:: निकालपत्र :
(पारीत व्दारा मा.सदस्या श्रीमती वृषाली गौरव जागिरदार)
(पारीत दिनांक–12 ऑक्टोंबर, 2018)
01. तक्रारकर्त्याने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्ष न्यु इंडीया एश्योरन्स कंपनी विरुध्द विमाकृत वाहनाचे दुरुस्ती संबधाने विमा दाव्याची रक्कम मिळण्या संबधी दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे-
तक्रारकर्त्याचे मालकीचा महिन्द्रा कंपनीचा ट्रॅक्टर असून त्याचा नोंदणी क्रमांक-MH-36/D-9083 असा आहे. त्याने सदर ट्रॅक्टर कर्जाने शेतीच्या कामासाठी खरेदी केला व त्याचा विमा विरुध्दपक्ष विमा कंपनीकडे दिनांक-29/04/2009 ते दिनांक-28/04/2010 या कालावधी करीता काढला होता. सदर पॉलिसीचा क्रं- 160302/31/09/01/00000264 असा आहे. दिनांक-01/11/2009 रोजी पालंदुर दिघोरी रोडवर खराशी गावाजवळ सदर विमाकृत ट्रॅक्टर मजूरां सोबत जात असताना विरुध्ददिशेने वेगाने येणा-या टाटा सुमो जिपने धडक दिल्याने अपघात झाला, सदर अपघातात विमाकृत ट्रॅक्टर मोठया प्रमाणावर क्षतीग्रस्त झाले आणि आत मधील मजूर जखमी झालेत. सदर अपघाताची सुचना पोलीस स्टेशन पालांदुर यांना दिली असता त्यांनी गुन्हा नोंद करुन मोका पंचनामा केला. तक्रारकर्त्याने त्वरीत विरुध्दपक्ष विमा कंपनीला अपघाताची सुचना दिली असता त्यांनी सर्व्हेअरला मोक्यावर पाठवून विमाकृत ट्रॅक्टरची पाहणी करुन दुरुस्तीच्या खर्चाचे अंदाजपत्रक काढले. सर्व्हेअर यांनी सुचित केल्या प्रमाणे तक्रारकर्त्याने महिंद्रा कंपनीची शाखा असलेल्या लक्ष्मी अॅग्रो स्टील इंडस्ट्रीज भोजपूर-भंडारा यांचेकडे विमाकृत ट्रॅक्टर दुरुस्तीसाठी पाठविला. तक्रारकर्त्याला विमाकृत ट्रॅक्टर दुरुस्तीसाठी रुपये-2,21,866/- एवढा खर्च येणार होता व त्याची सुचना वेळोवेळी विरुध्दपक्ष विमा कंपनीला देण्यात आली होती. विरुध्दपक्ष विमा कंपनीचे सांगण्या नुसार तक्रारकर्त्याने विमाकृत ट्रॅक्टर दुरुस्तीची सर्व बिले सादर केलीत परंतु बरेच दिवस पर्यंत दुरुस्तीचे खर्चाची रक्कम मंजूर करण्यात आली नसल्याने चौकशी केली असता विरुध्दपक्ष विमा कंपनीचे मुख्य शाखेत विमा दावा पाठविल्याचे सांगण्यात आले. दिनांक-13/05/2013 रोजी विरुध्दपक्ष विमा कंपनीचे संबधित अधिका-याने गोंदीया येथून त्याचा विमा दावा नामंजूर केल्याचे सांगितले. त्यानंतर तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष विमा कंपनीला दिनांक-23/07/2013 रोजी कायदेशीर नोटीस पाठवून दुरुस्तीच्या खर्चाची मागणी केली परंतु प्रतिसाद मिळाला नाही अशाप्रकारे विमा कंपनीने विमाकृत ट्रॅक्टरची दुरुस्तीची रक्कम न देऊन सेवेत त्रृटी ठेवली म्हणून त्याने प्रस्तुत तक्रार ग्राहक मंचा समक्ष दाखल करुन त्याव्दारे विरुध्दपक्ष विमा कंपनी विरुध्द पुढील प्रमाणे मागण्या केल्यात-
विमाकृत वाहनाचे दुरुस्ती संबधाने आलेल्या खर्चाची रक्कम रुपये-2,21,866/- विरुध्दपक्षा कडून मिळावी, तसेच त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-20,000/- आणि तक्रारीचा खर्च विरुध्दपक्षा कडून मिळावा.
03. विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे पान क्रं-76 ते 78 वर लेखी उत्तर दाखल करण्यात आले. त्यांनी लेखी उत्तरा व्दारे तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष विमा कंपनी कडून ट्रॅक्टरचा विमा काढला असल्याची बाब मान्य केली परंतु विमाकृत ट्रॅक्टरला अपघात झाल्यावर त्याची सुचना त्वरीत विरुध्दपक्ष विमा कंपनीला तक्रारकर्त्याने दिल्याची बाब नामंजूर करुन पुढे असे नमुद केले की, विरुध्दपक्ष विमा कंपनीचे सर्व्हेअर श्री भट्टाचार्य हे विमाकृत वाहनाची तपासणी करण्यासाठी मोक्यावर गेले असता त्यांना मोक्यावर विमाकृत क्षतीग्रसत ट्रॅक्टर आढळून न आल्याने तपासणी करता आली नाही कारण तक्रारकर्त्याने त्यापूर्वीच विमाकृत वाहन मोक्यावरुन हलविले होते, यावरुन सरळ सरळ दिसून येते की, तक्रारकर्त्याने विमा पॉलिसीच्या अटी व शर्तीचा भंग केलेला आहे, त्यामुळे विमा कंपनी विमाकृत वाहनाचे दुरुस्तीचे खर्चाची रक्कम देण्यास जबाबदार नाही. तक्रारकर्त्याने सर्व्हेअरचे तपासणी अगोदरच विमाकृत वाहन मोक्यावरुन हलविल्यामुळे विमा कंपनीला नुकसानीचे निर्धारण करता आले नाही. तक्रारकर्त्याने दाखल केलेला विमा दावा हा संशयास्पद असून तो मुख्य कार्यालयात मंजूरीसाठी पाठविण्यात आला असता तो विमा दावा दिनांक-24/09/2010 रोजी खारीज करण्यात आला व तसे तक्रारकर्त्याला सुचित करण्यात आले होते, त्यामुळे विरुध्दपक्ष विमा कंपनीने कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही. तक्रारकर्त्याने स्वर्हेअरचे तपासणीपूर्वीच विमाकृत वाहन दुरुस्तीसाठी वर्कशॉप मध्ये नेले आणि तेथे वाहनाचे क्षतीग्रस्त भाग काढून ते बदलविले, त्यामुळे विरुध्दपक्ष विमा कंपनीने विमा दावा नाकारला. तक्रारकर्त्याने ट्रॅक्टरसाठी वित्त पुरवठा करणा-या स्टेट बँकेला प्रतिपक्ष न केल्यामुळे तक्रार खारीज होण्यास पात्र आहे. एफ.आय.आर.चे अवलोकन केले असता अपघाताचे वेळी विमाकृत वाहनातून नऊ अनधिकृत लोक प्रवास करीत होते त्यामुळे सुध्दा विम्याचे अटी व शर्तीचा भंग झालेला आहे तसेच अपघाताचे वेळी वाहन चालकाजवळ वैध वाहन चालक परवाना नव्हता. तक्रारकर्त्याचा विमा दावा दिनांक-24/09/2010 रोजी खारीज केला असताना तक्रारकतर्याने ग्राहक मंचा समक्ष तक्रार दिनांक-17/07/2014 रोजी दाखल केलेली असल्याने सुध्दा तक्रार मुदतबाहय असल्याचे कारणावरुन खारीज होण्यास पात्र आहे. सबब उपरोक्त नमुद कारणास्तव तक्रारकर्त्याची तक्रार खोटी व बनावट असल्याने ती खारीज करण्याची विनंती विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे करण्यात आली.
