-निकालपत्र–
(पारित व्दारा- सौ.चंद्रिका किशोरसिंह बैस, मा.सदस्या)
( पारित दिनांक-12 ऑगस्ट, 2016)
01. तक्रारकर्त्याने ही तक्रार ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली त्याला झालेल्या अपघाता संबधाने विम्याची रक्कम मिळावी व इतर अनुषंगिक कारणांसाठी विरुध्दपक्षां विरुध्द दाखल केली आहे.
02. तक्रारीचे स्वरुप थोडक्यात खालील प्रमाणे-
यातील विरुध्दपक्ष क्रं-1) ही विमा कंपनी आहे तर विरुध्दपक्ष क्रं-2) माथाडी आणि असंरक्षित कामगारांचे हिताचे संरक्षण करण्यासाठी कायद्दाव्दारे स्थापन केलेले मंडळ आहे. तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष क्रं-2) मंडळाकडे असंरक्षीत कामगार म्हणून कामावर होता व त्याला ऑरेंज सिटी स्टील इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड, नागपूर येथे लोखंड उचलणे व उतरविणे हे काम विरुध्दपक्ष क्रं-2) मंडळ यांनी दिले होते, त्याच्या सोबत इतर सुध्दा कामगार कामाला होते.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, प्रत्येक असंरक्षीत कामगाराचे हिताचे रक्षण करण्यासाठी शासन निर्णया प्रमाणे माथाडी कायदा लागू केला आहे. शासन निर्णया प्रमाणे विरुध्दपक्ष क्रं-2 मंडळाने त्यांचेकडे काम करणा-या प्रत्येक कामगाराला विम्याचे संरक्षण दिलेले आहे. कामगाराला कामावर असताना अपघातामुळे अंपगत्व आले असेल तर त्याचे परिवाराची वाताहात होऊ नये हा त्या विम्या मागील उद्देश्य आहे. विरुध्दपक्ष क्रं-2 मंडळाने त्यांचेकडे काम करणा-या कामगारांची जनता वैयक्तिक अपघात विमा पॉलिसी काढली असून त्याव्दारे कामगाराच्या शारिरीक अवयवाची क्षती झाली तर विमा रक्कम रुपये-50,000/- देण्याची सोय केलेली आहे. तक्रारकर्त्याचा विमा, विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनी कडून, विरुध्दपक्ष क्रं-2) मंडळा मार्फतीने काढलेला असून त्यासाठी मोठया रकमेचा विमा हप्ता जमा करण्यात आला होता व त्या पॉलिसीचा क्रं-160300/47/07/61/00000063 असा आहे व त्या पॉलिसीचा कालावधी हा दिनांक-30/08/2007 ते दिनांक-29/08/2009 असा होता.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, तो दिनांक-19/10/2008 रोजी ऑरेंज सिटी स्टील इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड, नागपूर येथे काम करीता असताना सुमारे 11.00 वाजता त्याच्या उजव्या हातावर लोखंडी वजनाचा तुकडा पडून त्याचे हातास जबर दुखापत झाली व त्यामुळे त्याचा उजवा हात कोपराचे खाल पासून कापण्यात आला. त्याला शासकीय वैद्दकीय मंडळाने 65% कायमस्वरुपी अपंगत्व आल्याचे प्रमाणपत्र सुध्दा दिले आहे. अपघाता नंतर त्याने विरुध्दपक्ष क्रं-2) मंडळाचे मार्फतीने विमा दावा पत्र भरले व त्यावर डॉक्टरांची स्वाक्षरी करुन आवश्यक त्या दस्तऐवजांसह विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनीचे कार्यालयात सादर केले. विमा दावा सादर केल्या नंतर तक्रारकर्त्याने वारंवार विरुध्दपक्ष क्रं-2) मंडळाचे कार्यालयात भेटी देऊन विमा दाव्या संबधी चौकशी केली परंतु त्याचा विमा दावा आज पर्यंत विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनीने निकाली काढलेला नाही.
