न्या य नि र्ण य
(व्दाराः- मा. सौ. रुपाली धै. घाटगे, सदस्या)
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे—
तक्रारदार हे त्यांच्या कुटुंबाच्या चरितार्थाकरिता छोटा व्यवसाय करतात. तक्रारदार यांनी सदर व्यवसायासाठी वि.प. यांचेकडून एच.पी. कंपनीचा कॉम्प्युटर खरेदी केलेला होता. तक्रारदार यांनी वि.प. याचेकडून रक्कम रु.98,800/- इतक्या किंमतीस सदरचा कॉम्प्युटर खरेदी केलेला होता. सदरचा कॉम्प्युटर खरेदी केलेनंतर 7 ते 8 महिन्यांत हँग होवू लागला. सदरची बाब तक्रारदार यांनी वि.प. यांना ता. 22/11/18 रोजी कळविली. त्यानुसार वि.प. यांनी ता.24/11/18 रोजी सदरचा कॉम्प्युटर दुरुस्त केला. परंतु पुन्हा दि.27/12/18 रोजी कॉम्प्युटर हँग होवू लागलेची तक्रार तक्रारदार यांनी वि.प. यांना कळविली. त्यानंतर सुध्दा वेळोवेळी तक्रारदार यांनी वि.प. यांना सदर कॉम्प्युटर खरेदी केलेनंतर 12 ते 13 वेळा कॉम्प्युटर बाबत तक्रार केली परंतु वि.प. यांनी तक्रारदार यांच्या तक्रारीचे निवारण केले नाही. अशा प्रकारे वि.प. यांनी सेवात्रुटी केल्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. सबब, तक्रारदार यांचा कॉम्पयुटर व्यवस्थितरित्या दुरुस्त करुन वॉरंटी कालावधीमध्ये कॉम्प्युटर वारंवार बंद पडलेने 1 वर्षे जादा वॉरंटी कालावधी वाढवून मिळावी, कॉम्प्युटर दुरुस्तीनंतरही बंद पडलेस तक्रारदारास नवीन कॉम्प्युटर मिळावा, तसेच वि.प. यांनी कॉम्प्युटरपोटी स्वीकारलेली रक्कम रु. 98,800/- तक्रारदारास परत मिळावी व सदर रकमेवर 18 टक्केप्रमाणे व्याज मिळावे, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.50,000/- व तक्रारअर्जाचा खर्च रु.50,000/- देणेचा आदेश वि.प. यांना व्हावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
2. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत टॅक्स इन्व्हॉईस, सर्व्हिस रिपोर्ट इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
3. प्रस्तुतकामी वि.प. क्र. 1 यांना नोटीस लागू होवून देखील ते गैरहजर असलेने त्यांचेविरुध्द दि.1/3/2021 रोजी एकतर्फा आदेश पारीत झालेला आहे.
4. वि.प.क्र.2 यांनी याकामी म्हणणे दाखल केले असून तक्रारदाराची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारली आहे. वि.प. यांचे कथनानुसार, सदर कॉम्प्युटरचे ते उत्पादक तसेच सेवा देणारे नाहीत. सदरच्या कॉम्प्युटरचे खरेदीची रक्कम वि.प.क्र.2 यांना दिलेली नसलेमुळे तक्रारदार हे वि.प.क्र.2 चे ग्राहक नाहीत. वि.प. क्र.2 हे उत्पादक किंवा सेवापुरवठादार नसलेने वि.प. क्र.2 हे जबाबदार नाहीत. तसेच तक्रारदार यांनी वि.प.क्र.2 यांना सदरच्या कॉम्प्युटरपोटी कोणतीही रक्कम वि.प. यांना दिलेली नाही. त्याकारणाने सदर वि.प. यांचेविरुध्द सदरची तक्रार चालणेस पात्र नाही. तक्रारदार यांनी वि.प. क्र.2 यांचेकडे सदरच्या कॉम्प्युटरबाबत तक्रार दाखल करणेपूर्वी कोणतीही कायदेशीर नोटीस सदर वि.प. यांना दिलेली नव्हती. त्याकारणाने तक्रारदार यांची तक्रार नामंजूर करण्यात यावी असे म्हणणे दाखल केले आहे.