04. तक्रारकर्त्याने तक्रारीचे पृष्टयर्थ दस्तऐवज यादी पृष्ट क्रं-18 व 19 नुसार एकूण-09 दस्तऐवज दाखल केलेत, ज्यामध्ये तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाला दिलेली कायदेशीर नोटीस, पोच, विमा पॉलिसीची प्रत, महिन्द्रा कंपनीचे दुरुस्तीचे अंदाजपत्रकाची प्रत, स्टेट बँक ऑफ इंडीयाचे ना-हरकत-प्रमाणपत्र, लक्ष्मी अॅग्रो स्टील इंडस्ट्रजी भोजपूर भंडारा यांनी विमाकृत वाहनाचे दुरुस्तीच्या खर्चाचे दिलेल्या बिलाच्या प्रती, एफआयआर प्रत, गुन्हयाच्या तपशिलाचा नमुना अशा दस्तऐवजाच्या प्रतीचा समावेश आहे. तक्रारकर्त्याने पान क्रं-80 ते 84 वर प्रतिज्ञालेख दाखल केला. तसेच पान क्रं-91 ते 94 वर लेखी युक्तीवाद दाखल केला.
05. विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे पान क्रं 97 वर विमा दावा नामंजूरी संबधी तक्रारकर्त्याला दिलेल्या दिनांक-24.09.2010 रोजीच्या पत्राची प्रत दाखल केली. तसेच पान क्रं 99 वर लेखी युक्तीवादा बाबत पुरसिस दाखल केली. पान क्रं 103 वर विरुध्दपक्ष विमा कंपनीचे सर्व्हेअर यांचा दिनांक-15.02.2010 रोजीचा अहवाल, टाटा सुमोचा फोटो दाखल करण्यात आला.
06. तक्रारकर्त्याची तक्रार, विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे लेखी उत्तर, तक्रारकर्त्या तर्फे दाखल दस्तऐवजांचे अवलोकन करण्यात आले. तसेच तक्रारकर्त्या तर्फे वकील श्री पी.एच.आठवले तर विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे वकील श्री श्री एस.के.गजभिये यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला, त्यावरुन मंचाचा निष्कर्ष पुढील प्रमाणे-
:: निष्कर्ष ::
07. तक्रारकर्त्याचे मालकीचा महिन्द्रा कंपनीचा ट्रॅक्टर असून त्याचा नोंदणी क्रमांक-MH-36/D-9083 असा आहे. सदर वाहनाचा विमा विरुध्दपक्ष विमा कंपनीकडे दिनांक-29/04/2009 ते दिनांक-28/04/2010 या कालावधी करीता काढला होता आणि विम्याच्या वैध कालावधी मध्ये दिनांक-01/11/2009 रोजी सायंकाळी 07.00 वाजता पालंदुर दिघोरी रोडवर खराशी गावाजवळ सदर विमाकृत ट्रॅक्टर मजूरां सोबत जात असताना विरुध्ददिशेने वेगाने येणा-या टाटा सुमो जिपने धडक दिल्याने अपघात झाला, या बाबी उभय पक्षांमध्ये विवादास्पद नाहीत.
08. विरुध्दपक्ष विमा कंपनीने लेखी उत्तरा मध्ये असा आक्षेप घेतला की, तक्रारकर्त्याचा विमा दावा त्यांचे दिनांक-24/09/2010 रोजीचे पत्रान्वये नाकारला आहे. तक्रारकर्त्याने सदरची तक्रार दिनांक-17.07.2014 रोजी मंचा समक्ष दाखल केली असल्याने तक्रारकर्त्याची तक्रार ही मुदतबाहय असल्याने खारीज होण्यास पात्र आहे. तक्रारकर्त्याने त्याच्या तक्रारीत असे नमुद केले की, त्याने दिनांक-13/03/2013 रोजी विरुध्दपक्षाचे संबधित अधिका-याला विमा दाव्या बाबत विचारणा केली असता त्यांनी अपमानित करुन त्याचा विमा दावा नामंजूर करण्यात येईल असे सांगितले व त्यामुळे त्याने विरुध्दपक्षांना दिनांक-23/07/2013 रोजी कायदेशीर नोटीस पाठविली व ती विरुध्दपक्षांना दिनांक-25/07/2013 रोजी मिळूनही त्यांनी उत्तर दिले नाही वा कोणताही प्रतिसाद दिला नाही.
