निकालपत्र
(घोषीत द्वारा- मा. श्री आर. एच. बिलोलीकर, सदस्य )
अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्या विरुध्द सेवेत त्रुटी दिल्याच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
अर्जदार संभाजी भिमराव मोरे, हा ऑटो क्र. MH-26/T-9681 या ऑटोचा मालक असून स्वतः ऑटो चालवून त्याच्या कुटूंबाची उपजिविका भागवतो. अर्जदाराने सदर वाहनाचा विमा गैरअर्जदार यांच्याकडे काढलेला आहे ज्याचा पॉलिसी क्रमांक 16090031120100000014 असा असून त्याचा कालावधी 03/04/2012 ते 02/04/2013 असा आहे. दिनांक 21/02/2013 रोजी अर्जदार सदर ऑटोमध्ये बसून प्रवास करीता असतांना तरोडानाका ते मालेगाव रोडवर कुत्राला वाचविण्यासाठी अचानक ब्रॅक लावल्यामुळे ऑटोला अपघात झाला व त्यात ऑटो खुप नुकसान झाले. सदर अपघाताची नोंद भाग्यनगर पोलीस स्टेशन, नांदेडमध्ये येथे नोंद क्र. 3/2013 नुसान घेण्यात आली असून पोलीसांनी घटनास्थळ पंचनामा केलेला आहे. अर्जदाराने सदर अपघाताची माहिती गैरअर्जदार विमा कंपनीस दिली व ऑटो दुरुस्तीसाठी एस.के. ऑटो, हिंगोली गेट, नांदेड येथे दिला व एस.के. ऑटो यांनी ऑटोच्या दुरुस्तीसाठी लागणा-या खर्चाचे इस्टीमेंट दिले. अर्जदाराने सदर इस्टीमेंट गैरअर्जदार विमा कंपनीस रितसर दिले. त्यानुसार गैरअर्जदाराने सर्व्हेअर व लॉस असेसरची नेमणूक केली. त्याप्रमाणे सर्व्हेअरने ऑटोची संपूर्ण पाहणी केली व खर्चाचे अवलोकन केले. अर्जदाराने जून-2013 मध्ये गैरअर्जदाराकडे नुकसान भरपाईसाठी क्लेम दाखल केला. त्याचा क्लेम नं. 160900/31/12/01/90000332 असा आहे. गैरअर्जदाराने अर्जदाराचा क्लेम देण्याचे नाकारले. सदर क्लेम नाकारतांना गैरअर्जदाराने ऑटोचा कलर हा काळा पिपळा आहे, सदर ऑटोची पॉलिसी ही Private car package policy पॉलिसी आहे. अर्जदाराने सदर ऑटो भाडयाने चालवला आहे, अशी कारणे दिलेली आहेत. फक्त ऑटोच्या रंगामुळे क्लेम नामंजूर केला जे की, अत्यंत बेकायदेशीर असून अन्यायकारक आहे म्हणून अर्जदाराने मंचात सदरची तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदारास ऑटो दुरुस्तीसाठी रक्कम रु. 74,640/- खर्च आलेला आहे. अर्जदाराने मंचास विनंती केली आहे की, अर्जदाराचा अर्ज मंजूर करावा व अर्जदाराच्या झालेल्या नुकसान भरपाईची रक्कम रक्कम रु. 74,640/- त्यावर 18 टक्के व्याजासह दिनांक 21/02/2013 पासून पूर्ण रक्कम अदा करेपर्यंत गैरअर्जदार यांच्याकडून अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा. मानसिक शारीरिक त्रासापोटी रक्कम रु. 25,000/- व दावा खर्चापोटी रक्कम रु. 5,000/- देण्याबाबत आदेश करावा अशी मागणी तक्रारीद्वारे केलेली आहे.
गैरअर्जदार यांना मंचाची नोटीस प्राप्त झाल्यानंतर गैरअर्जदार हे आपल्या वकीलामार्फत हजर होऊन आपले लेखी म्हणणे दाखल केले. गैरअर्जदार यांचे थोडक्यात म्हणणे पुढील प्रमाणे आहे.
