::निकालपत्र:: (पारीत व्दारा- श्री मनोहर गोपाळराव चिलबुले, मा.अध्यक्ष) (पारीत दिनांक-04 फेब्रुवारी, 2014 ) 1. तक्रारकर्त्याने श्री राहूल सोहन बिहारे या कामगाराचे अपघाता संबधी नुकसान भरपाई विमा दावा रक्कम विरुध्दपक्ष विमा कंपनी कडून मिळावी व इतर अनुषंगीक मागण्यांसाठी प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली मंचा समक्ष दाखल केली.
2. तक्रारकर्त्याचे तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे- तक्रारकर्त्याचा शेतमालावर प्रक्रिया करण्याचा कारखाना असून त्यामध्ये कामगार कार्यरत आहेत. सदर कारखान्यात कापसाचे बोंडामधून कापूस व बिया या वेगवेगळया करुन कापूस बिया पासून तेल काढण्याचे काम केल्या जाते. कारखाना अधिनियमा नुसार प्रत्येक कामगाराचा विमा काढणे आवश्यक आहे. तक्रारकर्त्याने, विरुध्दपक्ष विमा कंपनी कडून पॉलिसी क्रं-16010036100100001176 अन्वये कामगारांचा विमा काढला होता व पॉलिसीचा कालावधी हा दि.16.12.2010 ते 15.12.2011 असा होता. कामगार कायद्दा अंतर्गत कलम-4 नुसार नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी तक्रारकर्त्याची आहे व ती नुकसान भरपाईची रक्कम परत करण्याची जोखीम वि.प.विमा कंपनीने विम्याव्दारे स्विकारली होती. तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, सदर कारखान्यात राहुल बिहारे, वय-19 वर्ष अकुशल कामगार म्हणून कार्यरत होता व त्याला कारखाना झाडझुड करुन पडलेला कापूस व कचरा उचलण्याचे कार्य दिले होते व त्यास संपूर्ण कारखाना व कारखान्याचे परिसरात काम करण्याची परवानगी होती. दि.20.06.2011 रोजी राहूल बिहारे कारखाना परिसरात कारखान्याच्या मशीन जवळ काम करीता होता व त्याला मशीनचे बेल्ट मध्ये कापसाचा कचरा अडकलेला दिसला, तो कचरा काढत असताना अचानक उजवा हात मशीनचे बेल्टमध्ये अडकला व तो ओढल्या जाऊन त्याचा उजवा हात खांद्दा पासून कापल्या जाऊन वेगळा झाला. त्यास लगेच चांडक हॉस्पिटल नागपूर
येथे भरती करुन वैद्दकीय उपचार करण्यात आले व वैद्दकीय उपचाराचा खर्च तक्रारकर्ता यांनी केला. अपघाता नंतर पोलीस स्टेशन नरखेड, विमा कंपनी आणि कारखाना तपासणी अधिकारी यांना अपघाताची सुचना देण्यात आली. तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, त्यांनी दि.08.09.2011 रोजी कामगार आयुक्त यांचे कार्यालयात कलम-4 अनुसार नुकसान भरपाईची रक्कम रुपये-5,59,394/- पावती क्रं-4446 अनुसार जमा केली व किरकोळ अर्ज–डब्ल्यु.सी.ए.क्रं-ऐ-73/2011 मधील न्यायालयीन आदेशा नुसार सदर रक्कम कामगार राहुल बिहारे यांना वाटप करण्यात आली. तक्रारकर्त्याने कामगार आयुक्त कार्यालयात जमा केलेल्या अपघात नुकसान भरपाई रकमेची भरपाई वि.प.विमा कंपनी कडून मिळण्यास विनंती केली. परंतु वि.प.विमा कंपनीने दि.28.09.2011 रोजीचे पत्रान्वये अपघात झालेला कामगार हा कारखाना झाडण्यासाठी ठेवलेला असल्याने, ते कार्य न करता, दुस-या कामासाठी अन्य कामगारानां मदत करण्या करीता गेला असता अपघात झाला त्यामुळे विमा दावा नामंजूर करण्यात आल्याचे कळविले. तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीत परिच्छेद क्रं 6 मध्ये कामगार नुकसान भरपाई कायदा कलम-3 (1) च्या तरतुदी उदधृत केल्यात. सदरचे तरतुदी प्रमाणे जर कामगाराला कामावर असताना कायमचे अपंगत्व आले असेल तर त्याला कलम- 3(i) (ii) (iii) च्या तरतुदी लागू होत नाही. अपघाती कामगार राहुल बिहारे हा अकुशल स्वरुपाचा कामगार होता व त्याचे काम संपूर्ण कारखाना परिसरात होते. कामगाराचे निष्काळजीपणामुळे जरी अपघात झाला तरी त्याला 100% कायमचे अपंगत्व आल्या बद्दल डॉ.