अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, पुणे मा. अध्यक्षा : श्रीमती. प्रणाली सावंत मा. सदस्या : श्रीमती. सुजाता पाटणकर ************************************** ग्राहक तक्रार अर्ज क्रमांक:एपिडिएफ/137/2008 तक्रार अर्ज दाखल दिनांक: 13/07/2005 तक्रार निकाल दिनांक : 27/09/2011 श्री. शशिकांत नारायण देशपांडे, ..) 3 ए, विश्वकर्मा नगर, सुस रोड, ..) पाषाण, पुणे – 411 021. ..).. तक्रारदार विरुध्द 1. व्यवस्थापक, नीता व्होल्वो, ..) दुकान नं.2, पौडरोड, आयडीएल कॉलनी, ..) बी.पी.एल मोबाईल गॅलरी समोर, कोथरुड, ..) पुणे – 411 029. ..) ..) 2. व्यवस्थापक, नीता व्होल्वो, ..) दुकान नं.42, एशियाड बस स्टॉपजवळ, ..) डॉ. आंबेडकर रोड, दादर (पूर्व) ..) मुंबई – 400 014. ..) ..) 3. व्यवस्थापक, नीता व्होल्वो, ..) 19/ए, सरस्वती निवास, रोकाडिया लेन, ..) गोकुळ हॉटेल समोर, बोरिवली (प.) ..) मुंबई. ..)... जाबदार ******************************************************************* तक्रारदारांतर्फे - अड आर.पी. शाळीग्राम जाबदार - एकतर्फा . ********************************************************** द्वारा :-मा. सदस्या, श्रीमती. सुजाता पाटणकर // निकालपत्र // (1) प्रस्तूतचे प्रकरण सन 2005 मध्ये दाखल झालेले आहे. सदरचा तक्रार अर्ज तक्रारदारांनी पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच येथे दाखल केला होता तेव्हा त्यास पीडीएफ/198/2005 असा नोंदणीकृत क्रमांक देण्यात आला होता. मा.राज्य आयोग, मुंबई यांचे आदेशान्वये सदरचे प्रकरण अतिरिक्त पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच येथे वर्ग केल्यानंतर सदरचा तक्रार अर्ज एपीडीएफ/137/2008 असा नोंदविण्यात आला आहे. सदरहू प्रकरणात तक्रारदार यांना दि.01/07/2011 रोजीची मे. मंचात हजर राहण्यासाठी नोटीस काढलेली आहे. त्यानुसार तक्रारदार हजर झाल्यानंतर जाबदार यांना ग्राहक संरक्षण कायदा कलम 13 अन्वये दि.03/08/2011 रोजी जाबदारांना हजर राहण्याबाबत नोटीस काढण्याचे आदेश करण्यात आले. (2) तक्रारदारांनी तक्रार अर्जात कथन केल्याप्रमाणे तक्रारदारांना जाबदारांनी प्रवास सेवा देताना दाखविलेल्या निष्काळजीपणामुळे झालेल्या आर्थिक नुकसानीबद्यल व मानसिक त्रासाबद्यल सदरहू तक्रार अर्ज दाखल केला आहे. तक्रारदारांची तक्रार संक्षिप्त स्वरुपात खालीलप्रमाणे :- (3) तक्रारदार उज्जैन मध्यप्रदेश याठिकाणी गेले होते. तेथील काम उरकून ते मुंबईला आले. दि.1/2/2005 रोजी मुंबईहून पुण्याला येण्यासाठी तक्रारदारांनी जाबदार क.2 यांचेकडून दुपारी 3.30 ते 4.00 चे दरम्यान सुटणा-या गाडीचे तिकीट काढले. तक्रारदार ज्या गाडीने प्रवास करत होते ती गाडी एक्सप्रेस हायवेवर सर्वसाधारणपणे चहापाण्यासाठी 15 मिनीटे थांबली होती. चहासाठी थांबलेली गाडी पुढे नेण्यापूर्वी सर्व प्रवासी आले का याची खातरजमा ड्रायव्हरने केली नाही व निष्काळजीपणा दाखवला. आपली मुंबईहून पुण्याकडे जाणारी गाडी निघून गेल्याचे तक्रारदारांच्या लक्षात येताच, तक्रारदार तेथे