मंचा तर्फे स्पष्ट करण्यात येते की, विरुध्दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्त्याचा विमा दावा नाकारल्या बाबत पाठविलेले दिनांक-24/09/2010 रोजीचे पत्र तक्रारकर्त्याला मिळाल्या बाबत रजिस्टर पोस्टाची पोच पुराव्या दाखल विरुध्दपक्ष विमा कंपनीने प्रकरणात दाखल केलेली नाही, केवळ विमा दावा नाकारल्याचे पत्राची प्रत अभिलेखावर दाखल केली आहे. तसेच तक्रारकर्त्याची दिनांक-23/072013 रोजीची नोटीस प्राप्त होऊनही विरुध्दपक्षाने उत्तर देऊन सदर बाबीचा खुलासा केला नाही, त्यामुळे योग्य कागदोपत्री पुराव्या अभावी तक्रारकर्त्याला विमा दावा नाकारल्याचे दिनांक-24/09/2010 रोजीचे पत्र मिळाले असे म्हणता येणार नाही. तक्रारकर्त्याला त्याचा विमा दावा नामंजूर केल्याचे लेखी पत्र मिळाले नाही म्हणून तक्रारीला सतत कारण घडत आहे, त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार ही मुदतबाहय आहे असे म्हणता येणार नाही असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
09. अभिलेखाचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, पोलीस एफआयआर मध्ये टाटा सुमोचा चालक वेगाने वाहन चालवित होता आणि अपघातात विमाकृत ट्रॅक्टर मधील चालक, मजूर तसेच टाटा सुमोचा चालक असे मिळून 12 लोख जखमी झाल्याचे नमुद आहे.
10. या प्रकरणामध्ये विवादाचा मुद्दा असा आहे की, विरुध्दपक्षाचे म्हणण्या प्रमाणे विरुध्दपक्ष विमा कंपनीचे सर्व्हेअर श्री भट्टाचार्य हे विमाकृत वाहनाची तपासणी करण्यासाठी मोक्यावर गेले असता त्यांना मोक्यावर विमाकृत क्षतीग्रस्त ट्रॅक्टर आढळून न आल्याने तपासणी करता आली नाही कारण तक्रारकर्त्याने त्यापूर्वीच विमाकृत वाहन मोक्यावरुन हलविले होते, त्यामुळे विमा पॉलिसीच्या अटी व शर्तीचा भंग झाल्याने विमा कंपनी विमाकृत वाहनाचे दुरुस्तीचे खर्चाची रक्कम देण्यास जबाबदार नाही. तक्रारकर्त्याने सर्व्हेअरचे तपासणी अगोदरच विमाकृत वाहन मोक्यावरुन हलविल्यामुळे विमा कंपनीला नुकसानीचे निर्धारण करता आले नाही, परिणामी तक्रारकर्त्याने दाखल केलेला विमा दावा हा संशयास्पद असल्याने विमा कंपनीचे मुख्य कार्यालयाने तो विमा दावा दिनांक-24/09/2010 रोजीचे पत्रान्वये खारीज केला व तसे तक्रारकर्त्याला सुचित केले.
