निकाल
(घोषित दि. 04.02.2017 व्दारा श्री.के.एन.तुंगार, अध्यक्ष)
ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 अन्वये तक्रार.
तक्रारदार याचे असे म्हणणे आहे की, त्याने दि.14.03.2016 रोजी गैरअर्जदार यांच्या दवाखान्यामध्ये त्याच्या डोळयांची तपासणी केली. त्यानंतर त्याला त्याच्या डोळयांचा नंबर काढून देण्यात आला. सदर नंबर गैरअर्जदार दवाखान्यातील डॉ.श्री.रजत महेश्वरी यांनी स्वतः संगणकाद्वारे तपासणी करुन काढून दिला. त्यानंतर त्या नंबरचा चष्मा तक्रारदार यांनी बनवून घेतला. परंतू सदर चष्मा तक्रारदार यास वापरण्याकरता अनुकूल होत नव्हता. त्याला दिसण्यास व बघण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे तो परत सदर रुग्णालयात गेला व संबंधित डॉक्टरांना त्याच्या त्रासाबददल सांगितले परंतू संबंधित डॉक्टरांनी तक्रारदाराच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर नाईलाजाने तक्रारदार यास परत त्याच्या डोळयांची तपासणी गणपती नेत्रालय जालना येथे करावी लागली. गणपती नेत्रालय जालना येथील तपासणीत तक्रारदार यास असे समजले की, गैरअर्जदार यांच्या दवाखान्यातून काढलेला त्याचा डोळयांचा नंबर व गणपती रुग्णालय जालना येथून काढलेला त्याच्या डोळयांचा नंबर यामध्ये मोठी तफावत आहे. गणपती नेत्रालय जालना येथून काढलेल्या नंबरच्या चष्म्यामुळे तक्रारदार यास होणारा बघण्याचा त्रास कमी झाला. तक्रारदार याचे असे म्हणणे आहे की, गैरअर्जदार यांनी चुकीचा नंबर दिल्यामुळे त्याला मानसिक व शारिरिक त्रास झाला. तसेच खर्च करावा लागला. त्यामुळे तो गैरअर्जदार यांचेकडून नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे. वरील कारणास्तव त्याने हा तक्रार अर्ज दाखल केला आहे.
तक्रारदार याने तक्रार अर्जासोबत नेत्रसेवा रुग्णालय व गणपती नेत्रालय येथून त्याच्या डोळयांची तपासणी केल्यानंतर काढून दिलेल्या चष्म्याच्या नंबरच्या झेरॉक्स प्रती दाखल केलेल्या आहेत.
गैरअर्जदार यांनी हजर होऊन लेखी जबाब दाखल केला. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तक्रारदार यास त्याचे डोळे तपासल्यानंतरच योग्य ती पडताळणी करुन योग्य त्या नंबरचा चष्मा देण्यात आला. तक्रारदार यास नुकसान भरपाई व खर्च मागण्याचा हक्क नाही. तक्रारदार याच्या डोळयांच्या चष्म्याचा नंबर काढण्यापूर्वी त्याच्या डोळयावर गैरअर्जदार डॉक्टरांनी दि.14.03.2016 रोजी तात्पुरता चष्मा लावला व त्यावरुन अक्षरांची ओळख व अक्षरांची पडताळणी करुन घेतली. सदर तपासणीच्यावेळी डॉक्टरांनी तक्रारदार यास प्रश्न विचारला की, पडताळणीमधील नंबरद्वारे जे दिसले त्याने तक्रारदार समाधानी आहे काय? त्या प्रश्नाचे उत्तर तक्रारदार याने होय असे दिले. त्यानंतरच तक्रारदार याला डोळयांचा नंबर काढून दिला. नंबर काढून देण्यात गैरअर्जदार डॉक्टर यांची कोणतीही चुक नाही. तक्रारदार याने गैरअर्जदार यांना त्रास देण्याच्या हेतुने खोटी तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे तक्रारदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करावा अशी विनंती गैरअर्जदार यांनी केलेली आहे.
तक्रारदार यांनी तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ पुराव्याकामी शपथपत्र दाखल केले आहे. तसेच गैरअर्जदार डॉक्टर यांनीही पुराव्याकामी शपथपत्र दाखल केले आहे.