उभ्या असलेल्या जाबदार कंपनीच्या दुस-या बसमध्ये चढले व त्या गाडीतील मदतनीसाची मदत घेऊन त्यांनी पुणे कार्यालयाशी संपर्क साधला व घडलेली घटना कानावर घातली. सदर मदतनिसाने श्री. सिकंदर यांना आपल्या गाडीतील तक्रारदार यांच्या दोन बॅगा परिहार चौक, औंध येथे काढून घेण्याच्या सुचना दिल्या होत्या. परंतु सिकंदर यांनी त्या काढून घेतल्या नाहीत. जाबदारांनी पुन्हा तक्रारदारांना हलगर्जीपणा व निष्काळजीपणा दाखवला व त्यामुळे तक्रारदार यांना त्रास झाला. दुस-या गाडीतून तक्रारदार आले व परिहार चौकात उतरले. तेथे सिकंदर यांचेशी बोलणे झाल्यावर त्यांनी पुणे स्टेशनच्या थांब्यावर फोन केला. तक्रारदार पाठोपाठ पुणे स्टेशनवर गेले तेथे प्रदीप यांनी तक्रारदार यांचे सामान नाही असे सांगितले. तक्रारदारांनी तक्रार अर्जात कथन केल्याप्रमाणे जाबदार कंपनीच्या कर्मचा-यांच्या हलगर्जीपणामुळे, निष्काळजीपणामुळे तक्रारदार यांच्या दोन बॅगज् गेल्या. त्या बॅगेत तक्रारदार यांचा मोबाईल, पैसे, संघटनेची कागदपत्रे, कपडे होते. बॅगांबरोबर बॅगेतील या सर्व गोष्टी गेल्याने तक्रारदार यांचे आर्थिक नुकसान झाले, वेळेचा अपव्यय झाला, जाबदार यांच्या सेवेतील त्रुटींमुळे तक्रारदार यांना प्रचंड त्रास व मनस्ताप झाला. यानंतर तक्रारदारांनी दि.2/2/2005 रोजी तक्रार केली. दि.4/2/2005 रोजी लेखी तक्रार करुन रु.15,000/- नुकसानभरपाईची मागणी केली. तसेच दि.15/2/2005 रोजी स्मरणपत्र पाठवून नुकसानभरपाईची विनंती केली. परंतु जाबदार यांनी तक्रारदार यांच्या तक्रारीचे समाधान केले नाही त्यामुळे तक्रारदारांनी सदरची तक्रार दाखल केली आहे. वरील सर्व कथने तसेच तक्रारदारांच्या तक्रार अर्जातील सविस्तर मजकूर यासह तक्रारदारांनी नुकसानभरपाईपोटी रु.15,000/- तसेच तक्रारीचा खर्च रु.5,000/- जाबदारांकडून तक्रारदार यांना देण्याचा हुकूम देणेबाबत मंचाकडे विनंती केली आहे. तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत तक्रारदारांचे शपथपत्र, बसचे तिकीट, जाबदारांशी झालेल्या पत्रव्यवहाराच्या प्रती व पोस्टाचा यु.पी.सी. चा दाखला इ. संबंधित कागदपत्रे जोडलेली आहेत. (4) मंचाने सर्व जाबदारांना नोटीस काढली असता, जाबदार क्र. 1 व 3 यांच्या नोटीसा त्यांना मिळाल्याच्या पोहोच पावत्या मंचाच्या रेकॉर्डवर दाखल आहेत. जाबदार क्र. 2 यांना पाठविण्यात आलेली नोटीस “N/C” या पोस्टाच्या शे-यासह परत आलेली आहे. जाबदार क्र. 1 ते 3 यांना नोटीसा मिळूनही ते मंचापुढे हजर झाले नाहीत अथवा त्यांनी त्यांची लेखी कैफियतही दाखल केलेले नाही. सबब दि.3/8/2011 रोजी मे. मंचातर्फे जाबदार क्र. 3 च्या विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आले आहेत व दि.13/09/2011 रोजी जाबदार क्र. 1 व 2 यांच्याविरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आले आहेत. (5) सदरहू प्रकरणातील तक्रार अर्ज, दाखल कागदपत्रे व तोंडी युक्तिवाद यांचा विचार करता खालील मुद्ये (points for consideration) मंचाच्या विचारार्थ उपस्थित होतात. मंचाचे मुद्ये व त्यांची उत्तरे पुढीलप्रमाणे :- मुद्या क्र . 