ORDER | ( पारीत दिनांक : 07/10/2014) ( मा. प्रभारी अध्यक्ष, श्री मिलींद आर.केदार यांच्या आदेशान्वये).) तक्रारकर्ता यांनी प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 अन्वये दाखल केली असून, तक्रारकर्ते हे ओम महिला बचत गटाच्या सदस्य असून सर्व सदस्या महिला आहेत. त्यांनी सदर तक्रार संयुक्तपणे मंचासमक्ष दाखल केली असून त्याबाबत ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 (क) नुसार अर्ज केला. सदर अर्ज मंजूर करण्यात आला. - तक्रारकर्ते यांनी सुवर्णजयंती स्वयंरोजगार योजने अंतर्गत
स्वयंसहाय्यता महिला बचत गट स्थापन केले.सदर बचत गटाचे नांव ओम महिला बचत गट असे आहे. तक्रारकर्ते यांनी नमूद केले की, त्यांच्या बचत गटात एकूण 13 सदस्या आहेत. त्यापैकी सविता सुनिल शेळके यांचा दि. 30.12.2011 रोजी मृत्यु झाला. सदर बचत गटाचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत खाते उघडण्यात आले व गृह उद्योगाकरिता रुपये30,000/-अनुदानासह त्यांनी स्वयंरोजगार उद्योग सुरु केला. - त.क. यांनी कागदी द्रोण, नाश्ताच्या प्लेटा व जेवणाच्या प्लेटा तयार करण्याची मशीन घेवून गृह उद्योग करण्याचे ठरविले होते. त्याकरिता त्यांनी वि.प.चे प्रोप्रा. श्री. गणवीर यांच्याशी संपर्क साधला व त्यांच्याकडून उत्पादकाकरिता लागणारी मशीन , कच्चा माल, प्रशिक्षणाची हमी व सदर व्यवसायातून रु.15,000/- मासिक फायदा होईल असे आश्वासन वि.प. यांनी दिल्यामुळे त्यांच्याकडून मशीन घेण्यात आली. त.क. यांनी पुढे नमूद केले की, दि. 27.06.2011 रोजी वि.प. यांनी दिलेल्या कोटेशननुसार मशीनची किंमत रु.1,35,000/-व रु.60,000/- प्र. कि. प्रमाणे 250 कि. कच्चा मालाची किंमत रु.1,50,000/-चे कोटेशन दिले. यानुसार कोटेशनच्या आधारे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्ज घेऊन दि. 12.07.2011 रोजी रु.1,50,000/- चा डी.डी. देऊन मशिन व कच्चा माल खरेदी केला असे त.क. यांनी तक्रारीत नमूद केले. सदर मशीनची किंमत बिलानुसार रु.1,20,000/- होती व त्यावर व्हॅट रु.15,000/- असे रु.1,35,000/- व रु.15000/- कच्च्या मालाची किंमत वि.प. यांनी दाखविली.
- त.क. यांनी नमूद केले की, वि.प. यांनी दि. 21.09.2011 रोजी बचत गटाच्या 8 महिलांना प्रशिक्षण दिले. त.क. यांनी आक्षेप घेतला की, वि.प. यांनी जुनी मशीन पुरविली. सदर मशीन वर कुठल्याही कंपनीचे नांव, लोगो अथवा नंबर नव्हते. वि.प. यांनी जुन्या मशीनला रंगरंगोटी करुन त.क. यांना विकली. तसेच सदर मशीनची कोणतीही वॉरन्टी देण्यात आली नाही व कच्चा माल सुध्दा अतिशय निकृष्ट दर्जाचा पुरविला असे त.क. यांनी तक्रारीत नमूद केले. त.क. यांनी दि. 09.11.2011 रोजी पंचायत समितीकडे तक्रार केली. तसेच इतर उत्पादकांकडून मशीनच्या किंमतीची माहिती घेतली असता वि.प. यांनी रु.25-40,000/- जास्त घेऊन जुनी मशीन नवीन म्हणून विकल्याचे त.क. चे म्हणणे आहे. त्यामुळे त.क. यांनी सदर मशीन परत घेऊन रु.1,50,000/- परत करण्याची मागणी केली होती. परंतु वि.प. यांनी कोणतीही दाद दिली नाही. त्यांनी पुढे नमूद केले की, चौकशीमध्ये वि.प. यांचे नेहा मॅन्युफॅक्चुरिंग नांवाचे कोणतेही दुकान किंवा डिलरशीप नसल्याचे आढळले व त्यांच्याकडे मशीन विक्रीचा परवाना देखील नव्हता असे म्हटले आहे. त.क. यांनी तक्रारीत नमूद केले की, जुनी मशीन व हलक्या प्रतीचा कच्चा माल पुरविल्यामुळे त.क. चे नुकसान झाले. त्यामुळे बँकेतील कर्जाची परतफेड वेळेवर करु शकले नाही व त.क. यांना रु.5,000/- प्रति महिना प्रमाणे बँकेचा हप्ता भरावा लागतो. त्यामुळे त.क. चे अतोनात नुकसान झाले. त.क.नी तक्रारीत मागणी केली की, वि.प. यांनी अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला आहे असे घोषित करण्यात यावे. तसेच मशीन व कच्च्या मालाकरिता दिलेली रक्कम व त्यावरील व्याज रु.35,000/-, रोजगाराचे झालेले नुकसान रु.25,000/-, शारीरिक, मानसिक त्रासाबद्दल रु.50,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रु.10,000/-ची मागणी केलेली आहे.