चांडक यांनी दि.29.06.2011 रोजीचे प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे कामगार नुकसान भरपाई कायदा कलम-3 प्रमाणे अपघाती कामगारास कायमचे अपंगत्व आले असल्यास त्याचा निष्काळजीपणा किंवा एखादे आदेशाचे उल्लंघन केले असले तरी ते ग्राहय धरल्या जात नाही व नुकसान भरपाई रक्कम देणे कायदया नुसार बंधनकारक आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याने कामगार अधिनियमांतर्गत अपघात नुकसान भरपाईची रक्कम न्यायालयात जमा केली परंतु वि.प.विमा कंपनीने पॉलीसी नुसार सदर नुकसान भरपाईची रक्कम फेटाळल्यामुळे अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला. वि.प.विमा कंपनीने विमा दावा रक्कम देण्याची जबाबदारी नाकारली. तक्रारकर्त्याने कामगार राहूल बिहारे हॉस्पिटल मध्ये भरती असताना वैद्दकीय उपचारार्थ रुपये-35,800/- एवढा खर्च केला. तक्रारकर्त्याचा वि.प.विमा कंपनीने विमा दावा फेटाळल्यामुळे तक्रारकर्त्यास शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. तक्रारकर्त्याची प्रार्थना- 1) विरुध्दपक्ष विमा कंपनीस, तक्रारकर्त्यास विमा रक्कम रुपये-5,59,394/- व कामगार वैद्दकीय उपचारार्थ खर्च रुपये-35,800/- दि.08/09/2011 पासून द.सा.द.शे.12% दराने व्याजासह देण्याचे आदेशित व्हावे. 2) तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक, आर्थिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-50,000/- आणि प्रस्तुत तक्रारीचा खर्च रुपये-20,000/- विरुध्दपक्ष विमा कंपनीस देण्याचे आदेशित व्हावे. 3. विरुध्दपक्ष न्यु इंडीया एश्योरन्स कंपनी तर्फे प्रतिज्ञालेखावरील लेखी उत्तर न्यायमंचा समक्ष सादर करण्यात आले. वि.प.विमा कंपनीचे उत्तरा नुसार, तक्रारकर्त्याने कामगार नुकसान भरपाई अंतर्गत विमा पॉलिसी काढल्याची बाब मान्य केली मात्र तक्रारकर्त्याने कामगार अधिनियमांतर्गत कामगाराचे अपघाता संबधीची नुकसान भरपाईची न्यायालयात जमा केलेली रक्कम वि.प.विमा कंपनीकडून परत मिळण्यास पात्र असल्याची बाब अमान्य केली. वि.प.चे म्हणणे असे आहे की, तक्रारकर्त्याचे कारखान्यातील कामगार राहूल बिहारे हा केवळ फॅक्टरी स्वच्छतेसाठी ठेवलेला मजूर होता, त्याला फॅक्टरीचे आतमध्ये जिनिंग सेक्शन मध्ये जाण्याची परवानगी नव्हती. तक्रारकर्त्याने वर्कमन कॉम्पेन्सेशन कोर्टात फॉर्म-ईई अंतर्गत कळविलेली माहिती खालील प्रमाणे- “He was engaged for stacking of cotton without instructions from us, he went inside the factory and started helping to colleague for feeding cotton in Ginning Machine. Suddenly his right hand comes in the belt causing serious injuries”. वरील निवेदना वरुन स्पष्ट होते की, राहुल बिहारे हा मालकाची परवानगी नसताना फॅक्टरी मध्ये शिरला व मशीन मध्ये कापूस टाकण्याचे काम करु लागला, जे वास्तविक त्याचे काम नव्हते, त्यामुळे सदर अपघात हा कामगार क्षतीपूर्ती कायद्दाच्या कलम-3 प्रमाणे ( Out of his employment) त्याचे नेमलेले काम करीत असताना घडलेला नसल्याने तक्रारकर्त्याची क्षतीपूर्ती देण्याची कायदेशीर जबाबदारी नव्हती. त्यांनी प्रेमापोटी दिलेल्या नुकसान भरपाईची अदायगी तक्रारकर्त्यास देण्यास वि.प.विमा कंपनी जबाबदार नाही.