आम्ही तक्रारदार यांचा युक्तीवाद ऐकला. तसेच गैरअर्जदार यांचे वकीलांनी केलेला युक्तीवाद ऐकला. तक्रारदार यांची तक्रार तसेच गैरअर्जदार यांचा लेखी जबाब यांचे परीक्षण केले. ग्राहक मंचासमोर असलेल्या सर्व कागदपत्रांचे वाचन केले. त्यावरुन आमचे असे मत झाले आहे की, दि.14.03.2016 रोजी तक्रारदार यास गैरअर्जदार यांनी चष्म्याचा नंबर काढून दिला हे उभयपक्षी मान्य आहे. सदर नंबरमध्ये दुरचा अॅक्सीस 110 असल्याचे दर्शविले आहे व जवळचा अॅक्सीस 10 असल्याचे लिहीलेले आहे. तो हयुमन एरर असून त्यात निष्काळजीपणा नाही असे नि.10 च्या शपथपत्रात गैरअर्जदार डॉक्टर यांनी स्पष्ट शब्दात (पॅरा नं.2 मध्ये) कबूल केले आहे. गैरअर्जदार यांच्या अधिकच्या खुलाशानुसार पेशंटचा जवळचा व लांबचा अॅक्सीस वेगवेगळा नसतो ते सारखेच असतात. त्यामुळे जरी चष्म्याच्या नंबरच्या तक्त्यामध्ये दुरचा अॅक्सीस 110 व जवळचा अॅक्सीस 10 असे लिहीले असेल तरी तो हयुमन एरर आहे असे समजावे, त्यात वैद्यकीय निष्काळजीपणा नाही असे समजावे. सदर नंबरच्या कार्डची झेरॉक्स प्रत तक्रारदार याने ग्राहक मंचासमोर सादर केली आहे, त्यावर डाव्या डोळयाचा लांबचा अॅक्सीस 110 व जवळचा अॅक्सीस 10 आहे असे लिहील्याचे दिसून येते. त्यामध्ये कोणतीही खाडाखोड नाही किंवा दुरुस्ती केलेली दिसून येत नाही. याचाच अर्थ दि.14.03.2016 रोजी गैरअर्जदार डॉक्टरने जो चष्म्याचा नंबर तक्रारदार यास दिला तो योग्य आहे असे डॉक्टरांचे मत त्यावेळी होते असे गृहीत धरावे लागेल.
तक्रारदार यास दि.14.03.2016 रोजी दिलेल्या चष्म्याच्या नंबरमुळे त्रास होऊ लागला त्यामुळे तो गैरअर्जदार डॉक्टर यांच्या भेटीस गेला, परंतू गैरअर्जदार यांनी तक्रारदार यांचेकडे दुर्लक्ष केले असा आरोप तक्रारदार यांनी तक्रारीत केलेला आहे. गैरअर्जदार डॉक्टर यांच्या दुर्लक्षामुळे तक्रारदार हा नाईलाजाने गणपती नेत्रालय जालना यांचेकडे गेला, तेथे त्याने त्याचे डोळे परत तपासून घेतले. त्यावेळी तक्रारदार यास परत चष्म्याचा नंबर काढून देण्यात आला. सदर तपासणी दि.23.04.2016 रोजी झाली त्यामध्ये डाव्या डोळयांचा लांबचा अॅक्सीस 105 व जवळचा अॅक्सीस 105 असल्याचा उल्लेख आहे. दि.23.04.2016 च्या तपासणीचा नंबर तक्रारदार यास पाहणे, वाचण्याकरता अनुकूल होता. वरील सर्व परिस्थितीमुळे तक्रारदार याच्या लक्षात आले की, गैरअर्जदार यांनी त्याच्या डोळयांचा अॅक्सीसचा आकडा लिहीण्यात निष्काळजीपणा केल्यामुळेच त्याला त्यावेळी वाचण्या, बघण्यामध्ये त्रास होऊ लागला व वरील सर्व प्रकारामुळे त्याला बराच मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला.
डोळयांचा चष्म्याचा नंबर काढण्याकरता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे दिलेल्या नंबरची अचुकता असते. जर सदरचा नंबर अचुक नसेल तर त्यामध्ये सदर डॉक्टरची चुक असते व त्याला निश्चितपणे वैद्यकीय निष्काळजीपणा आहे असे म्हणावे लागेल.
गैरअर्जदार यांचे वकीलांनी 2010 एन.सी.जे. 177 या सुप्रीम कोर्ट यांनी दिलेल्या निकालपत्रांचा हवाला दिला आहे. सदर प्रकरणामध्ये तक्रारदार याच्या पायास फ्रॅक्चर झाले होते, सदर फ्रॅक्चर करता जो वैद्यकीय उपचार असतो त्याचे काही पर्याय पेशंटवर उपचार करणा-या डॉक्टरला उपलब्ध होते. त्यापैकी डॉक्टराने सर्वोत्तम पर्याय निवडण्यामध्ये वैद्यकीय निष्काळजीपणा नाही असे या केसमध्ये निरीक्षण करण्यात आले आहे. तसेच याच प्रकरणात वैद्यकीय निष्काळजीपणा सिध्द करण्याची जबाबदारी तक्रारदार याच्या खांद्यावर असते असेही निरीक्षण करण्यात आले आहे. आमच्यासमोर चर्चेत असलेल्या प्रकरणात डोळयांचा नंबर काढण्यामध्ये गैरअर्जदार यांनी निष्काळजीपणा केला हे तक्रारदार याने योग्यरितीने सिध्द केले आहे. कारण गैरअर्जदार याने दिलेला डोळयांचा नंबर व गणपती नेत्रालय यांनी दिलेला डोळयांचा नंबर यामध्ये जवळच्या अॅक्सीसच्या आकडयामध्ये फरक दिसतो. त्यामुळे तक्रारदार याने गैरअर्जदार यांचे विरुध्द वैद्यकीय निष्काळजीपणाचा मुददा सिध्द केला आहे असे आम्ही गृहीत धरतो.