तक्रारकर्त्याने पुढे असेही नमुद केले की, त्याला कामगार न्यायालय, नागपूर यांचे मार्फतीने विरुध्दपक्ष क्रं-2) मंडळा कडून अपघाता संबधाने नुकसान भरपाईची रक्कम मिळालेली आहे. परंतु विम्याची रक्कम मिळालेली नाही. विमा पॉलिसी मध्ये कामगार/विमाधारकाला कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास रुपये-50,000/- विमा रक्कम देण्याची तरतुद केलेली आहे. विरुध्दपक्ष क्रं-2) मंडळाने त्याचे पगारातून विमा हप्त्याचे रकमेची कपात करुन ती रक्कम विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनीकडे भरलेली आहे. विमा दावे हे विरुध्दपक्ष क्रं-2) मंडळाचे मार्फतीने विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनीकडे सादर करण्याची अट विरुध्दपक्ष क्रं-1) आणि क्रं-2) यांचे करारात केलेली आहे. तसेच करारात एका महिन्याचे आत विमा दाव्याचे निराकरण करण्याची तरतुद सुध्दा केलेली आहे परंतु दोन वर्ष उलटून सुध्दा त्याचे विमा दाव्याचे निराकरण झालेले नाही. तक्रारकर्त्याच्या पगारातील रक्कम विमा हप्त्यासाठी कपात होत असल्याने तो विरुध्दपक्षांचा ग्राहक आहे. त्याचे विम्या दाव्या संबधी काही निर्णय न झाल्याने त्याने विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनी आणि विरुध्दपक्ष क्रं-2) मंडळाला दिनांक-26/09/2011 रोजी कायदेशीर नोटीस पाठविली, जी त्यांना मिळाली परंतु उत्तर दिले नाही वा कोणताही प्रतिसादही दिलेला नाही. अशाप्रकारे त्याचे विम्या दाव्या संबधी आज पर्यंत निर्णय न घेऊन विरुध्दपक्षांनी त्यास दोषपूर्ण सेवा दिल्याचे नमुद केले.
म्हणून तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षां विरुध्द ग्राहक मंचात प्रस्तुत तक्रार दाखल करुन खालील प्रकारच्या मागण्या केल्यात-
(1) विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनीला तक्रारकर्त्याचे अपघाता संबधाने विमा दावा रक्कम रुपये-50,000/- अपघात दिनांका पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.12% दराने व्याजासह देण्याचे आदेशित व्हावे.
(2) तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक व आर्थिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-20,000/- तसेच तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-10,000/- विरुध्दपक्षां कडून देण्याचे आदेशित व्हावे.
03. विरुध्दपक्ष क्रं-1) न्यु इंडीया एश्युरन्स कंपनी, नागपूर तर्फे लेखी उत्तर मंचा समक्ष सादर करण्यात आले. विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनीने तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष क्रं-2) मंडळामध्ये मजूरीवर काम करीत होता ही बाब नाकबुल केली. त्यांनी हे पण नाकबुल केले की, विरुध्दपक्ष क्रं-2) तर्फे काढलेल्या विमा पॉलिसीमध्ये त्याची विम्याची जोखीम स्विकारलेली होती. तक्रारकर्त्याने त्याचे विम्या दाव्याचे पुष्टयर्थ कोणतेही दस्तऐवज सादर केलेले नाहीत. तसेच विमाधारकाला अंपगत्व आल्यास रुपये-50,000/- विमा राशी देय असल्याची बाब नाकबुल केली. त्यांचे विमा पॉलिसी प्रमाणे शारिरीक अवयवाला कायमस्वरुपी 100% अपंगत्व आल्यास रुपये-50,000/- विमा राशी देय आहे परंतु अंशतः अंपगत्व आल्यास विमा राशी देय नाही. तक्रारकर्त्याचा उजवा हाता कापला होता व त्यास 65% कायमस्वरुपी अंपगत्व आले आहे ही बाब