अपघात हा कलम 3 च्या प्रावधाना नुसार “During the course of and out of employment” हया सदरात बसत नाही कारण मशीनमध्ये कापूस टाकण्यासाठी त्याची नियुक्ती झालेली नव्हती. तक्रारकर्त्याने क्षतीपूर्तीची रक्कम कोणत्या आधारावर कामगार न्यायालयात भरली याचे विवेचन केले नाही. विरुध्दपक्ष विमा कंपनीचा दुसरा महत्वाचा आक्षेप असा आहे की, तक्रारकर्त्याने चुकीचे हिशोबा नुसार रक्कम कामगार न्यायालयात भरली. चुकीचे हिशोबाने तक्रारकर्त्याने कामगार न्यायालयात कामगाराचे अपघाता संबधाने जमा केलेली क्षतीपूर्तीची रक्कम आणि वैद्दकीय खर्च देण्याची जबाबदारी वि.प.विमा कंपनीची नाही. वि.प.विमा कंपनीने तक्रारकर्त्यास कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही. तक्रारकर्त्याच्या संपूर्ण मागण्या या कायदेशीर नसल्यामुळे तक्रार खारीज व्हावी, अशी विनंती विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे करण्यात आली. 4. तक्रारकर्त्याने तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली. सोबत यादी नुसार दस्तऐवज दाखल केले, ज्यामध्ये प्रामुख्याने विमा पॉलिसी प्रत, विरुध्दपक्ष विमा कंपनीस अपघात घटने संबधी दिलेले सूचना पत्र, घटनास्थळ पंचनामा, पोलीसानीं नोंदविलेले बयान, अपघातग्रस्त कामगाराचा जन्माचा दाखला, वैद्दकीय अहवाल, वैद्दकीय उपचाराचे देयक, तक्रारकर्त्याने विमा दाव्या संबधी विरुध्दपक्ष विमा कंपनीस दिलेले पत्र, कामगार न्यायालय, नागपूर येथे रक्कम जमा केल्या बाबत पावती, फॉर्म एए, रक्कम भरल्याची पावती, वि.प.विमा कंपनीस तक्रारकर्त्याने दिलेल्या पत्राची प्रत, कायदेशीर नोटीस, पोस्टाची पोच पावती अशा दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात. तक्रारकर्त्याने पुरसिस दाखल करुन त्यांची तक्रार हेच प्रतिउत्तर समजावे असे कळविले. 5. विरुध्दपक्ष विमा कंपनीने आपले लेखी उत्तरासोबत दस्तऐवज यादी नुसार क्लेम फॉर्म, मेडीकल रिपोर्ट, फॉर्म ईई, पॉलिसीची प्रत, दावा नाकारल्याचे पत्र अशा दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात. 6. प्रस्तुत प्रकरणात तक्रारकर्त्या तर्फे वकील श्री नौकरकर तर विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे वकील श्री पाळधीकर यांचा युक्तीवाद ऐकण्यात आला. 7. तक्रारकर्त्याची तक्रार, वि.प.विमा कंपनीचे लेखी उत्तर, प्रकरणातील उपलब्ध दस्तऐवजांचे काळजीपूर्वक अवलोकन करण्यात आले असता, न्यायमंचाचे निर्णयार्थ उपस्थित होणारे मुद्दे व त्यावरील निष्कर्ष खालील प्रमाणे आहेत-
मुद्दा उत्तर (1) वि.प.विमा कंपनीने वर्कमेन कॉम्पेन्सेशन अंतर्गत तक्रारकर्त्याचा विमा दावा नाकारुन आपले सेवेत त्रृटी ठेवली आहे काय?.................होय. (2) अंतिम आदेश काय ?................................ तक्रार अंशतः मंजूर ::कारण मिमांसा::
मु्द्दा क्रं 1 बाबत- 8. तक्रारकर्त्याचा ( “तक्रारकर्ता” म्हणजे मे. ओमकार एग्रोटेक प्रा.लि. तर्फे भागीदार/व्यवस्थापक, गाव मोगरा, तहसिल नरखेड, जिल्हा नागपूर असे समजण्यात यावे ) कापसावर प्रक्रिया करण्याचा असेलेला कारखाना, कारखान्यात कार्यरत कामगारांचा कामगार नुकसान भरपाई कायदया अंतर्गत वि.प.विमा कंपनीकडे काढलेला विमा या बाबी विवादीत नाहीत. तक्रारकर्त्याने, विरुध्दपक्ष विमा कंपनी कडून ( “वि.प.