1:- जाबदारांनी तक्रारदार यांना सदोष सेवा दिली ही बाब सिध्द होते का ? ... होय. मुद्या क्र. 2 :- काय आदेश ? ... अंतिम आदेशाप्रमाणे विवेचन :- 1) तक्रारदार यांनी जाबदारांकडून घेतलेले मुंबई-पुणे प्रवासाचे तिकीट निशाणी क्र. 4 वर तक्रारदारांनी दाखल केलेले आहे. यावरुन तक्रारदारांनी जाबदारांकडून मुंबई-पुणे प्रवासाचे तिकीट खरेदी करुन सेवा घेतल्याचे सिध्द होते. सबब तक्रारदार निश्चितच जाबदारांचे ग्राहक आहेत ही बाब निर्विवाद आहे. 2) तक्रारदारांच्या कथनाप्रमाणे तक्रारदार जाबदार यांच्या बसने मुंबई-पुणे दरम्यान प्रवास करत असताना चहासाठी एक्सप्रेस हायवेवर गाडी उभी असताना गाडी तक्रारदारांना सोडून गेली तसेच बसमधील मदतनीसांनी ताबडतोब पुणे येथे संपर्क साधला व श्री. सिकंदर यांना परिहार चौकात निघून गेलेल्या गाडीमधून दोन बॅगा काढून घेण्याची सूचना दिली परंतु श्री. सिकंदर यांनी परिहार चौक, औंध येथे बॅगा काढून घेतल्या नाहीत. तसेच तक्रारदार गोवा गाडीने पुणेस्टेशनवर गेले असता तक्रारदारांना तेथे सामान नाही असे सांगण्यात आले, वरील सर्व बाबी तक्रारदारांनी जाबदार क्र. 1 यांना दि.4/2/2005 रोजी पत्र पाठवून कळवल्याचे तसेच निशाणी 6 अन्वये दाखल असलेले दि.15/2/2005 रोजीच्या जाबदारांना यु.पी.सी. ने पाठविलेल्या पत्रांवरुन निदर्शनास येतात. त्याचप्रमाणे ही सर्व कथने तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत दाखल केलेल्या शपथपत्रावर शपथेवर कथन केलेली आहेत. याउपरही सर्व जाबदारांना नोटीसा मिळूनही जाबदार हजरही राहिले नाहीत त्यामुळे तक्रारदार यांच्या तक्रार अर्जातील जाबदार यांच्या सेवेतील कमतरतेबाबत शपथपत्रासोबतचे कथन निर्विवादीत राहिलेले आहे. तक्रारदार हे जाबदार यांच्या बसमधून प्रवास करत असताना जाबदार यांची एखाद्या ठिकाणी बस चहासाठी थांबली असताना परत बस सुरु करताना सर्व प्रवासी बसमध्ये आलेले आहेत का नाहीत याबाबत पाहणी करणे ही जाबदारांची एकप्रकारची प्रवाशांना सेवा देण्यामधील नैतिक जबाबदारीच आहे. परंतु तक्रारदार हे बसमधून उतरले असता ते गाडीमध्ये आले अगर नाहीत याबाबत पाहणी न करता जाबदारांची बस निघून गेलेली होती. त्यानंतर तक्रारदार यांनी बसमधील आपल्या बॅगांबाबत जाबदारांच्या गाडीमधील मदतनिसामार्फत संपर्क साधून तक्रारदार यांच्या बॅगा श्री. सिकंदर यांना परिहार चौक, औंध येथे काढून घेणेबाबत सुचनाही दिलेली होती. परंतु तक्रारदार यांच्या बॅगा काढून घेतल्या नाहीत त्यामुळे तक्रारदार हे पुणे येथे आल्यानंतर जाबदारांच्या कार्यालयामध्ये त्यांचे सामान आणण्यासाठी गेले असता जाबदारांचे प्रतिनिधी श्री. प्रदीप यांनी तक्रारदार यांचे सामान नाही असे तक्रारदारांना सांगितले. तक्रारदार यांना जाबदार यांची बस सोडून गेल्यानंतर कमीतकमी तक्रारदार यांचे सामान उतरुन घेऊन ते पुणे येथील कार्यालयामध्ये ठेवून घेण्याची जाबदारांची जबाबदारी होती. परंतु जाबदारांनी तसे न केल्यामुळे तक्रारदार यांचे दोन बॅग्जमधील सामान म्हणजेच मोबाईल, पैसे, महत्वाची