक्के नुकसान झाले होते, असा पंचनामाही करण्यात आला होता, त्यामुळे किमान रक्कम रुपये 1,80,000/- अशी होते. जाबदेणार यांनी तक्रारदारांचा क्लेम विनाकारण नामंजूर करुन सेवेमध्ये त्रुटी निर्माण केली आहे. सबब तक्रारदारांनी प्रस्तूतची जाबदेणार यांच्याविरुध्द दाखल करुन वाहनाच्या नुकसानाची रक्कम रुपये 1,80,000/-, नुकसान भरपाई पोटी रुपये 50,000/- व व्याज मिळावे अशी मागणी केली आहे.
[2] जाबदेणार यांनी लेखी म्हणणे दाखल करुन तक्रारीतील कथने नाकारली आहेत. जाबदेणार यांच्या कथनानुसार त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारे सेवेतील त्रुटी निर्माण झालेली नाही. जाबदेणार यांनी वेळोवेळी मागणी करुनही तक्रारदारांनी संबंधित कागदपत्रे दिली नाहीत, त्यामुळे तक्रारदारांचा क्लेम नामंजूर करण्यात आला. तक्रारदारांनी या प्रकरणात अवास्तव नुकसान भरपाई व व्याज मागितलेले आहे. ते न्यायास धरुन नाही. सबब तक्रार फेटाळण्यात यावी अशी विनंती जाबदेणार करतात.
[3] दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेली कागदपत्रे, लेखी म्हणणे, शपथपत्र, लेखी युक्तीवाद यांचा विचार करुन खालील प्रमाणे मुद्ये निश्चित करण्यात येत आहेत. मुद्ये, त्यावरील निष्कर्ष व कारणे खालील प्रमाणे-
अ.क्र | मुद्ये | निष्कर्ष |
1 | जाबदेणार यांनी तक्रारदारांचा क्लेम नामंजूर करुन सेवेमध्ये त्रुटी निर्माण केली आहे काय ? | होय |
2 | अंतिम आदेश ? | तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते. |
कारणे-
मुद्या क्र 1 व 2-
[4] या प्रकरणातील दोन्ही पक्षकारांना मान्य असणा-या बाबी म्हणजे, तक्रारदार हे अपघातग्रस्त टाटा इंडिका वाहन क्र एम एच 12/डी.जी. 7314 चे मालक आहेत व त्यांनी सदरचे वाहन जाबदेणार यांच्याकडे विमीत केले होते. सदरची बाब सिध्द करण्यासाठी तक्रारदारांनी संबंधित कारची कागदपत्रे व विमा पॉलिसी दाखल केली आहे. त्यावरुन असे स्पष्ट होते की, सदर कारचा विमा तक्रारदारांनी जाबदेणार यांच्याकडे दिनांक 05/02/2009 ते 04/02/2010 या कालावधीसाठी उतरवला होता व त्या कारची किंमत रुपये 2,43,216/- अशी कळविली होती. तक्रारदार यांनी या प्रकरणात तुर्भे पोलिस ठाण्यात दिनांक 27/3/2009 रोजी झालेल्या अपघाताच्या वर्दीची नक्कल व पंचनाम्याची नक्कल दाखल केली आहे. त्याचप्रमाणे तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्याकडे पाठविलेला क्लेम फॉर्म व त्यासोबतच्या कागदपत्रांच्या नकला हजर केलेल्या आहेत. त्याचे अवलोकन केले असता असे स्पष्ट होते की, सदर कारचा अपघात दिनांक 27/03/2009 रोजी झाला होता व त्याची वर्दी ताबडतोब संबंधित पोलिस ठाण्यामध्ये दिली होती. या प्रकरणातील घटनास्थळाच्या पंचनाम्यावरुन असे स्पष्ट होते की, संबंधित वाहनाचे पुढील बाजूस – उजव्या बाजूचे शो बंफर जबर दबून पत्रा फाटून चेंदामेंदा होऊन हेडलाईट फुटून नुकसान झाल्याचे दिसत आहे. या प्रकरणातील घटनास्थळाच्या पंचनाम्याचा विचार केला असता, दोन्ही वाहनांचा समोरासमोर अपघात झाला असे दिसून येते. तक्रारदारांनी तक्रारीसोबत जाबदेणार विमा कंपनीकडे पाठविलेल्या क्लेम फॉर्मची नक्कल व त्यासोबत जोडलेल्या कागदपत्रांच्या नकला दाखल केल्या आहेत. त्यावरुन असे स्पष्ट होते की, तक्रारदारांनी दिनांक 13/4/2009 रोजी जाबदेणार