विमा कंपनी” म्हणजे न्यु इंडीया एश्युरन्स कंपनी लिमिटेड तर्फे प्रादेशिक व्यवस्थापक, नागपूर असे समजण्यात यावे ) पॉलिसी क्रं-16010036100100001176 अन्वये कामगारांचा विमा दि.16.12.2010 ते 15.12.2011 या कालावधीसाठी काढल्याची बाब विमा पॉलिसीचे प्रतीवरुन स्पष्ट होते. घटनास्थळ पंचनाम्या वरुन विमाधारक श्री राहूल सोहन बिहारे, वय-19 वर्ष या कामकागाराचा दि.20.06.2011 रोजी दुपारी 02.30 वाजता जिनींग प्लॉन्ट मधील रुई बेल्ट मध्ये कापसाचा कचरा काढत असतांना बेल्टने ओढल्यामुळे त्याचा उजवा हात खांद्दया पासून वेगळा झाल्याने अपघात झाल्याचे दिसून येते. चांडक हॉस्पिटल, सिताबर्डी नागपूर यांचे निर्गमित बिलाचे प्रती वरुन विमाधारक कामगार श्री राहूल बिहारे याचेवर दि.20.06.2011 ते 29.06.2011 या कालावधीत वैद्दकीय उपचार करण्यात आले आणि त्यासाठी एकूण रुपये-35,800/- एवढा खर्च आल्याचे दिसून येते. मा.कमिश्नर वर्कसमेन कॉम्पेन्सेशन अक्ट नागपूर यांचे न्यायालयात तक्रारकर्ता
ओमकार एग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड यांचे तर्फे भरपाईची रक्कम रुपये-5,59,394/- पावती क्रं-4446, दि.08.09.2011अनुसार भरल्याचे उपलब्ध पावतीचे प्रतीवरुन दिसून येते. 9. पॉलिसीचे कालावधीत कामगार राहूल बिहारे यास झालेला अपघात आणि त्या संबधाने तक्रारकर्त्याने कामगार न्यायालयात भरलेली नुकसान भरपाईची रक्कम आणि सदर नुकसान भरपाईची रक्कम वि.प.विमा कंपनीकडून मिळण्यासाठी तक्रारकर्त्याने सादर केलेला विमा दावा व पत्रव्यवहार या बाबी देखील उभय पक्षांमध्ये विवादीत नाहीत.
10. यातील विरुध्दपक्ष विमा कंपनीचा एकमेव विवाद असा आहे की, तक्रारकर्त्याचे कारखान्यातील कामगार राहूल बिहारे हा केवळ फॅक्टरी स्वच्छतेसाठी ठेवलेला मजूर होता, त्याला फॅक्टरीचे आतमध्ये जिनिंग सेक्शन मध्ये जाण्याची परवानगी नव्हती हे दर्शविण्यासाठी वि.प.ने वर्कमन कॉम्पेन्सेशन कोर्टात तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या फॉर्म-ईई ची प्रत दाखल केली असून सदर फॉर्म मध्ये तक्रारकर्त्याने नमुद केले आहे की, - “He was engaged for stacking of cotton without instructions from us, he went inside the factory and started helping to colleague for feeding cotton in Ginning Machine. Suddenly his right hand comes in the belt causing serious injuries”. 11. या संदर्भात पोलीस निरिक्षक, पोलीस स्टेशन, नरखेड यांनी नोंदविलेल्या बयानात विमाधारक कामगार राहुल सोहन बिहारे याने असे सांगितले आहे की, तो तक्रारदार कंपनीत सफाईचे काम करतो. त्यास रुई बेल्टमध्ये कापसाचा कचरा लटकलेला दिसला त्यामुळे त्याने हाताने तो कापूस काढण्याचा प्रयत्न केला असता त्याचा हात आत ओढल्या गेला आणि खांद्दा पासून तुटला व तो बेहोश झाला. 12. या वरुन राहूल बिहारे याचे काम साफसफाई करण्याचे होते आणि त्याचाच भाग म्हणून तो फॅक्टरीत काम करीता असता, मशीनमध्ये अडकलेला कापसाचा कचरा काढतानां त्याचे दुर्लक्ष झाल्याने हात बेल्टमध्ये ओढला गेल्याने अपघात झाल्याचे दिसून येते. 13. परंतु विरुध्दपक्ष विमा कंपनीने दि.28.09.2011 रोजीचे पत्रान्वये विमा दावा फेटाळल्याचे कारण राहूल बिहारे हा अकुशल कामगार जिनिंग प्लॉन्ट मध्ये रुई बेल्टवर कापूस भरण्यासाठी नियुक्त नसतानां मालकाच्या परवानगी शिवाय त्याने फॅक्टरीचे आंत प्रवेश करुन त्याचे नसलेले काम करण्याचा निष्काळजीपणे प्रयत्न केल्याने त्याच्या चुकीमुळे झालेला अपघात “arising out of and during the course of employment” नाही असे नमुद केले आहे. 