जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नागपूर.
तक्रार दाखल दिनांकः 20/01/2010
आदेश पारित दिनांकः 18/05/2010
- आदेश -
(पारित दिनांक – 18/05/2010)
1. प्रस्तुत तक्रार तक्रारकर्तीने ग्रा.सं. का. चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे. तक्रारकर्तीची तक्रार अशी आहे की, तिचे मृतक पती स्व.श्री.सुधाकर निंभोरकर यांचे पंजाब नॅशनल बँक यांचेकडे बचत खातेधारक व डेबिट कार्डधारक होते. सदर कार्डधारकांकरीता गैरअर्जदाराकडून Personal Accident Master Policy पंजाब नॅशनल बँकेने घेतली होती व त्याअंतर्गत रु.2,00,000/- चा विमा कार्डधारकाचा उतरविण्यात आला होता.
तक्रारकर्तीचे पती दि.24/11/2005 रोजी कार्यालयातून मोटरसायकलने परत येत असतांना प्रताप नगर चौकात पाठीमागून येणा-या ट्रकने धडक दिली व त्यात त्यांचा मृत्यू झाला. सदर प्रकरणाची सूचना पोलीस स्टेशन प्रतापनगर यांना देण्यात आली. तसेच पंजाब नॅशनल बँकेला व गैरअर्जदारास विमा दाव्याबाबत अर्ज कागदपत्रांसह सादर करण्यात आला. गैरअर्जदाराने 09.09.2008 रोजीच्या पत्रांन्वये विसेरा रीपोर्टची मागणी केली. तक्रारकर्त्यांनी अनेकवेळा पोलीस स्टेशन प्रतापनगर व न्यायवैद्यक प्रयोगशाळा, धंतोली नागपूर यांना मागणी करुनही त्यांना तो मिळालेला नाही. तसेच तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यू हा वाहनाने धडक दिल्याने झालेला आहे, म्हणून सदर विसेरा रीपोर्टशिवाय दावा निकाली काढण्याबाबत मंचाला विनंती केलेली आहे. सदर तक्रारीद्वारा तक्रारकर्तीने विमा दाव्याची रक्कम, मानसिक व शारीरीक त्रासाबाबत भरपाई, तक्रारीचा इ. मागण्या केलेल्या आहेत.
2. सदर तक्रारीचा नोटीस गैरअर्जदारावर बजावण्यात आला असता गैरअर्जदाराने सदर तक्रारीस लेखी उत्तर दाखल केले.
3. गैरअर्जदाराने लेखी उत्तरात, तक्रारकर्तीचे मृतक पतीच्या शवविच्छेदन अहवालामध्ये अनुक्रमांक 21 मध्ये मृतकाचे पोटात अल्कोहोल असल्याचे नमूद केले आहे व विसेरा हा परीक्षणकरीता पाठविल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पॉलिसीच्या अटी आणि निर्बंधाला अनुसरुन तक्रारकर्त्यांना वारंवार पत्र पाठवून विसेरा रीपोर्टची मागणी केली. परंतू त्यांनी विसेरा रीपोर्ट दाखल नसल्यामुळे योग्य निर्णय गैरअर्जदार घेऊ शकले नाही. श्री.सुधाकर निंभोरकर यांचा मृत्यू सदर पॉलिसीच्या अटी व निर्बंधात बसणारा नसल्यामुळे तक्रारकर्तीने केलेला दावा हा चुकीचा असल्यामुळे खर्चासह फेटाळण्यात यावा अशी मागणी गैरअर्जदाराने केलेली आहे.
4. दि.06.05.2010 रोजी सदर तक्रार मौखिक युक्तीवादाकरीता आली असता तक्रारकर्ता व गैरअर्जदार यांचा युक्तीवाद मंचाने त्यांच्या वकील प्रतिनीधींमार्फत ऐकला. तसेच दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले.
-निष्कर्ष-
5. प्रस्तुत प्रकरणी तक्रारकर्तीने तिचे मृतक पती श्री. सुधाकर निंभोरकर यांचा दि.24.11.2005 रोजी अपघाती मृत्यू झाल्याने रु.2,00,000/- ची मागणी केलेली आहे. तक्रारकर्तीच्या मृतक पतीचे त्यांच्या हयातीत पंजाब नॅशनल बँकेत बचत खाते होते व डेबिट कार्डधारक होते. Personal Accident Master Policy पंजाब नॅशनल बँकेने त्यांच्या कार्डधाकांकरीता घेतली होती. तसेच सदर विमाधारकाच्या मोटार सायकल क्र. MH 31/BT 7589 ला कार्यालयातून परत येत असतांना ट्रकने मागून धडक दिल्याने त्यांचा अपघाती मृत्यू झाला होता. सदर बाब तक्रारकर्तीने दाखल केलेल्या दस्तऐवजावरुन सिध्द होते.