- सदर तक्रारीची नोटीस वि.प.यांना बजाविण्यात आली. वि.प.
यांनी सदर तक्रारीला खालीलप्रमाणे उत्तर दाखल केले आहे. - वि.प. यांनी त.क. चे सर्व म्हणणे नाकारले असून त.क.
हे वि.प. यांच्याकडे आले होते व त्यांनी सर्व शहानिशा करुन मशीन खरेदी केली. तसेच वि.प. यांनी त.क.यांना प्रशिक्षण सुध्दा दिले. त.क. यांनी मशीनचे कोटेशन मागितले होते. कोटेशन मंजूर करुन सदर रक्कम डी.डी. द्वारे वि.प. यांना दिली व त्यानुसार दि. 25.08.2011 ला मशीन त.क. ला दिली. वि.प.नी आपल्या उत्तरात नमूद केले की, दि. 25.08.2011 ला मशीनची डिलीव्हरी दिली व दि. 18.09.2011 ला बिल दिले. कारण त्याच्याकडे बिल बुक नव्हते व ते छपाई करिता गेले होते. वि.प. यांनी त.क. चे सर्व म्हणणे नाकारले असून सदर तक्रार खारीज करण्याची मागणी केली आहे. - सदर प्रकरणामध्ये दाखल केलेले दस्ताऐवज उभय पक्षाचे
कथन, शपथपत्र, युक्तिवाद इत्यादीचे मंचाने अवलोकन केले असता, खालील बाबी विचारार्थ उपस्थित झाल्या. कारणे व निष्कर्ष - त.क. यांनी वि.प. यांच्याकडून द्रोण, पत्रावळी, कागदी पेपर प्लेटस बनविण्याची मशीन खरेदी केली ही बाब उभय पक्षांच्या कथनावरुन व त.क. यांनी दाखल केलेल्या नि.क्रं. 5 वरुन स्पष्ट होते. सदर मशीनची किंमत रु.1,35,000/- व कच्च्या मालाची किंमत 15,000/-रुपये असे एकूण 1,50,000/-रुपये डी.डी. द्वारे वि.प. यांना दिली ही बाब सुध्दा दस्ताऐवज व उभय पक्षांच्या कथनावरुन सिध्द होते. त.क. यांनी वि.प.यांच्याकडून मशीन व कच्चा माल खरेदी केला होता ही बाब स्पष्ट होते. सदर मशीन व कच्चा माल स्वयंरोजगाराकरिता घेतला होता ही बाब सुध्दा त.क. यांनी तक्रारीत नमूद केली. तसेच त्यावर त्यांच्या कुटुंबाचे उदरनिर्वाह होतो असे त्यांनी युक्तिवादाच्या वेळी म्हटले. त्यावर वि.प. यांनी कोणताही आक्षेप लेखी उत्तरात किंवा अन्य कोणत्याही प्रकारे घेतला नाही, त्यामुळे मंचाचे असे मत आहे की, त.क. हे वि.प.यांचे ग्राहक आहेत.