14. विमाधारक कामगार श्री राहूल सोहन बिहारे यास फॅक्टरीमधील स्वच्छतेसाठी कामगार म्हणून रोजगार देण्यात आला होता आणि फॅक्टरीमधील स्वच्छता ही फॅक्टरीचे आत मधील भागातील आणि फॅक्टरीचे बाहेरील परिसरातील दोन्ही ठिकाणची होती. म्हणून फॅक्टरीचे आंत सफाईचे कामासाठी जातांना प्रत्येक वेळी मालकाची परवानगी घेण्याचे प्रयोजन नाही. म्हणजेच सदरचा अपघात “During the course of employment” झाला आहे. तसेच कचरा साफ करण्याचे काम श्री राहूल बिहारे यांस देण्यात आले होते. म्हणून मशीन मध्ये अटकलेला कापसाचा कचरा काढण्याचे काम करतांना झालेला अपघात देखील “ Out of employment” आहे असे मंचाचे मत आहे. मात्र श्री राहूल बिहारे याने रुई बेल्ट मधील कापसाचा कचरा काढताना मशीन बंद होण्याची वाट न पाहता मशीन चालू असतांना व संबधित मशीनवर काम करणा-या व्यक्तीस कल्पना न देता चालू मशीन बेल्ट मध्ये हात घालून कचरा काढण्याचा प्रयत्न केला यात त्याचा निष्काळजीपणा निश्चीतच दिसून येतो. 15. डॉ. आर.एम.चांडक, एम.एस.आर्थोपेडीक यांनी दिलेल्या दि.29.06.2011 रोजीचे दिलेल्या प्रमाणपत्रात विमाधारक कामगार श्री राहुल बिहारे यास पूर्णतः 100% अपंगत्व आल्याचे नमुद केले आहे. 16. कामगार क्षतीपूर्ती अधिनियम 1923 च्या कलम-3 प्रमाणे मालक कामगारास क्षतीपूर्ती देण्यास केंव्हा जबाबदार असेल आणि नसेल याची तरतुद दिलेली आहे. सदर तरतुद खालील प्रमाणे आहे- 3- Employer’s liability for compensation (1) If personal injury is caused to (an employee) by accident arising out of and in the course of his employment, his employer shall be liable to pay compensation in accordance with the provisions of this Chapter : Provided that the employer shall not be so liable- (a) in respect of …………………………………………………………. (b) in respect of any (injury, not resulting in death (or permanent total disablement) caused by ) an accident which is directly attributable to- (i) the (employee) having………………………………………... (ii) the willful disobedience of the (employee) to an order expressly given, or to a rule expressly framed, for the purpose of securing the safety of (employee’s), or (iii) the willful removal or disregard by the (employee) of any safety guard or other device which he knew to have been provided for the purpose of securing the safety of (employee), वरील प्रमाणे कलम 3(i) (b) (ii) च्या तरतुदी प्रमाणे जर कामगाराने त्याचे काम करीत असतांना कामगारांच्या सुरक्षेसाठी असलेल्या नियमांचे उल्लंघन केले असेल तर त्यास नुकसान भरपाई देण्यास मालक जबाबदार असणार नाही. मात्र सदर नियमास अशा अपघातात कामगाराचा झालेला मृत्यू आणि कायमचे पूर्ण अंपगत्व या बाबींचा अपवाद केला आहे. याचाच अर्थ असा की, डॉ.चांडक यांच्या प्रमाणपत्रा प्रमाणे श्री राहूल बिहारे यांस अपघातातील दुखापतीमुळे कायमचे पूर्ण अंपगत्व आलेले असल्याने त्यांस झालेला अपघात जरी त्याने सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्यामुळे झाला असला तरी अशा अपघाता बाबत कलम-3 प्रमाणे नुकसान भरपाई देण्यास मालक कायदेशीररित्या जबाबदार आहे. कायद्दाच्या वरील तरतुदी प्रमाणे मालकाने कामगार आयुक्तांकडे जी कायदेशीर नुकसान भरपाईची रक्कम भरली असेल ती मालकास भरपाई करण्याची जबाबदारी विमा कंपनीची आहे. परंतु विमा कंपनीने सरसकट मालकाचा विमा क्लेम नामंजूर करणे ही विमा कंपनीने विमा ग्राहक असलेल्या तक्रारदारा प्रती अनुसरलेली सेवेतील न्युनता व अनुचित व्यापारी पध्दती आहे.