5. तक्रारदारांचा तक्रारअर्ज, वि.प.क्र.2 यांचे म्हणणे, दाखल केलेली अनुषंगिक कागदपत्रे, तक्रारदाराचे पुराव्याचे शपथपत्र, लेखी युक्तिवाद यांचा विचार करता निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे विमा रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | तक्रारदार हे मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
5 | अंतिम आदेश काय ? | अंशतः मंजूर. |
कारणमिमांसा –
मुद्दा क्र. 1 –
6. तक्रारदार हे त्यांच्या कुटुंबाच्या चरितार्थाकरिता छोटा व्यवसाय करतात. तक्रारदार यांनी सदर व्यवसायासाठी वि.प. यांचेकडून एच.पी. कंपनीचा कॉम्प्युटर खरेदी केलेला होता. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे -
कॉम्प्युटरच्या कंपनीचे नाव - एच.पी.
कॉम्प्युटरचे मॉडेल - HP A/O PC24-Q274IN
खरेदी दिनांक - 23/03/2018
कॉम्प्युटरची खरेदी किंमत - 98,800/-
कॉम्प्युटरची वॉरंटी - 3 वर्षे
तक्रारदार यांनी वरील वर्णनाचा एच.पी. कंपनीचा कॉम्प्युटर वि.प. यांचेकडून खरेदी केल्याची ता. 23/3/2021 रोजीची पावती प्रस्तुतकामी तक्रारीसोबत दाखल केलेली असून सदर पावतीनुसार त्यांनी वि.प. याचेकडून रक्कम रु.98,800/- इतक्या किंमतीस सदरचा कॉम्प्युटर खरेदी केलेला होता. प्रस्तुतकामी वि.प. क्र. 1 यांना नोटीस लागू होवून देखील ते गैरहजर असलेने त्यांचेविरुध्द दि.1/3/2021 रोजी एकतर्फा आदेश पारीत झालेला असून वि.प. क्र.2 यांनी त्यांच्या म्हणण्यामध्ये सदर कॉम्प्युटरचे ते उत्पादक तसेच सेवा देणारे नाहीत. सदरच्या कॉम्प्युटरचे खरेदीची रक्कम वि.प. क्र.2 यांना दिलेली नसलेमुळे वि.प. क्र.2 हे तक्रारदारांचे ग्राहक नाहीत असे म्हणणे दाखल केलेले आहे. सबब, तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो. प्रस्तुत मुद्याच्या अनुषंगाने दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता तक्रारदार यांनी वि.प. क्र.1 यांचेकडून सदरचा कॉम्प्युटर खरेदी केलेची पावती दाखल केलेली असून सदरची पावती वि.प. क्र.1 यांनी नाकारलेली नाही. तसेच सदर पावतीचे अवलोकन करता सदर टॅक्स इन्व्हॉईसवर Description of goods मध्ये HP A/O PC 24-Q274IN नमूद असून तक्रारदार यांनी तक्रारीसोबत दाखल केलेले सर्व्हिस रिपोर्टमध्ये देखील एच.पी. असे नमूद आहे. सबब, तक्रारदार यांनी खरेदी केलेला कॉम्प्युटर हा एच.पी. या कंपनीचा/हेवलेट पॅककार्ड या कंपनीचा असलेमुळे तक्रारदार हे वि.प.क्र.1 व 2 यांचे ग्राहक आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2
7. उपरोक्त मुद्दा क्र.1 मधील विवेचनाचा विचार करता तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत. तक्रारदार यांनी वर नमूद कंपनीचा कॉम्प्युटर वि.प. यांचेकडून ता. 23/3/18 रोजी खरेदी केलेला होता. सदरचा कॉम्प्युटर खरेदी केलेनंतर 7 ते 8 महिन्यांत हँग होवू लागला. सदरची बाब तक्रारदार यांनी वि.प. यांना ता. 22/11/18 रोजी कळविली. त्यानुसार वि.