(मंचाचा निर्णय : श्री. विजय प्रेमचंदानी - मा. अध्यक्ष यांचे आदेशांन्वये)
1. तक्रारकर्त्यानी विरुध्द पक्षाविरुध्द ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये प्रस्तुत तक्रार दाखल केलेली असुन तक्रारकर्त्याचे तक्रारीतील कथन असे आहे की, तक्रारकर्त्याने दि.15.12.2014 रोजी विरुध्द पक्ष क्र.4 यांचेकडे मुदत ठेव म्हणून रु.9,20,000/- 18 महिन्यांकरीता जमा केले होते. तक्रारकर्त्याच्या मुदत ठेवीचा कालावधी संपल्यानंतर विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्यास ठेवीची व्याजासह रक्कम रु.10,78,700/- परत केली नाही. म्हणून तक्रारकर्त्याने दि.29.06.2016 रोजी विरुध्द पक्षांना वकीलामार्फत नोटीस पाठविला, सदर नोटीस प्राप्त होऊन सुध्दा विरुध्द पक्षांनी त्याची कोणतीही दखल घेतली नाही. विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्याची मुदत ठेवीची रक्कम परत केली नसल्यामुळे तक्रारकर्त्याप्रती अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केल्यामुळे तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केली आहे.
2. तक्रारकर्त्याने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, विरुध्द पक्षांना मुदत ठेवीची रक्कम रु.10,78,700/- व्याजासह तक्रारकर्त्यास देण्याचा आदेश व्हावा. तसेच शारीरिक, मानसिक त्रासापोटी रु.1,00,000/-, पत्रव्यवहाराचा खर्च रु.10,000/- तक्रारीच्या खर्चापोटी रु.10,000/- व नोटीस खर्च रु.5,000/- मिळण्याचा आदेश व्हावा.
3. तक्रारकर्त्याची तक्रार स्वीकृत करुन विरुध्द पक्षाला नोटीस पाठविण्याचा आदेश पारित करण्यांत आला. सदर नोटीस विरुध्द पक्षास प्राप्त झाल्यानंतर ते मंचासमक्ष हजर झाले. परंतु त्यांनी आपला लेखीजबाब दाखल केला नसल्यामुळे दि.07.11.2016 रोजी विरुध्द पक्ष क्र. 1 ते 4 विरुध्द प्रकरण लेखी जबाबाशिवाय चालविण्याचा आदेश पारित करण्यांत आला.
4. तक्रारकर्त्यातर्फे दाखल तक्रार, वकीलांचा युक्तीवाद ऐकला. तसेच सदर प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालील कारणमिमांसेवरुन अंतिम आदेश पारित करीत आहे.
- // कारणमिमांसा // -
5. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षांकडे मुदत ठेवीची रक्कम रु.9,20,000/- दि.26.12.2014 रोजी जमा केलेली होती. या मुदत ठेवीचा अवधी पूर्ण झाल्यानंतर दि.25.06.2016 रोजी तक्रारकर्त्यास 10,78,700/- मिळणार होते ही बाब तक्रारकर्त्याने निशाणी क्र.2 वर दाखल दस्त क्र.1 वरील मुदत ठेवीच्या पावतीवरुन सिध्द होते. सबब तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षांचा ‘ग्राहक’ आहे हे सिध्द होते. तक्रारकर्त्याने निशाणी क्र. 2 वर दस्त क्र.2 ची पडताळणी करतांना असे दिसुन आले की, विरुध्द पक्षांनी वरील नमुद मुदत ठेवीची रक्कम तक्रारकर्त्यास दिली नाही म्हणून त्यांना वकीलामार्फत नोटीस पाठविण्यांत आला होता. तरी सुध्दा विरुध्द पक्षांनी कोणतीही दखल घेतली नाही. या प्रकरणात विरुध्द पक्षांनी त्यांचे बचावापोटी कोणतेही लेखीउत्तर दाखल केले नसल्यामुळे तक्रारकर्त्याने तक्रारीत विरुध्द पक्षांविरुध्द लावलेले आरोप सिध्द होते, तसेच विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्याप्रती अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे. सबब मंच खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करीत आहे.
- // अंतिम आदेश // -
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्याला मुदत ठेवीची परिपक्व रक्कम रु. 10,78,700/- दि. 25.06.2016 पासून प्रत्यक्ष रकमेच्या अदायगीपावेतो द.सा.द.शे.11.5% व्याजासह द्यावी.
3. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला मानसिक व शारिरिक त्रासापोटी 20,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 10,000/- द्यावे.
4. विरुध्द पक्षाने सदर आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत करावे.
5. उभय पक्षकारांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्क द्यावी.
6. तक्रारकर्त्याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.