17. वि.प.चे अधिवक्ता श्री पाळधीकर यांनी पुढे असा युक्तीवाद केला की, तक्रारकर्ता ही व्यापारी कंपनी आहे. तिने कर्मचा-यांची विमा पॉलिसी ही आपल्या व्यवसायिक उद्दीष्ठांसाठी काढली होती. म्हणून ग्राहक संरक्षण अधिनियम-2002 च्या कलम- 2 ( d) प्रमाणे तक्रारदार वि.प.चा ग्राहक होत नाही व तक्रारदाराने दाखल केलेली सदरची तक्रार मंचा समक्ष चालू शकत नाही. आपल्या युक्तीवादाचे पुष्टयर्थ श्री पाळधीकर यांनी खालील मा.वरिष्ठ न्यायालयाचे न्यायनिर्णयाचा दाखला दिला आहे. 2010 AC 595 (SC) Economic Transport Organization -Versus- Charan Spinning Mills (P) Ltd. And another सदर प्रकरणात मा.सर्वोच्च न्यायालयाने खालील प्रमाणे अभिप्राय नोंदविला आहे- “ We may also notice that Section 2(d) of Act was amended by Amendment Act 62 of 2002 with effect from 15.03.2003, by adding the words “but does not include a person who avails of such services for any commercial purpose” in the definition of ‘consumer’. After the said amendment if the service of the carrier had been availed for any commercial purpose, then the person availing the service will not be a ‘consumer’ and consequently, complaints will not be maintainable in such cases. But the said amendment will not apply to complaints filed before the amendment”. सदर प्रकरणात तक्रारकर्ता जरी व्यापारी कंपनी असली तरी त्यांनी खरेदी केलेली विमा पॉलिसी ही कर्मचा-यांच्या सुरक्षेसाठी व हितासाठी घेतली असल्याने त्या पॉलिसीचा वापर करुन नफा मिळविण्याचा कोणताही उद्देश्य नसल्याने ती पॉलिसी व्यापारी उद्दीष्ठासाठी आहे व त्यामुळे तक्रारदार वि.प.चा ग्राहक होत नाही, हा वि.प.तर्फे केलेला युक्तीवाद स्विकारार्ह्य नाही. म्हणून मुद्दा क्रं 1 वरील निष्कर्ष होकरार्थी नोंदविला आहे. मु्द्दा क्रं 2 बाबत- 18. विरुध्दपक्ष विमा कंपनीचे अधिवक्ता यांचे युक्तीवादा नुसार तक्रारकर्त्याने विमाधारक कामगार श्री राहूल सोहन बिहारे याचे अपघाता संबधी कामगार नुकसान भरपाई कायदया अंतर्गत मा.आयुक्त, कामगार न्यायालय, नागपूर यांचे न्यायालयात जी भरपाईची रक्कम रुपये-5,59,394/-पावती क्रं-4446, दि.08.09.2011अनुसार भरली आहे, तीच मूळात चुकीची व जास्तीची जमा केलेली आहे. विरुध्दपक्ष विमा कंपनीचे अधिवक्ता यांनी आपल्या युक्तीवादात सांगितले की, जर पॉलिसी प्रमाणे नुकसान भरपाईची कायद्दाने देय असलेली रकमेची भरपाई मिळण्यस तक्रारकर्ता पात्र आहे असे मंचाचे मत असेल तर कामगार क्षतीपूर्ती अधिनियमाचे तरतुदी प्रमाणे
