(मंचाचे निर्णयान्वये – सौ. व्ही.एन.देशमुख, अध्यक्षा)
-- आदेश --
(पारित दिनांक 24 सप्टेंबर 2004)
अर्जदाराने सदरची तक्रार त्याला मिळालेल्या विमा रकमेतील फरकाच्या रकमेकरिता दाखल केली आहे.अर्जदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे –
अर्जदाराने हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल दिनांक 18.01.2001 रोजी विकत घेऊन ती गैरअर्जदार यांचेकडे 18.01.2001 ते 17.01.2002 या कालावधीकरिता विमाकृत केली. विमाकृत सदर वाहनाची रक्कम रु.43,600/- दर्शविण्यात आली होती व या किंमतीवरच गैरअर्जदार विमा कंपनीने प्रिमिअमचा हप्ता स्विकारला दिनांक 26.11.2001 रोजी सदर मोटारसायकल चोरीला गेली. अर्जदाराने त्वरित पोलीस रिपोर्ट दिला. परंतु चौकशी अंती देखील मोआरसायकल न सापडल्यामुळे अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडे संपूर्ण विमा रक्कम मिळण्याकरिता अर्ज दाखल करुन आवश्यक त्या औपचारिक बाबींची पूर्तता केली. अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडे संपूर्ण रक्कम मिळण्याकरिता वारंवार भेटी दिल्यानंतर देखील दिनांक 15.11.2002 पावेतो अर्जदारास कोणतीही रक्कम दिली नाही. शेवटी दिनांक 15.11.2002 रोजी गैरअर्जदार यांनी चेक क्रमांक 138521 केवळ रु.33,000/- रकमेचा संपूर्ण विमा रकमेदाखल अर्जदारास दिला. सदरची रक्कम वाहनाच्या किंमतीपेक्षा कमी असल्यामुळे अर्जदाराने स्वतंत्र पत्रान्वये गैरअर्जदार यांचेकडे आक्षेप नोंदविला. तत्पूर्वी गैरअर्जदार यांनी मात्र संपूर्ण विमा रकमेदाखल अर्जदारास रु.33,000/- चा दिलेला चेक नाईलाजाने अर्जदारास स्विकारावा लागला. गैरअर्जदार यांनी अर्जदाराकडून वाहनाची किंमत रु.43,600/- असल्यामुळे त्यावर प्रिमिअम आकारला असून वाहनाच्या चोरीमुळे अर्जदाराचे संपूर्णपणे नुकसान झाले असून सदर किंमतीतून काही रक्कम वगळणे हे अन्यायकारक असल्याचे अर्जदाराचे प्रतिपादन आहे. करिता गैरअर्जदार यांनी रोखून ठेवलेली उर्वरित रक्कम रु.11,600/- त्यावरील व्याज व इतर नुकसानीकरिता अर्जदाराने एकूण रुपये 24,600/- ची मागणी केली आहे.
आपल्या तक्रारीपृष्ठयर्थ अर्जदाराने हलफनामा दाखल केला असून निशाणी क्रं. 4 अन्वये गैरअर्जदार यांनी अर्जदारास पाठविलेल्या पत्राच्या प्रती तसेच अर्जदाराने आक्षेप व्यक्त करण्यासंबंधीचे पत्र मंचासमोर दाखल केले आहे.
गैरअर्जदार यांनी आपल्या उत्तरामध्ये अर्जदाराने रु.33,000/- चा चेक हा संपूर्ण विमा रकमेकरिता उचलला असल्याचे नमूद केले असून सदर रक्कम उचलण्यापूर्वी अर्जदाराने कोणताही आक्षेप व्यक्त केला नव्हता. तसेच सर्व्हेअरने दिलेल्या अहवालानुसारच अर्जदारास रक्कम अदा करण्यात आली. अशाप्रकारे अर्जदाराने एकदा संपूर्ण विमा रकमेकरिता रक्कम उचलल्यानंतर उर्वरित रकमेकरिता तक्रार दाखल करणे न्यायोचित नाही असे आपल्या उत्तरात नमूद केले आहे.
आपल्या उत्तरापृष्ठयर्थ गैरअर्जदार यांनी त्यांचे विभागीय व्यवस्थापक यांचे शपथपत्र व महेन्द्रसिंग हुरा, सर्व्हेअर यांचे शपथपत्र मंचासमोर दाखल केले आहे.