11. विरुदपक्ष विमा कंपनीने आपले युक्तीवादाचे समर्थनार्थ सर्व्हेअर श्री एम.एन.भट्टाचार्य यांचे दिनांक-15.02.2010 रोजीचे अहवालाची प्रत दाखल केली. त्यामध्ये अपघात हा दिनांक-01/11/2009 रोजी झाल्याचे आणि सर्व्हेअर यांचा सर्व्हे दिनांक-02/11/2009 रोजी सायंकाळी 06.00 वाजता दर्शविलेला आहे यावरुन असे दिसून येते की, तक्रारकर्त्याने अपघाताची सुचना त्वरीत दिल्याचे सिध्द होते कारण दुसरे दिवशी सायंकाळी 06.00 वाजता सर्व्हेअर मोक्यावर गेल्याचे दिसून येते यावरुन विरुध्दपक्षाचे लेखी उत्तरा नुसार तक्रारकर्त्याने त्वरीत सुचना दिली नसल्याचे जे विधान केले आहे त्यात मंचाला तथ्य दिसून येत नाही. सर्व्हे अहवालात पुढे असे नमुद आहे की, विमाकृत वाहन तसेच कोणीही व्यक्ती मोक्यावर आढळून आली नाही परंतु मोक्यावर अपघातातील दुसरे वाहन टाटा सुमो वाहन आढळून आले. पोलीस स्टेशनला सुध्दा विमाकृत वाहनाचे मालका संबधी माहिती मिळाली नाही फक्त अपघात झाल्याचे सांगण्यात आले. सदर घटने बाबत मौखीक विरुध्दपक्ष विमा कंपनीचे कार्यालयास दिनांक-03/11/2009 ला कळविल्याचे सुध्दा त्यात नमुद आहे. सर्व्हे अहवाला सोबत टाटा सुमोचा फोटो दाखल केलेला आहे.
मंचाचे मते वस्तुतः तक्रारकर्त्याचा पत्ता शोधणे सर्व्हेअरला कठीण नव्हते कारण तक्रारकर्त्याचा पत्ता हा विरुध्दपक्ष कंपनीचे पॉलिसीवर नमुद आहे, त्यावरुन सुध्दा सर्वेअरला तक्रारकर्त्याचे पत्त्याचा शोध घेता आला असता, म्हणून विरुध्दपक्षाचे जे म्हणणे आहे की, मोक्यावर तक्रारकर्ता मिळून न आल्याने त्यांना सर्व्हे करता आला नाही या त्यांचे म्हणण्यात मंचाला कोणतेही तथ्य दिसून येत नाही. सदर सर्व्हे अहवाल त्यानंतर ब-याच उशिराने म्हणजे दिनांक-15.02.2010 रोजी म्हणजे सर्व्हे केल्याचे दिनांका पासून 03 महिने 13 दिवसांनी सर्व्हेअरने तयार केलेला आहे. जर सर्व्हेअरला दिनांक-02/11/2009 रोजी प्रत्यक्ष्य मोक्यावर विमाकृत ट्रॅक्टर आढळून आला नाही व तसे त्याने विरुध्दपक्ष विमा कंपनीला दिनांक-03/11/2009 रोजी मौखीक कळविले होते तर विरुध्दपक्ष विमा कंपनीने त्यानंतर लगेच तक्रारकर्त्याला तशा आशयाचे पत्र देऊन प्रत्यक्ष्य विमाकृत वाहनाची तपासणी करणे अभिप्रेत होते परंतु तसे काहीही विरुध्दपक्ष विमा कंपनीने केलेले नाही. वरील विवेचना वरुन विरुध्दपक्षाचे सर्व्हेअरचा अहवाल हाच संशयास्पद असल्याचे मंचाचे मत आहे.