प. यांनी ता.24/11/18 रोजी सदरचा कॉम्प्युटर दुरुस्त केला. परंतु पुन्हा दि.27/12/18 रोजी कॉम्प्युटर हँग होवू लागलेची तक्रार तक्रारदार यांनी वि.प. यांना कळविली. त्यानंतर सुध्दा वेळोवेळी तक्रारदार यांनी वि.प. यांना सदर कॉम्प्युटर खरेदी केलेनंतर 12 ते 13 वेळा कॉम्प्युटर बाबत तक्रार केली परंतु वि.प. यांनी तक्रारदार यांच्या तक्रारीचे निवारण केले नाही. सबब, वि.प. यांनी तक्रारदार यांच्या तक्रारीचे निवारण योग्य रितीने न करता तसेच सदर कॉम्प्युटरमधील दोषांचे निराकरण न करुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो. सदर मुद्याचे अनुषंगाने प्रस्तुतकामी वि.प. क्र.2 यांनी दाखल केलेल्या म्हणण्याचे अवलोकन करता वि.प. क्र.2 हे उत्पादक किंवा सेवापुरवठादार नसलेने वि.प. क्र.2 हे जबाबदार नाहीत. तसेच तक्रारदार यांनी वि.प.क्र.2 यांना सदरच्या कॉम्प्युटरपोटी कोणतीही रक्कम वि.प. यांना दिलेली नाही. त्याकारणाने सदर वि.प. यांचेविरुध्द सदरची तक्रार चालणेस पात्र नाही. तक्रारदार यांनी वि.प. क्र.2 यांचेकडे सदरच्या कॉम्प्युटरबाबत तक्रार दाखल करणेपूर्वी कोणतीही कायदेशीर नोटीस सदर वि.प. यांना दिलेली नव्हती. त्याकारणाने तक्रारदार यांची तक्रार नामंजूर करण्यात यावी असे म्हणणे दाखल केले आहे.
8. प्रस्तुतकामी तक्रारदार यांनी तक्रारीसोबत दाखल केलेल्या सर्व्हिस कॉल रिपोर्टचे अवलोकन करता सदरचे सर्व्हिस कॉल रिपोर्ट हे ता. 21/2/19, 5/8/19, 24/9/19, 25/9/19, 15/11/19, 17/12/19, 18/12/19, 31/12/19 असे दाखल केलेले असून सदर सर्व्हिस कॉलवर
Warranty – yes
Issues description – Key board issue,
Fan noise issue,
असे नमूद आहे. सबब, तक्रारदारांचे ता. 1/3/2021 रोजीचे पुरावा शपथपत्र व दाखल कागदपत्रे यांचे अवलोकन करता सदरचा कॉम्प्युटर ता. 23/3/18 रोजी खरेदी केले तारखेपासून हा हँग होवू लागलेला आहे. त्याच्यामध्ये Key board issue, तसेच Fan noise issue, असलेची तक्रार तक्रारदारांनी वि.प. यांना कॉम्प्युटर खरेदी केलेपासून तब्बल 10 वेळा वारंवार कळविलेचे दिसून येते. सदरचे सर्व्हिस कॉल रिपोर्ट्स वि.प. यांनी नाकारलेले नाहीत. तक्रारदार यांनी त्यांच्या पुरावा शपथपत्रामध्ये वि.प. यांनी मला कॉम्प्युटर रिपेअर करुन दिला. परंतु कॉम्प्युटरमध्ये असलेला उत्पादित दोष कायम तसाच राहिला असे कथन केले आहे. तसेच सदरचे सर्व्हिस कॉल रिपोर्टचे अवलोकन करता सदरचा कॉम्प्युटर हा वॉरंटी पिरेडमध्ये असलेचे दिसून येते. वि.प. यांनी तक्रारदार यांना खरेदीचे वेळी तीन वर्षांची वॉरंटी दिलेली होती ही बाब वि.प. यांनी नाकारलेली नाही. सबब, खरेदी केलेला कॉम्प्युटर हा वि.प.क्र. 1 व 2 कडून खरेदी केलेला असून तो एचपी या कंपनीचा असून त्याचे पूर्ण नाव हेवलेट पॅककार्ड म्हणजेच एचपी असे होते हे दिसून येते. वि.प. क्र.2 ही उत्पादित कंपनी असून वि.प. क्र.2 यांनी हेवलेट पॅककार्ड म्हणजेच एचपी कंपनी नाही असे कोठेही त्यांच्या म्हणण्यामध्ये नमूद केलेले नाही. सबब, सदरचा कॉम्प्युटर हा वि.प. क्र.2 यांनीच उत्पादित केलेला होता ही बाब शाबीत होते.