अर्जदार व गैरअर्जदार यांचा तोंडी युक्तिवाद व मंचासमोर दाखल केलेली सर्व कागदपत्रे, विशेषत्वाने अर्जदाराने गैरअर्जदार यांना पाठविलेले दिनांक 16.11.2002 चे पत्र (आक्षेपाबाबतचे) व महेन्द्रसिंग हुरा, सर्व्हेअर यांचे शपथपत्र यांचे अवलोकन केले असता मंचाचे निकष खालीलप्रमाणे आहेत.-
अर्जदाराने दाखल केलेल्या कागदपत्रावरुन व गैरअर्जदार यांनी मान्य केल्याप्रमाणे अर्जदाराच्या मोटारसायकलची किंमत रु.43,600/-असल्याचे दिसून येते. सदर मोटारसायकलची विकत घेतल्यानंतर केवळ 10 महिन्यातच चोरीला गेली. परंतु गैरअर्जदार यांनी नेमलेल्या सर्व्हेअरने मात्र या मोटारसायकलची किंमत रु.33,000/- कशी येते याबाबत कोणताही खुलासा मंचासमोर दाखल केलेला नाही. किंबहुना निरीक्षकाचा अहवाल देखील गैरअर्जदार यांनी मंचासमोर दाखल केलेला नाही. निरीक्षकांच्या शपथपत्रात त्यांनी वाहनाची किंमत बाजारभावाप्रमाणे रु.33,000/- येत असल्याचे नमूद केले असले तरी त्याबाबतचे कोणतेही स्पष्टीकरण अथवा खुलासा आपल्या शपथपत्रात केलेला नाही. गाडीच्या झालेल्या चोरीमुळे अर्जदाराचे संपूर्णच नुकसान झाले असल्यामुळे(Total loss)अर्जदारास त्याच्या वाहनाची संपूर्ण किंमत मिळणे क्रमप्राप्त ठरते. 10 महिने त्याने केलेल्या वापराकरिता केवळ 10% घट गृहित धरली तरी अंदाजे रु.40,000/- गैरअर्जदार यांनी त्याला विमा रकमेदाखल देणे आवश्यक ठरते असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
गैरअर्जदार यांनी अर्जदाराने उचलेली रक्कम ही संपूर्ण विमा रकमेकरिता होती व एकदा रक्कम उचलल्यानंतर आक्षेप व्यक्त करुन उर्वरित रक्कम मागणी करणे योग्य नसल्याचे नमूद केले असले तरी राष्ट्रीय आयोगाने पारित केलेल्या निर्णयात अर्जदाराने रक्कम स्विकारल्यानंतर त्वरित आक्षेप व्यक्त केला असल्यास हा आक्षेप ग्राहय धरता येतो असे नमूद केले आहे.
Complainant accepted amount settled by Insurance Company … few days later complainant wrote protest letter- If protest is lodged within shortest possible time then payment could not be said to be accepted in full & final.
सदर निर्णयानुसार अर्जदार उर्वरित रक्कम मिळण्यास पात्र ठरतो असे मंचाचे स्पष्ट मत आहे. गैरअर्जदार यांनी दिनांक 15.11.2002 रोजी अर्जदारास रु.33,000/- रक्कम दिल्याचे दाखल कागदपत्रावरुन दिसून येते. करिता सदरदिनांकापासून उर्वरित रकमेवर म्हणजेच रु.7,000/- वर 9% व्याज मिळण्यास अर्जदार पात्र ठरतो.
वरील सर्व कारणांकरिता मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
// अं ति म आ दे श //
1 अर्जदाराची तक्रार अंशतः मान्य करण्यांत येते.
2 गैरअर्जदार यांनी अर्जदारास विमा रकमेतील फरकाची रक्कम रु.7,000/- त्यावरील 9%व्याजाने दिनांक 15.11.2002 पासून ते रक्कम अर्जदाराच्या हातात पडेपर्यंत आदेश पारित झाल्याच्या दिनांकापासून 1 महिन्याच्या आत द्यावेत.
3 गैरअर्जदार यांनी अर्जदारास मानसिक त्रास व तक्रार खर्चादाखल रु.500/- आदेश पारित झाल्याच्या दिनांकापासून 1 महिन्याच्या आत द्यावेत.