- तक्रारकर्त्यांना विरुध्द पक्षाने जुनी मशीन, नवीन मशीन म्हणून विकली असा आक्षेप घेतला आहे . याबाबत मंचाने तज्ञांची नेमणूक केली. सदर प्रकरणामध्ये तज्ञ म्हणून हरदयाल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पुलगांव, जि. वर्धा यांची तज्ञ म्हणून नेमले. त्यांनी आपल्या अहवाल मंचासमक्ष दिला. सदर अहवालामध्ये मशीन जुनी असल्याबाबतचा कोणताही निष्कर्ष देता येत नाही असे तज्ञाने आपले मत दिलेले आहे. कारण सदर मशीनचा पुरवठा अडीच वर्षापूर्वी झाला होता व ज्या जागेमध्ये मशीन ठेवली होती ती जागा व तेथील वातावरणाची पाहणी केली असता सदर मशीनच्या आजूबाजुला लहान झाडे लावलेली आहे व त्यांना वारंवांर पाणी टाकल्या जाते त्यामुळे तेथील वातावरणाने मशीन खराब झाल्याची शक्यता नाकारता येत नाही असे त्यांनी आपल्या अहवालात नमूद केले आहे. तज्ञांनी सदर मशीन जुनी असून तिला रंगरंगोटी करुन विकली असा कोणताही निष्कर्ष दिला नाही. त्यामुळे सदर मशीन ही जुन्या स्वरुपाची होती व ती नवीन म्हणून विकली असा कोणताही निष्कर्ष मंचाला देता येत नाही.
- सदर प्रकरणामध्ये त.क. यांनी खरेदी केलेली मशीन व कच्चा माल हा 1,50,000/-रुपयाचा होता. परंतु वि.प. यांनी त.क. यांच्याकडून इतर त्याचप्रकारचे उत्पादन करणा-या मशीनचे दरपत्रक याची तुलना केली असतांना 25 ते 40,000/-रुपये जास्त घेतले आहे असा आक्षेप घेतला. ही बाब सिध्द करण्याकरिता त.क.ने तक्रारी सोबत वि.प.चे दरपत्रक व जयकिसान मशीनरीज यांचे कोटेशन नि.क्रं. 5 (12)वर दाखल केले आहे. ही बाब स्पष्टपणे जाणवत असली तरी वि.प. यांनी कोटेशन दिलेले 1,50,000/-रुपयाचे व जयकिसान मशीनरीजचे 45,500/रुपयाचे होते ही बाब त.क. यांनी मशीन खरेदी केल्यानंतर त्यांच्या लक्षात आली. मंचाच्या मते त.क. बचत गट असल्यामुळे त्यांनी मशीन खरेदी करण्यापूर्वी सर्व शहानिशा करुनच मशीन खरेदी करणे आवश्यक होते. त.क. यांनी मंचासमक्ष प्राथमिक चौकशी अहवाल दाखल केला. सदर चौकशी अहवालावर गट विकास अधिकारी, पंचायत समिती, देवळी व चौकशी अधिकारी तथा विस्तार अधिकारी उद्योग पंचायत समिती, देवळी यांची सही आहे. सदर चौकशी अहवालाचे अभिप्राय व्यवसायाचे दरपत्रक घेवून त.क. यांनी विभागाशी संपर्क न साधता वि.प.यांच्याशी परस्पर संपर्क साधला. त्यामुळे या सर्व अनियमिततेस ओम महिला बचत गटाचे अध्यक्ष, सदस्य व सचिव जबाबदार आहे असा अभिप्राय सदर अहवालात घेतला. सदर प्रकरणात त.क.चा कोणताही आक्षेप पुराव्या अभावी सिध्द होत नाही. तसेच प्राथमिक चौकशीच्या अहवालानुसार त.क. चे कोणतेही आक्षेप सिध्द होऊ शकले नाही. त्यामुळे तक्रारकर्त्यांची मागणी अमान्य करण्यात येते व सदर तक्रार खारीज होण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे.
वरील निष्कर्षाच्या आधारे मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. आदेश - तक्रारकर्त्यांची तक्रार खारीज करण्यात येते.
- मा.सदस्यांसाठीच्या ‘ब’ व ‘क’ फाईल्स संबंधितांनी परत घेवून जाव्यात.
- निकालपत्राच्या प्रति सर्व संबंधित पक्षांना माहितीस्तव व उचित कार्यवाहीकरीता पाठविण्यात याव्यात.
| |