( आदेश पारित द्वारा : श्रीमती जयश्री येंडे, मा.सदस्या ) आदेश ( पारित दिनांक : 28 जुन, 2011 ) प्रस्तुत प्रकरणातील तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार तक्रारदार हा गैरअर्जदार डब्ल्यु सी एल येथे कार्यरत होता. सदर कंपनीमधे कार्यरत असतांना डब्ल्यु सी एल कंपनीने आपल्या कर्मचा-यांच्या हितासाठी गैरअर्जदार क्रं.1 यांचेकडे “समुह जनता अपघात ” विमा पॉलीसी काढली होती. त्यामध्ये तक्रारदार एक सदस्य होता. सदर पॉलीसीचा क्रं.47/160202/0356 असा असुन त्याचा कालावधी दिनांक 14/3/1999 ते 14/3/2009 असा होता. सदर पॉलीसी नुसार एखाद्या कर्मया-यांने एखादे अवयवाला क्षती होऊन कायमचे अपंगत्व आल्यास त्यास रुपये 2,50,000/- समुह विमा दाव्या दाखल देण्याची हमी गैरअर्जदार क्रं.1 कंपनीने दिली होती. दिनांक 6.1.2005 रोजी तक्रारदार आपल्या घराचे नविन बांधकाम करतेवेळी छतावरील कच्चे बांधकाम तोडतेवेळी तक्रारदार स्लॅबसह खाली कोसळुन त्याच्या पायास जबर दुखापत झाली. उपचारासाठी तक्रारदारास दिनांक 6/1/2005 रोजी शुअरटेक हॉस्पीटल नागपूर येथे भरती करण्यात आले. दिनांक 31/3/2005 पर्यत त्यांचे पायावर उपचार करण्यात आले. त्यानंतर दिनांक 24/5/005 रोजी तक्रारदार पुन्हा सदर हॉस्पीटल मध्ये भरती झाला. त्याच्या पायाची गंभीर जखम लक्षात घेता. दिनांक 26/5/2005 रोजी सदर हॉस्पीटल मधे तक्रारदाराचा पाय गुडघ्यापासुन कापण्यात आला. दिनांक 15/6/005 रोजी तक्रारदारास हॉस्पीटल मधुन सुट्टी देण्यात आली. त्यानंतर सुध्दा त्यांचेवर उपचार सुरु होते. तक्रारदाराने सदर अपघाताची सुचना गैरअर्जदार क्रं. 2 यांना दिली. डब्ल्युसीएल च्या कराराप्रमाणे त्यांनी तक्रारदाराचा दवाखान्याचा संपुर्ण खर्च केला. अपघातानंतर गैरअर्जदार क्रं. 2 यांनी दिनांक 7/12/2005 रोजी तक्रारदाराचे दावा प्रपत्र गैरअर्जदार क्रं. 1 यांचंकडे सादर केले. परंतु त्यांनी तांत्रीक कारणास्तव तक्रारदारास ते परत केले म्हणुन तक्रारदाराने सदर न्यायमंचाकडे गैरअर्जदाराचा विमा दावा गैरअर्जदार क्रं.2 यांनी गैरअर्जदार क्रं.1 कडे पाठवावा म्हणुन किरकोळ अर्ज दाखल केला. त्यास गैरअर्जदार क्रं.2 यांनी अनुमती दिली. त्यानंतर गैरअर्जदार कं. 2 यांनी आवश्यक कागदपत्रासह तक्रारदाराचा विमा दावा दिनांक 8/7/2010 रोजी गैरअर्जदार यांचेकडे पाठविला व तसे पत्र तक्रारदारास दिले. सदरचा दावा प्राप्त होऊनसुध्दा गैरअर्जदार क्रं.1 यांनी तक्रारदाराचे दाव्याचे निराकरण केले नाही. इतकेच नव्हे तर तक्रारदाराने दावासंदर्भात नोटीस पाठवुनही त्यांचे उत्तर ही गैरअर्जदार यांनी दिलेले नाही. ही गैरअर्जदार यांची कृती सेवेतील कमतरता आहे म्हणुन तक्रारदाराने विमा दाव्यापोटी रुपये 2,50,000/- 12 टक्के व्याजासह मिळावे. मानसिक व शारिरिक त्रासापोटी रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 5,000/- मिळावा अशी मागणी केली. यात गैरअर्जदार क्रं.1 व 2 यांना नोंदणीकृत डाकेद्वारे नोटीस पाठविण्यात आली. नोटीस प्राप्त होऊन गैरअर्जदार क्रं 1 व 2 हजर झाले व आपला लेखी जवाब दाखल केला. गैरअर्जदार क्रं.1 यांनी गैरअर्जदार क्रं. 