यांच्याकडे क्लेम दाखल केला होता. त्यासोबत ड्रायव्हिंग लायसन्स, विमा पॉलिसी, कारची कागदपत्रे, फिटनेस सर्टिफिकीट, कराची पावती इ. कागदपत्रे दाखल केली होती. तसे शपथपत्र तक्रारदारांनी दाखल केले आहे. जाबदेणार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन असे दिसून येते की, जाबदेणार यांनी तक्रारदार यांच्याकडे वारंवार कागदपत्रांची मागणी केली होती. त्यापैकी बहुतांश कागदपत्रे तक्रारदार यांनी यापूर्वीच दाखल केली होती. तक्रारदारांनी क्लेम फॉर्म मध्ये अपघाताची तारीख व वेळ 27/3/2009 पहाटे 5.00 वा. अशी नमूद केली आहे. ती फिर्यादीशी मिळतीजुळती आहे. यावरुन असे स्पष्ट होते की, तक्रारदारांनी वेळेत जाबदेणार यांच्याकडे क्लेम दाखल केला होता व सोबत आवश्यकत ती कागदपत्रे दाखल केली होती. जाबदेणार यांनी क्लेम नाकारण्यासाठी दिलेले कारण योग्य व पुरेसे नाही. त्यामुळे तक्रारदारांचा क्लेम नाकारण्यासाठी दिलेले कारण योग्य व पुरेसे नसल्यामुळे, जाबदेणार यांनी निकृष्ट सेवा दिली आहे असे दिसून येते. सबब जाबदेणार हे तक्रारदारांना नुकसान भरपाई देण्यास जबाबदार ठरतात. तक्रारदारांनी वाहन नुकसान भरपाईची रक्कम रुपये 1,80,000/- मागितली आहे. परंतू त्यासंबंधी अहवाल दाखल केलेला नाही. परंतू विमा पॉलिसी मध्ये सदर वाहनाची किंमत रुपये 2,43,216/-नमूद केल्याचे दिसून येते. पंचनाम्यामध्ये सदर वाहनाचे नुकसान झाल्यासंबंधी कथन केल्याचे दिसून येते. यासर्व बाबींचा विचार करुन या मंचाचे असे मत झाले आहे की, जाबदेणार हे तक्रारदार यांना तीन वर्षांचा घसारा वजा करुन रक्कम रुपये 1,30,000/- देण्यास जबाबदार आहेत. त्याचप्रमाणे तक्रारीचा खर्च रक्कम रुपये 5,000/- व तक्रारदारांना झालेल्या शारिरीक, मानसिक त्रासासाठी नुकसान भरपाई म्हणून रक्कम रुपये 10,000/- देण्यास जबाबदार आहेत.
वर उल्लेख केलेली कारणे, निष्कर्ष व मुद्ये यांचा विचार करुन खालील प्रमाणे आदेश देण्यात येत आहे.
:- आदेश :-
1. तक्रार अंशत: मंजूर करण्यात येत आहे.
2. जाबदेणार यांनी तक्रारदारांचा क्लेम योग्य व पुरेशा
कारणाशिवाय नामंजूर करुन सेवेमध्ये त्रुटी निर्माण केली आहे, असे जाहिर करण्यात येत आहे.
3. जाबदेणार क्र 1 व 2 यांनी वैयक्तिकरित्या आणि संयुक्तिकरित्या तक्रारदारांना वाहनाच्या नुकसान भरपाई पोटी रक्कम रुपये 1,30,000/- [रुपये एक लाख तीस हजार मात्र] आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावी.
4. जाबदेणार क्र 1 व 2 यांनी वैयक्तिकरित्या आणि संयुक्तिकरित्या तक्रारदारांना शारिरीक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रक्कम रुपये 10,000/- [रुपये दहा हजार मात्र] व तक्रारीचा खर्च रक्कम रुपये 5,000/- [रुपये पाच हजार मात्र] आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावी.
5. जाबदेणार क्र 1 व 2 यांनी वैयक्तिकरित्या आणि संयुक्तिकरित्या वर नमूद आदेशाची पूर्तता विहीत कालावधीत न केल्यास, जाबदेणार तक्रार दाखल दिनांकापासून 9 टक्के द.सा.द.शे दराने व्याज देण्यास जबाबदार रहातील.
6. उभय पक्षकारांनी मा. सदस्यांसाठी दिलेले संच आदेशाच्या दिनांकापासून एका महिन्यात घेऊन जावेत, अन्यथा संच नष्ट करण्यात येतील.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शूल्क पाठविण्यात यावी.