निकालपत्र
(द्वारा- मा.प्रभारी अध्यक्ष – श्री.एस.एस.जोशी)
(१) सामनेवाले क्र.१ यांनी नादुरुस्त लिफ्ट दुरुस्त करुन दिली नाही, या कारणावरुन तक्रारदार यांनी सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम १२ अन्वये या मंचात दाखल केली आहे.
(२) तक्रारदार यांची तक्रार अशी आहे की, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळयामागील कॉम्प्लेक्समध्ये तिस-या मजल्यावर राहतात. त्यांचे वय ७२ वर्ष असून त्यांच्या पत्नीचे वय ६८ वर्ष आहे. दोघांनाही जिना चढ-उतर करण्याचा त्रास होत असल्यामुळे त्यांनी सामनेवाले क्र.१ यांच्याकडून लिफ्ट बसवून घेतली. त्यासाठी रु.२,२५,०००/- एवढी रक्कम अदा करण्यात आली. दि.०१-१२-२०११ रोजी लिफ्ट बसविल्यानंतर सामनेवाले क्र.१ यांनी एक वर्षाची गॅरंटी व सेवा देण्याचे कबूल केले होते. दि.०१-१२-२०११ ते दि.३०-११-२०१२ या कालावधीत मोफत सेवा देण्यात येईल असे पत्र सामनेवाले क्र.१ यांनी दि.०६-१२-२०११ रोजी दिले होते. लिफ्ट बसविल्यानंतर काही दिवसातच तिच्यातून आवाज येवू लागला आणि ती व्यवस्थितपणे चालत नव्हती. दि.२५-०८-२०१२ पासून लिफ्ट पूर्णपणे बंद आहे. याबाबत सामनेवाले क्र.१ यांना वेळोवेळी तोंडी आणि लेखी कळवूनही त्यांनी सेवा दिली नाही आणि लिफ्ट दुरुस्त करुन दिली नाही असे तक्रारदार यांचे म्हणणे आहे. सामनेवाले क्र.१ यांनी सदोष लिफ्ट काढून नविन लिफ्ट बसवून द्यावी किंवा नादुरुस्त लिफ्ट स्वखर्चाने दुरुस्त करुन द्यावी आणि ती निर्दोष असल्याचे प्रमाणपत्र द्यावे तसेच मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.३,००,०००/- व तक्रारीचा खर्च रु.५०,०००/- भरपाई द्यावी अशी मागणी तक्रारदार यांनी केली आहे.
(३) तक्रारदार यांनी तक्रारीसोबत शपथपत्र, सामनेवाले क्र.१ यांच्याकडे रु.१,००,०००/-, रु.५०,०००/-, रु.७५,०००/- भरल्याच्या पावत्या, सामनेवाले क्र.१ यांनी रु.२,२५,०००/- चे दिलेले बिल, सामनेवाले यांचे दि.०६-१२-२०११ रोजीचे पत्र, सामनेवाले क्र.२ यांना दि.३१-०८-२०१२ व दि.०२-०७-२०१२ रोजी दिलेले पत्र, सामनेवाले क्र.१ व २ यांना दि.१७-०९-२०१२ रोजी वकिलामार्फत पाठविलेली नोटीस, सामनेवाले क्र.१ यांनी वकिलामार्फत नोटीसीला दिलेले उत्तर आदी कागदपत्रांच्या छायांकीत प्रती दाखल केल्या आहेत.
(४) सामनेवाले क्र.१ यांना दोन वेळा नोटीस पाठवून आणि त्याबाबत माहिती मिळूनही ते मंचात हजर झाले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला आहे. तर सामनेवाले क्र.२ यांना तक्रारीतून वगळण्यात यावे अशी विनंती तक्रारदार यांनी केली होती, ती मंजूर करुन सामनेवाले क्र.२ यांना तक्रारीतून वगळण्याचा आदेश करण्यात आला आहे.
(५) तक्रारदार यांची तक्रार व त्यासोबत दाखल केलेली कागदपत्रे, तसेच तक्रारदार यांच्या विद्वान वकिलांनी केलेला युक्तिवाद ऐकला असता, आमच्यासमोर निष्कर्षासाठी पुढील मुद्दा उपस्थित होतो.
मुद्दा : | निष्कर्षः |
(अ) सदरची लिफ्ट घरगुती वापरासाठी बसविली होती हे तक्रारदार यांनी सिध्द केले आहे काय ? | : नाही |
| | | |
विवेचन
(६) मुद्दा क्र. ‘‘अ’’ – तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.१ यांच्याकडून लिफ्ट बसवून घेतली होती आणि ती नादुरुस्त होऊन तिचा वापर कायमस्वरुपी थांबला. त्यानंतरही सामनेवाले क्र.१ यांनी त्यातील दोष दूर केला नाही आणि लिफ्ट दुरुस्त करुन दिली नाही, अशी तक्रारदार यांची मुख्य तक्रार आहे.