नाकबुल केली. वैद्दकीय दस्तऐवजांवरुन असे दिसून येते की, त्याचे हातास कायमस्वरुपी 100% अपंगत्व आलेले नाही. तक्रारकर्त्याने त्यांचेकडे विमा दावा सादर केल्याची बाब मान्य केली. तक्रारकर्त्याचा विमा दावा त्यांचे कंपनीत प्राप्त झाल्या नंतर त्यांनी विरुध्दपक्ष क्रं-2) ला आवश्यक कागदपत्र सादर करण्यास दिनांक-26/02/2009 रोजीचे पत्र दिले होते, जे तक्रारकर्त्याने तक्रारी सोबत दस्तऐवज क्रं-9 म्हणून दाखल केले आहे. परंतु असे पत्र देऊनही विरुध्दपक्ष क्रं-2) अथवा तक्रारकर्त्याने मागितलेल्या दस्तऐवजाची पुर्तता केलेली नाही. आवश्यक दस्तऐवजाच्या अभावामुळे तक्रारकर्त्याचा विमा दावा निकाली काढता आला नाही. तक्रारकर्त्याला कामगार न्यायालयातून नुकसान भरपाई मिळाल्याची बाब माहिती अभावी नाकबुल केली. तक्रारकर्त्याचा विमा दावा प्रलंबित राहण्याचे मुख्य कारण आवश्यक ते दस्तऐवज सादर न करणे हे होय आणि त्यासाठी तक्रारकर्ता हाच जबाबदार आहे. इतकेच नव्हे तर विरुध्दपक्ष क्रं-2) यांनी विम्यात अंर्तभूत लाभार्थ्यांची यादी सुध्दा त्यांचेकडे सादर केलेली नाही. तक्रारकर्त्याच्या मागण्या या मंजूर होण्यास पात्र नाहीत, सबब तक्रारकर्त्याची तक्रार खारीज व्हावी, अशी विनंती विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनी तर्फे करण्यात आली.
04. विरुध्दपक्ष क्रं-2) नागपूर व वर्धा जिल्हा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ, नागपूर तर्फे सचिव याने लेखी उत्तर मंचा समक्ष दाखल केले. विरुध्दपक्ष क्रं-2) ने लेखी उत्तरात नमुद केले की, महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रम कामगार अधिनियम-1969 चे कायद्दातील तरतुदी प्रमाणे विरुध्दपक्ष क्रं-2) ची प्राधिकरण म्हणून स्थापना झालेली आहे. तक्रारकर्ता आणि विरुध्दपक्ष क्रं-2 चे संबध माथाडी कामगार व मंडळ असे आहे. तक्रारकर्ता हा त्यांचेकडे नोंदणीकृत माथाडी कामगार होता.
विरुध्दपक्ष क्रं-2) ने पुढे असे नमुद केले की, अनुसूचित उद्दोगातील असरंक्षित श्रम कामगारांच्या सेवेचे विनियमन करण्या करीता राज्य शासनाने 1969 चे अधिनियम केले आहे. असंरक्षित कामगारांची नियमित सेवा योजना सुनिश्चीत करण्यासाठी अधिनियमाचे कलम-3 मध्ये तरतुद केलेली आहे. महाराष्ट्र शासना तर्फे अधिसुचना जारी करुन कलम-6 नुसार विरुध्दपक्ष क्रं-2) मंडळाची स्थापना झालेली आहे. माथाडी कामगारांच्या पिळवणूकीला प्रतिबंध लाणे हा मंडळाचा उद्देश्य आहे. सदर अधिनियमाव्दारे मंडळास योजना राबविण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.. मंडळ हे राज्य शासनाने वेळोवेळी नामनिर्देशित केलेल्या सदस्यांनी बनविलेले आहे. माल भरणे व उतरविणे या कार्या करीता मुख्य नियोक्ता यांचेसाठी विरुध्दपक्ष क्रं-2) मंउळ माथाडी कामगार पुरवितात. मुख्य नियोक्ता/कंत्राटदार हा असंरक्षित कामगारांना रोजंदारी देण्या ऐवजी त्याचा परस्पर भरणा विरुध्दपक्ष क्रं-2) मंडळाकडे करतात. विरुध्दपक्ष क्रं-2) हे असंरक्षित कामगारांच्या हक्कांचे परिरक्षक म्हणून काम करतात. नोंदणीकृत मुख्य नियोक्ता यांनी भरणा केलेली रक्कम ही मजुरी व लेव्हीपोटी असते. विरुध्दपक्ष क्रं-2) मंडळ माथाडी कामगारांना कोणतीही सेवा देत नाही, त्यामुळे तक्रारकर्ता हा ग्राहक संरक्षण कायद्दातील तरतुदी प्रमाणे त्यांचा ग्राहक या व्याख्येत बसत नाही.