श्री राहूल बिहारे याचे 100% कायमचे अपंगत्वासाठी तक्रारदार किती रक्कम देणे लागतो हे निश्चीत करणे आवश्यक आहे. यासाठी कामगार क्षतीपूर्ती कायद्दाच्या कलम- 4 (b) प्रमाणे कायमचे पूर्ण अंपगत्व आले असेल तर अशी नुकसान भरपाई काढण्याचे सुत्र खालील प्रमाणे आहे- 60% of monthly income X Relevant factor in Schedule IV X 90% of the compensation specified in part II of Schedule-I कामगार श्री राहूल बिहारे याचे वय-22 वर्ष व मासिक पगार रुपये-2085/-असल्याने त्यानुसार येणारे श्येडयुल IV फॅक्टर रुपये-225.22 आहे. वरील सुत्रा प्रमाणे खालील प्रमाणे नुकसान भरपाईची गणना करणे आवश्यक आहे- 60% of Rs.-2085/- = Rs.- 1251/- 1251(X) 225.22 = Rs.- 2,81,750.22 90% of Rs.2,81,750.22 = Rs.- 2,53,575.22 वरील सुत्रा नुसार तक्रारकर्ता कामगार क्षतीपूर्ती कायद्दा प्रमाणे रुपये-2,53,575/- देणे लागत असतांना कामगार आयुक्तांच्या कोणत्याही आदेशा शिवाय स्वतःच्या कामगाराच्या प्रेमापोटी रुपये-5,59,394/- दिले असतील आणि वैद्दकीय उपचारासाठी रुपये-35,800/- खर्च केले असतील तर कायद्दाने देय रकमे शिवाय अधिकच्या रकमेची प्रतीपुर्ती करण्यास विमा कंपनी जबाबदार नाही. 19. तक्रारकर्त्याचे अधिवक्ता श्री नौकरकर यांचा युक्तीवाद असा आहे की, तक्रारकर्त्याने पॉलिसीधारक कामगारास दिलेली पूर्ण रक्कमेची प्रतीपुर्ती करण्याची कायदेशीर जबाबदारी विमा कंपनीची आहे. 20. वरील प्रमाणे कामगार क्षतीपुर्ती कायद्दाच्या तरतुदीं प्रमाणे कायमच्या 90% अपंगत्वासाठी अपघातग्रस्त कामगारास कायद्दा प्रमाणे केवळ रुपये-2,53,575/- नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी असताना तक्रारकर्त्याने जर रुपये-5,59,394/- अधिक वैद्दकीय खर्च रुपये-35,800/- दिला असेल तरीही विमा कंपनी मात्र कायद्दा नुसार देणे रक्कम रुपये-2,53,575/- चीच प्रतीपुर्ती करण्यास जबाबदार आहे व म्हणून तक्रारकर्ता केवळ तेवढीच रक्कम मिळण्यास पात्र आहे. वरील रकमे शिवाय सदर रकमेवर विमा क्लेम नाकारल्याच्या तारखे पासून रक्कम हातात पडे पर्यंत द.सा.द.शे.9% दरा प्रमाणे व्याज मिळण्यासही तक्रारकर्ता पात्र आहे असे मंचाचे मत आहे. या
शिवाय तक्रारकर्त्यास वि.प.कडून तक्रारखर्चा बद्दल रुपये-5000/- मंजूर करणे योग्य होईल असे मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्रं 2 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदला आहे. 21. वरील सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे- ::आदेश:: 1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) विरुध्दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्त्यास कामगार अधिनियमांतर्गत श्री राहूल सोहन बिहारे या कामगाराचे अपघाता संबधाने विमा दावा रक्कम रुपये-2,53,575/-(अक्षरी रु. दोन लक्ष त्रेपन्न हजर पाचशे- पंच्याहत्तर फक्त) विमा दावा नाकारल्याचा दिनांक- 28.09.2011 पासून द.सा.द.शे.9% दराने व्याजासह द्दावी. 3) विरुध्दपक्ष विमा कंपनीने, तक्रारकर्त्यास तक्रारखर्च म्हणून रु.-5000 /-(अक्षरी रु. पाच हजार फक्त) द्दावेत. 4) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष विमा कंपनीने सदर निकालपत्राची प्रत प्राप्त झाल्या पासून 30 दिवसांचे आत करावे.. 5) निकालपत्राची प्रमाणित प्रत उभय पक्षांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात यावी. |