9. सबब, वरील सर्व बाबींचा बारकाईने विचार करता, वादातील कॉम्प्युटर हा वि.प. क्र.2 यांनी उत्पदित केलेला असून वि.प.क्र.1 यांनी तो विकलेला असलेने सदरचा कॉम्प्युटर वि.प. क्र.1 व 2 यांनी वॉरंटी पिरेडमध्ये दुरुस्त करुन देणे व वारंवार बिघाड झालेस बदलून देणे ही वि.प. क्र.1 व 2 यांची जबाबदारी होती. तथापि दाखल कागदपत्रांवरुन तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडे 10 वेळा सदर कॉम्प्युटर दुरुस्त करणेसाठी देवून व सदरचा कॉम्प्युटर दुरुस्त होत नसलेची बाब वि.प. क्र.1 व 2 यांना माहित असताना देखील वि.प. क्र.1 व 2 यांनी सदरचा कॉम्प्युटर रिपेअर न करुन देवून उत्पादित दोष असलेला कॉम्प्युटर तक्रारदार यांना दिलेला आहे ही बाब सिध्द होत आहे. त्याकारणाने वि.प. यांनी तक्रारदार यांना सदोष कॉम्प्युटर देवून तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
10. वि.प.क्र.1 व 2 यांनी संयुक्तिकरित्या याकामी निवाडा दाखल केलेला असून सदर न्यायनिवाडयातील वस्तुस्थिती (Facts) सदर तक्रारीशी विसंगत असलेने सदरचा न्यायनिवाडया या तक्रारीस लागू होत नाही.
11. सबब, वि.प. यांनी तक्रारदार यांचा कॉम्प्युटर व्यवस्थितरित्या दुरुस्त करुन द्यावा व वॉरंटी कालावधीमध्ये कॉम्प्युटर वारंवार बंद पडलेने एक वर्ष जादा वॉरंटी कालावधी वाढवून द्यावा तसेच कॉम्प्युटर दुरुस्तीनंतर बंद पडलेस तक्रारदार यास नवीन कॉम्प्युटर द्यावा अथवा वि.प. यांनी कॉम्प्युटरपोटी स्वीकारलेली रक्कम रु.98,800/- इतकी रक्कम तक्रारदार यांना परत अदा करावी तसेच सदर रक्कम तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के प्रमाणे व्याज अदा करावे. तक्रारदारांनी सदोष कॉम्प्युटर वि.प. यांना परत करावा. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.3
12. वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेने तक्रारदार हे वि.प. यांचेकडून मानसिक त्रासापोटी रक्कम रु.8,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- मिळणेस पात्र आहेत. सबब, मुद्दा क्र.3 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.4 - सबब आदेश.
- आ दे श - - तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
- वि.प.क्र.1 व 2 यांनी संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना तक्रारदारांचा कॉम्प्युटर व्यवस्थितरित्या दुरुस्त करुन वॉरंटी कालावधीमध्ये कॉम्प्युटर वारंवार बंद पडलेने एक वर्ष जादा वॉरंटी कालावधी वाढवून द्यावा तसेच कॉम्प्युटर दुरुस्तीनंतरही बंद पडलेस तक्रारदार यांना नवीन कॉम्प्युटर द्यावा.
-
वि.प. क्र.1 व 2 यांनी संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना कॉम्प्युटरपोटी स्वीकारलेली रक्कम रु.98,800/- अदा करावी तसेच सदर रकमेवर तक्रार दाखल तारीख 12/06/2020 पासून सदरची संपूर्ण रक्कम तक्रारदार यास मिळेपावेतो द.सा.द.शे.6 टक्के प्रमाणे व्याज अदा करावे. - वि.प. क्र.1 व 2 यांनी संयुक्तिकरित्या तक्रारदार यास नवीन कॉम्प्युटर दिलेस अथवा तक्ररदार यांनी वि.प. यांचेकडून कॉम्प्युटरपोटी रक्कम स्वीकारलेस तक्रारदार यांनी त्यांचे ताबेतील वादातील कॉम्प्युटर वि.प. यांना परत करावा.
- वि.प.क्र.1 व 2 यांनी संयुक्तिकरित्या तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु.8,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- अदा करावी.
- वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प. यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
-
- विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदयातील तरतुदींअन्वये वि.प. विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
- आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.
|