मंचाचे निर्णयान्वये सौ. जयश्री येंडे, सदस्या.
- आदेश -
(पारित दिनांक – 30/04/2012)
1. तक्रारकर्त्यांनी सदर तक्रार या ग्रा.सं.का.1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे. प्रस्तुत प्रकरणातील तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार, तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांकडून 06.11.2008 रोजी फेबीया स्कोडा कार नोंदणी क्र. एम एच 31/सी आर 9948 हे वाहन रु.8,50,000/- मध्ये खरेदी केले. सदर रकमेपैकी डाऊन पेमेंटपोटी तक्रारकर्त्याने रु.2,43,200/- गैरअर्जदारांकडे जमा केली व उर्वरित रक्कम टाटा कॅपिटल लि. यांनी फायनांस केली. त्याची परतफेड प्रतिमाह किस्त रु.14,910/- प्रमाणे होती व रु.40,000/- किंमतीची श्रृंगार सामग्री वाहनाला लावली होती. दि.26.07.2009 रोजी सदर वाहनाच्या इंजिनमध्ये दोष निर्माण झाला, म्हणून तक्रारकर्त्याने गैरअर्जदार यांचे सुचनेवरुन सदर वाहन सर्व्हिसिंगकरीता दिले. दि.28.07.2009 रोजी गैरअर्जदाराने लेखी नोटीसद्वारे सदर वाहन त्यांच्या आवारात जळालेले असल्याचे कळवून तक्रारकर्त्यास सहकार्य करण्याची विनंती केली व असेही आश्वासन दिले की, जे नुकसान झाले, त्याची भरपाई विमा कंपनी करुन देईल व गैरअर्जदार तक्रारकर्त्यास त्याच मॉडेलचे नविन दुसरी कार देईल. तक्रारकर्त्याने गैरअर्जदार यांना सर्व कागदपत्रासह सहकार्य केले. परंतू वारंवार मागणी करुनही आपले आश्वासन पूर्ण केले नाही. शेवटी नुकसान भरपाई म्हणून केवळ रु.38,000/- देण्याचे कबुल केले. परंतू सदर भरपाई अत्यल्प असल्यामुळे तक्रारकर्त्याने ती नाकारुन सदर कारची संपूर्ण रक्कम अथवा नविन कार देण्याची विनंती केली. परंतू गैरअर्जदारांनी त्याकडे लक्ष दिले नाही. वास्तविक सदर वाहन त्यांच्या आवारात जळाल्यामुळे नुकसान भरपाई देण्याची सर्वस्वी जबाबदारी गैरअर्जदारांची आहे व ती त्यांनी पार पाडली नाही. ही गैरअर्जदार यांची कृती सेवेतील कमतरता दर्शविते. म्हणून तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमोर दाखल करुन, कारची संपूर्ण नुकसान भरपाई मिळावी किंवा नविन फेबीया स्कोडा कार द्यावी, मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासाबाबत रु.2,00,000/- भरपाई मिळावी, तक्रारीचा खर्च मिळावा अशा मागण्या केल्या.
2. सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदाराला देण्यात आली असता त्यांनी तक्रारीस लेखी उत्तर दाखल केले. गैरअर्जदारांच्या कथनानुसार ते स्कोडा कंपनीचे डिलर आहे. तसेच ते सर्व्हिस सेंटरदेखील आहे. गैरअर्जदार यांनी तक्रारकर्त्याचे सदर वाहन त्यांच्याकडून घेतल्याचे, तसेच तक्रारकर्त्याने डाऊन पेमेंट केल्याचे, वित्त सहाय्य घेऊन उर्वरित रक्कम दिल्याचे, कर्ज हप्तेपोटी रु.1,04,370/- रक्कम अदा केल्याचे, या सर्व बाबी गैरअर्जदारांनी मान्य केलेल्या आहेत. परंतू तक्रारकर्त्याचे इतर म्हणणे अमान्य केले आहे. त्याचबरोबर गैरअर्जदार यांनी सदर वाहन सर्व्हिसिंगसाठी त्यांच्या स्टेशनला आणल्यानंतर त्यांच्या आवारात असतांना जळाल्याचे व तक्रारकर्त्यास सहकार्य करण्याची विनंती केल्याचे म्हणणेदेखील मान्य केलेले आहे.
गैरअर्जदार यांच्या कथनानुसार तक्रारकर्त्याला सदर वाहनाच्या विमा दाव्यापोटी आय सी आय सी आय लोंबार्ड इंशूरंस कंपनीकडून रु.6,85,000/- धनादेश क्र. 707662 ची रक्कमदेखील प्राप्त झालेली आहे. तक्रारकर्त्याच्या सदर वाहन पाण्यामध्ये चालविल्यामुळे इंजिनमध्ये दोष आला होता. त्यापोटी अनुभवाप्रमाणे रु.1,00,000/- एवढा खर्च तक्रारकर्त्यास द्यावयाचा होता. गैरअर्जदार यांच्या सर्व्हिस सेंटरला आग लागल्याचे निदर्शनास आल्याबरोबर आगीपासून वाचणारे साहित्य उपयोगात आणले गेले.
