मंचाचे निर्णयान्वये - श्री. मिलींद केदार, सदस्य //- आदेश -// (पारित दिनांक – 04/12/2010) 1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्रा.सं.का.1986 कलम 12 अन्वये दाखल केलेली असून तक्रारकर्त्याची तक्रार अशी आहे की, त्याने गैरअर्जदार क्र. 1 कडून दि.22.10.2008 रोजी फॅबिया ऍमबिरोट 1.4 वाहन, इंजिन क्र. BNM 253300, रजि.क्र. MH-31-CR-5589 हे खरेदी करुन त्याचा विमा हा गैरअर्जदार क्र. 2 कडून गैरअर्जदार क्र. 1 ने सुचविल्याप्रमाणे काढला. तक्रारकर्त्याच्या म्हणण्याप्रमाणे वाहनात वारंवार दोष निर्माण होत असल्याबाबत गैरअर्जदाराकडे तक्रार केल्यावर केवळ आश्वासन देऊन सर्व्हिसिंग झाल्यावर वाहन व्यवस्थित चालणार याची शास्वती दिली. तक्रारकर्ता वाहन चालवित असतांना वाहन अचानक बंद पडले, त्यामुळे ते अपघातातून बचावले. त्यानंतर वाहन दुरुस्तीकरीता गैरअर्जदाराकडे दिले असता त्यांनी आपली चूक कबूल करुन वाहन दुरुस्त करण्याची हमी दिली. गैरअर्जदाराने वाहन दुरुस्त केल्यानंतर दुरुस्तीचा खर्च रु.1,75,000/- ची मागणी केली. तक्रारकर्त्याच्या म्हणण्याप्रमाणे वाहन हे हमी कालावधीत होते व गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी तक्रारकर्त्याला आश्वासन दिले होते की, दुरुस्ती खर्च हा विमा कंपनी व गैरअर्जदार करेल. वाहन परत घेण्यास गेले असता पार्किंग चार्जेस व व्याजाची मागणीही त्यांनी केली. त्यामुळे तक्रारकर्त्याने वाहनाचा ताबा घेतला. तक्रारकर्त्याच्या म्हणण्याप्रमाणे गैरअर्जदाराने त्याला सदोष वाहन विकून व्यवस्थित सेवा दिलेली नाही, म्हणून गैरअर्जदाराच्या सेवेतील त्रुटीबाबत त्याने सदर तक्रार मंचासमोर दाखल करुन मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाईदाखल रु.7,00,000/- ची मागणी केलेली आहे. आपल्या म्हणण्याचे पुष्टयर्थ एकूण चार दस्तऐवज दाखल केलेले आहेत. 2. सदर तक्रारीचा नोटीस गैरअर्जदारांवर बजावण्यात आला असता गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी लेखी उत्तर दाखल केले. 3. गैरअर्जदार क्र. 1 यांनी आपल्या उत्तरात असे नमूद केले आहे की, त्यांनी तक्रारकर्त्याला तक्रारीत नमूद वर्णनाचे वाहन विकले. परंतू वाहनाचा विमा काढण्याबाबत त्यांनी प्रोत्साहित केले नाही. तक्रारकर्त्याने स्वतःच्या पसंतीने वाहनाचा विमा अन्य विमा कंपनीकडून काढलेला आहे. वाहनाचे इंजिन हे अतिशय उच्च दर्जाचे व टिकाऊ आहे. विमा कंपनी व गैरअर्जदार क्र. 1 चा काहीही संबंध नाही. तक्रारकर्त्याच्या वाहनाचे इंजिन हे त्यांने वाहनात ऑईल न टाकता चालविल्याने ते ड्राय होऊन सीझ झाले व वाहन बंद पडले. वाहन दुरुस्तीला आल्यावर तक्रारकर्त्याला वाहन दुरुस्तीचे ईस्टीमेट देण्यात आले होते. तक्रारकर्त्याने होकार दिल्यावरच वाहन दुरुस्त करण्यात आले. तसेच गैरअर्जदार क्र. 1 यांनी गैरअर्जदार क्र.2 विमा कंपनीशी संपर्क साधला असता त्यांनी ऑईल सम्पकरीता येणारा खर्च मान्य केला. परंतू इंजिन ओव्हरहॉलींगचा खर्च अमान्य केला. त्यामुळे सदर वाद हा विमा कंपनी व तक्रारकर्ता यांच्यामधील आहे. तक्रारकर्ता वाहन घेऊन जात नसल्यामुळे पार्किंगचा प्रश्न उपस्थित झाला, म्हणून पार्किंगचे चार्जेसची मागणी त्यांनी केली. सदर तक्रार ही अमान्य करुन ती खर्चासह खारीज करण्याची मागणी गैरअर्जदार क्र. 1 ने केलेली आहे. 