तक्रारदार यांनी आपल्या तक्रारीत आणि शपथपत्रामध्ये ते आणि त्यांची पत्नी आदर्श लॉजच्या वर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळयामागे धुळे या पत्त्यावर राहत असल्याचे नमूद केले आहे. याच्या पुष्टयर्थ तक्रारदार यांनी शासकीय शिधापत्रिका, आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पॅनकार्ड, दूरध्वनी बिल, वीज बिल, अशा प्रकारचा कोणताही पुरावा दाखल केलेला नाही.
तक्रारदार यांनी तक्रारीत असे कथन केले आहे की, त्यांनी सदरची लिफ्ट त्यांची पत्नी आणि ते स्वत: अशा दोघांच्या वापरासाठी बसविली होती. त्याच्या पुष्टयर्थ त्यांनी सामनेवाले यांना वेळोवेळी दिलेल्या रकमांच्या पावत्या आणि बिल दाखल केले आहे. तथापि, या पावत्या आणि बिलावर रक्कम ज्याच्याकडून स्विकारण्यात आली त्या रकान्यात आदर्श लॉज, धुळे असे नमूद करण्यात आले आहे. जर तक्रारदार यांनी स्वत:च्या वैयक्तिक किंवा खासगी वापरासाठी लिफ्ट बसविली असती तर, त्यांनी सामनेवाले क्र. १ यांना दिलेली रक्कम स्वत:च्या नावे दिली असती आणि त्याच्या पावत्याही त्यांना स्वत:च्याच नावे मिळाल्या असत्या. मात्र सदर प्रकरणात सामनेवाले क्र.१ यांनी तक्रारदार यांना आदर्श लॉज या नावाने पावत्या आणि बिल दिले आहे. यावरुन तक्रारदार यांनी सदरची लिफ्ट स्वत:च्या खासगी वापरासाठी बसविलेली दिसत नाही.
तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.१ यांचे दि.०६-१२-२०११ रोजीचे पत्र दाखल केले आहे. हे पत्रही सामनेवाले यांनी आदर्श लॉज या नावाने दिले आहे. याच पत्रात सामनेवाले यांनी असे म्हटले आहे की, Your free service and guarantee period will be start from 1st December 20011 to 30th November 2012. Kindly release our balance payment as early as possible. यावरुन तक्रारदार यांच्याकडे सामनेवाले यांची काही रक्कम घेणे होती हे दिसून येते.
तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.१ व २ यांना दि.१७-०९-२०१२ रोजी वकिलामार्फत नोटीस पाठविली होती. त्या नोटीसीला सामनेवाले क्र.१ यांनी दि.२२-०९-२०१२ रोजी वकिलामार्फत उत्तर दिले आहे. या नोटीसीत सामनेवाले यांनी नमूद केले आहे की,
‘तक्रारदार यांचा रहिवास तिस-या मजल्यावर होता, आणि त्यांच्यासाठी त्यांनी लिफ्ट बसविली होती हे म्हणणे खोटे व लबाडीचे आहे. आम्ही ही लिफ्ट आदर्श लॉजसाठी, तेथे येणा-या प्रवाशांच्या सोयीसाठी बसविली होती व आहे सदरची लिफ्ट बसविण्याच्या वेळी आपण व आपली पत्नी व कुटुबिय तेथे कोणीच नव्हते. सदरची लिफ्ट ही आदर्श लॉज, मधुर कॉम्प्लेक्स मधील डॉक्टर व डॉक्टरांचे पेशंट यांचेसाठी बसविली होती व आहे.... आमची कंपनी सरकारी परवानाधारक असल्याने पाच माणसांची ३४० के.जी. लिफ्ट बसविण्यासाठी लागणारी आवश्यक ती कागदपत्रे (१) नगरपालिका परवानगी, (२) आर्किटेक्ट सटिर्फिकेट, (३) आर.सी.सी. तज्ज्ञांचा अहवाल (४) बिल्डींगचा नकाशा व लिफ्टसाठी सोडलेली जागा यापैकी कोणतीच माहिती आपल्याकडे नव्हती. म्हणून आपण आमच्याकडे असलेली कमी प्रवाशांची होम लिफ्ट बसविण्याची विनंती केली. या २०० के.जी. म्हणजे तीन माणसांच्या लिफ्टसाठी परवानगी लागत नाही. म्हणूनच आम्ही ती लिफ्ट बसवून दिली. त्याबाबतचे रु.२५,०००/- आपण अद्याप दिलेले नाहीत.’
सामनेवाले क्र.१ यांचे वरील कथन पाहता तक्रारदार यांनी त्यांच्याकडे बसविलेली लिफ्ट ही घरगुती वापरासाठी नव्हे तर त्यांच्या आदर्श लॉज या व्यवसायासाठी बसविल्याचे स्पष्ट होते. यावरुन तक्रारदार यांनी सदरची लिफ्ट घरगुती वापरासाठी बसविलेली आहे, हे सिध्द होत नाही.