तक्रारकर्तीने त.क्र.34/08 मंचासमोर दाखल केली होती व त्यात मंचाने, “तक्रारकर्तीने संपूर्ण दस्तऐवजानीशी मृतक सुधाकर निंभोरकर यांच्या अपघाती मृत्युबद्दलचा विमा दावा गैरअर्जदार क्र. 1 कडे दाखल करावा व गैरअर्जदार क्र. 1 ने दावा व संपूर्ण दस्तऐवज प्राप्त झाल्यापासून 45 दिवसाचे आत दावा निकाली काढावा” असा आदेश पारित केला होता.
त्या अनुषंगाने तक्रारकर्तीने 10.07.2008 रोजी संपूर्ण दस्तऐवजासह दावा गैरअर्जदाराकडे पाठविला व 09.09.2008 रोजी गैरअर्जदाराने पत्र पाठवून विसेरा रीपोर्टची मागणी केली. परंतू तक्रारकर्तीने ते गैरअर्जदारास पुरविले नाही. विसेरा रीपोर्ट मिळण्याबाबत प्रतापनगर पोलीस स्टेशन तसेच न्यायवैद्यक प्रयोगशाळा, धंतोली, नागपूर यांच्याशी अनेकदा संपर्क साधूनही आजतागायत त्यांना तो मिळाला नाही. त्यामुळे सदर विसेरा रीपोर्टशिवाय दावा निकाली काढण्यास विनंती केलेली आहे. याउलट गैरअर्जदाराने लेखी उत्तरात नमूद केले आहे की, मृतक सुधाकर निंभोरकर यांच्या शव विच्छेदन अहवालात अनुक्रमांक (21) वर मृतकाचे पोटात अल्कोहोल असल्याचे व विसेरा हा रासायनिक चाचणीकरीता पाठविण्यात आल्याचे म्हटले आहे. विमा दावा हा पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार काढण्यात येतो. तसेच सदर प्रकरणी नुकसान भरपाई दावा निकाली काढण्याकरीता विसेरा रीपोर्टची मागणी करण्यात आली होती. परंतू तक्रारकर्तीने गैरअर्जदाराला तो पुरविला नाही. म्हणून दावा निकाली काढता आला नाही ही बाब लेखी उत्तरावरुन व 21.10.2008 च्या पत्रावरुन दिसून येते. तसेच गैरअर्जदाराने तक्रारकर्तीचा विमा दावा निकाली काढण्याबाबत डॉ. जया एस. कपूर यांचा अभिप्राय घेण्यात आलेला आहे. तो अभिप्राय गैरअर्जदाराने त्याच्या लेखी उत्तरासोबत पृष्ठ क्र. 73 वर दाखल केलेला आहे. तसेच सोबत पॉथ्लसीच्या अटी व शर्तीची प्रतही दाखल केलेली आहे. त्यातील पृष्ठ क्र. 2 वरील अट क्र. 5 मध्ये नमूद केले आहे की, “जर पॉलिसीच्या अटीप्रमाणे विमाधारक हा मद्यपान करुन असेल व अपघात झाला असेल तर नुकसान भरपाईचा दावा देता येत नाही.” त्यामुळे तक्रारकर्तीचा विमा दावा हा गैरअर्जदाराने निकाली काढण्यात आलेला नाही. तक्रारकर्तीने प्रस्तुत प्रकरणात वेगवेगळे निवाडे दाखल केलेले आहेत. सदर निवाडयाचे अवलोकन केले असता सदर निवाडे तक्रारकर्तीच्या म्हणण्याला पूरक नाही. त्यामुळे वरील निष्कर्षावरुन मंचाचे असे मत आहे की, तक्रारकर्तीने गैरअर्जदाराला मृतक श्री सुधाकर निंभोरकर यांचा विसेरा रीपोर्ट सादर केलेला नाही. त्यामुळे गैरअर्जदारास मृतकाचा विमा दावा निकाली काढता आला नाही. म्हणून गैरअर्जदाराने सेवेत त्रुटी केली आहे ही बाब ग्राह्य धरता येत नाही. तसेच तक्रारकर्तीने विसेरा रीपोर्ट दाखल न करता विमा रकमेची केलेली मागणी ही अपरीपक्व आहे असे मंचाचे मत आहे. त्यामुळे तक्रारकर्तीची तक्रार ही खारीज होण्यास पात्र आहे. परंतू तक्रारकर्तीने गैरअर्जदारांना विसेरा अहवाल सादर केल्यानंतर तक्रार पुनश्च दाखल करण्याचा अधिकार तिला राहील. म्हणून मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-आदेश-
1) तक्रारकर्तीची तक्रार ही त्यांना पुनश्च तक्रार दाखल करण्याचा हक्क अबाधीत ठेवून खारीज करण्यात येत आहे.
2) उभय पक्षांनी आप-आपला खर्च सोसावा.
(मिलिंद केदार) (नलिन मजिठीया)
सदस्य अध्यक्ष