विरुध्दपक्ष क्रं-2) ने पुढे असे नमुद केले की, ज्या विमापत्राचा लाभ तक्रारकर्त्याला घ्यावयाचा आहे ते लागू नाही. माथाडी कामगाराचा मृत्यू झाला असल्यास त्याचे वारसाला आर्थिक मदत होण्या करीता ग्रुप विमा पॉलिसी लागू आहे. अपंगत्वाचे प्रकरणात विमा पॉलिसी लागू नाही म्हणून तक्रारकर्त्याची तक्रार खारीज व्हावी अशी विनंती विरुध्दपक्ष क्रं-2) तर्फे करण्यात आली.
05. तक्रारकर्त्याने त्याचे तक्रारी सोबत विरुध्दपक्ष क्रं-1) विमा पॉलिसीचा शिक्का असलेले विमा पॉलिसी क्रमांक व कालावधी दर्शविणारा दस्तऐवज, तक्रारकर्त्याचा विमा दावा फॉर्म, घटनास्थळ पंचनामा, ऑरेंज सिटी स्टील इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड यांनी विरुध्दपक्ष क्रं-2) मंडळाला दिलेले पत्र, शासकीय रुग्णालयाची पावती, चौधरी हॉस्पीटलचे प्रमाणपत्र, इंदिरा गांधी वैद्दकीय महाविद्दालय नागपूर तर्फे तक्रारकर्त्यास दिलेला अपंगाचा दाखला, राशन कॉर्ड प्रत, विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनीने विरुध्दपक्ष क्रं-2) मंडळास तक्रारकर्त्याचे विमा दाव्या संबधाने दिलेले पत्र अशा दस्तऐवजाच्या प्रती दाखल केलेल्या आहेत.
06. विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनी आणि विरुध्दपक्ष क्रं-2) मंडळ यांनी कोणतेही दस्तऐवज दाखल केलेले नाहीत.
07. विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे वकील श्री पाळधीकर यांचे म्हणणे ऐकण्एयात आले. तक्रारकर्त्याची तक्रार आणि तक्रारी सोबत दाखल दस्तऐवज यावरुन मंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे देण्यात येतो-
::निष्कर्ष ::
08. विरुध्दपक्ष क्रं-2) नागपूर व वर्धा जिल्हा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ, नागपूर तर्फे सचिव यांचे लेखी उत्तरा नुसार महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रम कामगार अधिनियम-1969 चे कायद्दातील तरतुदी प्रमाणे त्यांचे प्राधिकरणाची स्थापना झालेली आहे. तक्रारकर्ता आणि विरुध्दपक्ष क्रं-2 चे संबध माथाडी कामगार व मंडळ असे आहे. तक्रारकर्ता हा त्यांचेकडे नोंदणीकृत माथाडी कामगार होता ही बाब मान्य केली आहे. माल भरणे व उतरविणे या कार्या करीता मुख्य नियोक्ता यांचेसाठी विरुध्दपक्ष क्रं-2) मंउळ माथाडी कामगार पुरवितात. मुख्य नियोक्ता/कंत्राटदार हा कामगारांना रोजंदारी देण्या ऐवजी त्याचा परस्पर भरणा विरुध्दपक्ष क्रं-2) मंडळाकडे करतात. नोंदणीकृत मुख्य नियोक्ता यांनी भरणा केलेली रक्कम ही मजुरी व लेव्हीपोटी असते. थोडक्यात तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष क्रं-2) मंडळात नोंदणीकृत कामगार होता ही बाब विरुध्दपक्ष क्रं-2) ला मान्य आहे.
09. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनीचा शिक्का असलेला एक दस्तऐवज दाखल केला, ज्यावर जनता वैयक्तिक अपघात विमा योजने अंतर्गत पॉलिसीचा क्रं-16030047076100000063 असा असून पॉलिसीचा कालावधी हा दिनांक-30/08/2007 ते दिनांक-29/08/2009 असा आहे परंतु तक्रारकर्ता हा त्या विमा योजनेत लाभार्थी म्हणून समाविष्ठ होता काय या संबधाने कोणताही पुरावा तक्रारकर्त्या तर्फे मंचा समक्ष दाखल करण्यात आलेला नाही.
10. विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनीचे उत्तरा नुसार, त्यांना तक्रारकर्त्याचा विमा दावा मिळाल्याची बाब मान्य आहे परंतु त्या सोबत आवश्यक ते दस्तऐवज नसल्याने त्यांनी विरुध्दपक्ष क्रं-2) ला आवश्यक कागदपत्र सादर करण्यास दिनांक-26/02/2009 रोजीचे पत्र दिले होते, परंतु असे पत्र देऊनही विरुध्दपक्ष क्रं-2) अथवा तक्रारकर्त्याने मागितलेल्या दस्तऐवजाची पुर्तता केलेली नाही. आवश्यक दस्तऐवजाच्या अभावामुळे तक्रारकर्त्याचा विमा दावा निकाली काढता आला नाही. इतकेच नव्हे तर विरुध्दपक्ष क्रं-2) यांनी विम्यात अंर्तभूत लाभार्थ्यांची यादी सुध्दा त्यांचेकडे सादर केलेली नाही.
11. तक्रारकर्त्यास झालेला अपघात, त्यातून त्याचे उजव्या हातास झालेली दुखापत आणि त्या अनुषंगाने सादर केलेला विमा दावा या बद्दल दोन्ही विरुध्दपक्षां तर्फे विवाद करण्यात आलेला नाही.
12. दाखल घटनास्थळ पंचनाम्या वरुन तक्रारकर्ता दिनांक-19/10/2008 रोजी ऑरेंज सिटी स्टील इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड, नागपूर येथे काम करीता असताना सुमारे 11.00 वाजता त्याच्या उजव्या हातावर लोखंडी वजनाचा तुकडा पडून त्याचे हातास जबर दुखापत झाल्याचे नमुद आहे. तक्रारकर्ता काम करीत असलेल्या ऑरेंज सिटी स्टील इंडस्ट्रीज तर्फे तक्रारकर्त्यास अपघात झाल्या संबधीची लेखी सुचना विरुध्दपक्ष क्रं-2) मंडळाला दिनांक-20/10/2008 रोजीचे पत्राव्दारे दिली असल्याचे दाखल पत्रावरुन दिसून येते. इंदिरा गांधी शासकीय वैद्दकीय महाविद्दालय, नागपूर येथील वैद्दकीय मंडळाने दिनांक-29/01/2009 रोजी जारी केलेल्या वैद्दकीय प्रमाणपत्र क्रं-5412 नुसार तक्रारकर्त्याचा उजवा हात कोपरा पासून कापल्याचा फोटो असून त्यामध्ये DIAGNOSIS- Below Amputation (Ri) असे नमुद असून त्यात पुढे असेही नमुद आहे की, “Case of crush injury right hand fore arm-R/E Amputation done” असे नमुद केलेले असून तक्रारकर्त्यास 65% कायमस्वरुपी अंपगत्व आल्याचे प्रमाणपत्र दिलेले आहे.