ग्राहक संरक्षण कायकायद्यातील कलम २(ड) मध्ये या मंचासमोर कोणत्या तक्रारी चालू शकतात आणि कोणत्या तक्रारींचा न्यायनिवाडा करण्याचे या मंचाला अधिकारक्षेत्र आहे हे स्पष्ट केले आहे. त्यासाठी मंचाने ग्राहक संरक्षण कायद्यातील कलम २(ड) चे अवलोकन करुन या तक्रारीच्यासंदर्भात त्याचा आधार घेतला. कलम २(ड) मध्ये “ग्राहक” या शब्दाचा अर्थ आणि व्याख्या स्पष्ट केली आहे, ती पुढील प्रमाणे.
२ (ड) ग्राहक याचा अर्थ...
(एक) ज्याचे प्रदान करण्यात आले आहे किंवा प्रदान करण्याचे वचन देण्यात आले आहे किंवा अंशत: प्रदान करण्यात आले आहे आणि अंशत: देण्याचे वचन देण्यात आले आहे अशा प्रतिफलाचे किंवा स्थगित किंवा स्थगित प्रदानाच्या कोणत्याही पध्दतीखाली कोणताही माल खरेदी करते अशी कोणतीही व्यक्ती असा असून त्यात देण्यात आलेल्या किंवा देण्याचे वचन दिलेल्या किंवा अंशत: दिलेल्या व अंशत: देण्याचे वचन दिलेल्या प्रतिफलासाठी किंवा असा वापर अशा व्यक्तीच्या संमतीने झाला असेल अशा बाबतीत स्थगित प्रदानाच्या कोणत्याही पध्दतीनुसार असा माल खरेदी करणा-या व्यक्ती व्यतिरिक्त अशा मालाचा वापर करणा-या व्यक्तीचा समावेश असेल. परंतु, त्यात पुनर्विक्री करिता किंवा वाणिज्यिक प्रयोजना करिता असा माल खरेदी करणा-या व्यक्तींचा समावेश असणार नाही.
(दोन)ज्याचे प्रदान करण्यात आले आहे किंवा प्रदान करण्याचे वचन देण्यात आले आहे किंवा अंशत:प्रदान करण्यात आले आहे किंवा अंशत: देण्याचे वचन देण्यात आले आहे अशा प्रतिफलाचे किंवा स्थगित प्रदानाच्या कोणत्याही पध्दतीनुसार कोणतीही सेवा (भाडयाने घेते किंवा तिचा लाभ घेते) अशी कोणतीही व्यक्ती असा असून जेव्हा अशी सेवा प्रथम निर्दिष्ट व्यक्तीच्या संमतीने उपलब्ध झाली असेल अशा बाबतीत त्यात देण्यात आलेल्या किंवा देण्याचे वचन दिलेल्या किंवा अंशत: दिलेल्या किंवा अंशत: देण्याचे वचन दिलेल्या किंवा स्थगित प्रदानाच्या कोणत्याही पध्दतीसाठी अशी सेवा (भाड्याने घेते किंवा तिचा लाभ घेते अशा) व्यक्तीखेरीज अशा सेवेच्या कोणत्याही लाभधा-याचा समावेश असेल.
[परंतु, अशी सेवा व्यापारी कारणाकरीता घेतली असेल अशा कोणत्याही व्यक्तीचा यात समावेश होत नाही.]
[स्पष्टीकरण – पोटकलम (१) च्या प्रयोजनासाठी “वाणिज्यिक प्रयोजन” यामध्ये ग्राहकाने खरेदी केलेल्या आणि स्वयंरोजगारान्व्ये स्वतःची उपजीविका मिळविण्याच्याच केवळ प्रयोजनासाठी वापरलेल्या मालाचा अंतर्भाव होत नाही.]
ग्राहक संरक्षण कायद्यातील वरील कलमाचे अवलोकन केले असता, हे स्पष्ट होते की, कोणतीही व्यावसायिक संस्था ग्राहक या संज्ञेत मोडत नाही. तक्रारदार यांनी सदरची लिफ्ट त्यांच्या आदर्श लॉज आणि मधुर कॉम्प्लेक्स या व्यावसायिक उद्योगासाठी बसविली आहे हे वरील मुद्यांवरुन स्पष्ट होते. म्हणून तक्रारदार हे ‘ग्राहक’ या संज्ञेत मोडत नाहीत आणि त्यांच्या तक्रारीवर न्यायनिवाडा करण्याचा या मंचाला अधिकार पोहोचत नाही, असे आम्हाला वाटते. म्हणून मुद्दा क्र. ‘‘अ’’ चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत.
(७) उपरोक्त सर्व विवेचनावरुन तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.१ यांच्याकडून बसवून घेतलेली लिफ्ट घरगुती वापरासाठीच बसविलेली होती हे ते सिध्द करु न शकल्यामुळे त्यांची तक्रार ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदी नुसार मंजूर करता येणार नाही, या निर्णयाप्रत आम्ही आलो आहोत. म्हणून आम्ही पुढील प्रमाणे आदेश करीत आहोत.
आदेश
(१) तक्रारदार यांची तक्रार रद्द करण्यात येत आहे.
(२) तक्रार अर्जाचे खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
धुळे.
दिनांक : ०५-१२-२०१४
(सौ.के.एस.जगपती) (श्री.एस.एस.जोशी)
सदस्या प्र.अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.