कागदपत्रे, कपडे इत्यादींचे आर्थिक नुकसान झालेले आहे. तसेच त्यांना सदरच्या प्रकारामुळे प्रचंड मनस्ताप झालेला आहे. याबाबत तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडे पत्र पाठवून वेळोवेळी नुकसानभरपाईची रक्कम देणेबाबत विनंती करुनही जाबदार यांनी त्याची पूर्तता केलेली नाही अगर सदर पत्रांना उत्तरही दिलेले नाही. सदरच्या अर्जाची मे. मंचामार्फत पाठविलेली नोटीस मिळूनही जाबदार या मंचामध्ये हजर राहिलेले नाहीत आणि तक्रारदार यांच्या तक्रार अर्जातील कथने नाकारलेली नाहीत, त्यामुळे तक्रारदार यांचा तक्रार अर्ज, शपथपत्र व दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता जाबदारांनी तक्रारदारांना सेवा देण्यामध्ये कमतरता केलेली आहे, ही बाब सिध्द झालेली आहे. वरील सर्व विवेचनाचा विचार होता, जाबदार यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केलेली आहे असे या मंचाचे मत आहे. 3) जाबदारांनी गाडी सुटतेवेळी सर्व प्रवासी गाडीत स्थानापन्न झालेले आहेत याची खात्री करणे आवश्यक होते. जाबदारांनी याबाबत खातरजमा न करता हलगर्जीपणा केला व त्यांच्या या बेजबाबदार वागण्यामुळे व निष्काळजीपणामुळे तक्रारदारांना त्यांचे सामानही मिळाले नाही. त्याचप्रमाणे तक्रारदारांनी पत्रव्यवहार केल्यानंतरही जाबदारांनी त्याबाबत काहीही दखल घेतली नाही त्यामुळे तक्रारदार यांना मे. मंचामध्ये प्रस्तूतचा तक्रार अर्ज दाखल करावा लागला आहे व त्याअनुषंगाने खर्चही करावा लागला आहे. जाबदार यांच्या कंपनीच्या कर्मचा-याच्या हलगर्जीपणामुळे व निष्काळजीपणामुळे तक्रारदार यांना निश्चितपणे आर्थिक नुकसान सहन करावे लागलेले आहे. या सर्व गोष्टींमुळे तक्रारदारांना निश्चितच शारिरिक व मानसिक त्रास झाल्याचे निष्पन्न होते. त्याचबरोबर मे. मंचाची नोटीस मिळूनही जाबदार हजरही राहिले नाही किंवा त्यांनी त्यांचा खुलासा सादर केलेला नाही. वरील सर्व परिस्थितीचा विचार करता, तक्रारदारांनी नुकसानभरपाईपोटी त्यांनी मागणी केल्याप्रमाणे रक्कम रु.15,000/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.5,000/- जाबदारांनी तक्रारदारांना द्यावेत असे आदेश करणे न्यायोचित ठरेल असे या मंचाचे मत आहे. वरील सर्व विवेचन व निष्कर्षांचा आधार घेऊन मंच खालीलप्रमाणे आदेश निर्गमीत करीत आहे. // आदेश // (1) तक्रार अर्ज मंजूर करण्यात येत आहे. (2) सदर निकालपत्राची प्रत प्राप्त झालेपासून तीस दिवसांचे आत यातील जाबदार क्र.1 ते 3 यांनी तक्रारदारांना नुकसानभरपाईपोटी रक्कम रु.15,000/- (रक्कम रु. पंधरा हजार मात्र) व सदरहू तक्रार अर्जाचा खर्च म्हणून रु.5,000/- (रक्कम रु. पाच हजार मात्र) अदा करावेत. (3) निकालपत्राच्या प्रती दोन्ही पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात याव्यात. (श्रीमती. सुजाता पाटणकर) (श्रीमती. प्रणाली सावंत) सदस्या अध्यक्षा अतिरिक्त पुणे जिल्हा मंच, पुणे अतिरिक्त पुणे जिल्हा मंच, पुणे पुणे. दिनांक – 27/09/2011
| [ Smt. Sujata Patankar] MEMBER[ Smt. Pranali Sawant] PRESIDENT | |