12. ज्याअर्थी तक्रारकर्त्याने विमाकृत ट्रॅक्टरला झालेल्या अपघाताची सुचना विरुदपक्ष विमा कंपनीला त्वरीत कळवली, त्याअर्थी विमाकृत वाहन मोक्यावरुन हलविण्याची त्याची कृती संशयास्पद होती असे म्हणता येणार नाही. तक्रारकर्त्याचे प्रतिज्ञालेखा नुसार त्याने विरुध्दपक्ष विमा कंपनीचे सर्व्हेअरचे सांगण्या वरुन ट्रॅक्टर दुरुस्तीसाठी लक्ष्मी अॅग्रो इंडस्ट्रीज मध्ये टाकला. या उलट सर्व्हेअरचे अहवाला नुसार मोक्यावर सर्व्हे तपासणी अगोदरच विमाकृत वाहन हलविण्यात आले होते. अभिलेखाचे अवलोकन केले असता विमाकृत वाहनास अपघात झाला होता व त्यामध्ये विमाकृत वाहन मोठया प्रमाणावर क्षतीग्रस्त झाले होते या बाबी पुराव्यानिशी सिध्द होतात, त्यामुळे सर्व्हेअरचे तपासणीचे वेळी प्रत्यक्ष्य मोक्यावर वाहन आढळून न आल्याने तक्रारकर्त्याचा संपूर्ण विमा दावा हा संशयास्पद व खोटा असल्याने तो खारीज करण्याची विरुध्दपक्ष विमा कंपनीची कृती ही तक्रारकर्त्याला दिलेली दोषपूर्ण सेवा ठरते असे मंचाचे स्पष्ट मत आहे. तसेच तक्रारकर्त्याचे वाहनास झालेला अपघात हा विमा पॉलिसीचे वैध कालावधीत झालेला असल्याचे दिसून येते.
13. विरुध्दपक्ष विमा कंपनीला जर वाटत असेल की, तक्रारकर्त्याने विमाकृत ट्रॅक्टर दुरुस्तीचे अनुषंगाने दाखल केलेली बिले खोटी व बनावट आहेत तर त्यांनी वाहन ज्या ठिकाणी दुरुस्तीसाठी टाकण्यात आले त्या लक्ष्मी अॅग्रो स्टील इंडस्ट्रीज भोजपूर भंडारा जे महिंद्रा कंपनीचे अधिकृत सर्व्हीस सेंटर आहे त्यांचेकडे चौकशी करावयास हवी होती परंतु तसेही विरुध्दपक्ष विमा कंपनीने केलेले नाही.
14. विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे लेखी उत्तरात आणखी काही आक्षेप घेण्यात आलेत ज्यामध्ये विमाकृत वाहनास वित्त पुरवठा करणा-या स्टेट बँकेला प्रतिपक्ष न केल्यामुळे तक्रार खारीज होण्यास पात्र आहे. एफ.आय.आर.वरुन अपघाताचे वेळी विमाकृत वाहनातून नऊ अनधिकृत लोक प्रवास करीत होते त्यामुळे सुध्दा विम्याचे अटी व शर्तीचा भंग झालेला आहे तसेच अपघाताचे वेळी वाहन चालकाजवळ वैध वाहन चालक परवाना नव्हता.
या आक्षेपा संदर्भात मंचा तर्फे स्पष्ट करण्यात येते की, अपघाताचे वेळी विमाकृत ट्रॅक्टर चालकाचा काहीही दोष नव्हता तर दुसरे वाहन टाटा सुमोचा चालक हा भरधाव वेगाने वाहन चालवित असल्याने अपघात झाला होता या बाबी पोलीस दस्तऐवजा वरुन सिध्द झालेल्या आहेत. अपघाताचे वेळी विमाकृत वाहनातून अनधिकृतपणे नऊ लोक प्रवास करीत होते असे जे विरुध्दपक्ष विमा कंपनीचे म्हणणे आहे ते सुध्दा मान्य करता येत नाही कारण विमाकृत वाहनातून प्रवास करणा-या प्रवाश्यांमुळे अपघात झाला होता अशी वस्तुस्थिती नाही, या संबधाने मा.सर्वोच्च न्यायालयाने सिव्हील अपिल क्रं-49-50 order Dated-07th January, 2016 – “LAKHMI CHAND-VERSUS-RELIANCE GENERAL INSURANCE” या प्रकरणात पारीत केलेल्या निवाडयावर मंच आपली भिस्त ठेवीत आहे, सदर निवाडयात मा.सर्वोच्च न्यायालयाने विमा अटी व शर्तीचा भंग झाला हे सिध्द करण्याची जबाबदारी विरुध्दपक्ष विमा कंपनीची आहे, वाहनातील प्रवाश्याचे ओव्हरलोडमुळे अपघात झाला होता हे सिध्द करण्याची जबाबदारी विरुध्दपक्ष विमा कंपनीची असल्याचे मत मा.सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलेले आहे व त्यामुळे विमा दावा देण्यास विमा कंपनी जबाबदार असल्याचे आदेशित केले. आमचे समोरील प्रकरणात दुस-या वाहनाने वेगाने धडक दिल्याने अपघात झालेला असल्याची बाब पोलीस दस्तऐवजा वरुन सिध्द झालेली आहे. मा.सर्वोच्च न्यायालयाने New India Assurance Co. Ltd vs Suresh Chandra Aggarwal CIVIL APPEAL NO. 44 OF 2003 Order Dated- 10 July, 2009 या प्रकरणात पारीत केलेल्या निवाडयावर मंच आपली भिस्त ठेवीत आहे, सदर निवाडया मध्ये सुध्दा अपघातास विमाकृत वाहन चालविणारा चालक जबाबदार नव्हता असे मत नोंदवून विमाराशी देण्याची जबाबदारी विमा कंपनीची असल्याचे मत नोंदविलेली आहे. त्यामुळे विरुध्दपक्ष विमा कंपनीने घेतलेल्या वरील आक्षेपात मंचाला कोणतेही तथ्य दिसून येत नाही. दुसरी गोष्ट अशी की, मंचाचे मते स्टेट बॅंकेला जरी तक्रारकर्त्याने प्रतिपक्ष केले असते तरी तक्रारीतील गुणवत्तेवर काहीही फरक पडला नसता, त्यामुळे याही विरुध्दपक्षाचे आक्षेपा मध्ये मंचाला कोणतेही तथ्य दिसून येत नाही.
15. वरील सर्व वस्तुस्थितीचा विचार केल्या नंतर तसेच मा.सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे आणि प्रकरणातील दाखल दस्तऐवजां वरुन तक्रारकर्त्याची तक्रार विरुध्दपक्ष विमा कंपनी विरुध्द मंजूर होण्यास पात्र आहे. तक्रारकर्त्याने वाहनाचे दुरुस्तीपोटी त्याला आलेल्या खर्चाची संपूर्ण बिले मंचा समक्ष पुराव्या दाखल सादर केलेली आहेत त्यामुळे तक्रारकर्त्याला विमाकृत वाहनाचे दुरुस्तीसाठी आलेल्या एकूण खर्चाची रक्कम रुपये-2,21,866/-तक्रार दाखल केल्याचा दिनांक-17.07.2014 पासून द.सा.द.शे.-9% दराने व्याजासह विरुध्दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्त्याला द्दावी तसेच त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-5000/- आणि तक्रारखर्च म्हणून रुपये-3000/-विरुध्दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्त्याला द्दावेत असे मंचाचे स्पष्ट मत आहे, त्यावरुन मंच प्रस्तुत तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे-
::आदेश::
(01) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(02) विरुध्दपक्ष विमा कंपनीला आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्त्याला विमाकृत वाहनाचे दुरुस्तीसाठी आलेल्या एकूण खर्चाची रक्कम रुपये-2,21,866/- (अक्षरी रुपये दोन लक्ष एकविस हजार आठशे सहासष्ठ फक्त) मंचा समक्ष तक्रार दाखल केल्याचा दिनांक-17.07.2014 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्याजासह सदर निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांका पासून 30 दिवसाचे आत द्दावी. विहित मुदतीत उपरोक्त नमुद रक्कम न दिल्यास मुदत संपल्या नंतर येणा-या पुढील दिनांका पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-12% दराने दंडनीय व्याजासह रक्कम तक्रारकर्त्याला देण्यास विरुध्दपक्ष विमा कंपनी जबाबदार राहिल.
(03) विरुध्दपक्ष विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-3000/-(अक्षरी रुपये तीन हजार फक्त) विरुध्दपक्ष विमा कंपनी तर्फे तक्रारकर्त्याला देण्यात यावेत.
(04) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष न्यु इंडीया एश्योरन्स कंपनी शाखा गोंदीया यांनी निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे.
(05) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
(06) तक्रारकर्त्याला “ब” व “क” फाईल्स परत करण्यात याव्यात.