2 डब्ल्यु सी एल कंपनीने त्यांच्या कर्मचा-यांकरिता सदरील पॉलीसी काढल्याचे म्हणणे तसेच पॉलीसीच्या शर्तीप्रमाणे एक अवयव वा एका डोळयाच्या क्षती करिता रुपये 2,50,000/- ची हमी घेतलेली होती. हे दस्तऐवजाशी संबंधीत असलेले म्हणणे मान्य केलेले आहे. परंतु तक्रारदाराचे इतर आरोप अमान्य केलेले आहेत. गैरअर्जदार क्रं.1 च्या कथनानुसार सदरची तक्रार कालमर्यादेत नाही. तसेच सदर तक्रारीसोबत विलंब माफीचा अर्ज तकारदाराने सादर केलेला नाही. तसेच तक्रारदाराने सदर अपघाताच्या दाव्यासबंधी कोणत्याही प्रकारची तक्रार संबंधीत पोलीस स्टेशनमध्ये केलेली नाही. तसेच तक्रारदाराचा पाय अपघातात फॅक्चर झाला होता. यासंदर्भात कोणताही ठोस पुरावा तक्रारदाराने सादर केला नाही अथवा सदर घटनेचा साक्षीदार नाही. तसेच तक्रादाराने दाखल केलेला सदरचा अर्ज तसेच पुर्वीचा अर्ज मुदतबाहय आहे. त्यामुळे तक्रारदाराची तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती गैरअर्जदार क्रं.1 यांनी केलेली आहे. गैरअर्जदार 2 यांच्या कथनानुसार तक्रारदार हा त्याचा ग्राहक नाही. तसेच विमा पॉलीसीची रक्कम देण्याची जबाबदारी गैरअर्जदार क्रं.1 कंपनीची आहे. गैरअर्जदार क्रं. 2 यांनी आपल्या कर्मचा-यांच्या हितासाठी गैरअर्जदार क्रं. 1 कडे पॉलीसी काढलेली होती. त्यास तक्रारदाराची पुर्ण संमती होती. तक्रारदाराचा अपघात दिनांक 1/6/2005 रोजी झाला होता. हे म्हणणे गैरअर्जदार क्रं.2 यांनी मान्य केलेले आहे. परंतु तक्रारदाराचे इतर आरोप अमान्य केलेले आहे. गैरअर्जदार क्रं. 2 यांच्या मते ते आपल्या सर्व कर्मचा-यांना ध्)ध्ध्)) सेवा प्रदार करते. तक्रारदाराने सदरची दुर्घटना झाल्यानंतर पॉलीसीची रक्कम मिळण्याकरिता लागणारी सुचना देण्याबाबत कुठलाही अर्ज गैरअर्जदार क्रं.2 यांचेकडे केला नाही. तक्रारदाराने स्वतःहुन गैरअर्जदार क्रं. 1 ला सदर दुर्घटनेची माहीती दिली असावी तक्रारदाराने विना सहीचे अपुर्णरित्या भरलेला अर्ज दुर्घटनेच्या एक वर्षानंतर दिनांक 13/1/006 रोजी गैरअर्जदार क्रं. 1 यानी पाठविला. गैरअर्जदार क्रं.2 यांनी तो दिनांक 17/1/2007 रोजी वरिष्ठ कर्यालयाकडे पाठविला व त्यांनी तो त्यांच्या मुख्य कार्यालयाकडे पाठविला. कारण दावा प्रपत्र पाठविण्याचे योग्य अधिकारी डब्ल्यु सी एल चे मुख्य कार्यालय गैरअर्जदार क्रं.2 आहेत. सदर कार्यालय सदर प्रपत्राचे निरिक्षण केल्यावर त्यांचे असे लक्षात आले कि दुर्घटनेची सुचना गैरअर्जदार क्रं.1 यांना देऊन विम्याचे पैसे गैरअर्जदार क्रं.1 कडुन मिळवुन देण्यात यावे. याबाबत तक्रारदाराने यापुर्वी कोणताही अर्ज गैरअर्जदार क्रं.2 डब्ल्युसीएल कडे सादर केलेला नव्हता. तसेच सादर केलेल्या कागदपत्रावर सही देखील नव्हती म्हणुन डब्ल्युसीएल मुख्य कार्यालयाने सदरची कागदपत्रे पुन्हा उमरेड सहा.एरियाकडे दिनांक 31.1.2006 रोजी पाठविली. तक्रारदाराला दिनांक 10/2/2006 रोजी पत्र क्र.1951 मार्फत संपुर्ण कागदपत्रे योग्यरितीने करुन त्यांच्या कार्याल्यात परत सादर करण्यासाठी पाठविली. तक्रारदारांनी त्यांनतर संपुर्ण कागदपत्रे भरुन परत गैरअर्जदार क्रं.2 कडे किरकोळ अर्ज क्रं.1/2010 दाखल केल्यानंतर पाठविली. गैरअर्जदार क्रं.2 यांनी दिनांक 8/7/2010 रोजी तक्रारदाराचा विमा दावा गैरअर्जदार क्रं. 1 कडे पाठविला. एवढेच नव्हेतर गैरअर्जदार क्रं.1 यांनी विमा रक्कम पुर्ण घेऊन नंतर पॉलीसी रद्रद ठरवुन गैरअर्जदार क्रं.2 यांचे कार्यालयास विमा देणे बंद केले म्हणुन गैरअर्जदार क्र.2 यांनी गैरअर्जदार क्रं.1 याचेविरुध्द मा.