(घोषित दि. 10.02.2014 द्वारा श्रीमती माधुरी विश्वरुपे, सदस्या)
तक्रारदारांची मारुती ओमनी गाडी एम.एच.20 ए. 47775 या वाहनाची विमा पॉलीसी कव्हर नोट 400426240 गैरअर्जदार यांचेकडे दिनांक 11.08.2011 ते 10.08.2012 या कालावधीची घेतली होती. दिनांक 31.12.2011 रोजी सदर वाहनाचा जालना येथे ट्रकची धडक लागून अपघात झाला. ट्रकची धडक बसल्यामुळे तक्रारदारांचे वाहन पूर्णत: निकामी झाले. वाहनामध्ये प्रवास करत असलेल्या तक्रारदारांच्या कुटूंबियांना तसेच गाडीच्या वाहन चालकास सदर अपघातामध्ये दूखापत झाली. तक्रारदारांनी अपघाता संदर्भातील एफ.आय.आर, घटनास्थळ पंचनामा, विमा पॉलीसी, वाहनाची कागदपत्रे, वाहन चालकाचे ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे कागदपत्रे तक्रारीत दाखल केली आहेत.
तक्रारदारांनी सदर अपघाताची माहीती गैरअर्जदार विमा कंपनीला घटनेनंतर ताबडतोब कळवली. विमा कंपनीच्या अधिका-यांनी तक्रारदारांना दूरुस्ती बाबतचा अहवाल सर्व्हेअर यांचेकडून आणण्याबाबत सांगितले. त्याप्रमाणे विमा कंपनीचे अधिकृत सर्व्हेअर श्री.एच.बी.जिंतूरकर यांनी वाहनाची दिनांक 20.01.2012 रोजी तपासणी केली. तसेच दिनांक 21.01.2012 रोजी रक्कम रुपये 87,000/- वाहनाच्या दूरुस्तीचा अहवाल दिला. तक्रारदारांनी सदर अहवाल गैरअर्जदार विमा कंपनीकडे दाखल केला. त्याचप्रमाणे तक्रारदारांनी वाहनाच्या दूरुस्तीबाबत खर्चाचे अंदाजपत्रक रक्कम रुपये 1,09,393/- चे गैरअर्जदार विमा कंपनीकडे दाखल केले. गैरअर्जदार यांनी सदर रक्कम तक्रारदारांना अदा केलेली नसल्यामुळे त्यांना दिनांक 14.02.2012 रोजी वकीला मार्फत कायदेशीर नोटीस पाठवली. परंतू गैरअर्जदार यांनी नोटीशीचे उत्तर दिले नाही अथवा वाहनाच्या नूकसानी बाबतची रक्कमही अदा केली नाही. त्यामुळे तक्रारदारांनी सदरची तक्रार दाखल केली.
गैरअर्जदार यांच्या लेखी म्हणण्यानुसार गैरअर्जदार यांचेकडून अपघातग्रस्त वाहनाची विमा पॉलीसी नाथानी यांनी घेतलेली असून तक्रारदारांना सदर वाहन दिनांक 31.11.2011 रोजी विक्री केले आहे. अपघाताचे वेळी वाहनाची विमा पॉलीसी तक्रारदारांचे नावावर नसून वाहन तक्रारदारांना विक्री केल्याबाबतची माहिती गैरअर्जदार यांना दिलेली नाही. अशा परिस्थितीत तक्रारदारांना सदरची तक्रार दाखल करण्याचा अधिकार नाही.
तक्रारदारांनी सदर अपघाताची माहिती गैरअर्जदार यांना दिेलेली नाही, तसेच सर्व्हेअर श्री.जिंतूरकर यांची नेमणूक करावयास सांगितले ही बाब मान्य नाही.
तक्रारदारांची तक्रार, गैरअर्जदार यांचे लेखी निवेदन यांचा सखोल अभ्यास केला. तक्रारदारांचे विद्वान वकील श्री.एम.डी.देशपांडे, गैरअर्जदार यांचे विद्वान वकील श्री. आर.यु.बनछोड यांचा युक्तीवाद ऐकला.
तक्रारदारांची एम.एच.20 ए.47775 मारुती ओमनी गाडीला ट्रकने धडक देवून झालेल्या दिनांक 31.12.2011 रोजीच्या अपघातामध्ये नूकसान झाल्याचे घटनास्थळ पंचनामा, एफ.आय.आर या कागदपत्रानुसार दिसून येते.
अपघातग्रस्त वाहनाची विमा पॉलीसी क्रमांक 400426240 मोहंमद हारुन मोहंमद हबीब नाथानी यांचे नावावर असून दिनांक 11.08.2011 ते 10.08.2012 या कालावधीची आहे.
तक्रारदारांचे वाहनाचे अपघातामध्ये नूकसान झाल्याचे तक्रारीत दाखल कागदपत्रानुसार दिसून येते. तक्रारदारांनी सर्व्हेअर श्री.जिंतूरकर यांचेकडून वाहनाची तपासणी केली असून सर्व्हेअर अहवाल दाखल केला आहे. परंतू अपघाताचे वेळी वाहनाची विमा पॉलीसी तक्रारदारांचे नावावर ट्रन्सफर झाली नव्हती. सदर विमा पॉलीसी मोहंमद हारुन मोहंमद हबीब नाथानी यांचे नावावर असून त्यांनी अपघातग्रस्त वाहन दिनांक 06.09.2011 रोजी शिवकुमार राऊत यांच्या नावावर ट्रान्सफर केले असून दिनांक 31.11.2011 रोजी तक्रारदारांच्या नावावर ट्रान्सफर केल्याबाबत तक्रारदारांनी वकीला मार्फत दिनांक 14.02.2012 रोजी गैरअर्जदार विमा कंपनीला पाठवलेल्या नोटीस वरुन दिसून येते. अपघातग्रस्त वाहन तक्रारदारांच्या नावावर ट्रन्सफर झाले असून प्रादेशिक परिवहन कार्यालयात (R.T.O) त्या प्रमाणे नोंदणी झाली. परंतु सदर वाहनाची विमा पॉलीसी तक्रारदारांच्या नावावर हस्तांतरीत झालेली नसल्यामुळे वाहनाच्या नुकसानीची भरपाई करण्याची जबाबदारी गैरअर्जदार विमा कंपनीवर येत नाही. अशा परिस्थितीत गैरअर्जदार विमा कंपनीची सेवेतील त्रुटी स्पष्ट होत नाही असे मंचाचे मत आहे.
सबब मंच खालील आदेश पारीत करत आहे.
आदेश
- तक्रारदार यांची तक्रार नामंजूर करण्यात येते.
- खर्चा बाबत आदेश नाहीत.
- ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच अर्जदाराला परत करावेत.