अर्जदाराचे अपघातग्रस्त वाहन ऑटो क्र. MH-26/T-9681 ला देण्यात आलेली विमा पॉलिसी ही Private car package policy होती. सदर पॉलिसी ही व्यक्तीगत, निजी वाहन वापरासाठी होती. सदर पॉलिसी ही नियम, अटी व अपवाद यांना बांधील आहे. सदर पॉलिसीच्या अटी व नियमानुसार विमाकृत वाहन प्रवासी वाहतूक करण्यासाठी वापरता येत नाही. (Insured vehicle should not be used / on hire or reward basis ) सदर वाहनाचा रंग पांढरा असल्याबाबत आर.सी. बुकामध्ये कॉलम नं. 15 खाली नमूद केले आहे. अर्जदाराने सदर वाहनाचा रंग काळा पिवळा केला त्यामुळे सदर वाहन हे प्रवासी वाहतूक करणारे असल्याचे दिसते. विमा कंपनीच्या सर्व्हेअर यांनी सदर वाहनाचे छायाचित्र घेतलेले आहे त्यात देखील सदर वाहनाचा रंग काळा पिवळा असल्याचे दिसून येते. यावरुन ही बाब स्पष्ट होते की, अर्जदाराने सदरचे वाहन हे अपघाताच्यावेळी प्रवासी वाहतूक करण्यासाठी वापरलेले आहे त्यामुळे विमा पॉलिसीच्या अटीचा भंग झालेला आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा क्लेम हा योग्य कारणास्तव नामंजूर केला आहे याच निर्णयास कायम राहणे योग्य आहे. गैरअर्जदाराने सदर वाहनाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी सर्व्हेअरची नेमणूक केली होती. सर्व्हेअरने सदर वाहनाचा सर्व्हे केलेला आहे. सदर सर्व्हे रिपोर्ट व त्यांनी घेतलेले फोटोग्राफ हे कंपनीला सादर केलेले आहेत. विमा पॉलिसी, सर्व्हे रिपोर्ट, बिल चेक रिपोर्ट आणि वाहनाचे फोटोग्राफ व सर्व्हेअरचे शपथपत्र गैरअर्जदाराने रेकॉर्डवर दाखल केलेले आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्या सेवेतमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता केलेली नाही. अर्जदार हा स्वच्छ हाताने मंचासमोर आलेला नसल्यामुळे अर्जदाराची तक्रार गैरअर्जदाराविरुध्द खर्चासह खारीज करावी अशी विनंती लेखी जबाबाद्वारे गैरअर्जदार यांनी केलेली आहे.
अर्जदार व गैरअर्जदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्टयार्थ आपले शपथपत्र व कागदपत्र दाखल केली आहेत. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकला. दोन्ही बाजुंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता पुढील बाबी स्पष्ट होतात.
अर्जदार संभाजी भिमराव मोरे हा ऑटो क्र. MH-26/T-9681 चा मालक आहे व त्याने गैरअर्जदार यांच्याकडून सदर अॅटोचा विमा काढलेला आहे. सदर पॉलिसी क्रमांक 16090031120100000014 असा आहे. सदर बाब गैरअर्जदार यांना मान्य आहे. सदर ऑटोचा अपघात झालेला असून अपघातात सदर ऑटोचे नुकसान झालेले आहे हे देखील गैरअर्जदार यांना मान्य आहे. गैरअर्जदार यांनी त्यांच्या लेखी म्हणण्यात हे मान्य केलेलेले आहे की, सदर अॅटोच्या नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी त्यांनी सर्व्हेअरची नियुक्ती केलेली असून सव्हेअरनी त्यांचा अहवाल फोटोग्राफसह गैरअर्जदार यांच्याकडे दिलेला आहे. गैरअर्जदार यांचे पुढे असे म्हणणे आहे की, सदर ऑटोचा विमा हा प्रायव्हेट कार पॉलिसीचा होता परंतू सदर ऑटो प्रवासी वाहतुकीसाठी वापरण्यात आला. प्रवासी वाहतुक करण्यासाठी अर्जदाराने सदर ऑटोचा पांढरा रंग बदलून काळा-पिवळा केलेला आहे. त्यामुळे ब्रिच ऑफ पॉलिसी झालेली आहे व म्हणून गैरअर्जदार हे अर्जदारास काहीही देणे लागत नाही. गैरअर्जदाराचे सदरचे म्हणणे मान्य करता येत नाही. कारण त्याबद्दल गैरअर्जदाराने कसलाही पुरावा मंचासमोर दाखल केलेला नाही. गैरअर्जदाराने मंचासमोर सर्व्हेअरचा अहवाल देखील सादर केलेला नाही. तसेच सदर ऑटोचा रंग बदलल्या बद्दलचा फोटोग्राफ/पुरावा मंचासमोर दाखल केलेला नाही. तसेच गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा दावा नाकारतांना दिलेले कारण अर्जदाराने वाहनास काळा-पिवळा रंग दिलेला असल्याने सदर वाहन प्रवासी वाहतूक करण्यासाठी अर्जदार वापरत होता परंतू अपघाताच्या वेळी वाहनामध्ये प्रवासी वाहतूक होत असल्याचा पुरावा म्हणजेच प्रवाश्यांचा जबाब किंवा शपथपत्र मंचासमोर दाखल केलेले नाही. त्यामुळे गैरअर्जदाराने अर्जदाराचा दावा अयोग्य कारणामुळे नाकारलेला आहे, असे मंचाचे मत आहे.
वरील विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1. अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. गैरअर्जदार यांनी सर्व्हेअरच्या अहवालाप्रमाणे नुकसान भरपाईची रक्कम अर्जदारास आदेश तारखेपासून 30 दिवसांच्या आत दयावी.
3. गैरअर्जदार यांनी अर्जदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रु.2,000/- व दावा खर्चापोटी रु.1,500/- आदेश तारखेपासून 30 दिवसांच्या आत दयावेत.
4. आदेशाची पूर्तता झाल्याबद्दलचा अहवाल दोन्ही पक्षांनी 45 दिवसानंतर मंचात दाखल करावा.प्रकरण 45 दिवसानंतर पुन्हा आदेशाच्या पूर्ततेच्या अहवालासाठी ठेवले जाईल.
5. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारास मोफत देण्यात याव्यात.