वर उल्लेख केलेले सर्वोच्च न्यायालयाचे निकालपत्र हे पायाच्या जखमे विषयी आहे. आमच्या समोर चर्चेत असलेल्या प्रकरणात डोळयांचा नंबर काढण्यात झालेल्या निष्काळजीपणाचा मुददा आहे त्यामुळे गैरअर्जदार यांना सदर निकालपत्रातील सर्व निरीक्षणांचा डोळे झाकून लाभ होऊ शकत नाही.
गैरअर्जदार यांनी 2015 एन.सी.जे.506 या प्रकरणातील निकालपत्र आमच्यासमोर अवलोकनार्थ सादर केले आहे. या प्रकरणातील निकालपत्राचा सुध्दा फायदा गैरअर्जदार यांना होऊ शकत नाही. कारण गैरअर्जदार यांनी सादर केलेल्या निकालपत्रातील वैद्यकीय इलाजाचे स्वरुप व आमच्या समोर चर्चेत असलेल्या प्रकरणातील वैद्यकीय इलाजाचे स्वरुप अत्यंत वेगळे आहे. तसेच आमच्यासमोर चर्चेत असलेल्या प्रकरणातील निष्काळजीपणाचा महत्वाचा मुददा तक्रारदार यांनी योग्यरितीने सिध्द केलेला आहे.
गैरअर्जदार यांनी 2014 एन.सी.जे. 585 या निकालपत्राची प्रत ग्राहक मंचाचे अवलोकनार्थ दाखल केलेली आहे. परंतू त्यामधील मुददा सुध्दा आमच्यासमोर चर्चेत असलेल्या प्रकरणात लागू होत नाही. म्हणून आम्ही सदर प्रकरणाचा ऊहापोह आमच्यासमोर चर्चेत असलेल्या प्रकरणात करत नाहीत.
वरील सर्व परिस्थितीमुळे आमचे असे मत झाले आहे की, गैरअर्जदार यांनी तक्रारदार यास त्याच्या डोळयांचा जो नंबर दि.14.03.2016 रोजी काढून दिला, त्या नंबरने तक्रारदार यास बराच त्रास झाला. म्हणून तक्रारदार त्यांची तक्रार घेऊन गैरअर्जदार यांचेकडे आला. त्यावेळी तक्रारदार याची फेर तपासणी करुन तक्रारदाराच्या तक्रारीत तथ्य आहे अथवा नाही याची खातरजमा करुन घेणे गैरअर्जदारास आवश्यक होते. परंतू तसे केल्याबददल कोणताही पुरावा ग्राहक मंचासमोर दाखल झालेला नाही. तसेच जर दुरचे अॅक्सीस व जवळचे अॅक्सीस एकच असते आणि त्यामध्ये फरक नसतो असे जर गैरअर्जदार याचे म्हणणे असेल तर, ज्यावेळी तक्रारदार हा गैरअर्जदार यांचेकडे त्याच्या डोळयास त्रास होत आहे म्हणून तक्रार घेऊन आला, त्यावेळी गैरअर्जदार यांनी तक्रारदाराची पुन्हा तपासणी करुन दि.14.03.2016 रोजी दिलेल्या चष्म्याच्या नंबरचे कार्ड दुरुस्त करुन देणे आवश्यक होते परंतू तसे गैरअर्जदार यांनी केलेले दिसत नाही.
या सर्व विवेचनावरुन आम्ही गृहीत धरतो की, तक्रारदार याने गैरअर्जदार यांचे विरुध्द वैद्यकीय निष्काळजीपणा/हलगर्जीपणाचा आरोप सिध्द केलेला आहे. शिवाय गैरअर्जदार यांनी ही या बाबत त्यांचे शपथपत्र नि.10 चे परिच्छेद 2 मध्ये या मुद्यावर कबुली दिलेली आहे. त्यामुळे आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करतो.
आदेश
- तक्रारदार यांचा तक्रार अर्ज खालीलप्रमाणे अंशतः मंजूर करण्यात येतो.
2) गैरअर्जदार डॉ. रजत दादुदास माहेश्वरी यांनी तक्रारदार यांना झालेल्या
मानसिक व शारीरिक त्रासाबददल रु.10,000/- या आदेशापासून 30
दिवसात द्यावेत.
3) गैरअर्जदार यांनी तक्रारदार यास या तक्रारीच्या खर्चाबददल रक्कम
रु.1,000/- द्यावेत.
श्रीमती एम.एम.चितलांगे श्री. सुहास एम.आळशी श्री. के.एन.तुंगार
सदस्या सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, जालना