4. गैरअर्जदार क्र. 2 यांनी लेखी उत्तरात तक्रारकर्त्याचे संपूर्ण विधाने अमान्य केलेली आहेत. त्यांच्या मते त्यांनी तक्रारकर्त्याला कोणतीही पॉलिसी निर्गमित केलेली नसल्याने त्यांच्यामध्ये कोणताही करार झालेला नाही, म्हणून तक्रारकर्त्याला त्यांच्याविरुध्द तक्रार दाखल करण्याचा अधिकार नाही. 5. सदर तक्रार मंचासमक्ष दि.19.11.2010 रोजी युक्तीवादाकरीता आल्यानंतर मंचाने उभय पक्षांच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकला. तसेच तक्रारीमध्ये दाखल दस्तऐवज व शपथपत्रे यांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले. -निष्कर्ष- 6. तक्रारकर्त्याने गैरअर्जदार क्र. 1 कडून दि.22.10.2008 रोजी फॅबिया ऍमबिरोट 1.4 वाहन, इंजिन क्र. BNM 253300, रजि.क्र. MH-31-CR-5589 हे खरेदी करुन त्याचा विमा हा गैरअर्जदार क्र. 2 कडून उतरविला होता ही बाब नि.क्र.23 वरील विमा पॉलिसीवरुन दिसून येते. त्यामुळे तक्रारकर्ता हा गैरअर्जदार क्र. 1 व 2 चा ग्राहक आहे ही बाब स्पष्ट होते. 7. तक्रारकर्त्याचे वाहन हे चालता चालता अचानक बंद पडले असे तक्रारकर्त्याने तक्रारीत नमूद केले आहे. परंतू ते कोणत्या दिनांकास बंद पडले हे नमूद केले नाही. त्यामुळे गैरअर्जदाराने ते वाहन बंद पडल्यानंतर व त्या तारेखनंतरच त्याला दुरुस्तीचे ईस्टीमेट दिले काय? याबद्दलचा निष्कर्ष काढणे योग्य नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याच्या वाहनामध्ये काय दोष निर्माण झाला व ते कधी बंद पडले आणि त्यानंतर ते वाहन गैरअर्जदार क्र. 1 च्या सुपूर्द केले याबाबत जोपर्यंत पाठपुरावा करणारे दस्तऐवज समोर आणित नाही तोपर्यंत त्याबाबतचा कोणताही निर्णय घेणे मंचास शक्य होणार नाही. 8. तक्रारकर्त्याने तक्रारीमध्ये वाहनामध्ये सुरुवातीपासून दोष होता ही बाब नमूद केलेली आहे. जर वाहनामध्ये सुरुवातीपासून दोष होता तर ते वाहन दोषयुक्त होते किंवा नव्हते हे सिध्द करण्याची जबाबदारी तक्रारकर्त्याची होती व त्याकरीता विशेष तज्ञांचा अहवाल दाखल करणे आवश्यक होते. परंतू तसे सदर प्रकरणी तक्रारकर्त्याचे केलेले नाही. 9. तक्रारकर्त्याने सदर तक्रारीद्वारा रु.7,00,000/- ची मागणी केलेली आहे व वाहन पूर्ण सेवानिष्ठेने परत करावे अशी मागणी केलेली आहे. परंतू सदर प्रकरणात त्यांनी विमा कंपनीला गैरअर्जदार क्र. 2 म्हणून विरुध्द पक्ष केलेले आहे, ते कशाकरीता व कोणत्या कारणास्तव केले याबाबतचा कोणताही खुलासा तक्रारीत नाही. त्यामुळे मंचाचे असे मत आहे की, तक्रारकर्त्याने सविस्तरपणे आवश्यक ते दस्तऐवज तक्रारीसोबत दाखल करावे. त्याशिवाय त्यावर निर्णय देणे योग्य होणार नाही. करीता मंचाचे मते तक्रारकर्त्याने संपूर्ण तथ्यासह व दस्तऐवजासह परत तक्रार दाखल करण्याची अनुमती देण्यात येते. वरील सर्व निष्कर्षाच्या आधारे मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. -आदेश- 1) तक्रारकर्त्याची तक्रार निकाली काढण्यात येते. 2) उभय पक्षांनी आप-आपला खर्च स्वतः सोसावा.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |