Maharashtra

DCF, South Mumbai

252/2007

Mrs. Hansaben B. Gada - Complainant(s)

Versus

New India Assurance Co. Ltd. ors - Opp.Party(s)

Manij P. Mhatre

11 Aug 2011

ORDER

 
Complaint Case No. 252/2007
 
1. Mrs. Hansaben B. Gada
plot no. 104,shop no. 11,garodia nagar,ghatkopar(E) mumbai
Mumbai-77
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. New India Assurance Co. Ltd. ors
Durva-D ,grd. floor ,r.n. 6 palan chawl,byculla(E) mumbai
Mumbai
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. SHRI.S.B.DHUMAL. HONORABLE PRESIDENT
  Shri S.S. Patil , HONORABLE MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

द्वारा - श्री.शि.भि.धुमाळ : मा.अध्‍यक्ष

1) ग्राहक वाद संक्षिप्‍त स्‍वरुपात खालील प्रमाणे -
तक्रारदार हया मे.जॉली कम्‍युनिकेशनच्‍या पार्टनर असून त्‍यांच्‍या व्‍यवसायाचे ठिकाण सतीकृपा शॉपिंग सेंटर, प्‍लॉट नं.104, शॉप नं.11, गरोडिया नगर, घाटकोपर (पू), मुंबई-77 येथे आहे. दि.26/07/05 रोजी तक्रारदार हया सायबर कॅफे चालवित होत्‍या. सामनेवाला क्र.1 हे सामनेवाला क्र.2 चे अधिकृत एजंट असून सामनेवाला क्र.2 ची विमा पॉलिसी ग्राहकांना देण्‍याचे काम सामनेवाला क्र.1 करीत असतात. दि.26/07/05 पूर्वी तक्रारदाराना त्‍यांच्‍या सायबर कॅफेच्‍या व्‍यावसायात त्‍यांचे पती मदत करीत असत. तक्रारदारांच्‍या सायबर कॅफेमध्‍ये 1 एस.टी.डी. बुथ, 4 पी.सी.ओ., 1 एअर कंडिश्‍नर, फर्निचर इ. वस्‍तु होत्‍या, तसेच जुन्‍या कागदपत्रांची रद्दी साठवून ठेवली होती. फेब्रुवारी, 2005 मध्‍ये तक्रारदारांना आपल्‍या सायबर कॅफेसाठी विमा पॉलिसी घ्‍यावी अशी इच्‍छा झाली म्‍हणून सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदारांना सामनेवाला क्र.1 विमा कंपनीच्‍या विमा पॉलिसींची माहिती दिली. तक्रारदारांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे सामनेवाला क्र.1 यांनी विमा पॉलिसी संबंधी खोटी आश्‍वासने देवून सामनेवाला क्र.2 विमा कंपनीची विमा पॉलिसी घ्‍यावी असे सुचविले व त्‍याप्रमाणे तक्रारदारांनी सामनेवाला क्र.2 कंपनीची विमा पॉलिसी क्र.112000/11/04/01707 त्‍यांचा व्‍यवसाय म्‍हणजेच मे.जॉली कम्‍युनिकेशनच्‍या नांवाने घेतली. सदरची विमा पॉलिसी ही दि.24/02/05 ते 23/02/06 या कालावधीसाठी होती व त्‍यामध्‍ये देवू करण्‍यात आलेली आश्‍वासित रक्‍कम रु.7,56,000/- होती. तक्रारदारांनी वरील पॉलिसीसाठी प्रिमिअम म्‍हणून रक्‍कम रु.2,343/- सामनेवाला यांना दिले.
 
2) दि.26/07/05 रोजी मुंबईत झालेल्‍या अतिवृष्‍टीमुळे तक्रारदारांच्‍या ऑफीसमध्‍ये म्‍हणजेच व्‍यवसायाच्‍या ठिकाणी पुराचे पाणी शिरले. ते पुराचे पाणी 3.5 फुट उंचीपर्यंत होते. सदर पुराच्‍या पाण्‍यामुळे तक्रारदारांच्‍या ऑफीसचे नुकसान झाले. तक्रारदारांनी ताबडतोब झालेल्‍या नुकसानीची माहिती सामनेवाला क्र.1 व 2 यांना दिली. नंतर तक्रारदारांनी नुकसानभरपाई मिळावी म्‍हणून क्‍लेम फॉर्म भरुन तो सामनेवाला क्र.1 मार्फत सामनेवाला क.2 यांना पाठविला.
 
3) तक्रारदारांचे झालेल्‍या नुकसानीची माहिती मिळाल्‍यानंतर सामनेवाला क.2 यांनी श्री.पी.के.दास आणि कं. यांची इन्‍शुरन्‍स सर्व्‍हेअर म्‍हणून नेमणूक केली. सर्व्‍हेअर पी.के.दास आणि कं. यांनी तक्रारदारांच्‍या ऑफीसला दि.02/08/05 रोजी भेट दिली व तक्रारदारांच्‍या पतीच्‍या समक्ष ऑफीसची व त्‍यातील मालमत्‍तेच्‍या नुकसानीची पाहणी करुन फोटो काढले. सर्व्‍हेअरच्‍या सुचनेप्रमाणे तक्रारदारांच्‍या पतीने सी.पी.यु. दुरुस्‍तीसाठी मे.ध्रुव इंन्‍फोटेक यांना दिला. सर्व्‍हेअरने मागितल्‍याप्रमाणे सर्व कागदपत्रे फोटोसहित सर्व्‍हेअरना देण्‍यात आले. दि.12/08/05 रोजी सर्व्‍हेअर पी.के.दास आणि कंपनी यांनी पुन्‍हा तक्रारदारांच्‍या ऑफीसला भेट दिली व ऑफीसची पाहणी केली. दि.18/10/05 रोजी सर्व्‍हेअर पी.के.दास आणि कं. यांनी त्‍यांचा फायनल सर्व्‍हे रिपोर्ट सामनेवाला क्र.2 यांना सादर केला. त्‍या रिपोर्टमध्‍ये तक्रारदारांचे रक्‍कम रु.2,88,864/- चे नुकसान झाले असे नमूद करुन तक्रारदारांनी विमा पॉलीसीच्‍या अटी व शर्तींचा भंग केलेला नाही असे नमूद केले आहे. श्री.दास यांनी त्‍यांचा फायनल सर्व्‍हे रिपोर्ट सादर केल्‍यानंतर सामनेवाला क्र.2 यांनी मे.व्‍ही.बी.असोसिएटस् यांची इन्‍व्‍हेस्‍टीगेटर म्‍हणून नेमणूक केली व मे.व्‍ही.बी.असोसिएटस् यांनी तक्रारदारांच्‍या ऑफीसला भेट देवून तक्रारदारांच्‍या पतीकडे विचारपूस केली. मे.व्‍ही.बी.असोसिएटस् यांनी त्‍यांचा दि.27/02/06 चा रिपोर्ट सामनेवाला यांना सादर केला.
 
4) दरम्‍यानच्‍या काळात तक्रारदारांनी सामनेवाला यांना दि.01/12/05, 30/12/05 20/01/06 व दि.03/02/06 रोजी पत्र पाठवून त्‍यांच्‍या क्‍लेमबाबत विचारणा केली, परंतु त्‍यास सामनेवाला क्र.2 यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. सामनेवाला क्र.1 यांचेकडे चौकशी केली असता सामनेवाला क्र.1 यांनी याबाबत मध्‍यस्‍थी करण्‍यास असमर्थता व्‍यक्‍त केली.
 
5) तक्रारदारांनी दि.23/02/06 रोजी सामनेवाला क्र.2 यांना पत्र पाठवून क्‍लेमसंबंधी लवकरात लवकर निर्णय घ्‍यावा अशी विनंती केली. तक्रारदारांची विमा पॉलिसीची मुदत दि.23/02/06 ला संपणार होती. तक्रारदारांनी सामनेवाला क्र.1 मार्फत विमा पॉलिसीच्‍या नुतनीकरणासाठी प्रिमियम देवू केला परंतु सामनेवाला क्र.2 यांनी तो स्विकारला नाही. तक्रारदारांनी प्रिमियम न स्विकारण्‍याचे व विमा पॉलिसी नुतनीकरण न करण्‍याचे लेखी कारणे द्या अशी सामनेवाला क्र.2 यांचेकडे मागणी केली असता त्‍यास सामनेवाला क्र.2 यांनी प्रतिसाद दिला नाही.
 
6) सामनेवाला क्र.2 यांनी दि.13/04/06 चे पत्राने तक्रारदारांचा क्‍लेम नाकारला व सदर पत्रामध्‍ये क्‍लेम नाकारण्‍यासाठी दिलेली कारणे म्‍हणजे इन्‍व्‍हेस्‍टीगेटरच्‍या रिपोर्टमध्‍ये तक्रारदारांनी बनावट डॉक्‍युमेंटस् म्‍हणजेच बिले सादर केली असल्‍याचा आरोप केला आहे. तक्रारदारांनी सामनेवाला क्र.2 यांना दि.20/11/06 रोजी पत्र पाठवून मे.अरिहंत टेलीपॉईण्‍टने पाठविलेल्‍या पत्राची प्रत त्‍याची सत्‍यता पडताळणीसाठी तक्रारदारांना पाठवावी असे सांगितले. बिलांचा शोध घेतला असता तक्रारदारांना दि.11/12/06 चे मे.ऑनलाईन कंम्‍प्‍युटर्सचे प्रमाणपत्र मिळाले त्‍यामध्‍ये त्‍यांनी त्‍यांच्‍या व्‍यवसायाचे कार्यालय बदलले असून त्‍यांनी त्‍यांचा व्‍यवसाय पूर्णपणे बंद केला आहे असे म्‍हटले आहे. मे.अरिहंत टेलीपॉईण्‍टचे मालक फक्‍त तक्रारदारांच्‍या पतीला नांवाने ओळखत होते. कदाचित त्‍यांना मे.जॉली कम्‍यु‍निकेशनची माहिती नव्‍हती. त्‍यामुळे मे.अरिहंत टेलीपॉईण्‍ट यांनी मे.जॉली कम्‍युनिकेशन यांना विद्युत उपकरणे विकली नाहीत असे म्‍हटले असावे. तक्रारदारांनी दि.05/12/06, 11/12/06 च्‍या बिलांच्‍या प्रती सामनेवाला क्र.2 यांना पाठविल्‍या परंतु सामेनवाला क्र.2 यांनी त्‍याकडे दुर्लक्ष केले. तक्रारदारांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे सामनेवाला क्र.1 व 2 यांनी जाणीवपूर्वक तक्रारदारांच्‍या रास्‍त मागणीकडे दुर्लक्ष केले. त्‍यांचे सर्व्‍हेअर पी.के.दास आणि कं. यांनी दाखल केलेला सर्व्‍हे रिपोर्टसुध्‍दा विचारात घेतला नाही. मे.व्‍ही.बी.असोसिएटस् यांनी त्‍यांच्‍या रिपोर्टमध्‍ये सुध्‍दा तक्रारदारांच्‍या मालमत्‍तेचे झालेले नुकसानीबाबत उल्‍लेख आहे. सामनेवाला क्र.2 यांना तक्रारदारांनी दाखल केलेला रक्‍कम रु.7,56,000/- चा क्‍लेम मंजूर करणे आवश्‍यक होते तथापि, सामनेवाला यांनी चुकीच्‍या कारणावरुन तक्रारदारांचा क्‍लेम नाकारल्‍यामुळे तक्रारदारांना सदरचा तक्रारअर्ज या मंचासमोर दाखल करणे भाग पडले.
 
7) सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदारांना झालेल्‍या नुकसानीपोटी रक्‍कम रु.7,56,000/- द्यावेत व वरील रक्‍कमेवर त्‍यांनी क्‍लेम सादर केल्‍या तारखेपासून द.सा.द.शे. 18 टक्‍के दराने संपूर्ण रक्‍कम तक्रारदारांना मिळेपर्यंत द्यावी असा आदेश सामेनवाला क्र.2 यांना करणेत यावा अशी विनंती केली आहे. तक्रारदारांनी सामनेवाला क्र.2 यांचेकडून मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.1,00,000/- व या अर्जाच्‍या खर्चापोटी रु.25,000/- ची मागणी केली आहे. तक्रारदारांनी तक्रारअर्जात सामनेवाला क्र.1 यांचेकडून कोणतीही रक्‍कम वसुल करुन मागितली नाही. तक्रारदारांनी तक्रारअर्जासोबत यादीप्रमाणे कागदपत्रे दाखल केली आहेत.
 
8) प्रस्‍तुत तक्रारअर्जाची नोटीस सामनेवाला क्र.1 यांना बजावून सुध्‍दा सामनेवाला क्र.1 या मंचासमोर हजर राहिले नाहीत. सामनेवाला क्र.1 यांनी सामनेवाला क्र.2 यांना दि.12/11/07 रोजी पाठविलेल्‍या पत्राची एक प्रत या मंचाच्‍या प्रबंधकांना पाठविली असून ती रेकॉर्डमध्‍ये आहे. त्‍यामध्‍ये सामनेवाला क्र.1 यांनी मंचाकडून त्‍यांना मिळालेले समन्‍स सामनेवाला क्र.2 यांना पाठवून देवून तक्रारदारांनी केलेल्‍या क्‍लेमबाबत त्‍यांचा काहीही संबंध नाही असे म्‍हटले आहे.
 
9) सामनेवाला क्र.2 यांनी कैफीयत दाखल करुन तक्रारदारांची मागणी अमान्‍य केली आहे. तक्रारदार ग्राहक संरक्षण कायदयातील तरतूदीप्रमाणे ग्राहक नसल्‍यामुळे तक्रारअर्ज रद्द होणेस पात्र आहे.
 
10) तक्रारदारांनी सामनेवाला क्र.1 यांचेकडून तक्रारअर्जात नमूद केलेली विमा पॉलिसी घेतली होती हे सामनेवाला यांना मान्‍य आहे. मुंबईत झालेल्‍या जुलै,2005 मधील अतिवृष्‍टीमुळे तक्रारदारांच्‍या ऑफीसमध्‍ये शिरलेल्‍या पुराच्‍या पाण्‍याची पातळी 3 ते 3.5 फुट उंच होती हे सामनेवाला यांना मान्‍य आहे तथापि, सामनेवाला क्र.2 यांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे फक्‍त 3 ते 3.5 उंचीच्‍या पातळीपर्यंत पुराचे पाणी साठल्‍यामुळे त्‍या उंचीपेक्षा जास्‍त उंच असणारे टेबल व त्‍यावरील विद्युत उपकरणे यांचे पाण्‍यामुळे नुकसान होण्‍याचे काही कारण नाही. सर्व्‍हेअर पी.के.दास आणि कं.यांनी दि.18/10/05 ला त्‍यांनी रिपोर्ट सादर केल्‍यानंतर सामनेवाला क्र.2 यांनी त्‍या रिपोर्टची छाननी केली असता त्‍यातील काही त्रुटी सामनेवाला क्र.2 यांच्‍या निदर्शनास आल्‍या तेंव्‍हा सामनेवाला क्र.2 यांनी मे.व्‍ही.बी.असोसिएटस् यांची इन्‍व्‍हेस्‍टीगेटर म्‍हणून नेमणूक केली. मे.व्‍ही.बी.असोसिएटस् यांनी दि.27/02/06 रोजी त्‍यांचा रिपोर्ट सामनेवाला क्र.2 यांना सादर केला. सदर रिपोर्टमध्‍ये मे.व्‍ही.बी.असोसिएटस्र यांनी स्‍पष्‍टपणे नमूद केले आहे की, मे.अरिहंत टेलीपॉईण्‍टची एकूण 43,000/- ची दाखल केलेली बिले बनावट आहेत. तसेच, मे.ऑनलाईन कंम्‍प्‍युटर्सचे बिलांची त्‍यांना पडताळणी करता आली नाही. 
 
11) तक्रारदारांच्‍या पत्राला सामनेवाला यांनी उत्‍तर सुध्‍दा पाठविले नाही हा तक्रारदारांचा आरोप सामनेवाला क्र.2 यांनी नाकारला आहे. सामनेवाला क्र.2 यांनी इन्‍व्‍हेस्‍टीगेटरच्‍या रिपोर्टची बारकाईने पाहणी केल्‍यानंतर तक्रारदारांचा क्‍लेम नाकारला आहे व त्‍याची सविस्‍तर माहिती तक्रारदारांना दिली आहे. अशा परिस्थितीत सामनेवाला क्र.2 यांचे सेवेत कमतरता आहे असे म्‍हणता येणार नाही. तक्रारदारांनी बनावट बिले दाखल करुन सामनेवाला क्र.2 यांचा विश्‍वासघात केला त्‍यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदारांचा क्‍लेम नाकारला आहे. तक्रारदारांना रक्‍कम रु.7,56,000/- किंवा नुकसानभरपाई तसेच या अर्जाचा खर्च देण्‍यास सामनेवाला क्र.2 जबाबदार नाहीत. सबब सदर तक्रारअर्ज खर्चासहित रद्द करण्‍यात यावा असे सामनेवाला क्र.2 यांनी म्‍हटले आहे. 
 
12) तक्रारदारांनी लेखी युक्तिवाद दाखल केला आहे, तसेच सामनेवाला क्र.1 यांनी कैफीयत किंवा लेखी युक्तिवाद दाखल केलेला नाही. सामनेवाला क्र.2 यांनी लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. दि.31/01/2010 पासून सामनेवाला क्र.1 व 2 या मंचासमोर हजर राहिले नाहीत. सबब तक्रारदारांचे वकीलांचा तोंडी युक्तिवाद ऐकण्‍यात येवून प्रस्‍तुत प्रकरण निकालावर ठेवण्‍यात आले.
 
13) निकालासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात -
 
मुद्दा क्र.1 - तक्रारदार हे सामनेवाला क्र.1 व 2 यांचे सेवेत कमतरता आहे हे सिध्‍द करतात काय ?
 
उत्तर      - होय. 
 
मुद्दा क्र.2 - तक्रारदार यांना सामनेवाला क्र.2 यांचेकडून दि.26/07/2005 रोजीच्‍या अतिवृष्‍टीमुळे त्‍यांच्‍या ऑफीसमधील 
                मालमत्‍तेच्‍या नुकसानीपोटी रक्‍कम रु.7,56,000/- व्‍याजासहित वसुल करता येईल काय ?तसेच सामनेवाला यांचेकडून नुकसानभरपाई
                व या अर्जाचा खर्च मागता येईल काय ?
 
उत्तर      - अंतिम आदेशाप्रमाणे.
 
कारणमिमांसा - 
मुद्दा क्र.1 - तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडून तक्रारअर्जात नमूद केलेली स्‍टॅण्‍डर्ड फायर अण्‍ड स्‍पेशल पेरिल्स् पॉलिसी क्र.112000/11/04/01707 त्‍यांचा व्‍यवसाय मे.जॉली कम्‍युनिकेशनसाठी घेतली होती. सदरची पॉलिसी ही दि.24/02/05 ते 23/02/06 या कालावधीसाठी होती. या पॉलिसीसाठी तक्रारदारांनी प्रिमियम म्‍हणून सामनेवाला यांना रक्‍कम रु.2,343/- दिले ही बाब सामनेवाला यांना मान्‍य आहे. सदर पॉलिसीमध्‍ये आश्‍वासित रक्‍कम रु.7,56,000/- असल्‍याचे नमूद केले आहे. ऑफीसमधील कोणत्‍या मालमत्‍तेसाठी विमा संरक्षण दिले याचाही तपशिल पॉलिसीमध्‍ये नमूद केला आहे.
 
           तक्रारदारांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे त्‍यांच्‍या ऑफीसमध्‍ये त्‍यांनी 4 पी.सी.ओ., एस.टी.डी. बुथ, 1 एअर कंडिश्‍नर, बसविले होते, तसेच जुन्‍या कागदपत्रांची रद्दी साठवून ठेवली होती. दि.26/07/2005 रोजी मुंबईत झालेल्‍या अतिवृष्‍टीमुळे तक्रारदारांच्‍या ऑफीसमध्‍ये पुराचे पाणी शिरले. ऑफीसमध्‍ये शिरलेल्‍या पुराच्‍या पाण्‍याची पातळी 3.5 फुट उंचीपर्यंत होती. सदर पुराच्‍या पाण्‍यामुळे तक्रारदारांच्‍या ऑफीसमधील पी.सी.ओ., एस.टी.डी. बुथ, एअर कंडिश्‍नर, फर्निचर इत्‍यादी मालमत्‍तेचे नुकसान झाले. नुकसानीची माहिती त्‍यांनी ताबडतोब सामनेवाला क्र.2 यांना दिली. नंतर तक्रारदारांनी नुकसानभरपाई मिळावी म्‍हणून क्‍लेम फॉर्म भरुन तो सामनेवाला क्र.1 मार्फत सामनेवाला क.2 यांना पाठविला. तक्रारदारांचे झालेल्‍या नुकसानीची माहिती मिळाल्‍यानंतर सामनेवाला क.2 यांनी पी.के.दास आणि कंपनी यांची इन्‍शुरन्‍स सर्व्‍हेअर म्‍हणून नेमणूक केली होती ही गोष्‍ट सामनेवाला यांना मान्‍य आहे. सर्व्‍हेअर पी.के.दास आणि कंपनी यांनी तक्रारदारांच्‍या मे.जॉली कम्‍युनिकेशनच्‍या ऑफीसला दि.02/08/05 रोजी भेट देवून तक्रारदारांच्‍या पतीच्‍या समक्ष ऑफीसची व त्‍यातील मालमत्‍तेच्‍या नुकसानीची पाहणी केली व फोटो काढले. तक्रारदारांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे सर्व्‍हेअर दास आणि कं. यांच्‍या सुचनेप्रमाणे तक्रारदारांच्‍या पतीने सी.पी.यु. दुरुस्‍तीसाठी मे.ध्रुव इंन्‍फोटेक यांना दिला. सर्व्‍हेअरने मागितलेली सर्व कागदपत्रे फोटोसहित तपासणीसाठी त्‍यांनी सर्व्‍हेअरना उपलब्ध करुन दिली. दि.12/08/05 रोजी सर्व्‍हेअर मे.पी.के.दास आणि कं. यांनी पुन्‍हा तक्रारदारांच्‍या ऑफीसला भेट देवून ऑफीसची पाहणी केली व दि.18/10/05 रोजी सर्व्‍हेअर दास आणि कं. यांनी त्‍यांचा फायनल सर्व्‍हे रिपोर्ट सामनेवाला क्र.2 यांना सादर केला. तक्रारदारांनी तक्रारअर्जासोबत सर्व्‍हेअर पी.के.दास आणि कंपनीने सादर केलेल्‍या दि.18/10/05 च्‍या फायनल सर्व्‍हे रिपोर्टची छायांकीत प्रत दाखल केली आहे. सर्व्‍हेअर पी.के.दास आणि कं. यांनी त्‍यांच्‍या दि.18/10/05 रोजीच्‍या रिपोर्टमध्‍ये प्रथमतः त्‍यांनी दि.02/08/05 रोजी तक्रारदारांच्‍या मे.जॉली कम्‍यनुनिकेशन या कन्‍युनिकेशन सेंटर व गेमींग कॅफेला भेट देवून पाहणी केली असे म्‍हटले आहे. तक्रारदारांनी सर्व्‍हेअर पी.के.दास यांना इन्‍शुरन्‍सची पॉलिसी कॉपी, नुकसान झालेल्‍या मालाची नोंद, वस्‍तु विकत घेतल्‍याची बिले, बॅलेंन्‍सशिट, इ. कागदपत्रे सादर केली. सर्व्‍हेअरने नुकसान झालेल्‍या मालाचे वर्णन त्‍यांच्‍या सर्व्‍हे रिपोर्टमध्‍ये दिलेले असून त्‍यामध्‍ये 17 कंम्‍प्‍युटर्स (without monitors), एस्.टी.डी.बुथ, टेबल, 21 खुर्च्‍या, प्‍लायवूडचे पार्टीशन, कंम्‍प्‍युटर ट्रॉली, 4 पी.सी.ओ. कॉइन बॉक्‍सेस, इलेक्‍ट्रानिक फीटींग, इत्‍यादी मालाचे झालेल्‍या नुकसानीचे वर्णन केले असून झालेले नुकसान एकूण रक्‍कम रु.2,88,864/-चे असल्‍याचे म्‍हटले आहे. सर्व्‍हेअर पी.के.दास यांनी तक्रारदारांनी विमा पॉलीसीच्‍या सर्व अटी व शर्तींचे पालन केले असल्‍याचे त्‍यांना आढळून आले असे म्‍हटले आहे.
 
सामनेवाला यांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे सर्व्‍हेअर पी.के.दास यांच्‍या दि.18/10/05 चे सर्व्‍हे रिपोर्टची त्‍यांनी बारकाईने पाहणी केली असता त्‍यांना काही त्रुटी आढळून आल्‍या त्‍यामुळे त्‍यांनी सर्व्‍हेअरला दि.05/12/05 रोजी पत्र पाठवून त्‍याबाबत खुलासा मागितला व त्‍यानंतर सामनेवाला क्र.2 यांनी व्‍ही.बी.असोसिएटस् यांची इन्‍व्‍हेस्‍टीगेटर म्‍हणून नेमणूक केली. व्‍ही.बी.असोसिएटस् यांनी तक्रारदारांच्‍या ऑफीसला भेट देवून त्‍यांनी दि.27/02/06 रोजी त्‍यांचा रिपोर्ट सामनेवाला यांना सादर केला. सादर केलेल्‍या या रिपोर्टमध्‍ये व्‍ही.बी.असोसिएटस् यांनी स्‍पष्‍टपणे नमूद केले आहे की, तक्रारदारांनी खरेदी केलेल्‍या कॉम्‍प्‍युटर, पी.सी.ओ., एस.टी.डी. मशीन कॉनफरन्‍स मशीनची बिले त्‍यांना तपासणीसाठी मिळाली नाहीत. तक्रारदारांनी मे.अरिहंत टेलीकॉमचे रक्‍कम रु.4,300/- चे सादर केलेली रिप्‍लेसमेंट बिले बनावट आहे. मे.ऑनलाईन कंम्‍प्‍युटर्सचे ऑफीस त्‍यांना सापडले नाहीत. त्‍यामुळे मे.ऑनलाईन कंम्‍प्‍युटर्सची बिले त्‍यांना तपासता आली नाहीत. सामनेवाला क्र.2 यांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे तक्रारदारांनी बनावट बिले सादर करुन सामनेवाला क्र.2 चा विश्‍वासघात केला आहे. तक्रारदारांनी विमा पॉलिसीच्‍या अटी व शर्तींचा भंग केला म्‍हणून त्‍यांना दि.13/04/06 च्‍या पत्राने तक्रारदारांचा क्‍लेम नाकारल्‍याचे कळविले.
 
           सामनेवाला क्र.2 यांनी क्‍लेम नाकारल्‍यासंबंधी पाठविलेले पत्र दि.13/04/06 च्‍या पत्राची प्रत तक्रारदारांनी तक्रारअर्जासोबत नि.’क’ ला दाखल केली आहे. सदर पत्रामध्‍ये सामनेवाला क्र.2 यांनी क्‍लेम नाकारण्‍यासाठी दिलेले कारण म्‍हणजे सर्व्‍हे रिपोर्टमध्‍ये त्‍यांना त्रुटी आढळून आल्‍याने त्‍यांनी इन्‍व्‍हेस्‍टीगेटर नेमला व इन्‍व्‍हेस्‍टीगेटरने सादर केलेल्‍या रिपोर्टमध्‍ये तक्रारदारांनी बनावट कागदपत्र दाखल करुन सामनेवाला यांची फसवणूक करण्‍याचा प्रयत्‍न केला म्‍हणून सामनेवाला यांनी तक्रारदारांचा क्‍लेम नाकारला आहे.
 
           या कामी तक्रारदारांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे सामनेवाला क्र.1 हे सामनेवाला क्र.2 चे अधिकृत एजंट आहेत व त्‍यांच्‍या सांगण्‍यावरुन सामनेवाला क्र.2 ची तक्रारअर्जात नमूद केलेली विमा पॉलिसी घेतली. तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.1 ने सामनेवाला क्र.2 मार्फत निर्णय घेण्‍यास काही मध्‍यस्‍थी केली नाही असा आरोप केला. तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.1 विरुध्‍द कोणतीही रक्‍कम वसुल करुन मागितलेली नाही तसेच, नुकसानभरपाई किंवा या अर्जाचा खर्च देखील मागितलेला नाही.
 
          वर नमूद केल्‍याप्रमाणे सामनेवाला यांचे सर्व्‍हेअर पी.के.दास आणि कंपनी यांनी तक्रारदारांचा क्‍लेम रक्‍कम रु.2,57,867/- पर्यंत मंजूर करण्‍यास हरकत नाही असा अहवाल सामनेवाला क्र.2 यांना सादर केला, परंतु सामनेवाला क्र.2 यांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे त्‍यांना सर्व्‍हेअरच्‍या अहवालात त्रुटी आढळून आल्‍या त्‍यामुळे त्‍यांनी सर्व्‍हेअरला दि.05/12/05 रोजी पत्र पाठवून त्‍याबाबत खुलासा मागितला. सर्व्‍हेअर पी.के.दास आणि कं. यांच्‍या अहवालात नक्‍की काय त्रुटी आढळून आल्‍या त्‍याबाबत सामनेवाला क्र.2 यांनी त्‍यांच्‍या कैफीयत किंवा लेखी युक्तिवादात स्‍पष्‍टपणे काहीही नमूद केलेले नाही. सामनेवाला यांनी त्‍यानंतर व्‍ही.बी.असोसिएटस् यांची इन्‍व्‍हेस्‍टीगेटर म्‍हणून नेमणूक केली. सामनेवाला यांनी व्‍ही.बी.असोसिएटस् यांच्‍या रिपोर्टचे आधारे तक्रारदारांचा क्‍लेम नाकारला. तक्रारदारांचा क्‍लेम नाकारण्‍यासाठी तक्रारदारांनी बनावट बिले - कागदपत्रे सादर केली असे महत्‍वाचे कारण नमूद करण्‍यात आले. इन्‍व्‍हेस्‍टीगेटर यांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे तक्रारदारांनी मे.ऑनलाईन कंम्‍प्‍युटर्स यांचा दि.02/09/05 रोजी रु.3,09,478/- किमतीच्‍या वस्‍तु विकत घेतल्‍या याबद्दलचे बिल दाखल केले परंतु सदरचे शॉप अस्तित्‍वात नाही असे आढळून आले. तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडे सादर केलेले क्‍लेम त्‍यांच्‍या दि.26/07/05 रोजी झालेल्‍या अतिवृष्‍टीमुळे पुराचे पाणी त्‍यांच्‍या ऑफीसमध्‍ये शिरल्‍यामुळे नुकसान झालेल्‍या वस्‍तुंची भरपाई मिळण्‍यासाठी सादर केलेला आहे. उपलब्‍ध कागदपत्रावरुन असे दिसून येते की, तक्रारदारांच्‍या ऑफीसमधील 17 कंम्‍प्‍युटर्समध्‍ये पाणी शिरल्‍यामुळे ते बंद झाले, तसेच एस.टी.डी.बुथ, पी.सी.ओ., टेबल, 21 खुर्च्‍या, कंम्‍प्‍युटर ट्रॉली इत्‍यादी वस्‍तुंचे नुकसान झाले. सदर नुकसानीचे सर्व्‍हेअर पी.के.दास आणि कं. यांनी समक्ष पाहणी करुन नुकसान झालेल्‍या वस्‍तुंचे फोटो काढले होते असे दिसून येते. तक्रारदारांच्‍या ऑफीसमध्‍ये 4 ते 5 फुट उंचीपर्यंत पाणी साठून राहिले होते असे सदर अहवालात नमूद करण्‍यात आले व झालेली नुकसानी विचारात घेवून तक्रारदारांना विमा पॉलिसीपोटी रक्‍कम रु.2,88,864/- द्यावेत अशी शिफारस केली. व्‍ही.बी.असोसिएटस् यांचा रिपोर्ट पाहता व्‍ही.बी.असोसिएटस् यांची सामनेवाला क्र.2 यांनी दि.28/10/05 रोजी नेमणूक केली परंतु व्‍ही.बी.असोसिएटस् यांनी तक्रारदारांच्‍या ऑफीसला प्रत्‍यक्ष कधी भेट दिली याचा उल्‍लेख नाही. व्‍ही.बी.असोसिएटस् यांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे प्रथम त्‍यांनी गोपनीय चौकशी केली व नंतर तक्रारदारांचे पती यांचा जबाब घेतला, नुकसान झाल्‍याचे फोटो घेतले. विमाधारकाकडून माहिती घेतली व त्‍यांनी सादर केलेल्‍या बिलांची चौकशी केली. तक्रारदारांनी सर्व्‍हेअरसमोर कंम्‍प्‍युटर्स, पी.सी.ओ., एस.टी.डी. मशीन कॉन्‍फरन्‍स मशीन ही त्‍यांना तपासणीसाठी मिळाली नाहीत. त्‍यांना तपासणीसाठी मिळालेल्‍या 2 बिलांबद्दल व्‍ही.बी.असोसिएटसने आक्षेप नोंदविले आहेत. पहिला आक्षेप मे.अरिहंत टेलीपॉईण्‍टच्‍या बिलासंबंधी आहे. तक्रारदारांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे दि.26/07/05 च्‍या पुरानंतर त्‍यांच्‍या आफीसमधील विद्युत उपकरणांचे नुकसान झाल्‍यानंतर मे.अरिहंत टेलीपॉईण्‍टकडून तक्रारदारांनी एस.टी.डी. मशीन, फॅक्‍स मशीन, कॉन्‍फरन्‍स मशीन, कॉईन बॉक्‍स इत्‍यादी वस्‍तु रक्‍कम रु.43,000/- ला विकत घेतल्‍या. दि.18/12/05 रोजी इन्‍व्‍हेस्‍टीगेटरने मे.अरिहंत टेलीपॉईण्‍टला भेट दिली त्‍यावेळी मे.अरिहंत टेलीपॉईण्‍टच्‍या मालकाने पी.सी.ओ., एस.टी.डी.मशीन, कॉन्‍फरन्‍स मशीन मे.जॉली कम्‍युनिकेशन यांना दि.26/07/05 च्‍या पुरानंतर विकलेल्‍या नाहीत असे सांगितले. व्‍ही.बी.असोसिएटसने मे.अरिहंत टेलीपॉईण्‍टच्‍या मालकाचे नांव रिपोर्टमध्‍ये लिहिलेले नाही तसेच त्‍यांचा लेखी जबाब सुध्‍दा घेतलेला नाही. महत्‍वाची बाब म्‍हणजे दि.26/07/05 च्‍या पुरामध्‍ये पी.सी.ओ.,एस.टी.डी. मशीन इत्‍यादीचे नुकसान झाल्‍यामुळे तक्रारदारांनी पुन्‍हा वर नमूद केलेल्‍या वस्‍तु विकत घेतल्‍याचे दिसते. दि.26/07/05 नंतर विकत घेतलेल्‍या वस्‍तुच्‍याबद्दल तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडे कोणतीही नुकसानभरपाई मागितलेली नाही. मागितलेली नुकसान भरपाई ही दि.26/07/05 रोजी नुकसान झालेल्‍या मालासंबंधी आहे. त्‍यामुळे तक्रारदारांनी दाखल केलेल्‍या क्‍लेमचा विचार करता नंतर खरेदी केलेल्‍या बिलांचा विचार करणेचे कारण नव्‍हते व सदरचे बिल बनावट असल्‍याचे मोघम आरोप व्‍ही.बी.असोसिएटसने आपल्‍या अहवालात केला आहे. व्‍ही.बी.असोसिएटसने दुसरा घेतलेला महत्‍वाचा आक्षेप म्‍हणजे मे.ऑनलाईन कंम्‍प्‍युटर्सचे तक्रारदारांनी दाखल केलेल्‍या बिलांबाबत आहे. मे.ऑनलाईन कंम्‍प्‍युटर्सचे ऑफीस जय महाराष्‍ट्र नगरमध्‍ये असल्‍याची माहिती इन्‍व्‍हेस्‍टीगेटरला मिळाल्‍यानंतर इन्‍व्‍हेस्‍टीगेटरने जय महाराष्‍ट नगरला भेट दिल्‍याचे दिसते. जय महाराष्‍ट्र नगरचा एरिया बराच मोठा असल्‍याने इन्‍व्‍हेस्‍टीगेटरला मे.ऑनलाईन कंम्‍प्‍युटर्सचे ऑफीस प्रयत्‍न करुनही सापडले नाही असे त्‍यांनी अहवालात म्‍हटले आहे. मे.ऑनलाईन कंम्‍प्‍युटर्सचे ऑफीस इन्‍व्‍हेस्‍टीगेरला सापडले नाही म्‍हणून इन्‍व्‍हेस्‍टीगेटरने मे.ऑनलाईन कंम्‍प्‍युटर्स नांवाचे दुकान/ऑफीस नव्‍हते असा निष्‍कर्ष काढणे चुकीचे ठरेल. व्‍ही.बी.असोसिएटसचा संपूर्ण रिपोर्ट बारकाईने वाचला असता व्‍ही.बी. असोसिएटसने दिलेला रिपोर्ट पूर्वग्रह दूषित असून मुद्दाम तक्रारदारांविरुध्‍द रिपोर्ट सादर केला असे दिसते. वास्‍तविक सामनेवाला यांनी नेमलेले सर्व्‍हेअर मे.पी.के.दास आणि कंपनी यांनी तक्रारदारांच्‍या ऑफीसला प्रत्‍यक्ष भेट देवून झालेल्‍या नुकसानीची प्रत्‍यक्ष पाहणी केली तसेच तक्रारदारांनी त्‍यांना आवश्‍यक ती कागदपत्रे उपलब्‍ध करुन दिली, तसेच सदर कागदपत्रांची पाहणी करुन तक्रारदारांनी विमा पॉलिसीच्‍या अटी व शर्तींचा भंग केलेला नाही असे स्‍पष्‍टपणे नमूद करुन तक्रारदारांचा रक्‍कम रु.2,88,864/- चा क्‍लेम मंजूर करावा अशी शिफारस करुन सुध्‍दा सामनेवाला यांनी इन्‍व्‍हेस्‍टीगेटरच्‍या चुकीच्‍या रिपोर्टचा आधार घेतला असे दिसते. अशा परिस्थितीत चुकीच्‍या कारणावरुन तक्रारदारांचा क्‍लेम नाकारणे ही सामनेवाला यांच्‍या सेवेतील कमतरता आहे असे म्‍हणावे लागते. सबब मुद्दा क्र.1 चे उत्‍तर त्‍याप्रमाणे देण्‍यात येते. 
 
मुद्दा क्र.2 - तक्रारदारांनी दि.26/07/2005 च्‍या पुराच्‍या पाण्‍यामध्‍ये त्‍यांचे एकूण रु.7,56,000/- किमतीच्‍या मालमत्‍तेचे नुकसान झाले आहे असे म्‍हटले आहे, परंतु झालेले एकूण नुकसान सिध्‍द करण्‍यासाठी तक्रारदारांनी स्‍वतः विश्‍वासार्ह असा पुरावा या मंचासमोर दाखल केलेला नाही. वर नमूद केलेल्‍या कारणास्‍तव सामनेवाला यांनी नेमलेले सर्व्‍हेअर पी.के.दास आणि कंपनी यांचा सर्व्‍हे रिपोर्ट विश्‍वासार्ह वाटतो व या सर्व्‍हे रिपोर्टमध्‍ये काढलेल्‍या निष्‍कर्षानुसार सामनेवाला यांनी तक्रारदारांना रक्‍कम रु.2,88,864/- द्यावेत असा आदेश करणे योग्‍य होईल.
 
             तक्रारदारांनी वरील रकमेवर द.सा.द.शे. 18 टक्‍के दराने व्‍याजाची मागणी केलेली आहे. या प्रकरणातील वस्‍तुस्थिती विचारात घेता सामनेवाला यांनी तक्रारदारांना रु.2,88,864/- यावर दि.04/10/2005 पासून द.सा.द.शे.9 टक्‍के दराने व्‍याज संपूर्ण रक्‍कम तक्रारदारांना मिळेपर्यंत द्यावेत असा आदेश करणे योग्‍य होईल.
 
             तक्रारदारांनी त्‍यांना सामनेवाला यांचेकडून मनस्‍तापापोटी नुकसानभरपाई म्‍हणून रु.1,00,000/- व या अर्जाचा खर्च रु.25,000/- सामनेवाला यांचेकडून मागितले आहेत. तक्रारदारांनी नुकसानभरपाईपोटी मागितलेली रक्‍कम, तसेच या अर्जाच्‍या खर्चाची रक्‍कम अवास्‍तव जादा आहे. सबब सामनेवाला यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्‍हणून रक्‍कम रु.10,000/- व या अर्जाच्‍या खर्चापोटी रु.5,000/- द्यावेत असा आदेश करणे योग्‍य होईल. सबब मुद्दा क्र.2 चे उत्‍तर त्‍याप्रमाणे देण्‍यात येते. प्रस्‍तुत तक्रारअर्जात तक्रारदारांनी सामनेवाला क्र.1 विरुध्‍द कोणतीही मागणी केलेली नसल्‍यामुळे सदरचा तक्रारअर्ज सामनेवाला क्र.1 विरुध्‍द खर्चासहित रद्द करणेत येतो, तसेच सदरचा तक्रारअर्जा सामनेवाला क्र.2 विरुध्‍द अंशतः मंजूर करण्‍यात येवून खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करणेत येत आहे - 
 
अं ति म आ दे श
 
1.तक्रार क्रमांक 252/2007 अंशतः मंजूर करणेत येतो. 
 
2.तक्रारअर्ज सामनेवाला क्र.1 विरुध्‍द खर्चासहित रद्द करणेत येतो.
 
3.सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदारांना रक्‍कम रु.2,88,864/-(रु.दोन लाख अठठ्याऐंशी हजार आठशे चौसष्‍ट मात्र) यावर दि.04/10/2005 पासून द.सा.द.शे.9 टक्‍के दराने व्‍याज संपूर्ण रक्‍कम तक्रारदारांना मिळेपर्यंत द्यावेत.
 
4.सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्‍हणून रक्‍कम रु.10,000/-(रु.दहा हजार मात्र) व या अर्जाच्‍या खर्चापोटी रक्‍कम रु.5,000/-(रु.पाच हजार मात्र) द्यावेत. 
 
5.सामनेवाला क्र.2 यांनी वरील आदेशाची अंमलबजावणी प्रस्‍तुत आदेशाची प्रत त्‍यांना मिळाल्‍यापासून 30 दिवसांचे आत करावी.

 
7. सदर आदेशाची प्रमाणित प्रत उभय पक्षकारांना देणेत यावी.

 

 
 
[HON'ABLE MR. SHRI.S.B.DHUMAL. HONORABLE]
PRESIDENT
 
[ Shri S.S. Patil , HONORABLE]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.