13. तक्रारकर्त्याने विमा दावा विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनीकडे दाखल केल्या नंतर त्यांनी विरुध्दपक्ष क्रं-2) माथाडी आणि अंसरक्षित कामगार मंडळ, नागपूर यांना दिलेल्या पत्रा नुसार 1) क्लेम फॉर्म, 2) पॉलिसीची प्रत, 3) एफआयआर, 4) जखमी व्यक्तीचे छायाचित्र, 5) शासकीय अंपगत्व प्रमाणपत्र, मूळ हॉस्पीटलची बिले व स्टॅम्पवरील पावत्या तसेच मूळ डिसचॉर्ज कॉर्ड इत्यादी प्रमाणपत्रांची मागणी त्यांचे दिनांक-26/02/2009 रोजीचे पत्रा नुसार विरुध्दपक्ष क्रं-2) मंडळाकडे केल्याचे दिसून येते. परंतु तक्रारकर्ता आणि विरुध्दपक्ष क्रं-2) मंडळाने त्या संबधी पुर्तता केल्या बाबत कोणताही पुरावा मंचा समोर आलेला नाही.
14. विरुध्दपक्ष क्रं-2) मंडळाने तिचे नोंदणीकृत कामगांरासाठी विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनीकडे जी जनता वैयक्तिक अपघात विमा पॉलिसी काढली होती आणि जिचा पॉलिसी क्रं-16030047076100000063 पॉलिसी कालावधी दिनांक-30/08/2007 ते दिनांक-29/08/2009 असा होता, त्यामध्ये तक्रारकर्त्याची विमा जोखीम अंर्तभूत होती काय, त्या संबधाने कोणताही पुरावा मंचा समक्ष आलेला नाही तसेच त्या विमा पॉलिसीची प्रत सुध्दा विरुध्दपक्ष क्रं-2) मंडळाने लेखी उत्तरा सोबत दाखल केलेली नाही.
15. तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष क्रं-2) मंडळाने काढलेल्या विमा पॉलिसीचे जोखीम मध्ये अंर्तभूत होता काय हाच प्रश्न येथे अनुत्तरीत आहे. या बाबतीत ज्या विरुध्दपक्ष क्रं-2) मंडळाकडून माथाडी कामगारांचे हितासाठी जी जनता वैयक्तिक अपघात विमा योजना पॉलिसी काढल्या जाते, तेच आपले लेखी उत्तरामध्ये मौन बाळगून आहेत, त्यांनी असे नमुद केलेले आहे की, तक्रारकर्ता हा त्यांचेकडे नोंदणीकृत कामगार होता परंतु त्याची ग्रुप विमा पॉलिसीमध्ये विमा जोखीम सदरचे कालावधी करीता काढली होती किंवा नाही यावर भाष्य केलेले नाही.
16. उपरोक्त नमुद वस्तुस्थिती वरुन तक्रारकर्त्याचे विम्या संबधीचे आवश्यक ते दस्तऐवज विरुध्दपक्ष क्रं-1) विमा कंपनीने पत्र देऊनही तक्रारकर्ता आणि विरुध्दपक्ष क्रं-2) मंडळा तर्फे सादर झालेले नाहीत. तसेच मंचा समोर पॉलिसीची प्रत सुध्दा दाखल करण्यात आलेली नाही तसेच तक्रारकर्ता हा त्या ग्रुप इन्शुरन्स मध्ये लाभार्थी होता असे दर्शविणारी लाभार्थ्यांची यादी सुध्दा पुराव्या दाखल नाही त्यामुळे योग्य त्या पुराव्या अभावी तक्रारकर्त्याची तक्रार ही खारीज होण्यास पात्र आहे, त्यावरुन आम्ही प्रस्तुत तक्रारीमध्ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
::आदेश ::
(01) तक्रारकर्त्याची विरुध्दपक्षां विरुध्दची तक्रार योग्य तो पुरावा समोर आला
नसल्याचे कारणा वरुन खारीज करण्यात येते.
(02) खर्चा बद्दल कोणतेही आदेश नाहीत.
(03) प्रस्तुत निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.