तक्रारकर्त्यास विमा कंपनीकडून सदर विमा रक्कम प्राप्त झालेली आहे व त्यासाठी गैरअर्जदार यांनी तक्रारकर्त्यास सहकार्य केलेले आहे. तसेच सदर वाहनाचे मुल्य आजच्या बाजारभावाप्रमाणे रु.5,50,000/- - रु.6,00,000/- एवढे आहे. त्यामुळे तक्रारकर्त्यास भरपूर फायदा झाल्यामुळे तक्रारकर्त्यास गैरअर्जदार हे काहीही देणे लाग नाही. वाहन जेव्हा सर्व्हिसिंगकरीता येते तेव्हा त्याची संपूर्ण जबाबदारी मालकाची असते. तसेच वाहनाचा विमा काढावयाची जबाबदारी ही तक्रारकर्त्याची असते. वरील सर्व बाबी लक्षात घेता गैरअर्जदार यांनी दिलेल्या सेवेत कुठलीही कमतरता आहे असे म्हणता येणार नाही. उलट तक्रारकर्त्याने अधिक नफा मिळण्याच्या हेतूने सदर तक्रार दाखल केली, म्हणून ती खारीज करावी अशी गैरअर्जदाराने विनंती केलेली आहे.
3. प्रकरण युक्तीवादाकरीता आले असता, मंचाने तक्रारकर्त्यांचा युक्तीवाद ऐकला. गैरअर्जदारांनी लेखी युक्तीवाद दाखल केला. मंचाने दाखल दस्तऐवजांचे अवलोकन केले असता खालील निष्कर्षाप्रत आले.
-निष्कर्ष-
4. प्रस्तुत प्रकरणातील एकंदर परिस्थिती, दाखल पुरावे पाहता या मंचाचे असे निदर्शनास येते की, निर्विवादपणे तक्रारकर्त्याने 06.11.2008 रोजी फेबीया स्कोडा कार नोंदणी क्र. एम एच 31/सी आर 9948 हे वाहन रु.6,85,368/- मध्ये (दस्तऐवज क्र.3) खरेदी केले व डाऊन पेमेंटपोटी तक्रारकर्त्याने रु.2,43,200/- गैरअर्जदारांना दिले व उर्वरित रक्कम टाटा कॅपिटल लि. यांनी फायनांस केली. त्याची परतफेड प्रतिमाह किस्त रु.14,910/- प्रमाणे रु.1,04,370/- वित्त सहाय कंपनीला केली होती.
5. निर्विवादपणे तक्रारकर्त्याचे सदर वाहन सर्विसिंगसाठी इंजिनमध्ये निर्माण झालेला दोष दूर करण्यासाठी गैरअर्जदार यांचेकडे दिले असतांना व वाहन त्यांच्या आवारात असतांना दि.28.07.2009 रोजी सदर वाहनास आग लागली होती.
6. दस्तऐवज क्र. 6 वरील दि.28.07.2009 च्या पत्राद्वारे गैरअर्जदार यांनी सदर वाहनाला आग लागून जळाल्याचे तक्रारकर्त्यास कळविले होते व त्यात गैरअर्जदार यांनी दस्तऐवजासंबंधी तक्रारकर्त्यास सहकार्य करण्याविषयी व झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यात येईल असेदेखील नमूद केल्याचे दिसून येते. गैरअर्जदारांचे मते सदर वाहनास अपघात झाला त्यावेळी सदर वाहनाचे बाजार भाव रु.5,50,000/- ते रु.6,00,000/- असा होता व विमा कंपनीकडून तक्रारकर्त्यास रु.6,85,000/- प्राप्त झाले. त्यामुळे तक्रारकर्त्याच्या अधिक फायदा झालेला आहे. त्यामुळे गैरअर्जदार यांचेकडून काहीही घेणे लागत नाही.
7. गैरअर्जदार यांचे शपथेवरील कथनावरुन हेही दिसून येते की, तक्रारकर्त्यास सदर वाहनाच्या नुकसान भरपाईपोटी वित्त कंपनीकडून रु.6,85,000/- (vide cheque No. 707662 from ICICI Lombard Insurance Company + Rs.20,000/- from salvage buyer) प्राप्त झालेले आहे. तक्रारकर्त्याने गेरअर्जदाराचे हे म्हणणे नाकारले नाही. म्हणजेच पर्यायाने तक्रारकर्त्यास सदर वाहनाची किंमत मिळालेली आहे, त्यामुळे तक्रारकर्त्यांची मागणी इतकी नुकसान भरपाईच्या रकमेची मागणी या न्यायमंचाला मान्य करता येणार नाही. त्याचप्रमाणे एकाच वाहनाकरीता दोनदा नुकसान भरपाई देणे कायदेशीररीत्या योग्य नाही. परंतू हेही तितकेच खरे आहे की, सदर वाहन हे गैरअर्जदार यांचे आवारात असतांना आग लागून जळाले. गैरअर्जदार यांच्या ताब्यात वाहन असतांना सदर वाहनाची काळजी घेण्याची जबाबदारी त्यांची होती. ती न घेऊन त्यांनी तक्रारकर्त्याला सेवेत कमतरता दिली आहे. सदर घटनेमुळे निश्चितच तक्रारकर्त्यास मानसिक, शारिरीक त्रास सहन करावा लागला. त्याकरीता निश्चितच गैरअर्जदार जबाबदार आहे. उपरोक्त निष्कर्षावरुन खालीलप्रमाणे आदेश.
-आदेश-
1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याला मानसिक, शारिरीक त्रासाबाबत भरपाई म्हणून रु.10,000/- व तक्रारीच्या खर्चादाखल रु.3,000/- द्यावे.
3) सदर आदेशाचे पालन गैरअर्जदाराचे आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत करावे.