उच्च न्यायालयात रिट पिटीशन 332/02 दाखल केली. त्याचा निकाल गैरअर्जदार क्रं.2 यांच्या बाजुने लागला. त्यानंतर गैरअर्जदार क्रं.1 यांनी सदर निर्णयाविरुध्द मा.सर्वोच्च न्यायालयाकडे स्पेशल लिव्ह पिटीशन क्रं. 1733/06 दाखल केले होत. ते मा.सर्वोच्च न्यायालयाने खारीज केले. तक्रारदाराची मागणी ही गैरअर्जदार क्रं.1 यांच्याशी संबंधात आहे. ही बाब लक्षात घेता. गैरअर्जदार कं.2 यांनी आपल्या सेवेत कुठलीहीत्रुटी ठेवलेली नाही म्हणुन तक्रारदाराची तक्रार गैरअर्जदार क्रं.2 विरुध्द खारीज करण्यात यावी अशी विनंती गैरअर्जदार क्रं.2 यांनी केलेली आहे. -: कारणमिमांसा :- दोन्ही पक्षाचे म्हणणे, सादर केलेले दस्तऐवज तसेच उभयपक्षांच्या वकीलांचा युक्तिवाद पाहता या मंचाच्या असे निर्देशनास येते की, निर्वीवादपणे तक्रारदार हा गैरअर्जदार डब्ल्युसीएल कंपनी उमरेड शाखा, येथे कार्यरत होता. व कार्यरत असतांना गैरअर्जदार क्रं. 2 यांनी आपल्या कर्मचा-यांच्या हिताकरिता “समुह जनता वैयक्तिक अपघात विमा ” पॉलीसी काढलेली होती व विमा हप्त्याची रक्कम भरुन तक्रारदार त्यात सदस्य झाला होता. सदर प्रकरणात सादर केलेला दिनांक 6.1.2005 रोजीचा घटनास्थळ पंचनामा (कागदपत्र क्रं.16) दिनांक 15/6/005 व दिनांक 11/1/005 चा डिस्चार्ज समरी तसेच दिनांक 30/11/005 चे अपगत्व प्रमाणपत्र व इतर दस्तऐवज पाहता या मंचाच्या असे निर्देशनास येते कि, पॉलीसीच्या वैध कालावधीमध्ये म्हणजेच दिनांक 6/1/2005 रोजी दुर्घटना होऊन तक्रारदाराचे एका पायास कायमचे अपंगत्व आलेले होते. कागदपत्र क्रं.9 वरील दिनांक 6/2/006 चे गैरअर्जंदार क्रं. 2 यांनी तक्रारदारास पाठविलेल्या पत्रावरुन या मंचाच्या असे निर्देशनास येते की तक्रारदाराने गैरअर्जदार क्रं.2 यांचेकडे विमादावा सादर केलेला होता. तो तांत्रीकदृष्टया योग्य नसल्यामुळे गैरअर्जदार यांनी तो परिपुर्ण करण्यासाठी तक्रारदाराकडे पाठविलेला होता ते पाहता तसेच कागदपत्रे क्रं.41 वरील किरकोळ अर्जावरील या मंचाचा आदेश व इतर दस्तऐवज व प्रकरणातील वस्तुस्थितीपाहता तक्रारदाराची तक्रार मुदतबाहय आहे हे गैरअर्जदार यांचे म्हणणे या मंचाला मान्य करता येणार नाही. तसेच तक्रारदार हा पॉलीसीच्या शर्तीप्रमाणे रक्क्म मिळण्यास पात्र आहे. या निर्णयाप्रत हे मंच येते. गैरअर्जदार क्रं. 2 यांनी दिलेल्या सेवेत कमतरता आहे हे पुराव्याअभावी मान्य करता येत नाही. गैरअर्जदार क्रं.1 यांनी तक्रारदाराच्या दाव्याबाबत कुठलाही निर्णय न होणे ही गैरअर्जदार यांनी तक्रारदारास दिलेल्या सेवेतील कमतरता आहे. वरील सर्व वस्तु व परिस्थिती पाहता हे न्यायमंच खालीलप्रमाणे आदेश करित आहे. -// अं ति म आ दे श //- 1. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर.करण्यात येते. 2. गैरअर्जदार क्रं.1 यांनी तक्रारदारास “समुह जनता अपघात ” विमा दाव्यापोटी रुपये 2,50,000/-( दोन लाख पन्नास हजार फक्त ) एवढी रक्कम अदा करावी. 3. गैरअर्जदार क्रं.1 ने तक्रारदारास दाव्याच्या खर्चापोटी रुपये 500/-(रुपये पाचशे फक्त) अदा करावे. 4. गैरअर्जदार क्रं.2 विरुध्द कोणताही आदेश नाही. 5. सदर आदेशाचे पालन गैरअर्जदार क्रं.1 यांनी आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासुन 30 दिवसाचे आत करावे.
| [HONABLE MRS. Jayashree Yende] MEMBER[HONORABLE Shri V. N. Rane] PRESIDENT | |